Login

नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग ६

कथा एका प्रेमीयुगुलाची
नांदू द्या ना सौख्यभरे.. भाग ६

मागील भागात आपण पाहिले की पूजेनंतरच्या पहिल्याच दिवशी ज्योतीताई सानवीला पुरणपोळ्या करायला सांगतात. आता बघू पुढे काय होते ते.


" तू हो म्हणायला का सांगितलेस?" सानवीने रागाने विचारले.

" आमच्याकडे पुरणपोळ्या म्हणजे सुगरणपणाची कसोटी मानली जाते. माझ्या बायकोला कोणी नावे ठेवू नये म्हणून.." सानवीच्या गालावरून बोटं फिरवत अनिरुद्ध म्हणाला.

" नको त्या वेळेस नको त्या ठिकाणी बरा रोमांस सुचतो तुला." सानवी अनिरुद्धला फटकारत म्हणाली.

" तुला बघून ज्याला रोमांस सुचणार नाही तो... मला तर शब्दच सुचत नाहीत बघ."

" मस्का पॉलिश सोड.. डाळ धुवायला घे." सानवी म्हणाली.

" तुला पुरणपोळी येते?" अनिरुद्धने आ वासला.

" मला फक्त पुरणपोळीच येते.." सानवी अनिरुद्धला डोळा मारत म्हणाली. अनिरुद्धने डाळ धुवून कुकरला लावली. वेलचीची पूड करून दिली. तोपर्यंत सानवीने कणिक भिजवली. भज्यांचे पीठ करून ठेवले.

" मी काय म्हणतो, कुकर गार व्हायला थोडा वेळ आहे तोपर्यंत थोडा.." अनिरुद्ध सानवीच्या जवळ येत म्हणाला.

" काय थोडा??"

" थोडा रोमांस केला तर??"

" तू वेडा झाला आहेस.." अनिरुद्धला पाठी ढकलत सानवी हसत म्हणाली. अनिरुद्धच्या कोणत्याच गोष्टीला दाद न देता सानवीने स्वयंपाकाकडे लक्ष दिले आणि त्यालाही द्यायला लावले.

" अग, साधं पाणी हवं आहे मला. त्यासाठी तू कशाला आत आलं पाहिजे?" आत्याचा आवाज ऐकून अनिरुद्ध बाहेर जाऊ लागला.

" असं काही नाही वन्स.. तुम्हाला त्रास नको म्हणून." ज्योतीताईंचा आवाज आला. तोपर्यंत आत आलेल्या आत्या अनिरुद्धला बघून थांबल्या.

" अस्सं.. म्हणून जाऊ देत नव्हतीस का मला आत? हा इथे आहे म्हणून? काय ते सुनेचे आणि लेकाचे लाड.. देवा.."

" आत्या, मी पण इथे तुझ्यासारखंच पाणी प्यायला आलो होतो. चल बाहेर जाऊ. मी तुला लग्नातले तुझे फोटो दाखवतो." अनिरुद्ध आत्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाला.

" फोटो आले पण?"

" मग काय?" अनिरुद्ध आत्याला घेऊन बाहेर गेला. ते बघून ज्योतीताईंनी सानवीला विचारले,

" काय ग, जमल्या का तुला पोळ्या?"

" बघा तुम्हीच.." सानवीने पोळ्या करायला सुरुवात केली. तव्यावर टम्म फुगलेली पोळी बघून ज्योतीताई खुश झाल्या.

" गुणाची ग माझी पोर.." म्हणत त्यांनी सानवीची अलाबला काढली. आल्यागेल्या प्रत्येकाला त्या सानवीचे कौतुक सांगत होत्या. घरातले सगळेसुद्धा पुरणपोळी खाऊन तृप्त झाले. माधवरावांनीदेखील सानवीचे कौतुक केले. जेवणं झाल्यावर आत्या त्यांच्या घरी गेल्या. संध्याकाळपर्यंत सगळेच नातेवाईक आपापल्या घरी गेले. घर अगदी शांत झाले. अनिरुद्ध आणि सानवीदेखील हनिमूनसाठी सिमल्याला जायची तयारी करू लागले.

" तू आईबाबांना सांगितले आहेस ना?" सानवीने बॅग भरता भरता विचारले.

