नाण्याच्या दोन बाजू (कविता)

Description About Happyness And Sadness
विषय: सुखाची परिभाषा

कवितेचे नाव: नाण्याच्या दोन बाजू

कर्पूरा सम जळते सुख
अन्
दुःख अगरबत्ती समान

उगाळल्या दुःख जाते फार
अन्
सुख उडते अत्तरा समान

सुतळी बॉब क्षणात फुटतो सुखाचा
अन्
दुःखाचा भुईनळा वेदनेच्या पाऊसा समान

सहवास दुःखाचा त्रासदायक फार
अन्
सुखाचा दरवळ सुगंधा समान

सारे सज्ज कवटाळण्या सुख
अन्
दुःख वागविले जाते अस्पृश्या समान

चिवट दुःख जगते फार
अन्
सुख क्षणभंगूर आयुष्या समान

दिव्याचा प्रकाश म्हणजे सुख
अन्
दुःख अंधकारा समान

कायम झिजते दुःख फार
अन्
सुख गर्जते जयकारा समान

अमृताची गोडी घेई सुख
अन्
दुःख झिडकारले जाते विषा समान

पदोपदी शिकविते दुःख फार
अन्
सुख जपतो आपण छंदा समान

गर्वाची बाधा होते सुखाला
अन्
दुःख पाया घट्ट करते वृक्षा समान

सुखाला दुःखाची साथ फार
अन्
आयुष्याची वाटणी करती सम समान

स्फूर्ती देई सुख
अन्
दुःख नैराश्या समान

सुख दुःख आयुष्याचे सोबती
अन्
संसार यांचा नवरा बायको समान

रूसता सुख, दुःखही हसवते फार
अन्
अवचित सुखही ओघळते अश्रू समान

निव्वळ सुखाची परिभाषा अवघड फार
कारण
सुख दुःख नाण्याच्या दोन बाजू समान

©️ अंजली मीनानाथ धस्के
पुणे