Login

नंदिनी श्वास माझा 10

म्हणून तुला सगळे सोडून जातात...
झाडाच्या कठड्यावर बसून नंदू प्रेमाने एकटक खेळत असणाऱ्या शरूकडे बघत होती. खेळत असताना सुद्धा टीनाचे सगळे लक्ष नंदू कडे होतं. नंदुला असं शरूकडे एकटक बघतांना पाहून तिला खूप राग आला. ती पाणी प्यायच्या बहाण्याने नंदू जवळ गेली.

" काय मग , कसं वाटते पडल्यावर?'" टीना द्वेषाने नंदूला म्हणाली.

" तू मुद्दाम पाडलेस ना मला?"नंदू टिनाला म्हणाली.

" स्मार्ट गर्ल! हो तुला मीच पाडले होते . तू नाही का सकाळी प्लॅन करून मला पाडलं , तसे." टिना रागात म्हणाली.

" सुरुवात तूच केलीस. तू सतत आम्हा गावाकडच्या मुलींना कमी लेखत होती. डिचवत होतीस. आणि मी तुला नव्हते म्हणाले की ते हाय हिल्स घाल?" नंदूने टिनाला तिच्या शब्दात उत्तर दिले.

" हो , तुम्ही गावाकडच्या मुली खूप साध्या सरळ दिसता, पण जरा जास्तच हुशार आहात. चांगल्या मुलांना गळ्यात कसं पाडायचं , कसे फसवायचे , तुम्हाला चांगलं ठाऊक आहे." टिना.

" हे बघ, तू आम्हाला काहीपण म्हणशील तर मी ते खपवून घेणार नाही."नंदू थोडी रागातच म्हणाली .

" का टोचलं? मी जे खरं आहे ते बोलले. तू नाही का राजला स्वतःच्या जाळ्यात ओढू बघते आहे? मला सगळं कळतंय आणि सगळं दिसत सुद्धा आहे." टिना.

" शरू माझा बालपणीचा मित्र आहे आणि तू आमच्या मैत्रीत न पडलेली बरी." नंदू.

" चांगलाच वापर करून घेते तू त्याचा आणि तुझ्या so called मैत्रीचा." टीना.

"आल्यापासून बघते आहे, तू मला सतत त्रास देते आहेस. तू तर तुझ्या आजीला सुद्धा खूप त्रास देत असते. राजला च काय, तू तर सगळ्यांना , तुझ्या आजी-आजोबांना पण खुप सतावत असते. म्हणूनच सगळे तुला सोडून जातात. आता राज सुद्धा अमेरिकेला चालला आहे. मला खात्री आहे, एकदा काय तो अमेरिकेला गेला की इकडे परत नाही यायचा. तिथली लाईफ स्टाईल, तिथल्या गोऱ्या , सुंदर , हुशार मुली बघितल्या की तो तुला पूर्णपणे विसरणार आहे." टिना.

" असं काहीच होणार नाहीये." नंदू.

आता मात्र नंदूच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं होतं. टीनाचे बोलणे तिच्या जिव्हारी लागत होतं.

दुरून हे सगळ मीना बघत होती. आणि तिला जाणवलं काहीतरी नक्कीच वाईट होते आहे. ती तिथला खेळ सोडून नंदू जवळ पळत गेली. मीनाला असं पळत जाताना पाहून बाकीचे पण त्यांचा खेळ सोडून तिच्यामागे आले.

" तू तुझ्या त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या आजी आजोबांना त्रास देत असते. तू राजला सुद्धा त्रास देत असते. सगळ्या गावाला तू त्रास देत असते. सगळ्यांच्या खोड्या करत फिरत असते. नक्कीच तू तुझ्या आई बाबांना पण त्रास दिला असशील, म्हणूनच ते तुला सोडून चालले गेले. तू सगळ्यांना दुःखी करत असतेस." टिना.

नंदुवर टिना तिखट शब्दांचे वार करत सुटली होती. मनाला येईल ते ते बोलत होती.

टिनाचे हे सगळे शब्द नंदूच्या काळजावर घाव घालत होते . आता मात्र तिला टिनाचे बोलणे असह्य झाले आणि नंदूच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले होते. तिचं मन दाटुन आलं, तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. तिला आता पुढे बोलायला सुद्धा जड झाले होते .

तेवढयात शरू आणि बाकी सगळे तिथे पोहोचले होते . टीनाचे हे शेवटचे शब्द त्यांनी सुद्धा ऐकले होते . टीनाचे ते शब्द शरूच्या सुद्धा जिव्हारी लागले होते. त्याने नंदु कडे बघितले, तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू बघून , तिचा तो रडावलेला चेहरा , तिची ती अवस्था बघून त्याच्या हृदयात सुद्धा कळ उठली.

"स्टॉप इट टिना !" शरू थोड्या मोठ्या आवाजातच ओरडला.
आणि धावतच तो नंदू जवळ गेला, नंदू भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती .

" मी.... मी कोणाला त्रास नाही दिला. मी माझ्या आई-बाबांना त्रास नाही दिला." नंदू रडत शरूकडे बघत कसबसं बोलत होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते, तिचा गळा दाटून आला होता.

तिला असं रडताना बघुन शरूने लगेच तिला आपल्या कुशीत घेतले. जसं त्याने तिला आपल्या जवळ घेतले , तिचा ऊर दाटून आला आणि ती आणखी जोराजोरात हुंदके देत रडत होती. आणि परत परत तेच बोलत होती, मी आईबाबांना त्रास नाही दिला ,मी आई-आबांना त्रास नाही दिला.

" हो बाळा, शांत हो! मला माहितीये तू कोणाला त्रास नाही दिला." शरू नंदूच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होता. तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता.

पण नंदूला टिनाचे बोलणे फार लागले होते. तिचं रडणं काही थांबेना. तिच्या सगळ्या भावना तिच्या आवाक्याच्या बाहेर गेल्या होत्या . ती सतत शरू कडे बघून एकच बडबड करत होती , मी कोणाला त्रास नाही दिला .

नंदूला असं रडताना बघून आता बाकीच्यांना पण फार वाईट वाटत होतं.

" टीना , तू असं बोलायला नको होतं." शरू थोडा चिडत म्हणाला.

शरूचे असं सगळ्यांसमोर बोलण्यामुळे टिनाला खूप राग आला.

" तुला फक्त माझी चुक दिसते ? तिची दिसतच नाही ना ? ही गोड गोड बोलते आणि सगळ्यांना फसवते. असंच हवे , तिचे आई बाबा तिला सोडून गेले ना , आता अक्कल येईल तिला." टिना मनाला येत होतं तसं बोलत होती.

टीनाचे बोलणं ऐकून नंदूला अजून रडू येत होतं. तिची हालत आता खूप खराब होत होती.

" टीनाss" शरू थोडा मोठ्याने ओरडला. त्याने डोळ्याने रोहनला इशारा करून टिनाला तिकडे न्यायला सांगितले . त्याचा इशारा ओळखून रोहन टिनाला दुसरीकडे घेऊन जाऊ लागला.

" मला तिकडे नाही जायचे , मी काहीच केलं नाही." टीना बडबड करत होती. रोहन तिला थोडे ओढतच बाजूला नेत होता.

शरूने नंदू कडे बघितलं, तिच्या हनुवटीला धरुन तिचं डोकं थोडं वरती केलं आणि तिच्या डोळ्यात बघायला लागला. तिच्या डोळ्यात त्याला खूप वेदना, खूप दुःख दिसत होतं. त्यामुळे त्याला पण आता आतून त्रास होत होता. त्याने एका हाताने हळूच तिचे डोळे पुसले.

" शांत हो बाळा ! असं काही नाहीये . ती रागाच्या भरात बोलून गेली , शांत हो !" शरू.

नंदूचा कं खूप दाटून येत होता. ती सतत परत तेच ते बोलत होती, मी आईबाबांना त्रास नाही दिला, मी आई-आबांना त्रास नाही दिला , शरू मी वाईट नाहीये , मी त्रास नाही दिला.

" हो राजा, तू चांगलीच आहे." शरू तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता.

आता बाकीच्यांना सुद्धा नंदुला असे रडतांना बघवत नव्हते. मीना सुद्धा तिच्याजवळ जात तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती. पण नंदूला कोणाचेच ऐकू जात नव्हते. ती कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

नंदू तेच ते बोलत सतत रडत होती, हुंदके देत होती . ती काहीच ऐकत नाहीये, स्वतःशीच वेड्यासारखे बडबडत आहे बघून शरूने तिला आपल्या मिठीत ओढून घेत, तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कपाळावर, गालावर किस करू लागला.

"तू चांगलीच आहे ग राणी, खूप चांगली आहे. शांत हो ना बाळा प्लीज शांत हो आता." तिला असं दुःखी बघून आता शरूला सुद्धा खूप रडायला येत होते. तो तिला तसेच आपल्या मिठीत घट्ट पकडून उभा होता. आता त्याच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू यायला लागले होते. तो वारंवार तिला आपल्या मिठीत आणखी आणखी घट्ट पकडत होता.

त्या दोघांना असं बघून आता मीनाला आणि बाकीच्या सर्वांना खूप वाईट वाटत होते. त्यांनी त्या दोघांना झाडाजवळ नेऊन बसवले. मीनाने पाण्याची बॉटल काढून नंदूला थोडं पाणी पाजले. नंदू आता थोडी शांत झाली होती. एकटक शून्यात नजर लावून बघत बसली होती.

कोणाचं मन आता तिथे थांबायला तयार नव्हतं. काय करायला आलो आणि काय झालं , असेच सगळ्यांना वाटत होते.

"चला निघूया आता , घरी पोहोचायला उशीर होईल." राहुल सगळ्यांचा मूड चेंज करण्यासाठी काहीतरी बोलला.

" हो , चला जाऊया. " सुजी.

" चला !" शरू.

सगळेजण गाडीकडे जायला निघाले.

रोहनने टिनाला थोडं समजावून सांगितलं होतं. ती पण आता चूप बसली होती.

शरूने नंदूला खूप आवाज दिले, पण ती ऐकायला आणि हलायला तयार नव्हती. शेवटी शरूने तिला आपल्या दोन्ही हातांवर आपल्या कुशीत उचलून घेतले आणि गाडीत समोरच्या सीटवर आणून बसवले आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला.

मागच्या सीटवर मीना आणि सुजी बसल्या होत्या .
त्यामागे रोहन , राहुल आणि टीना बसले .

शरूने एकदा नंदु कडे बघितले , ती एकटक पुढे बघत होती. ती शांत बसली होती आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. शरूने आपल्या हाताने तिचे डोळे पुसले आणि गाडी स्टार्ट केली .

गाडी चालवता चालवतांना अधून मधून शरू नंदू कडे बघत होता. तिचे मोकळे केस हवेवर उडत होते. ते तिच्या कपाळावर, चेहऱ्यावर येत होते , पण तिला त्याचा काहीच फरक पडताना नव्हता दिसत. मग अधून मधून शरू आपल्या एका हाताने तिचे केस तिच्या कानामागे करत होता.

गाडीत कोणीच कोणाशी बोलत नव्हतं,एकदम नीरव शांतता पसरली होती.

रात्री आठच्या सुमारास सगळे घरी पोहोचले. शरूने नंदूला तिच्या घरी नेऊन सोडले. आजीला झालेले प्रकरण थोडक्यात सांगून तिची काळजी घ्यायला सांगितली आणि तो जड मनाने घरी निघून आला.