Oct 16, 2021
Kathamalika

नंदिनी ... श्वास माझा 83

Read Later
नंदिनी ... श्वास माझा 83
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

भाग 83

 

( आधीच्या भागात : हळदीचा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडतो . नंदिनी राजला हळद लावते तर तिचा तो स्पर्श त्याला वेगळा वाटतो....आणि म्हणून तो तिला मर्यादे मध्ये राहायला हवे असे सांगतो. येवढे बोलून सुद्धा त्याच्या डोक्यात मात्र नंदिनी असते आणि तिचा झालेला स्पर्श...बऱ्याच वेळ विचार करून तिला विचारायचं ठरवत तो बाहेर येतो तर त्याला कळते तिचे अमेरिका वरून मित्र आले आहेत.... त्याला वाटते की तिला आवडणारा तो मुलगा सुद्धा आला असेल....म्हणून तिला विचारायचं तो कॅन्सल करत मागच्या पावली फिरतो. संगीत कार्यक्रम छान सुरू असतो. शेवटी नंदिनीची वेळ येते.. आणि ती  स्टेजवर जाते ... ती तिथे सांगते की आज ती तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीची ओळख करून देईल . आता पुढे ) ...

 

"  मी गाणं नाही म्हणणार आहे की डान्स नाही करणार आहे ... मी आज इथे एक कथा  सांगणार आहे .... कथा एका राजकुमाराची ... .....".....नंदिनी

 

राजचे डोके मात्र सुन्न झाले होते..... त्याने नंदिनीच्या आनंदासाठी येणारी परिस्थिती स्वीकारली होती....येणाऱ्या परिस्थितीचा तो सामना करायला तयार सुद्धा  होता....पण तरीही  आपल्या प्रेमाला दुरावतांना  तो बघू शकत नव्हता....ती ज्या मुलाबद्दल सांगणार होती,  त्याच्याने ते ऐकवल्या जाणार नव्हते....आणि म्हणूनच तो तिथून बाहेर जायला निघाला होता.....

 

नंदिनीचे बोलता बोलता सगळं लक्ष राजकडे होतें...

 

" राज , तू माझ्या अवॉर्ड शो ला आला नव्हता... पण आज मी तुला माझे ऐकल्या शिवाय जाऊ देणार नाही ....  आज तुला माझे ऐकावेच लागेल.....".... पाठमोऱ्या राजकडे  बघत मनातच ती विचार करत होती.... आणि तिने कोणाला तरी एक इशारा केला तसे हॉल मधले सगळे लाईट बंद झाले .... आणि एक प्रोजेक्टर सुरू झाले ...

 

अचानक लाइट्स बंद झाल्यामुळे चालता चालता राज थोडा गोंधळला आणि भानावर आला......अचानक काय झाले , हॉलची व्यवस्था कशी गडबडली म्हणून  तो मागे वळला....तर त्याला नंदिनी उभी होती तिथे तिच्या मागे पडद्यावर लहान मुलांचे फोटो दिसत होते ...... आणि ते बघून तो अवाक् झाला ... फोटो मधले ते लहान मुलं दुसरे तिसरे कोणी नसुन नंदिनी आणि राज होते.. ..

 

" नंदू .....".... त्याचं सगळं लक्ष नंदिनीच्या फोटोवर स्थिर झाले... तोच ती तिच्या आबांच्या वाड्याच्या समोर बसलेली सात वर्षाची गोबऱ्या गालांची , हिरव्या डोळ्यांची .... निरागस ... शरूची नंदू...... तिचा तो फोटो बघून त्याच्या ओठांच्या कडा आपोआप रुंदावल्या....

 

हॉलमध्ये एकदम शांतता पसरली होती..... लहान मुलांना सुद्धा काहीतरी गंमत सुरू आहे वाटत होते....

