नंदिनी श्वास माझा बोनस पार्ट C

दिवाळी साजरी करण्याचा हक्क सर्वांना असतो.

नंदिनी श्वास माझा बोनस पार्ट C


पूर्वार्ध: 

रश्मी राहुल यांचे लग्न थाटात पार पडले.. दोन्ही जोडपी आनंदात आपापल्या हनिमूनसाठी बाहेर गेली. 


आता पुढे…. 



         हनिमूनसाठी बाहेर एकत्र वेळ घालवून तीन महिन्यांनी राज नंदिनी घरी परत आले. दोघंही खूप खुश दिसत होते. दोघांचे नाते आणखी घट्ट झाल्यासारखे दिसत होते . नंदिनीने सगळ्यांसाठी खूप गिफ्ट आणले होते . सोबतच जिथे जिथे फिरले होते तिथले सगळे व्हिडिओ , फोटो काढून आणले होते. ती ते सगळ्यांना दाखवत होती , आणि त्या सोबत सगळी माहिती देत होती . 


" नंदिनी एकटीच बघायला गेली होती काय? तू काही नाही बघितले काय ?" काकी राजची मस्करी करत म्हणाल्या. 


" बघितले ना त्याने , हिला! " राहुल खी खी करत हसत होता . नंदिनी डोळे मोठे करत राहूलकडे चिडक्या नजरेने बघत होती. 


" राज , नंदिनी पेक्षा दुसरं काही तिथे सुंदर नसेलच ना? म्हणजे बघण्यासारखे नसेलच ना ?" राहुल परत चिडवायला लागला. त्याचे शब्द ऐकून राज गालातच हसत होता. तो ब्लश करतोय असे वाटत होते. 


"काय आजीसाहेब , सगळे पैसे वाया गेले ना ! हेच बघायचे होते तर हे फोटो Google वरून पण डाऊनलोड करता आले असते." राहूल.  


" राहूल आगाऊपणा नाही हा !" म्हणत नंदिनी त्याला मारायला त्याचा मागे पळाली, तो सुद्धा आता पळायला लागला होता. दोघांची अशीच मारामारी , मस्ती सुरू होती . त्यांना बघून आजीसाहेबांनी डोक्यावर हात मारून घेतला . 


" काय रे , हे ध्यान जसेच्या तसे परत आणले तू? " (नीती) आई राजला म्हणाली.


" रश्मीने तरी कुठे दुरुस्त केला , हा दुसरा ध्यान!" राज. 

 ते ऐकून सगळे खळखळून हसायला लागले. 


*****


                दिवस असेच आनंदात जात होते . आता नंदिनीने सुद्धा ऑफिस जॉईन केले होते . रश्मीचे सुद्धा हॉस्पिटल सुरू होते . घरातून दोघींना ही चांगला सपोर्ट होता. घरातील सून म्हणून कोणीच त्या दोघींवर फालतूच्या अपेक्षा किंवा जबाबदारी लादली नाही. दोघींही वेळ काळ बघून घरातील इतर गोष्टी एडजस्ट करून घेत होते . मात्र सणवार असले की सगळं घर एकत्र हसत. 


            नंदिनी आणि रश्मी ऑफिस सोबतच घर सुद्धा उत्तम प्रकारे सांभाळत होत्या. नंदिनीला अजूनही स्वयंपाकात फार काही करता येत नव्हते. घरी सुद्धा कोणी तिच्यावर काही बळजबरी केली नाही . नेहमी प्रमाणे राज मात्र तिच्या आवडीचे काही ना काही बनवत असत. 


