भाग १: छोट्या शरू नंदुची पहिली भेट
" नंदू sssss नंदू ssss " आवाज देत श्रीराज गाडीतून उतरून समोर असलेल्या वाड्याच्या मोठ्या दारातून आत आला. गावात आल्या आल्या तो सगळ्यात आधी नंदूला भेटायला येत. नंतर तो त्याचा घरी जात.
घरात आजी काही काम करत होती, "आजी ग , नंदू कुठे आहे ?"
"नुसती धुमाकूळ घालत असते , आबांनी रागवलय , रुसून कुठल्या कोपऱ्यात बसली असेल. " आजी म्हणाली.
श्रीराजने परत जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली, तेवढयात आबासाहेब बाहेर आले.
" तू आहेस होय? तेच म्हणतोय एवढा आरडाओरडा कुठून येतोय. आताच एकीला शांत बसवले, आता तू सुरू केले होय रे? कधी आला?" आबासाहेब म्हणाले.
" हे काय आताच येतोय. ते राहू द्या , नंदू कुठाय सांगा अगोदर?" अस म्हणून परत तो नंदुला आवाज द्यायला लागला.
इकडे नंदू आतल्या खोलीत कोपऱ्यात जाऊन बसली होती . तिला बाहेरचा आवाज ऐकू येत होता. आवाज ओळखीचा वाटला तसे तिचे डोळे आनंदाने चमकले. जागेवरून उठून तशीच ती पळत बाहेर आली आणि"शरूssss " करत त्याच्या गळ्यात पडली .
"बघ ना रे ,सगळेच मला रागवतात." मुसमुसत ती शरूला सांगत होती.
" कोणीच माझा लोभ नाही करत. " आबाकडे बघून ती नाटकी सुरात बोलत होती .
शरू नेहमीच नंदूची बाजू घेत . ती कितीही नाटकी वागली तरी तो तिच्याकडूनच बोलायचा आणि नंदू याचाच फायदा उचलत .
" काय केले ते पण सांगा की बाईसाहेब?" आबा.
नंदू चुपचाप गालातल्या गालात हसत शरूकडे बघत , काही नाही केले अशी मान हलवत होती.
" तिने आपल्या बाजूच्या राम्याच्या कोंबड्या उडवून लावल्या. अशाच कुरापती करत असते आणि मग सगळे माझ्याकडे हिची तक्रार घेऊन येतात." आबा तक्रारीच्या सुरात म्हणाले.
हे ऐकताच शरू खुदकन हसला , नंदू पण त्याच्यासोबत हसायला लागली.
" काय हो आबासाहेब , तुम्ही इतके मोठे, का छळता आम्हा मुलांना ? आम्ही मुलं म्हणजे देवाघरची फुलं. विसरलेत का हो तुम्ही ?" .शरू हसतच म्हणाला. शहरातलंच पोर ते , बोलायला अगदी हुशार होतं.
" आला मोठा नंदुचा वकील बनून. तिचं असे मस्तीखोर वागणं समजते , तू तर एवढा मोठा झालास ना , तरी असे वागतो ?" असे म्हणत त्यांची काठी उचलली आणि शरूनंदूच्या मागे आले. तसे शरू आणि नंदू एकमेकांचा हात पकडून आंगणात पळत सुटले. कधी आजीच्या मागे तर कधी पायऱ्यांवर , असे पळत होते . आबा त्यांच्या मागे मागे धावून थकले आणि ओसरीत असलेल्या खुर्चीवर बसले .
"नंदूच्या आजी , पाणी आणा हो. या कार्ट्यांनी दमवून सोडलं."
"नंदूच्या आजी , पाणी आणा हो. या कार्ट्यांनी दमवून सोडलं."
आजी हे सगळं बघत होती.
" शरू आला की घराचं कसं गोकुळ होऊन जाते." आजी मनात म्हणाली आणि आतमध्ये पाणी आणायला गेली.
" शरू आला की घराचं कसं गोकुळ होऊन जाते." आजी मनात म्हणाली आणि आतमध्ये पाणी आणायला गेली.
" चल आबासाहेबांकडे जा आणि त्यांना एक पापी कर. त्यांचा राग पळून जाईल. " असे म्हणत शरूने नंदुचे गोबरे , मऊमऊ गाल ओढले आणि आपल्या घरी परत जायला निघाला.
" अरे बाळा, आला तसाच परत निघाला ? हे बघ खाऊ आणलाय , थोडं खाऊन घे." आजी खाऊची एक प्लेट त्याच्या पुढे धरत म्हणाली.
