Aug 18, 2022
नारीवादी

नणंदभावजय

Read Later
नणंदभावजय

#नणंदभावजय

दोन मुलं आम्हाला. मोठा निरज व धाकटी निवा. दोघांमधे पाच वर्षाचा फरक. निवा तीन वर्षाची झाली तशी दादाचा हात पकडून शाळेत जाऊ लागली. तिचं दप्तर भरणं,तिचा अभ्यास घेणं सगळं निरज करायचा. काहीच सांगाव लागत नव्हतं त्याला. 

निवा जरा जास्तच मस्तीखोर म्हणून मी कधी तिला धम्मकलाडू देऊ लागले तर निरज मधे यायचा व तिच्या वाट्याचा मार खायचा. कधी हट्टाला पेटून मी तिला मारलच तर याच्या डोळ्यातून गंगायमुना वहायच्या.

हळूहळू दोघंही मोठी झाली. निरज बारावी झाल्यावर होस्टेलला रहायला गेला तरी दिवसातून एक फोन निवाला करायचाच. तिची शाळा,तिचा अभ्यास,मित्रमैत्रिणी सगळ्याची चौकशी करायचा. 

बाबाचीही ती लाडोबाच होती. यात झालं काय मी एकटीच तिला शिस्त लावणारी म्हंटल्यावर मेडमना माझा राग यायचा. इथली काडी तिथे करायला नको पोरीला बरं ओरडले की बाबा यायचा धावत,माझ्या लेकीला काही बोलू नकोस म्हणून. अरे याला काय अर्थ नं! मी काय शत्रू होते तिची? 

मी म्हणते,मुलगी चार दिवस आपल्याकडे रहाणार मग तिच्या सासरी जाणार या नावाखाली तिचे अवास्तव लाड करुच नयेत. मुलगी असो वा मुलगा..शिस्त ही हवीच. 

बाबा पण तिचा असा ना..ती जे मागेल ते दुसऱ्या दिवशी तिच्या पुढ्यात हजर. मला मग माझं बालपण आठवायचं.  
रोज संध्याकाळी दिवेलागणीला म्हणायचो ती स्तोत्रं,परवचा,पाठांतर आठवायचं. आईच्या हातची गुळपापडी आठवायची. मग वाटायचं माझेच संस्कार कमी पडले की काय लेकीवर पण हे सर्व मीही लहानपणी शिकवायचे तिला. आता मोठी झाली नं.. शिंग फुटली. कशाला ऐकेल आईचं? 

एकदा मला न विचारता कारटी कसला तो मशरुम कट करुन आली. बापयाचे तरी मोठे असतात केस. हिने पाठीमागचे सगळे भादरलेले नि वरती कोंबडीचं घरटं. पहिलं ओळखलंच नाही तिला मी. निवा घरी नाहीए म्हणून सांगत होते तर मोठमोठ्याने हसू लागली गधडी. 

मला त्या रात्री फारच रडू आलं. एवढे घनदाट केस होते म्हणून सांगू. अगदी दुसरीपासून वाढवलेले. तेव्हा कट करुया म्हंटलं तर मी वाढवणार म्हणायची नि आता ही थेरं. मला आठवतय..दर रविवारी हिचे केस धुण्याचा मोठा कार्यक्रम होता माझा..परत ते वाळवणं..लाल रिबिनी लावून डबल वेण्या बांधणं..एवढ्या निगा राखलेल्या केसांवर माझा काहीच हक्क नव्हता? मी असं  यांना विचारलं तर म्हणे तू फारच इमोशनल होतेस. तिने.मला सांगितलेलं हेअरकट करण्याआधी. मी म्हंटलं,"तुम्हालाही नाही वाटलं मला विचारावसं? एवढी परकी आहे मी?"
मग काय बसले गप्प. माझ्या मनात निवाबद्दल अढी बसली. यानंतर अशीच ती माझ्यापासून दूर दूर होत गेली. 

निरजला मल्टीनेशनल कंपनीत नोकरी लागली. आता त्याच्या लग्नाचा विषय हाती घेतला. चारेक स्थळं पाहिली पण तो नाहीच म्हणत होता. एकदा मी त्याची रुम साफ करत होते. तो आंघोळीला गेला होता. 

आमच्या घरात धुळ जास्त येते. रोडसाईडला आहे त्यामुळे. मी पुस्तकांवरील धूळ झाडत होते तेव्हा एक फोटो खाली पडला. मी तो उचलला. अच्छा म्हणजे असं आहे तर, मी मनात म्हणाले. 