" हो ग. आणि तू तुझ्या आईबाबांना?"

" हे बरं आहे. मी तुझ्या आईबाबांना फक्त आईबाबा म्हणायचं आणि तू? तुझे आईबाबा?" सानवी चिडून म्हणाली.

" अग ए.. ते कन्फ्युजन नको म्हणून. नाहीतर असं करतो की त्यांना ममी पपा म्हणतो. तसंही तू पण कधी कधी तेच म्हणतेस ना?"

" हं.. ते चालेल." हनिमूनला जाताना भांडण नको म्हणून सानवी गप्प बसली. आणि दोघेही पुढचे आठ दिवस काय काय फिरायचे या स्वप्नात दंगून गेले.

" तिथे गेल्यावर फोन करा रे. आणि काळजी घ्या एकमेकांची. समजलं का? आणि रोज फोन करायचा.. नाहीतर एक दिवस कराल आणि नंतर विसरून जाल." माधवराव आणि ज्योतीताई सूचना देत होत्या.

" ए वहिनी, माझ्यासाठी काय आणशील ग? की विसरशील तिथे गेल्यावर मला?" रियाने विचारले.

" तुला बरी विसरीन? माझी छोटीशी नणंदबाई.. तुला फोटो पाठवीन. जे हवं ते सांग मला." सानवी म्हणाली.

" निघायचं का आता? उशीर होतो आहे." अनिरुद्ध घड्याळात बघत म्हणाला. दोघेही निघाले. अनिरुद्ध सानवीच्या जवळ बसायला जाणार तोच सानवीचा फोन वाजला.

" आईचा फोन.." सानवी आनंदाने ओरडली.

" सानू.. काय ग हे.. लग्न झालं आणि विसरलीस की काय आम्हाला?" शोभाताईंनी बोलायला सुरुवात केली.

" अग आई, असं काही नाही." आईचे बोलणे ऐकून सानवीचा चेहरा उतरला.

"असं काही नाही म्हणतेस.. आणि फोनही केला नाहीस बघ."

" अग आई, परवा पूजा झाली. मग काल पुरणपोळ्या आणि आज जायची तयारी. त्यात तुला फोन करायला फोन हातात घेतला की कोणीतरी यायचं आणि फोन करायचं राहून जायचं." अपराधीपणाने सानवी बोलली.

" हो का? मग काय बोलायचे आम्ही? निघालात का?"

" हो.. "

" तिथून आलात की सांग. मग मांडवपरतणी करायला घ्यायला येऊ आम्ही."

" बरं.. बाबा कुठे आहेत?"

" हे काय आहेत ना इथेच. तू नाहीस तर माझं डोकं खातात नुसतं."

" हॅलो सानू.. आईकडे लक्ष देऊ नकोस. तू तिथे सुखी रहा. आम्ही इथे छान मजेत आहोत. आणि अनिरुद्ध कसा आहे?" प्रदीपरावांनी विचारले.

" बाबा, तो छान आहे. बोलताय का?"

" नको.. तुम्हाला जास्त त्रास देत नाही. तुम्ही मजा करा. आल्यावर बोलू. पण रोज फोन करायला विसरू नकोस. काळजी वाटते."

" हो बाबा." डोळ्यातलं पाणी पुसत सानवी म्हणाली.

" काय झालं?" अनिरुद्धने विचारले.

" आईबाबा एकटे पडले आहेत. आपण परत आल्यावर ते मला न्यायला येणार आहेत."

" न्यायला म्हणजे?" अनिरुद्धने विचारले.

" न्यायला म्हणजे मी आठ दिवस माझ्या घरी जाणार."

" अजिबात नाही.. मी फक्त एक दिवस तुला तिथे जाऊ देणार, दुसर्‍या दिवशी लगेच तुला घ्यायला येणार." अनिरुद्ध बोलत होता.

" नाही हं.. मी पंधरा दिवस तिथे राहणार."

" तू गेले पंचवीस वर्ष तिथेच रहात होतीस ना?"

" ओ लव्ह बर्डस तुम्ही तुमचा गोड वाद विमानात घालाल का? तुमचं बोलणं ऐकून मला मी कुठे आणि किती दिवस रहायला जायचं हा प्रश्न पडायला लागला." गाडी चालवत असलेला विरेन पाठी वळून बोलला. ते ऐकून सानवी गोरीमोरी झाली.

" शहाण्या, तुझं लग्न होऊ दे मग बघतो तुझ्याकडे.." अनिरुद्ध विरेनला धमकी देत म्हणाला.

" तू काय बघणार? तेव्हा तू तुझ्या चिल्ल्यापिल्ल्यांमध्ये मग्न असणार. शोनू, भाता खाऊन घे.. ए बबड्या तिकडे नाही जायचं बरं का.. मला तर वाटतं मला एखादा नवीन माणूस शोधायला लागेल गाडी चालवण्यासाठी." विरेन गंभीर स्वरात बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून सानवीला हसू यायला लागले.

" म्हणजे तू अजून दहा वर्ष लग्न करणार नाहीस?" चेहर्‍यावर खोटे आश्चर्य दाखवत अनिरुद्धने विचारले.

" दहा वर्ष का?" विरेन गोंधळात पडला.

" कारण आमची पंचवार्षिक योजना आहे. दुसरं बाळ येईपर्यंत दहा वर्ष तरी लागणार. मग तू तोपर्यंत थांबणार?"

" अनिरुद्ध.." मुलांचा विषय ऐकून सानवी लाजली.

" तू पण ना.. वहिनी इथे आहेत म्हणून काही बोलत नाही. तू भेट मला नंतर."

" प्लिज , मला वहिनी नका ना म्हणू. सानवी म्हटलेलं जास्त आवडेल मला."

" वहिनी, मी जर तुम्हाला नावाने हाक मारली ना तर प्रलय येईल इथे. त्यापेक्षा नकोच."

गप्पा मारता मारता ते विमानतळावर कधी येऊन पोहोचले ते त्यांना समजलच नाही. विरेनने अनिरुद्धला सगळं सामान काढायला मदत केली. शेवटची बॅग त्याने बाहेर ठेवली.

" चल, निघतो मी. काळजी घ्या. आणि तिथून निघालास की फोन कर. मी येतो गाडी घेऊन." विरेन म्हणाला.

" आम्ही येऊ की ओला उबेरने." सानवी पटकन म्हणाली.

" किती काळजी आहे ना बायकोला नवर्‍याची?" विरेन म्हणाला.

" म्हणजे?" काहीच न समजून सानवीने विचारले.

" म्हणजे मी माझ्या हनिमूनवरून आल्यावर तुमच्या नवर्‍याला त्रास नको म्हणून म्हणताय ना?" विरेनने विचारलं.

" अरेरे.. माझ्या मनात तसं काही नव्हतं. अनिरुद्ध तू सांग ना."

" विरेन , मस्करी बंद कर. मी तिथून निघालो की कळवतो. आणि आईबाबांची काळजी घे." त्याला मिठी मारत अनिरुद्ध म्हणाला.

" ते पण सांगायला पाहिजे का? चल निघ. तुला उशीर होतो आहे." बोलून विरेन निघाला सुद्धा.

" हा तुझ्या आईबाबांची काळजी सुद्धा घेतो?" विरेन गेला त्या दिशेने बघत सानवीने विचारले.

" त्याच्या जीवावर तर मी शहरात नोकरी करतो. आईबाबांना काय हवं नको ते सगळं तो बघतो." अनिरुद्ध अभिमानाने म्हणाला.

" माझे आईबाबा मात्र तिकडे एकटे पडले आहेत." चेहरा पाडून सानवी म्हणाली.

" सानवी , पुढचे काही दिवस आपल्या आयुष्यातील सगळ्यात रोमँटिक दिवस असणार आहेत. तुझे माझे आईबाबा, काम हे सगळं आयुष्यभर चालूच राहणार. त्याचे सावट आत्तापासूनच नको ना." अनिरुद्ध गंभीरपणे बोलला.

" हो बाबा.. आता फक्त तू आणि मी.. बाकी कोणीच नाही." सानवी अनिरुद्धला हसवायचा प्रयत्न करत म्हणाली.


अनिरुद्ध सानवीला जगायचे आहे छानसे सुखी, प्रेमाने भरलेले आयुष्य.. जमेल का त्यांना? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all