 

" ही कथा आहे एका राजकुमाराची .... हो राजकुमाराच....परिकथांमध्ये वाचतो अगदी तसाच... कुठल्याही मुलीला हवाहवासा....तर कथा एका राजकुमाराची.....हुशार , प्रेमळ, साहसी ,   संयमी , हळवा प्रसंगी खणखर  ..... अगदी पारीसा सारखा... ज्याच्याही आयुष्यात जाणार ... त्याच्या  आयुष्याचे सोने बनवणार....

 

" ही कथा आहे एक राजकुमाराची आणि एका साधारण मुलीची .... पण राजकुमार तिच्या आयुष्यात आला आणि त्याने त्याच्या जादूने त्या मुलीला अगदी परी बनवले.... त्याची परीराणी .....

 

" परिरानी सात वर्षाची होती तेव्हाच परदेशीचा  राजकुमार सोनेरी पावलांनी  तिच्या आयुष्यात आला ...

 

" इटूकली पिटूकली परी आणि पिटूकलाच राजकुमार

 

परी गाल फुगवून बसली होती दारात

 

राजकुमाराला ते आवडले नाही

 

सगळ्यांना डटावत ,त्याने केली परीची मनधरणी

 

परी खुदकन हसली , आणि झाली दोघांची मैत्री

 

जीवापाड मैत्री... राजकुमाराने आपल्या प्रत्येक श्वासासोबत जपली.

 

" दोघंही सारखेच , खोडकर , खट्याळ , मस्तीखोर , सगळ्यांना सतावून सोडणार

 

पण त्यात राजकुमार थोडा समजदार,

 

परीने केलेली सगळी गडबड ,सगळ्या चुका तोच निस्तरणार.......

 

लहानसा राजकुमार , लहानशीच परी

 

पण तरीही राजकुमाराने जपले तिला नाजूक फुला परी

 

" वर्षातून एकदा भेटायचे आणि मग पूर्ण वर्ष एकमेकांच्या ओढीने एकमेकांची वाट बघण्यात काढायचे .

 

दिवसामागून दिवस सरले , वर्षांमागून वर्ष

 

परी आणि राजकुमाराचे पदार्पण झाले तारुण्यात

 

लहानपणीची या  घट्ट मैत्रीचे रुपांतर आता होऊ लागले होते प्रेमात

 

दिली प्रेमाची कबुली , घेतली वचने एकमेकांना साथ देण्याची .....नेहमीच सोबत राहण्याची ..

 

" राजकुमाराचे होते स्वप्न स्वबळावर राज्य कमवायचे , 

 

त्यासाठी त्याने ठरविले दूरदेशी  जाण्याचे , अर्थातच परीची सुद्धा परमिशन घेतली..

 

वचन दिले मोठ्या राजाला , परतून येऊनी घेऊन जाईल माझ्या परीला....

 

जड अंतःकरणाने घेतला  एकमेकांचा निरोप... झाली पावले जड एकमेकांपासून दूर जातांना ..

 

" आणि काळाने घात केला..... ती भेट शेवटची ठरली ,

 

राजकुमार आणि परीच्या प्रेमाची ती मिठी शेवटची ठरली ".... आणि बोलता बोलता तिचा गळा दाटून आला, डोळ्यात आसवे जमा झाली....

 

राज तिच्याकडे बघत उभा होता....ती बोलत होती तशी त्यांची  ती शेवटची भेट  त्याच्या डोळ्यांसमोर आली....आतून तुटणारी नंदिनी , तिचे वाहणारे डोळे, तिची ती मिठी....आणि तिचा तो पहिला कीस ......ते आठवून त्याच्या अंगावर सर्कन काटाच आला.....आणि आपोआप त्याचे डोळे पाणावले....

 

" काही राक्षसांनी परिला त्रास दिला.....आणि काळाने सगळंच हिरावून घेतले....

 

काही वर्षांनी राजकुमार परत आला आपल्या परीला सोबत घेऊन जायला.... पण त्याची परी होती कुठे तिथे??....

 

देवाने अजब लीला खेळली....आणि परीची स्मृती गेली....