         आता दिवाळी जवळ आली होती . दिवाळी म्हटले की आधीपासूनच नंदिनीच्या आंगात दिवाळी येत. यावर्षी तर तिला रश्मीची सुद्धा साथ होती. रश्मीने फराळाची जबाबदारी तर नंदिनीने शॉपिंगची जबाबदारी घेतली होती. "मी सासू , ही सून , ही माझी कामं नाही" , अशा कोणत्याच फालतूच्या , घराचे घरपण हिरावणाऱ्या गोष्टी त्यांनी आपल्या मध्ये ठेवल्याच नव्हत्या. नंदिनीने घरातील प्रत्येकाला साफसफाई, डेकोरेशन , अशा प्रत्येक कामाला लावले होते. अगदी आजीसाहेबांना आणि सगळ्या पुरुष मंडळींना सुद्धा तिने सोडले नव्हते. त्यामित्त्याने सगळे एकत्र गप्पा करत, लहानपणीच्या गोष्टी , आबा आजींच्या काळातली मजा मस्ती , तेव्हाच्या काळा बाद्दलची माहीत असे सगळं सुरू होते . अधून मधून खाणेपिणे , बनत असलेल्या फराळाची चव घेणे , थट्टा मस्करी , नाचत , गात कामं करत होते .काम जरी करत असले तरी सगळे क्वालिटी टाइम एकत्र घालवत होते. आयुष्यभर पुरतील असे सुंदर क्षण ते सगळे एकेमकांसोबत घालवत होते. उगाच हे काम नाही झाले, हे असेच केले नाही..अशा गोष्टींना तर त्यांनी थारा सुद्धा दिला नव्हता. मुळात सणवार असे आनंदाने साजरे करण्यासाठी असतात, ना की कुरकुरी करण्यासाठी, हे देशमुख परिवाराला उमगले होते. आजीसाहेबांनी तर बोलून सुद्धा दाखवले होते की ही दिवाळी त्यांचा आयुष्यातली सगळ्या सुंदर दिवाळी आहे. कौतुक केल्यामुळे घरातील सूना खुश होत्या. सूना खुश असल्यामुळे क्रमाने पुरुष मंडळी सुद्धा आनंदी होती. 


                धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घरी पूजा होती. या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करून घरात धनधान्य सोबतच आरोग्य सौख्याची प्रार्थना केली जाते. घरातील सगळेच पारंपरिक पद्धतीने तयार झाले होते . पूजेची तयारी झाली होती . पण नंदिनी मात्र गायब होती. सगळे तिचीच वाट बघत होते. बरीच संध्याकाळ झाली होती , आता अंधार पडत आला होता. तरी ती घरी आली नव्हती की तिचा फोन लागत नव्हता. सगळे काळजी करायला लागले होते , आजीसाहेब तर चिडत होत्या. आता राजला तिची खूप काळजी वाटायला लागली होती. त्याचा जीव सुद्धा टांगणीला लागला होता. आता वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये समजून, राहुल आणि राज तिला शोधायला बाहेर पडणार की तेवढयात नंदिनी धापा टाकत घरात आली . 


" नंदिनी तू ठीक आहेस? छाया ताई पाणी आणा." राज नंदिनी जवळ जात काळजीने तिची विचारपूस करत होता . तिने मान हलवून ठीक असल्याचे सांगितले . पण आजीसाहेब मात्र चांगल्याच चिडल्या होत्या. 


" कुठे होत्या इतक्या वेळ ? काही सांगून जाण्याची पद्धत असते की नाही ? उशीर होणार होता तर फोन करून कळवायचे असते, एवढे सुद्धा कळत नाही काय तुम्हाला ?" आजीसाहेब चिडत , रागात बोलत होत्या. 


" ते मी … तिकडे ती गल्ली आहे ना , हा ते कुंभार ,मातीच्या वस्तू बनवतात , त्यांच्याकडे गेले होते . " नंदिनी आजीसाहेबांना रागात बघून अडखळत बोलत होती. 


" कशाला ? दिवे तर तुम्ही आधीच आणले होते , मग आज परत तिकडे का गेल्या ? ते पण घरातील पूजा सोडून ?" आजीसाहेब. आजीसाहेबच्या आवाजाने नंदिनी थोडी घाबरली. 


" राज , ते…. , मी काही दिवस आधी शॉपिंगसाठी बाहेर गेले होते , दिवे विकणाऱ्या बायका , त्यांची लहान मुलं होते तिथे. " आणि पुढे नंदिनी सगळं सांगू लागली. सांगताना ते सगळं तिच्या डोळ्यांपुढे येत होते .


         बाजाराच्या एका कडेला काही बायका , लहान मुलं मातीचे दिवे , कंदील असे वस्तू विकायला घेऊन बसले होते .   


" माय , मले लाडू लई आवडतात , तरी तू बनवत नाही ? तू म्हणली होती दिवाळीला बनवू , बनवशील का आता ? " एक छोटा मुलगा आपल्या आईला म्हणत होता . 


" माय , नवीन कापड घेऊन देशील यावर्षी? हे पाय फाटले माझे कापड ." एक लहान मुलगी आपल्या फाटलेल्या कपड्यामधून दिसत असणारे अंग झाकत म्हणाली.


" माय , आपण फुलझडी घेऊ , अन् त्या सोम्याकडे होत्या तश्या टूचुक टूचुक टिकल्या पण घिऊन देशील ?" 


असेच मुलांचे त्यांचा आईजवळ काही काही घेऊन मागण्याच्या गोष्टी सुरू होत्या. 


" काय रे पोरांना टूनटून लावलाय मगा पासनी? हिथ दोन वेळच जेवाची तरतूद लाग ना , दिवाळीत लक्ष्मी पुढं दिवा लावाया पैस नसे , आन् तुमास गोड धोड खायास पायजे? एवढं पायजेत तुम्हाला तर श्रीमंताच्या घरी जन्म घ्यास पायजेल हुता. रमे, ते कपडे घरी जाऊन शिवून दे तीस , आजुन खूप दिस चालत्यात. परत कामावर गेले तर कोणी ना कोणी देईल जुनं कापड, पुरतील ते. " एक म्हातारी आजी मुलांची त्यांच्या आईच्या मागे सुरू असलेली भूनभून ऐकून ओरडली. तसे त्या लहान मुलांची चेहरे बारीक झालेत. 


" आय , आपल्यासाठी दिवाळी नसते काय ? आपण नाय काय साजरी करायची? पाय ना सगळेच लोकं करत्यात हायेत. सारेच तर खरेदी करत हायीत. त्यांचे कपडे चांगले हायेत तरी ते नवीन कपडे घेत्यात. मग आपण कपडे फाटले तरी नाय का घिऊ शकत ?" 


" घेऊ आपण. हे दिवे , हे सामान , या मुर्त्या विकल्या गेल्या की खूप पैसे मिळतील. मग सगळ्यांना जे पायजे ते करू. आन मस्तपैकी दिवाळी बी साजरी करू . " आईला आपल्या पोरांचे मन दुखवायची हिंमत होत नव्हती, ती त्यांना समजावत म्हणाली. 


" दोन दिवसापासून शंभर रुपये पण कमाई नाय झाली , अन् चालली खरेदी करास . पोरांनो आपली परिस्थिती नाय त्या दुसऱ्या लोकांसारखी. दोन येळ पोटभर अन्न भेटले तरी खूप हाय." आजी मुलांना वास्तविकतेचा, त्यांच्या खऱ्या परिस्थीचा आरसा दाखवत म्हणाली. 


          ते ऐकून आईच्या डोळ्यात पाण्याने काठोकाठ डबडबले. ते बघून पोरांना सुद्धा खूप वाईट वाटत होते. 


" हो आय , ते फुलझडी काय नको मला."


" आय , मला बी ते लाडू नको , भाकरी खाईल मी. पण ताईला कपडे फाटले हायित , तेव्हड घिऊन दे." 


" आय नग , कपडे नग. इथ शिवला की चांगला होते पाय हा कपडा." मुलं आईच्या डोळ्यात अश्रू बघून आपल्या आईला घेरून तिच्या जवळ जात आईला समजावत म्हणाले. 



          पोरांची समजदारी बघून आईच्या डोळ्यात आसवे जमा झाली, हृदयात गलबलून आले. दरवर्षी मुलांना घेऊन देऊ म्हणतो पण काहीच होत नाही . आपल्या पण मुलांनी बाकीच्या मुलांसारखी दिवाळी साजरी करावी , जास्त नाही पण थोडं तरी मुलांसाठी खायला छान छान काही बनवावे , असे त्या माऊलीला वाटत होते. पण परिस्थिती पुढे काय चालत नव्हते. 


                हे सगळं बघून नंदिनीला खूप वाईट वाटले होते. कधी ती आपल्या हातातल्या शॉपिंग च्या बॅग बघत तर कधी त्या लहान केविलवाणी मुलं बघत होती . शेवटी न राहवून ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांना मदत करू बघत होती आणि तिने आपल्या पर्स मधुन काही पैसे काढत पुढे धरले , पण त्या आईने साफ मनाई केली. 


" ताई साहेब , आम्ही गरीब आहोत , पण भिकारी नाही. हे सामान इकून खाऊ घेईल पोरांसाठी." ती आई म्हणाली. 


******

क्रमशः 


🎭 Series Post

View all