" उद्या येतो ग आजी. तिकडे पण महासरकार बसलीय ना , ओरडत असेल माझ्या नावाने " म्हणत प्लेट मधला एक लाडू उचलत श्रीराज त्याचा घरी पळाला.
"या साहेब , तुम्ही आता मोठे झाले नाही काय ? आता तुम्हाला त्या कार्टीशी आधी भेटायचं असतं , या आजीची काही आठवण नाही यायची ना? " मोठे डोळे करत आजी शरूला आत येताना बघत म्हणाली.
" ओये माझी शोणुली मोणुली क्युटीपाय आज्जी , इतक्या दुरून तुलाच भेटायला आलो आहे. आता काय अशी मला रागवत बसणार आहेस ग ?" असं म्हणत शरू आपल्या आजीचे गाल ओढत होता. तसा आजीचा राग कुठल्या कुठे पळाला.
त्या दोघांना असे आनंदी बघून सगळे हसायला लागले...
********
तर हा आहे श्रीराज देशमुख , वय वर्ष १३ , खूप समजदार पण तेवढाच मस्तीखोर. त्यात नंदूची साथ मिळाली की दोघेही मिळून भयंकर मस्ती करणार, सर्वांना नको नको करून सोडणार . श्रीराज मुंबईला राहतो , शाळेनंतरच्या प्रत्येक उन्हाळाच्या सुट्टीमध्ये इथे गावात आपल्या आईसोबत मामाकडे यायचा. नंदू त्याची बेस्ट फ्रेंड , त्याचा तिच्यावर खूप जीव होता .
हिरव्या घाऱ्या डोळ्यांची नंदू म्हणजे नंदिनी ९ वर्षाची , सुंदर गुटगुटीत पोर . ती ७ वर्षाची असताना एका अपघातात तिचे आईवडील दोघंही गेले. इथे गावामध्ये आपल्या आजीआबा सोबत राहते. भयंकर उपद्रवी, मस्तीखोर , सर्वांना नको नको करून सोडणारी , पण तेवढीच निर्मळ मनाची आणि म्हणूनच सगळ्यांची लाडकी.
नंदू ७ वर्षाची होती तेव्हा पासून शरू आणि नंदूची ओळख. ' शरू ' , हो नंदू श्रीराजला शरूच म्हणत. तिला श्रीराज हे नाव उच्चारायला खूप कठीण वाटत होते. तिला ते नीट म्हणता येत नव्हते , म्हणून ती त्याला शरू नावाने हाक मारत असायची.
नंदूच्या आबांचा वाडा आणि शरूच्या मामाचा वाडा शेजारी शेजारी होता . शरू सुट्टीमध्ये आला की इथे मित्रांसोबत खेळायचा . असाच एकदा खेळ खेळत असताना वाड्यासमोर दाराजवळच्या पाळीवर बसलेली नंदू त्याला दिसली. तिच्या डोळ्यात पाणी होते, ती मुसमुसत होती. तिचा तो लोभस केविलवाणा चेहरा बघून तो तिच्या जवळ आला.
" काय झालं, का रडतियेस?"
" आजीने सांगितलेय अनोळखी लोकांसोबत बोलायचं नाही. " दोन्ही हात फोल्ड करून ती त्याच्याकडे बघत म्हणाली.
" अगं ते बरोबर आहे , पण मी अनोळखी कुठेय ? बघ बाजूच्याच तर वाड्यात राहतो. तू मला सांगू शकते , मी तुझी मदत करेन."
" खरंच ?"
" हो.."
" आजी रागावली " रडक्या आवाजात नंदू म्हणाली.
" का ?"
" ते मी, मी म्याऊच शेपूट ओढलं."
"काय?" एवढयासाठी आजी रागावली?" शरू डोळे मोठे करत म्हणाला.
" दूध सांडले. " एवढे बोलून नंदू रडायला लागली.
" म्हणजे , मला कळलं नाही , नीट सांग ना?"
" ते.. मी..(नंदू बोलतांना थोडी अडखळत होती ) म्याव माझ्याकडे डोळे मोठे करून बघत होती. म्हणून मी तिची शेपूट ओढली. मग ती माझ्या मागे धावायला लागली. मी पळत होती. आजीला जाऊन धडकली. आजीच्या हातातलं दूधाचे पातेले खाली पडलं. " "ह्यााsssss " नंदूने भोंगा पसरला.
ते बघून शरू हसायला लागला.
" तू हसतोस? आsssss " तिने परत भोंगा काढला, " तू मला मदत करणार होता ना ?"
" अगं हो हो , तू पहिले रडायची थांब. डोळे आणि आधी ते नाक पुस. कसं शी दिसतंय. "
" आणि तू इथेच थांब , मी आलोच. " म्हणत शरू त्याचा वाड्यात गेला. त्यांच्या कडील गडी माणसाला आवाज दिला.