 

आपल्या प्रेमाने आपल्याला ओळखावं नाही, ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला ,त्यानेच आपल्याला ओळखावं नाही .... कसं झेपणार होत हे दुःख ? ... बरं हे पण सहन केले असते , पण समोर दिसणारी परीची अवस्था, ती तरी कशी सहन होणार??.. परी अगदी लहान सात वर्षाची बालक  झाली होती....काहीच कळेना ,काहीच वळेना

 

" सगळंच संपले होते....सगळी स्वप्न मातीमोल झाली होती..

 

देवाने परीक्षा घ्यायची ठरवलेच होते, पण राजकुमाराने सुद्धा हार  मानली नव्हती ...केलं त्याने आपल्या परिसोबत लग्न....

 

सगळ्यांनी समजवले , राजकुमार ऐकत नाहीये म्हणून रागवलेही .... ' सोबत घेऊन जायचं परीला तर तसेच घेऊन जा ....कशाला घालतोय लग्नाचा घाट ...? '

 

पण राजकुमाराला आपल्या परिचा मान- सन्मान प्रिय होता...त्याला माहिती होते आपल्या समाजात मुलामुलीने एकत्र राहणं मान्य केले नसते , परीवर बोटं उचलली असती...तिच्या चारित्र्यावर प्रश्न उभे राहिले असते  ...जे त्याला कदापि  मान्य नव्हते....आणि त्याने सगळ्यांच्या विरोधात जाऊन परी सोबत बांधली साता जन्माची गाठ" ...

 

" या नात्याला सगळे हसले , राजकुमाराला मूर्ख ही ठरवले

 

पण त्याने कधीच सोडली नाही परीची साथ.....एकच बोलला तो... परी विसरली आहे माझ्या प्रेमाला...मी नाही ... खऱ्या अर्थानं झाला तो परीचा जीवनसाथी.... " ....नंदिनी

 

नंदिनीचे हे बोलणे ऐकून आजीसाहेबांच्या   डोळ्यात पाणी तरळले...तिचे हे बोल त्यांच्या हृदयाला भिडले होते...त्यांनी राजला न केलेला सपोर्ट , नंदिनीला मुद्दाम  दिलेला त्रास , त्यामुळे एकटा पडलेला राज ...एकहाती तिला सांभाळणारा राज....सगळं सगळं त्यांच्या डोळ्यासमोर येत होते....त्याचे त्यांना आता खूप वाईट वाटत होते ...आणि त्यामुळेच त्यांचं मन सुद्धा भरून आले होते...

 

" एका आईलाच माहिती आहे लहान बाळाला वाढवणे किती कठीण  ....

 

इथे तर राजकुमाराने एका मोठ्या तरुण त्यात पण मुलगी , बाळाला वाढवले आहे .... होता तर तो परीचा नवरा....पण हे नातं तर कुठेच नव्हते.... तो तर झाला होता परीची आई ....

 

एकदाचं वडील, भाऊ , बहीण , मित्र  बनणे सोपे पण आई होणे सोपे नाही ...

 

एखाद्या पुरुषाला आई होणं , ते पण आपल्याच बायकोची.... खरंच सोपी असते काय...??

 

तिचं आंघोळ पाणी ,  खाणं पिणं ,भरलेले नाक तोंड पुसणे .... एखाद्या तरुण मुलीची करावी लागणारी सगळी कामं , कपडे घालून देताना , सगळीच काम करतांना  तिला पौरुशी स्पर्श सुद्धा न करता, तिचं बाल मन जपत , तिला कोमेजू न देता  तिला मोठं समजदार बनवणे ....."....नंदिनी

 

नंदिनीचे हे बोलणे ऐकून राजच्या आई , काकूंना आता खूप वाईट वाटत होते....आपण घरात असूनही त्याला नंदिनीची कामं करावी लागली....आपण साधं तिला कपडे नाही घालू शकलो की तिची वेणी नाही करू शकलो...तिच्या पाळीच्या दिवसात तिची काळजी नाही घेऊ शकलो की तिला समजावून नाही सांगू शकलो....एक पुरुष असूनही  त्याने सगळं केले.......राजच्या आईला तर याचं वाईट वाटत होते की त्याला खरंच जेव्हा गरज होती, तो जेव्हा एकटा पडला होता तेव्हा आपण राजच्या मागे खंबीरपणे उभे सुद्धा नाही राहू शकलो .... पण राज मात्र प्रेमळ, काळजीवाहू आणि खंबीरपणे नंदिनीच्या मागे उभा राहणारा , आई नावाच्या प्रत्येक परीक्षेत पास झाला होता....

