नंदिनी श्वास माझा 20

मन से जो जुड़े होते है, वो रिश्ते रब के नवाजे होते है
भाग 20 : मन से जो जुडे होते हैं , वो रिश्ते रब के नवाजे होते हैं .

" हा काय पोरकटपणा चालवला आहे ? सकाळपासून बघतोय, हे लग्न आहे काय? श्रीराज , आम्ही तुमच्यासाठी चूप बसलो आहे पण आम्हाला हे जे काही चालले आहे , ते अजिबात पटलेलं नाही." श्रीराजची आजी नंदिनीला आतमध्ये गेलेली बघून चिडत बोलल्या..


" पोरीची काही चूक नाही बघा.मी तिला समजावते . समजावून सांगितलं की ऐकेल ती. तशी समजदार आहे." नंदिनीची आजी म्हणाली .

"हो दिसतच आहे सगळा समजदरपणा." श्रीराजची आजी तोंड वाकडं करत बोलल्या.

वातावरण आता गरम होत होतं..

"आईसाहेब तुम्ही दमल्या असाल. तुम्ही घरी चला, थोडा आराम होईल आहे." मामी वातावरण हलकं करण्यासाठी आजीसाहेबांना म्हणाली.

" आजीसाहेब,आई, बाबा , काका , काकी , तुम्ही सगळे मुंबईसाठी पुढे निघा. मी नंदिनीला घेऊन येतो." श्रीराज म्हणाला.

" हो आणि त्यांना आजच घेऊन या. ज्या रितीभाती आहे , त्या पाळायला हव्यात. वरात आज घरी पोहचायला हवी . आज जर त्या आल्या नाही, तर आम्ही हे लग्न मानणार नाही , आणि नंतर त्यांना कधीच घरात घेणार नाही." नंदिनीचे वागणे बघून , नंदिनी आज मुंबईला येणार नाही , असा विचार करून आजीसाहेबांनी आपला डाव खेळला होता.

आजीसाहेबांच्या बोलण्यावर श्रीराजने मान हलवून होकार दर्शविला. सर्वांसमोर आजीसाहेबांसोबत त्याला वाद घालायचा नव्हता आणि उद्धटपणे सुद्धा बोलायचं नव्हतं, म्हणून तो निमूटपणे आजीसाहेबांचं ऐकत होता. तो प्रत्येक नातं मनापासून जपणारा होता. तो प्रत्येक वयाचा मानपान सांभाळणारा व्यक्ती होता .

" चला मग आपण सगळे पुढे निघूया. श्रीराज नंदिनीला घेऊन येईल." म्हणत श्रीराजचे बाबा पुढे गेले.

" नीती,सोबत येत आहात ना ? "श्रीराजच्या आईला तिथे थांबलेले बघून आजीसाहेबांनी तिला आवाज दिला. तिची श्रीराजला काही मदत होऊ नये म्हणून आजीसाहेबांनी श्रीराजच्या आईला आवाज देऊन सोबत यायला सांगितले.


श्रीराजच्या आईने श्रीराजच्या डोक्यावरून , गालावरून मायेने हात फिरवला आणि त्याच्या गालावर थोपटले. " काळजी घे आणि हळू या. मी वाट बघते आहे दोघांची." आई त्याच्याकडे बघुन बोलली. आपण किती असहाय आहो, असे तिला वाटत होते . आपल्या मुलाची आपण थोडी सुद्धा मदत करू शकत नाही , याचे तिला खूप वाईट वाटत होते.


"काळजी नको करू." श्रीराजने आईचा हात आपल्या हातात घेऊन तिला आश्वस्त केले आणि स्माईल केले.

सगळी पाहुणे मंडळी आपापल्या घरी परतले होते.

" श्रीराज नंदिनीची व्यवस्थित काळजी घेईल , त्याचावर विश्वास असू द्या." श्रीराजची आई नंदिनीच्या आजी आबांसोबत बोलून पुढे निघाली.

" श्रीराज आता आम्ही सुद्धा घरी जातो , तुला काही मदत लागली तर कळव, लगेच येऊ." श्रीराजचे मामी मामा म्हणाले.

" आजी, तू काळजी करू नको , मी नंदीनी सोबत बोलतो . तुम्ही दोघे आता थोडा आराम करा, सकाळपासून तुमची खूप धावपळ होत आहे, थकले असाल आहात. आलोच मी." म्हणत श्रीराज बाहेर गेला.


"बाळा, सगळं इतकं छान झालं, अशी रडत घरात का येऊन बसली आहे ? असं छान दिसते का ? कोणी काय म्हणेल ?" आजी नंदिनी जवळ येत बसली आणि म्हणाली .

"मग तुम्ही सगळे मलाच रागवत होता. मी काय करू?" नंदिनी म्हणाली.

" बरं, आता सगळे गेले." आजी म्हणाली.

" राज पण गेला ? तो तर म्हणाला होता आता आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत, मग तो मला सोडून कसा काय गेला ?" नंदिनी केविलवाण्या स्वरात म्हणाली.

"मी माझ्या बेस्ट फ्रेंडला सोडून कसे काय जाणार? मी तर माझ्या बेस्ट फ्रेंडला माझ्या सोबत घेऊन जाणार आहे . मला माझ्या बेस्ट फ्रेंड शिवाय अजिबात करमत नाही." म्हणत श्रीराज हातात आइस्क्रीमचे बॉक्स घेऊन आतमध्ये आला.

" अय्या ! आईस्क्रीम ! माझ्यासाठी ?" नंदिनी डोळे मोठे करत आनंदाने म्हणाली.

" हो !" श्रीराज नंदिनीच्या आईस्क्रीम हातात देत म्हणाला.

तिने लगेच आईस्क्रीम ओपन करत खायला सुरुवात केली. त्याने बाकीचे बॉक्स आजी जवळ दिले. आजी हसतच ते घेऊन किचनमध्ये गेली. आबांनी तिथेच जवळ दीवाना वर थोडं अंग टेकवले होते. आजच्या कामाच्या दगदगीमुळे ते सुद्धा थकले होते. आजीने त्यांना पाणी नेऊन दिले आणि आईस्क्रीमचा एक बॉक्स श्रीराजला आणून दिला.


"अगं हळू खा, कुठे पळून नाही चाललं ते आईस्क्रीम" आजी म्हणाली .

नंदिनी मात्र आईस्क्रीम खाण्यात मग्न झाली होती आणि श्रीराज तिला बघण्यात मग्न होता.

" नंदिनीच्या आजी , माझ्या बीपीच्या गोळ्या आणून द्या." आबा म्हणाले.

" आबांना बरं नाहीये का ?" श्रीराज म्हणाला.

" हो, आता ते म्हातारे झाले ना , त्यांना शक्ती नसते. त्यांना असं औषध खावे लागतात." नंदिनी म्हणाली .

" अच्छा , मग सगळे काम आजीलाच करावे लागतात?" श्रीराज म्हणाला.

" हो. पण कधी कधी तिला सुद्धा बरं नसते." नंदिनी आईसक्रीम खाता-खाता बोलत होती आणि श्रीराज तिला प्रश्न विचारत होता.

" मग आजीला तुझ्यासोबत जास्त वेळ घालवता येत नसेल ?" श्रीराज म्हणाला.

" हो ना , ती नेहमीच कामात असते." नंदिनी म्हणाली.

" तू इथे आजीआबाकडे राहायला कधी आली? तुला इथे कोणी आणले?" श्रीराजने विचारले .

" मी आजी-आबांसोबत इथे आली . मी तर आधी तिकडे आई-बाबांसोबत राहत होती. पण आजी म्हणे आई-बाबा देवाघरी गेले.. मग मी तिथे एकटी कशी राहणार ?" नंदिनी म्हणाली.

" आई-बाबा लवकर परत येतच नाही आहे. आजी म्हणाली की माझ्या आईने तिला माझी काळजी घ्यायला इथे पाठवलं आहे. कधी येणार आई बाबा? मला त्यांची खुप आठवण येते." नंदिनी म्हणाली.


"देवबाप्पाला खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून त्यांनी तुझ्या आई बाबाला तिथे त्यांच्याजवळ बोलवलं. त्यांचं काम झालं की येतील. मला पण तुझ्या आईने इथे पाठवलं. आता आजी आबा थकले ना, त्यांना तुझ्या एवढी शक्ती नाहीच आहे. ते आता तुझ्यासोबत खेळू नाही शकत. ते आता लवकर थकतात ना. म्हणून तुझी आई मला म्हणाली, राज तू नंदिनी कडे जा, तिचा बेस्ट फ्रेंड हो आणि तिला तुझ्यासोबत मुंबईला घेऊन ये." राज म्हणाला.

" खरंच? तुला आईने पाठवलं? माझ्या आईने पाठवलं?" ते ऐकून नंदिनीला खूप आनंद झाला. नंदिनी निरागसपणे विचारत होती..

" हो.... मला तुझ्या आई-बाबांनी पाठवलं आहे म्हणून तर मी तुझा बेस्ट फ्रेंड झालो. त्या म्हणाल्या आता आजी आबा थकले. त्यांच्याकडे आता जास्त शक्ती नाही आहे. आजीला खूप काम करावे लागतात. आबांची पण काळजी घ्यावी लागते. नंदिनीकडे पण लक्ष द्यावे लागते , म्हणून त्या बोलल्या राज नंदिनी कडे जा , तिला मुंबईला घेऊन ये. मुंबई मध्ये खूप शाळा आहेत, गार्डन आहेत, तिथे नंदिनीला खूप आवडेल.. तिथे खेळायला पण खूप मित्र मिळतील.. जसा तो नंदू शाळेत जातो, पिंकी शाळेत जाते , तसे नंदिनीला सुद्धा शाळेत जायचं होते ना?" राज म्हणाला.

" हो , मला पण शाळेत जायला खूप आवडतं. पण इथे आबा मला शाळेत जाऊच देत नाही." नंदिनी म्हणाली .

" हो म्हणूनच म्हणतोय, माझ्यासोबत चल." राज म्हणाला.

" खरंच, आई-बाबा बोलले असे?" नंदिनी म्हणाली.

" हो.. आधी त्यांनी आजी आबाला पाठवलं, आता मी तुझा बेस्ट फ्रेंड झालो म्हणून त्यांनी आता मला पाठवलं.. तू चल माझ्यासोबत, तुला जे आवडते ,आपण ते सगळं करू आणि इथे आजी बाबांना पण थोडा आराम मिळेल." श्रीराज म्हणाला.

" पण मग इथे आजी-आबांकडे लक्ष कोण देईल? मीच तर आबांना औषध वगैरे देत होती." नंदिनी म्हणाली .

"आपण या शेजारच्या मामा मामींना सांगू , ते आजी आबाकडे लक्ष देतील." राज म्हणाला.

आजी आबा राज नंदिनी मध्ये सुरू असलेले त्यांचे हे बोलणं ऐकत होते.

" हो नंदिनी , राज खरं बोलतोय, तुझ्या आईने त्याला इथे पाठवलं. तुला खूप मोठं व्हायचं ना, मग तुला असं मोठ्या शहरात जायला हवं. तिथे खूप मोठी शाळा आहे आणि राज तुझी किती काळजी घेतो, तुझं सगळं ऐकतो , तुला जे पाहिजे ते आणून देतो. तूच तर म्हणतेस ना तुला आजी पेक्षा पण राज खूप आवडतो.. मग आता राज सोबत जायला हवं की नाही ? तिथे त्याचे ऑफिस आहे , तो इथे किती दिवस असा तुझ्या सोबत राहू शकणार आहे? तू माझं शहाणं बाळ आहे ना, तू माझं ऐकणार आहेस ना ?" आजी तिला समजावत म्हणाली .

" हो, पण मला मग तुमची आठवण आली तर ?"नंदिनी म्हणाली.

" तुझी जेव्हा पण इच्छा झाली , तेव्हा आपण आजी आबांना भेटायला इथे येऊ." राज म्हणाला.

" पण , मग मला कपडे घालून द्यायला कोण मदत करेल? मला तर माझ्या केसांची वेणी पण घालता येत नाही ?" नंदिनी म्हणाली .

" मी तुला मदत करेल ना, मी तुला सगळं शिकवेल." राज म्हणाला.

" पण मला आजीच्या कुशीत झोपल्या शिवाय झोप येत नाही. तिथे मी कोणाजवळ झोपू? तू मला तुझ्या कुशीत घेऊन झोपशील काय? मला रात्री खूप भीती वाटते." नंदिनी म्हणाली.

तिच्या या सगळ्या निरागस बोलण्याने आता मात्र राजचा गळा दाटून आला होता. त्याच्याने आता पुढे काहीच बोललं जात नव्हते. जी नंदिनी त्याच्या सहवासाची आतुरतेने वाट बघत होती, आज तिचीच मनधरणी त्याला करावी लागत होती. त्याला खूप असह्य वाटत होते. त्याच्या डोळ्यात आता अश्रू जमायला लागले होते. त्याने एकदा आजी आबांकडे बघितलं आणि त्याची मान मागच्या दिशेला फिरवली आणि त्याच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली .

" हो नंदिनी , श्रीराज रात्री तुला त्याच्याजवळ घेऊन झोपेल. त्याच्याजवळ तुला भीती वाटणार नाही. तो आमच्या पेक्षा तुझी खूप जास्त काळजी घेईल, तुला खूप जास्त प्रेम करेल . त्याचं ऐक बाळा आता, असं हट्ट नाही करू. तू त्याच्यासोबत जाऊन तिकडे मुंबईला राहिली तर आम्हाला पण खूप आवडेल." आजी म्हणाली .

"मी त्याच्यासोबत गेले तर माझी आई खुश होणार ना ?..बरं मी त्याच्यासोबत जाते. राज मला खूप आवडतो." नंदिनी म्हणाली.

" हो!" आजीने होकारार्थी मान हलविली .

" आजी , मला ही साडी, हे दागिने काढून दे ना , मला खूप टोचत आहे." नंदिनी म्हणाली.

" आजी , तिला दुसरा कुठला पण ड्रेस घालून दे. " राज म्हणाला.

" नको , तिला साडी घालू दे. पहिल्यांदा सासरी चालली आहे, तिचा गृहप्रवेश होणार आहे , बरं नाही दिसायचं ते." आजी म्हणाली.

" आजी , मला काही फरक पडत नाही . तिला ज्यात मोकळं वाटत असेल ते घालू दे ." राज म्हणाला.

" हो , पण तुझ्या आजीसाहेबांना सुद्धा नाही आवडणार ते, आजच्या दिवस तिला साडी नेसवते ." आजी म्हणाली .


" बरं , तिला साधीशी मऊसूत असणारी अशी साडी नेसवून दे , तोपर्यंत मी मामींना भेटून येतो आणि मुंबईला जायची तयारी करतो." राज आजी-आबांसोबत बोलून मामा मामी कडे निघून गेला.

मामा मामी सोबत बोलून थोडा फ्रेश होऊन तो परत आला. रोहन श्रीराजची वाट बघत थांबला होता. रोहन गाडी घेऊन आला.

आजीने नंदिनीची तयारी करून दिली होती.. परत एकदा श्रीराज सगळ्यांच्या पाया पडला आणि आशीर्वाद घेतला.

नंदिनीची पाठवणी करताना आजी आणि आबांना वाईट वाटत होतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

श्रीराजने आजी आबांना हग केले.

"नंदिनीची तर तू काळजी घेशील, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे .पण ....पण तिची काळजी घेता घेता स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस, स्वतःची पण काळजी घे बाळा आणि काही लागलं तर कळव , आम्ही लगेच तिकडे निघून येऊ. आणि तुला वाटलं तेव्हा कधी पण तू इथे नंदिनीला घेऊन येऊ शकतो." आबा त्याला म्हणाले.

श्रीराजने मानेनेच होकार दिला..तो आजी जवळ गेला.. आजीने त्याला त्याचा हातात एक छोटीशी डब्बी दिली.

" यात काय आहे?"श्रीराज म्हणाला.
" उघडून बघ."आजी म्हणाली .

त्याने ती डब्बी उघडली. त्यात तेच ❤️ हार्टशेप पेंडंट चेन होती , जी त्यानें तिला त्याचे तिच्यावरील प्रेम व्यक्त करत तिच्या १८ वाढदिवसाला दिले होते. ती डब्बी हातात पकडत तो प्रश्नार्थक नजरेने आजीकडे बघत होता .

" ह्म्म...मला सगळं माहिती आहे. तुमचं प्रेम माझ्यापासून कधीच लपलेले नव्हते. नंदिनीला जेव्हा तुझं प्रेम समजेल , तेव्हा परत घालून दे . देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत." म्हणत आजीने त्याच्या डोक्यावरून मायने हात फिरवला..
" स्वतःची काळजी घे बाळा , आम्ही तुझ्या सोबत आहोत !" आजी म्हणाली.

त्याने एकदा ते pendant बघितले. आधीचे ते गोड दिवस त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होते. त्याला त्याची ती अल्लड नंदू आठवली. तो तिच्या जवळ येत असला की कसे आजीचे नाव घेऊन ती त्याच्या पासून दूर पाळायची.आणि ते आठवून त्याच्या चेहऱ्यावर छानसे हसू उमलले..

नंदिनी सुद्धा आजी आबांच्या गाळ्यात जाऊन पडली.
" आबा , आजीला जास्ती त्रास नाही द्यायचा , तुम्ही खूप चिडचिड करत असता "नंदिनी म्हणाली .

सगळ्यांना तिच्या अशा काळजीपूर्वक बोलण्यावर हसू आलं.. हसतच राजनंदिनीने सगळ्यांचा निरोप घेतला आणि राजनंदिनी कारमध्ये मागच्या सीटवर बसले. रोहन गाडी ड्राईव्ह करणार होता..

खिडकीतून हात बाहेर काढून नंदिनीने सगळ्यांना बाय केले. गाडी आता पुढल्या मार्गावर निघाली होती. अंधार पडत आला होता. पोहोचायला रात्रीचे दहा वाजणार होते. नंदिनी खिडकीतून बाहेर बघत होती. ती अशी खूप दिवसांनी कार मधून बाहेर जात होती. गेल्या काही वर्षात ती घराबाहेर गेली नव्हती, त्यामुळे आता तिला खूप आनंद होत होता.

" राज , ते ते बघ... मंदिर.....!" असं करत ती त्याला खिडकीतून दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी सांगत होती.

हवेवर तिचे केस उडत होते.. ती आनंदाने हसत कधी राजकडे बघत होती तर कधी बाहेर बघत होती. श्रीराज नंदिनीचा चेहऱ्यावरील आनंद टिपत शांतपणे तिला बघत बसला होता.

" राज , आर यु ओके ?" रोहन कार ड्राईव्ह करता करता बोलला.

" एस , फाईन."राज म्हणाला.

" ओके.....!" रोहनने कार चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. त्याने मुझिक सिस्टम वर गाणे लावले..

कितनी ही दूर दूर हों
हम दोनों के रास्ते
मिल जाते हैं जो बने
एक दूजे के वास्ते


नंदिनी आता बरीच दमली होती. बडबड करत करत ती सीटला टेकून झोपी गेली.. रस्त्याने वेगाने कार जात असल्यामुळे तिची मान हालत होती. त्यामुळे तिची झोपमोड होत होती. श्रीराजने हळुवारपणे तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतले आणि तिचे पाय आडवे करत सीटवर नीट झोपवलं. तिच्या कपाळा वरून , केसांमधून हात फिरवत तो सुद्धा मागे सीटला टेकून बसला होता. आता त्याचासुद्धा डोळा लागला होता..


या पाच दिवसात त्याचं आयुष्य बदललं होतं.. इथे तरी आजी बाबा त्याच्या मदतीसाठी होते. तिथे मुंबईला आता सगळं त्यालाच बघावं लागणार होतं.. नवीन लाइफ चॅलेंजेस तिथे त्याची वाट बघत होते. पण तो या सगळ्यांसाठी तयार होता. तो खुश होता की त्याची नंदू त्याच्यासोबत होती. त्याला याशिवाय दुसरं काहीच नको होते .
******

क्रमशः

*********

🎭 Series Post

View all