मी निरजला त्या फोटोबद्दल विचारलं. निरजने त्याचं तिच्यावरचं प्रेम मान्य केलं. मी फोटो पाहिला. रंगाने सावळी,टपोरे डोळे,नाजूक जिवणी आणि चेहऱ्यावर अल्लड भाव. खरं सांगू तिचा फोटो फार आवडला मला. 
"नाव काय रे हिचं?"

"गौरी"

"इतके दिवस सांगितलं का नाहीस. उगाच मुली बघत राहिलास तो!"

"ते निवाला रंग आवडला नाही तिचा."

"लग्न कोणाला करायचय निवाला की तुला?"

"अगं आई पण.."

"पणबिण काही नाही. उद्या जाऊच तिच्याकडे."

"आणि निवा.."

"हे बघ निरज,आयुष्यात काही निर्णय हे स्वतःच्या डोक्याने घ्यायचे. सगळ्यांना विचारत राहिलास तर म्हातारा होशील."

दुसऱ्या दिवशी आम्ही गौरीच्या घरी गेलो. निरजने गौरीला कल्पना देऊन ठेवली होती. कॉमन गेलरीवाली बिल्डींग होती ती. मी होणाऱ्या सुनेला पहिल्यांदाच भेटणार म्हणून   फळं,मिठाई घेतली होती. 

गौरीने बारीक फुलांचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिचे वडील यांच्याशी गप्पा मारु लागले. मी स्वैंपाकघरात गेले. टीचभर स्वैंपाकघर पण किती निटनेटकं ठेवलेलं. मी म्हंटलं गौरीच्या आईला,"खूप छान ठेवलय तुम्ही स्वैंपाकघर" यावर त्या म्हणाल्या,"गौरीच करते हे सगळं. माझ्याच्याने होत नाही हो. मणक्यात गेप की काय पडलेय तेव्हापासून अधुच झालंय शरीर. तुमचा निरव आमच्या धीरजकडे यायचा अधेमधे, तेव्हाच सूत जमलं या दोघांच. माझी गौरी माझ्यापासून काही लपवत नाही. तिने सांगितलन मला पण नाही म्हंटलं तरी आर्थिकदृष्ट्या तफावत आहे हो आपल्यात. निरजचे बाबा मोठे शासकीय अधिकारी तेव्हा मीच जरा टाळाटाळ करत होते."

मी गौरीच्या हातात मिठाई देत गौरीला म्हंटलं,"मला आवडली माझ्या मुलाची आवड."  अगदी मोजकी माणसं बोलावून लग्न करायचं असं ठरलं. 

लग्न झालं,सत्यनारायणाची पूजा,देवदर्शन झालं ,हनिमुनलाही जाऊन आली नवरानवरी आणि रुटीन सुरु झालं. गौरी माझ्या हाताखाली शिकू लागली. तसं तिला येत होतं सगळच पण तरीही मला विचारुन करायची सगळं. माझं नि गौरीचं छान जमत होतं. 

गौरीचा वाढदिवस होता म्हणून निरजने तिच्यासाठी मोती कलरचा ड्रेस आणला. मीही युट्युबवर पाहून केक बनवला. गौरीचे आईवडील व भाऊही आलेला वाढदिवसाला. हसतखेळत जेवणं झाली.

 गौरीची आई म्हणाली,"तुमच्यामुळे मला काळजीच वाटत नाही गौराईची. अगदी साखरेसारखी विरघळली तुमच्या घरात." तरी आई निघताना गौरीचे डोळे पाण्याने भरलेच. मी तिच्या पाठीवर हात ठेवून तिला धीर दिला. 

यांच्याशीही गौरीचं छान जमत होतं. दोघं मिळून कँरम खेळायचे,चेस खेळायचे. निरज मग तिला साद घालायचा,"गौरी बास गं आता ये झोपायला." 

निवा मात्र गौरीशी जेवढ्यास तेवढं बोलत होती. निरजने एकच साडी आणली याचाही तिला राग आला होता. गौरी व निरज कुठे फिरायला निघाले की निवाही त्यांच्यासोबत  बाहेर पडायची. मी एकदोनदा निवाला यावरुन बोलण्याचा प्रयत्न केला पण तिचं म्हणणं,"दादावहिनीला चालतं मग तुला काय प्रॉब्लेम?" 

निवा घरात काहीच काम करत नाही याचा गौरीला राग येऊ लागला. तीच मग तिला जरा हे कर ते कर सांगू लागली पण निवा ऐकेल तर शपथ. एकदा तर निवा गौरीचा लाँग गाऊन घालून गेली आणि त्यावर डाग पाडून घेऊन आली. ते डाग काही गेले नाहीत. मग मीच गौरीला मरुन कलरचा गाऊन आणून दिला. ते पाहून निवा जाम भडकली. गौरीलाही अद्वातद्वा बोलली मग मात्र हे मधे पडले. प्रथमच हे निवावर भडकले. तिच्यावर हात उचलणार इतक्यात गौरीने त्यांना थांबवलं. 

मी मनात म्हंटलं,"शिस्त लावत होते पोरीला तेव्हा पाठीशी घातलत आता भोगा.." एका संध्याकाळी निवाचा फोन आला. गौरीने उचलला. गौरी तिथेच थबकली. मी तिला विचारत होते,"अगं गौरी काय झालं? तू अशी गप्प का?" 

गौरीने मला सोफ्यावर बसवलं व म्हणाली,"निवाने घर घेतलं भाड्याने. तिला इथे नाही रहायचं." 

मी म्हंटलं,"बघू किती दिवस रहातेय ते. राहुदेत जरा बाहेरची दुनियाही बघुदेत तिला."

"आई,माझ्यामुळे निवा घर सोडून गेली."

"नाही गं बाळा. तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस. तिचा राग शांत झाला की येईल ती परत."

निरजने निवाला फोनवर खूप समजावलं पण ती घरी यायला तयार होईना. 

गौरीला दिवस गेले. मी तिचे सगळे डोहाळे पुरवत होते. सातव्या महिन्यात ती माहेरी गेली नि घर कसं सुनंसुनं झालं. निवा एकदाही तिला पहायला आली नाही. 

गौरी माहेरी गेलेय हे तिला तिच्या बाबांकडून कळलं तशी आली रहायला. आता थोडी सुधारली होती बाहेर राहून. आपली रुम आपण स्वच्छ केली. माझ्यासोबत किचनमधेही कामं करु लागली. मला नवीनच होतं हे.

 केसही छान वाढलेले. मला म्हणाली,"आई मालिश कर जरा." मी तेलाची बाटली घेऊन सोफ्यावर बसले तशी आपण बसली खाली. मी बोटांच्या अग्रांनी हळूवार मालिश केलं. म्हंटलं,"निवा,आवडतय का गं तुला असं स्वतंत्र रहाणं?" तर हसली म्हणाली,"हवा होती गं आई डोक्यात. बाहेर राहिले. रुममेट्सची दु:खं जाणली. म्हंटलं,एवढं सुंदर आयुष्य दिलंय देवाने नि मी नको ते गैरसमज डोक्यात घेऊन बसलेय झालं. मग ठरवलं..बास..झालं तेवढं पुरे..आता मोठं व्हायचं..त्यादिवशी माझ्या रुममेटची आई एडमिट होती. ती पोर रात्रभर जागी होती. वेड्यासारखी रडत होती.

 मला जाणवलं..माझं तुला नेहमीच ग्रुहित धरणं..तुला उलट उत्तरं करणं. तुझं बरोबर असलं तरी केवळ तू म्हणतेस म्हणून नेमकं उलट करणं.. नि आता तू ,बाबा गौरीचे लाड करतात म्हणून माझं तिचा दुस्वास करणं. मग ठरवलं,हे बदलायचं. परत घरी फिरायचं पण गौरीला छळलेलं. तिच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नव्हती माझी म्हणून ती माहेरी जायची वाट पहात होते. 

इतक्यात बेल वाजली. निरज व गौरी आले. निरज म्हणाला,"अगं आई,हिला म्हंटलं निवा घरी आलेय तर हट्टालाच पेटली. मला निवाला भेटायचय म्हणू लागली."

निवाने धावत जाऊन गौरीला मिठी मारली. "आय एम एक्स्ट्रीमली सॉरी वहिनी",असं म्हणाली. 

गौरी म्हणाली,"नको गं सॉरी म्हणून परकं करुस मला. माझ्यावर रागाव,मला बोल पण परत अशी हिरमुसून जाऊ नकोस निवा."

त्या दोघींची एकी बघून भरुन पावले मी.

-------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now