 

" राजकुमाराने परिच्या डोक्यावर संरंक्षणाच मजबूत छत्र तयार केले , उडण्यासाठी मजबूत पंख ही दिले....नवीन स्वप्न बघण्याचे धाडस ही दिले आणि त्याला पूर्ण करण्याचे स्वातंत्र्यही दिले.....  प्रसंगी  परिवर उठणारे वाईट हात ही मोडले..... आयुष्यात मनाप्रमाणे जोडीदार निवडण्यासाठी मोकळीक ही दिली.....तो खऱ्या अर्थाने परीचा बाबा झाला ....."....नंदिनी

 

नंदिनीचे हे बोलणे ऐकून शशिकांत ( राजचे वडील ) त्यांना गहिवरून आले .... आपण एक योग्य पिता नाही बनू शकलो हे त्यांना कळले होते.....राजला मदत करायची सोडून त्याच्या विरोधात कट रचले.... त्याच्या मनाचा, आवडीनिवडी कशाचाही  मान न ठेवता बिजनेससाठी त्याचे भांडवल करून त्याचं लग्न एका चुकीच्या मुलीसोबत करायचा प्लॅन केला....नंदिनी त्याची बायको असून सुद्धा राजने  तिच्यावर आपले प्रेम लादले नाही की आपला हक्क गाजवला नाही .... तिला तिचा जोडीदार निवडण्याचा हक्क ही दिला.... त्यांना बाप होण्याची लाज वाटली.....पश्चातापाचे अश्रू त्यांच्या डोळ्यात होते..

 

" राजकुमाराला कितींनी हिणवले....नातेवाईक हसले.....मित्र ही टर उडवू लागले......समाजही हसला....परीला कोणीच स्वीकारेना......ना घरचा ना बाहेरचा..... पण राजकुमार डगमगला नाही......निग्रही मन केले , खूप परिश्रम घेतले.........परी साठी त्याने खुली करून दिली सृष्टीची ,तिचा हक्काची   सगळी दारे.........."....नंदिनी

 

नंदिनीचे हे बोलणे ऐकून आता हॉलमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी जमले होते ..... प्रत्येक नातेवाईकाला त्यांनी राज आणि नंदिनी विरोधात बोललेले शब्द आठवत होते...नंदिनीला पागल म्हणून तिची उडवलेली टर ....नंदिनीला सोडून दे , दुसरं लग्न कर , आपापसात त्याच्यावर केलेले जोक्स.... सगळं सगळं आठवत होते...रश्मीचे नातेवाईक सुद्धा निःशब्द झाले होते...जिथे त्यांना ते गर्विष्ठ श्रीमंत , दिखावा करणारे वाटत होते...त्यांच्याच विचारांची त्यांना लाज वाटली...

 

" पण हे सगळं करतांना तो राजकुमार स्वतहालाच विसरला.... स्वतःची स्वप्न , स्वतच्या आशा अपेक्षा.... स्वतःचे सुख , स्वतःचा आनंद ..... स्वतःचे अस्तित्व सगळं सगळं विसरला.....प्रत्येक नात्यात खरा उतरला...पण स्वतःला हरवून बसला......" ..

 

" देवानेच काय सगळ्यांनी राजकुमाराची  परीक्षा घेतली ....त्याच्या  सहनशक्तीचा अंत पाहिला....पण राजकुमार सगळ्या परीक्षांमध्ये अव्वल दर्जेने पास झाला.... बाहेरच्या जगातही जिंकला , घरातही जिंकला ..... एक खरा उत्तम  माणूस म्हणूनही जिंकला......जिंकणारच होता तो , माणुसकी जपता येत  होती त्याला... ." ....नंदिनीचे डोळे वाहत होते....आवाजात खोलवर ओलावा जाणवत होता....

 

हॉल मधील सगळेच लोकं भाऊक झाली होती......

 

" तर असा हा राजकुमार .... सगळ्यांना हवाहवासा..... "...….नंदिनीने एक पॉझ घेतला....

 

" तुम्हाला माहिती राजकुमार फक्त परिकथेतच नसतात , खऱ्या आयुष्यात सुद्धा  असतात.....

 

" हा माझ्या कथेतील राजकुमार कोण आहे ओळखलं तुम्ही.....? "........आणि नंदिनीने एका इशारा केला आणि तिच्या मागे असलेल्या पडद्यावर राजचा तोच फोटो आला जो नंदिनीने अवॉर्ड शो मध्ये दाखवला होता....

 

" श्रीराज ..... राज ....."..... हॉल मध्ये एकच आवाज आला...

 

" आणि ती परी ??.... ".... पडद्या वरचा फोटो बदलला... आणि आता राज आणि नंदिनीच्या लग्नाचा एक फोटो (अग्नी पुढे  नंदिनीचा हात हातात पकडून लग्नाची विधी करतांनाचा राज )  दिसत होता....

 

" ती आहे  , सौभाग्यवती नंदिनी श्रीराज देशमुख ....राजची परिराणी ..."..... नंदिनी

 

ते ऐकून राजचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले होते ..

 

नंदिनीच्या मागे सुरू असणाऱ्या प्रोजेक्टरवर ती सांगत होती त्या क्रमाने त्यांचे पेंटिंग केलेले फोटो सुरू होते...... नंदिनी जे सांगत होती त्याचं चित्र रूपांतर तिथे सुरू होते...बालपणी केलेली मस्ती , तारुण्य , राज अमेरिकाला जातांनाची शेवटची ती भेट , राज नंदिनीचे लग्न राजने तिला आपल्या हातांवर उचलून घेत घेतलेले सात फेरे , नंदिनीची वेणी घालतांनाचा राज , झुल्यावर बसलेला तिला आपल्या कुशीत घेऊन झोपलेला राज , तिचा हट्ट पुरवत तिला पाठीवर घेऊन फिरणारा राज , तिला जेवण भरवणारा राज , तिच्या सोबत लहान बनून बेडवर उड्या मारणारा राज , तिला बरं नसतांना रात्र रात्र जागणारा राज , तिचा अभ्यास घेणारा राज ....तिला strong बनवणारा राज  ...... तिचा बेस्ट फ्रेंड राज.......असे फोटो एका मागून येत होते ......... हे सगळे फोटो नंदिनीने पेंट केले  होते ...... तिथे असलेला प्रत्येक व्यक्ती ते बघण्यात गुंग झाला होता.....नंदिनीला उद्धट , आगाऊ समजणाऱ्या बायकांचे पण डोळे ओलावले होते....

 

हॉलचे सगळे लाइट्स लागले..... राजला नंदिनी स्टेजवर आपले कान पकडून उभी  दिसली .... 

 

राज पुढे नंदिनीला बघत उभा होता.... येवढ्या दुरून सुद्धा नंदिनीला त्याच्या डोळ्यांतले पाणी दिसले....त्याचा चेहेरावरच्या वेदना स्पष्ट जाणवत  होत्या....तिला पुढे काहीच बोलवेना... आता तिला जगाचं भान सुद्धा राहिले नव्हते ...

 

" सॉरी ......... नकोय तुझ्याशिवाय काहीच .......... घेशील सामावून तुझ्यात? ........".....नंदिनीचा आवाज खूप जड झालं होता.... तिला आता पुढे बोलणं ही कठीण झाले होते.....तिच्या काळजात दुःखत होते , आणि तिच्या आवाजातून राजला ते कळत होते....तिचा आवाज त्याचं काळीज भेदून गेला होता.........आतापर्यंत रोखून धरलेले अश्रू त्याच्या गालांवर ओघळू लागले.......

 

राजने तिच्याकडे बघून होकारार्थी मान हलवली. .... आणि एक पाऊल पुढे टाकले.... जशी त्याने मान हलवली , नंदिनी आपली सुधबुध सगळं विसरून स्टेजच्या पायऱ्या उतरत पळतच राज जवळ आली...त्याला मिठी मारणार तेवढयात तिला त्याचे म्हटलेले वाक्य आठवले...  ' मर्यादेत राहायला हवे ' ........आणि जागेचं , तिथे उपस्थित असलेल्या मोठ्या लोकांचे भान ठेवत ती जागेवरच थांबत त्याच्या पुढ्यात उभी राहिली....

 

तो पण स्थिर एकटक तिच्याकडे बघत उभा होता.... त्याला पण तिला आपल्या मिठीत घ्यायचे होते , प्रेमानं गोंजरायचे होते ... पण  आठ नऊ वर्षांपूर्वी ( अमेरिकाला शिकायला जातांना रस्त्यावर त्यांची भेट ) जसे त्याचे हात बांधल्या गेले होते तसेच आजही बांधले होते....

 

दोघंही एकमेकांना बघत होते ... दोघांचेही डोळे वाहत होते .......एकमेकांना मिठीत घेण्यासाठी दोन्ही शरीर आसुसले होते , हृदयाची गती वाढली होती....कंठ दाटून आला होता.....आता त्यांना शब्दांची गरज नव्हती.... फक्त ते डोळ्यांची भाषा बोलत होते....

 

तेवढयात टाळी वाजण्याचा आवाज आला .... नंदिनीने बाजूला बघितले तर आबा ( राजचे आबा ) उभे होते...त्यांनी तिच्याकडे बघून होकारार्थी मान हलवली..... राज मात्र फक्त नंदिनिकडे बघत होता ...

 

नंतर तिने आजीसाहेबांकडे बघितले तर त्यांनी सुद्धा होकारार्थी मान हलवली.... मग आई , नंदिनीचे आजी आबा , राहुल , शशिकांत , काकी ... तिने सगळ्यांकडे बघितले ... त्यांनी पण होकारार्थी मान हलवली....त्यानंतर एकही क्षणाचा विलंब न करता तिने लगेच राजच्या गळ्यात हात गुंफत त्याला मिठी मारली....आणि तहानलेल्या तप्त धर्तीवर पावसाची पहिली सर यावी आणि एकदम धरती शांत व्हावी तसे काहीसे राजला फील होत  होते ...

 

तिच्या त्या मिठीचा जसा त्याला स्पर्श झाला.....त्याचे श्वास मंदावले.......आपोआप तिच्या भोवती त्याचे  हात गुंफल्या गेले ,  तिच्या भोवतालची मिठी त्याने घट्ट केली.....डोळ्यात पाणी , ओठांवर हसू असे काहीसे दोघांचेही झाले होते... तिला आपल्या मिठीत घेऊन त्याच मन शांत झाले होते......पण  ती मात्र रडत होती... त्याचा स्पर्श झाला आणि तिचा उर दाटून आला होता ....

 

त्याने हळूवारपणे तिच्या हनुवटीला पकडत तिचा चेहरा वर केला.... एका हाताने तिचे डोळे पुसत डोळ्यांनीच तिला रडू नको म्हणून खुणावले....आणि परत  त्याने तिला  आपल्या मिठीत घट्ट पकडून घेतले.....आपोआप त्याचे पाणावलेले  डोळे मिटले गेले....आणि त्याच्या डोळ्यातील एक अश्रू तिच्या गालावर पडला......आणि त्या अश्रुंच्या स्पर्शाने तिच्या हृदयातून एक कळ गेली....आणि  सगळ्यांच्या नकळत त्याच्या मिठीत असतांनाच हळूच त्याचा माने जवळ  तिने छोटंसं किस केले.....रडणारा तो खुदकन हसला..... त्याच्या ओठांवर हसू पसरले.... त्याचा हसण्याचा आवाज आला तशी नंदिनी पण त्याच्या मिठीतच खुदकन हसली......

 

आज त्याची प्रतीक्षा संपली होती , त्याचं प्रेम जिंकले होते ,  त्याचा संयम जिंकला होता... आज जवळपास आठ नऊ वर्षांनी त्याची प्रेमिका , त्याची नंदिनी त्याच्या मिठीत होती.... नेहमीसाठी....प्रत्येक जन्मासाठी...

 

त्या दोघांना बघून एक व्यक्ती खूप खुश झाला होता....त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.....अहो आपला राहुलच.....जसेकाही आज तोच जिंकला होता... उड्या मारताच त्याने पळत येत त्या दोघांना मिठी मारली.....

 

" Sorry guys .... I know I am kababme haddi ..... But I can't wait .....".... राहुल

 

" जळकुकडा...." ...नंदिनिने  एक हाथ त्याच्या पाठीवर ठेवत त्याला जवळ घेतले.....राजने त्याला पण आपल्या मिठीत घेतले....

दूर उभ्या रशमीच्या या तिघांना खुश बघून ओठांवर हसू फुलले होते.....या सहा महिन्यांच्या काळात तिने राहुलला आज  इतके जास्ती आनंदी बघितले होते.....

 

तिघांनाही सोबत हसतांना बघून सगळ्यांनाच आनंद झाला..... आणि सगळ्यांनी आपापले  डोळे पुसत आनंदाने टाळ्या वाजवल्या........

 

******

नंदिनीच्या बाराव्या  भागात वेगळे झालेले राज नंदिनी आज 83 भागात एक झाले ...खूप वेळ लागला, पण कोणावरही कुठल्याच नात्याच ओझं न लादतात , जबरदस्ती न करता त्या व्यक्तीला त्याची पर्सनल स्पेस जपू देत, त्याला त्याचा वेळ घेऊ दिला....... प्रत्येक नातं प्रत्येकाने मनापासून स्वीकारले होते....आणि मनापासून जुळली गेलेली ह्रदये कोणीच दुर करू शकणार नव्हतं....

त्यांच्या प्रेमापुढे देवालाही झुकावं लागलं , त्यांच्या निरागस निस्वार्थ प्रिमाची जीत झाली होती....
म्हणतात ना जे आपलं आहे ते आपल्याजवळ परतून येते....ते आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही ....सगळ्यांसमोर वेगळे झाले होते.... सगळ्यांसमोर हक्काने एक झालेत......जे नातं खरं , आहे , सच्च आहे , पवित्र आहे तिथे लपवाछपवीची गरजच पडत नाही .....

 

******************************************

नमस्कार मित्रांनो ,

ईरा वरील सदाबहार कथा आम्ही pdf स्वरूपात तुमच्या समोर  सादर करत आहोत. होंगे जुदा ना हम, quarantine लव्ह स्टोरी, कळत नकळत, घरकोन, लूप होल, सनकी आणि अश्या अनेक गाजलेल्या कथा त्यात आहेत. प्रचंड गाजलेल्या आणि मनाचा ठाव घेणाऱ्या या कथा आपल्याला नक्कीच आवडतील. संग्रही ठेवण्यासारख्या या कथा आहेत. बऱ्याच वाचकांनी नोंदणी केली आहे त्यांना अंक दिला गेला आहे. ज्यांना अजूनही हवा आहे त्यांनी 8087201815 या नंबर वर 35/- शुल्क भरून पेमेंट स्क्रीनशॉट याच नंबर वर व्हाट्सअप्प करावा. तिथे तुम्हाला अंक देण्यात येईल.

धन्यवाद !!!

****

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "