नारीशक्ती

About Power Of Women


नारीशक्ती

"वा! मस्त आहे जेवण! " अनघा आपल्या मैत्रीणींना म्हणाली.

"हो,खूपचं टेस्टी आहे ." मैत्रीणींनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

"आजचा महिला दिन आपण छान एन्जॉय करत आहोत ना!"
सुप्रिया उत्साहात म्हणाली.

" हो ना , आपल्या सात जणींच्या नारीशक्तीमुळे आपण फक्त गृहिणी म्हणून न राहता, समाजासाठी, पर्यावरणासाठी चांगले कार्य करीत आहोत. या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे." मेघा म्हणाली.

"प्रत्येकात काहीतरी गुण असतात,फक्त ते ओळखता आले पाहिजे. आपल्यातील गुण ओळखून त्यांचा योग्य उपयोग केला की,यश मिळतेचं." निशाने आपले मत प्रकट केले.

"आपलचं बघा ना, एक गृहिणी म्हणून आपली ओळख होती पण आज एक संस्था चालवत आहोत." कविता आनंदाने म्हणाली.

"आपण पहिल्यांदा एकमेकींना भेटलो होतो,तेव्हा वाटले नव्हते, आपण एवढे मोठे काम करू शकतो." नेत्रा म्हणाली.

"आपल्या गार्डनिंगच्या छंदामुळे आपण एकमेकींना भेटलो आणि आपल्याला भरभरून आनंद देणाऱ्या निसर्गासाठी काहीतरी करावे या उद्देशाने आपण \"अंकुर सामाजिक संस्था\" स्थापन केली.आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या संस्थेच्या यशस्वी वाटचालीचे सेलिब्रेशन करत आहोत.. हो,ना !"
पूजा म्हणाली.

"हो, नक्कीच.."सर्व मैत्रीणींनी एकसुरात रिप्लाय दिला.

अनघाला लहानपणापासून बागकामाची आवड होती आणि लग्नानंतरही तिने आपली आवड जोपासली.लग्नानंतर सुरूवातीला नवीन संसार,आईपणाची जबाबदारी यामुळे आपल्या आवडीनिवडी या गोष्टींसाठी तिला पाहिजे तेवढा वेळ मिळत नव्हता. पण काही वर्षांनी मुलगाही मोठा झाला आणि घरातील कामे करून थोडा वेळही मिळू लागला. तो वेळ ती आपल्या आपल्या आवडत्या कामासाठी खर्च करू लागली. सोशल मिडिया वर तिने गार्डनिंगचा ग्रुप पाहिला आणि त्यात जॉईन झाली. त्यामुळे तिला बागकामाची खूप माहिती मिळू लागली आणि तिची बाग छान फुलू लागली. या ग्रुपमुळे तिला मैत्रीणीही मिळाल्या..आणि त्याही तिच्या घरापासून कमी जास्त अंतरावर राहणाऱ्या होत्या सर्व. त्यामुळे एकमेकींना भेटणे शक्य झाले. एका ग्रुपच्या माध्यमातून, झालेल्या ओळखीचे रूपांतर एका छान मैत्रीत झाले होते.

प्रत्येकीने आपली बाग छान फुलवली होती.

\"फक्त बागकामच नाही तर आपण आता अजून काहीतरी करू \"
असा विचार अनघा व तिच्या मैत्रीणींनी केला.

झाडे लावणे,झाडांची काळजी घेणे, घरच्या घरी कंपोस्ट बनवणे,रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खतांचा वापर करणे.या सर्व गोष्टी इतर महिलांना समजावून सांगणे आणि तसेच दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरा मुळे होणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून शक्य तितके प्लास्टिकचा वापर टाळणे आणि घरात आलेल्या प्लास्टिकला रिसायकलिंग ला देणे. प्लास्टिक रिसायकलिंग बरोबर घरातील जुने कपडे, ई-वेस्ट, वापरात नसलेल्या जुन्या वस्तू हे ही रिसायकलिंग ला देणे.
हे काम प्रत्येकीने आपल्या स्वतः पासून सुरू केले.
यासाठी त्यांना सोशल मीडियाचा चांगला फायदा झाला. त्यांनी अशा संस्था शोधून काढल्या ज्या पर्यावरणासंबंधी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या आहेत.
सरकारमान्य संस्था निर्माण झाल्यावर त्यांनी महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेतला आणि संबंधित अधिकारी वर्गाला आपण करत असलेल्या कार्यासंबंधी माहिती दिली.
अधिकाऱ्यांच्या संमतीपत्राने आपल्या शहरातील शाळांमध्ये ,विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेतले,जेणेकरून त्यांच्यात निसर्गाबद्दल प्रेम वाढेल आणि प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण स्वच्छ करण्यास त्यांचा हातभार लागेल.
भावी पिढीला मोकळा आणि स्वच्छ श्वास घ्यायचा असेल तर प्रदुषणमुक्त पर्यावरणाची गरज आहे. आणि मुलांना लहानपणापासून चांगल्या सवयी लावल्या ..जसे झाडे लावून त्यांची काळजी घेणे,इतरत्र कचरा न टाकता ,कचरा कचरापेटीत टाकणे,स्वच्छता ठेवणे.यामुळे मुलांना स्वच्छतेचे महत्त्व कळेल.

फक्त शाळाच नाही तर वेगवेगळ्या सोसायटीत जाऊन महिलांना स्वच्छता ,पर्यावरण यासंबंधी माहिती सांगणे आणि महत्त्व समजावून सांगणे.
हे सर्व कामे \"अंकुर सामाजिक संस्था\" करू लागली.


कोविड काळात गरजूंना मास्क,किराणा वाटप केला.

काही गरिब व गरजू स्त्रियांना शिलाईयंत्र घेऊन दिले.

संस्थेला पैसे मिळावे म्हणून वेगवेगळ्या वर्कशॉप घेऊ लागले.

संस्था स्थापन करण्यापासून ते तिला मिळत आलेल्या यशापर्यंतचा प्रवास खूप सोपा नव्हता.

अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण घरातील व्यक्तींना आपला काही त्रास न देता सात ही जणींनी आपल्या घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत सर्व संकटात सामोरे जात संस्था उभारली.
संस्थेची सर्व कामे या सात जणीच करतात. प्रत्येक जण आपल्या बुद्धीचा, गुणांचा योग्य उपयोग आपल्या संस्थेसाठी करत असतात.

सुरूवातीला त्यांच्या घरातील व्यक्तींचा हे सर्व करायला विरोध होता. कारण यामुळे घराकडे दुर्लक्ष होईल असे त्यांना वाटत होते. पण जेव्हा संस्थेला बक्षिसे, सर्टिफिकेट मिळू लागले, तेव्हा आनंदही होऊ लागला. काहींना घरातून सपोर्ट मिळू लागला पण ज्यांना नाही मिळाला त्याही आनंदाने संस्थेसाठी आपले योगदान देऊ लागल्या.

जगात खूप साऱ्या समस्या आहेत. आपण सर्वच तर नाही दूर करू शकत पण आपल्याकडून जेवढे चांगले करता येईल तेवढे करत रहावे.
पर्यावरण रक्षणासाठी आपणही खारीचा वाटा उचलू या.

या उद्देशाने अनघा व तिच्या मैत्रीणी संस्था चालवित आहे.

आज वेगवेगळ्या क्षेत्रात महिला कार्यरत आहेत.
स्त्री आता अबला नसून सबला झाली आहे.
बंदिनी नसून रणरागिणी झाली आहे.
रडणारी नाही तर लढणारी झाली आहे.
परावलंबी नाही तर स्वावलंबी झाली आहे.

स्त्रीने मनात आणले तर ती आकाशालाही गवसणी घालू शकते.
स्त्री शिक्षित असो की अशिक्षित.
गृहिणी असो की नोकरी करणारी
तिला तिच्या नारीशक्तिची जाणीव झाली की, ती आत्मविश्वासाने यशाची शिखरे चढू लागते.

एक स्त्री म्हणून
मला आहे खूप अभिमान
प्रत्येक स्त्रीच्या स्त्रीत्वाचा
करते मी मनापासून सम्मान


समाप्त

नलिनी बहाळकर