" गण्या काकाssss.... ओ गण्या काका , मला ते गाईचं पातेलभर दूध काढून द्या हो."
" गण्या काकाssss.... ओ गण्या काका , मला ते गाईचं पातेलभर दूध काढून द्या हो."
" काय करसाल छोटे मालक ?"
"पटकन द्या हो , मला काम आहे. लवकर द्या."
गण्याने त्याला पातेल्यामध्ये दूध दिले. ते घेऊन तो नंदू जवळ आला आणि म्हणाला, " चल आतमध्ये."
नंदू आणि तो आतमध्ये आले.
" आज्जी , ओ आज्जीss" शरूने आजीला आवाज दिला. आवाज ऐकून आजी बाहेर आली.
" काय रे पोरांनो, तुम्ही इथे काय करत आहात? चला बाहेर खेळा. आणि हे काय आणलस तू?" आजी दोन्ही चिमुरड्यांना बघत म्हणाली.
"आज्जी हे घ्या पातेले , त्यात दूध आहे. पण हिला रागावू नका हो. ते तिच्या कडून चुकून झालं होतं . ती बाहेर बसून कधीची रडतिये." शरू विनवणीच्या सुरात म्हणाला.
आज्जी आवसून त्याच्याकडे बघत होती.
" कोण रे तू ?"
" मी ? हिचा मित्र. " शरू आपल्या ओठांवर गोड हसू आणत म्हणाला.
" कधी झाला मित्र?"
" हे काय आताच. ती बाहेर रडत होती ना तेव्हा."तो हसत म्हणाला.
" हो रे , पण तू कोण? कुठला? कुणाचा?"
" मी, हा बाजूचा. " शरू त्यांच्या वाड्याकडे हात दाखवत म्हणाला.
" अच्छा अच्छा , शिर्केंच्या घरचा आहेस तू. बरं बरं. पण काय रे दूध का आणलंय?" आजीने विचारले.
" अहो आज्जी दूध सांडले म्हणून तुम्ही हिला रागावलात ना? तुमचं नुकसान झाले ना?म्हणून आणलं हे. "
" अरे बाळा मी तिला त्यासाठी नाही रागावले. ती मांजरीची शेपटी ओढत होती. ती तिला चावली असती म्हणजे? म्हणून रागावले."आजी डोक्यावर हात मारत म्हणाली.
" ओsssss , अस्स आहे. बरं असे नाही करायचे ते मी तिला सांगतो हा. तुम्ही तिला आता परत रागावू नका. "
आजी होकारार्थी मान हलवत हसत आतमध्ये निघून गेली.
" मी म्हणालो होतो ना , बघ आता आज्जी तुला नाही रागवणार. "
ते बघून नंदू हसायला लागली.
"ए तुझं नाव काय ग? आता आपण मित्र झालो ना? "
" नंदिनी, पण सगळे मला नंदूच म्हणतात. तुझं नाव काय ?"
" श्रीराज."
" श....श.. र... किती कठीण नाव आहे रे तुझं ? श...र...शरू.."
" अगं येईल. ठीक आहे शरू म्हणता येत ना तेच म्हण ,चालेल मला."
ही त्या दोघांची पहिली भेट आणि अशाप्रकारे त्या दोघांची मैत्री झाली होती.
**********
" नंदू ssss नंदू ssss आम्ही निघालो ग. लवकर ये ग. नाहीतर मला आता आई रागवायची." शरू नंदुच्या वाड्यात येत आवाज देत होता.
" ती इथे घरी नाही. तिकडे कुठे उनाडक्या करत असेल." आबा म्हणाले.
" ओ आबासाहेब , काय हो सारखं सारखं तिच्या मागे लागता तुम्ही?"
" नाहीतर काय, घरात एक मिनिट म्हणून नसते. बांधूनच ठेवायला हवं." आबा त्याची मस्करी करत म्हणाले.
" आबासाहेब बघा हा, मी मोठा झालो की नंदुला माझ्यासोबत पळवून नेणार आहे. तोपर्यंत नंदुची काळजी घ्या." म्हणत आबांना नमस्कार करत शरू घराबाहेर पडला.
" आला मोठा पळवनारा ! नंदूच्या आजी , बघा काय म्हणताय शहरातलं पोर? " म्हणत आजीआबा हसायला लागले . त्यांना पण मुलांच्यां घनिष्ट मैत्रीबद्दल माहिती होते.
" खूप जीव लावतो हो शरू आपल्या बाळाला. " आजी आबासाहेबांना म्हणाली.
" ह्म्म.."
इकडे बाहेर शरू नंदुची वाट बघत उभा होता. बस सुटायची म्हणून आई त्याला घाई करत होती. तो ५ मी ५ मी करत आईला थांबवत होता.
तो परत जायला वळणार तेवढयात नंदू तिथे धापा टाकत आली.
" कुठे गेली होतीस ग? कधीचा आवाज देतोय?"
नंदूने तिच्या हाताची मूठ उघडली आणि ३ कैऱ्या त्याला दिल्या.
" तुला खूप आवडतात ना झाडावरच्या कैऱ्या, त्याच तोडायला गेली होती. "
ते ऐकून शरूला हसू आलं, " बरं चल येतो पुढल्या सुट्टीत, स्वतःची काळजी घे." म्हणत शरू तिला बाय करून मुंबईला परत जायला निघाला.
************
असे हे नंदू - शरू खूप जिवाभावाचे मित्र, एकमेकांचे जीव की प्राण आहेत . शरू तिचा जरा जास्तीच लोभ आणि काळजी करायचा. नेहमी तिच्यासाठी तिच्यासोबत उभा असायचा.
प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत शरू आणि नंदुची भेट ठरलेली असायची . शरू इकडे गावात आला की दोघं मिळून खूप धिंगाणा घालायचे, मस्ती करायचे. शेतावर खेळणं काय, आजीचा डब्ब्यातून चोरून खाऊ काय पळवायचे , गाई म्हशी , कोंबड्या , मांजरांच्या मागे मागे काय पाळायचे . खूप धमाल करायचे. आणि आता शरू आणि नंदू यांच्या दोन्ही परिवाराला यांच्या मैत्री बद्दल माहिती होते.
नंदूच्या आबांची आणि शरूची नेहमी ' नंदू ' या विषया वरून गोड वादावादी होत असे. आणि मग तो प्रत्येक वेळी त्यांना तिला आपल्या सोबत घेऊन जाण्याची धमकी देत. आबा सुद्धा मुलांमध्ये त्यांच्याच वयाचे होत शरूची मस्करी करत असायचे . शरू नंदूच्या आजीआबांचा सुद्धा खूप लाडका होता. त्यांनी दोघांमध्ये कधीच अंतर केले नव्हते. शरू सुद्धा त्यांना खूप जीव लावायचा .
असेच वर्षांमागुन वर्ष सरत होते. दोघेही मोठे होत होते . आता शरू १०वी च्या वर्गात होता. त्यामुळे त्याला नववी झाल्यानंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत ट्युशन क्लासेस, अभ्यास होता , यामुळे नंदुच्या गावाला यायला जमले नव्हते. १० वीच्या परीक्षा आटोपल्यावर तो गावी आला होता . दोघांनी त्या उन्हाळ्यात सुद्धा खूप धमाल केली होती. पण त्या नंतर त्याला पुढले काही वर्ष जसे की त्याची १२ वी , मग त्याचे इंजिनिअरिंग , असे सगळं असल्यामुळे तिथे गावाला यायला जमले नव्हते.
नंदू मात्र प्रत्येक उन्हाळी सुट्टीत शरूची वाट बघत बसायची . उन्हाळ्याच्या सुट्ट्या तिने फक्त शरूसाठी राखून ठेवलेल्या होत्या. तो नसला की तिला अजिबात करमत नसे. आता जवळपास पाच वर्ष होत आली होती की ती शरूला भेटली नव्हती. त्यामुळे ती थोडी हिरमुसली होती. तिची नजर त्याचा वाटेवर लागली होती. चातकाप्रमाने ती त्याची वाट बघत होती.
श्रीराज पण आता मोठा झाला होता. कॉलेजला जात होता . कॉलेज म्हटलं की सगळंच गोडगुलाबी असते . त्याला खूप मित्र मैत्रिणी भेटल्या होत्या. आनंदात दिवस जात होते. पण इकडे नंदू त्याची वाट बघत होती.
श्रीराज परत गावाकडे येतो की नाही?
नंदुला तिचा शरू भेटतो की तिला तो विसरतो?
काय आहे त्यांच्या भविष्यात?
बघुया पुढल्या भागात.
नंदुला तिचा शरू भेटतो की तिला तो विसरतो?
काय आहे त्यांच्या भविष्यात?
बघुया पुढल्या भागात.
क्रमशः
********
आपल्या ईरा वर बरेच नवीन वाचक जॉईन झालेत. त्यामुळे नंदिनी श्वास माझा ही कथा परत पोस्ट करत आहे. आवडल्यास नक्की कळवा. Thank you.
*******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा