Login

नणंद माझी लाडाची

Marathi katha

"काय हे दादा, मी पण शॉपिंगला आले असते ना.. माझी माझी शॉपिंग केली असती.. मला का नाही नेलेस?.. वहिनी आल्यापासून तुझं माझ्याकडे लक्षच नाही.. नुसता तिचे कौतुक माझे काहीच नाही.." असे म्हणून सोनाली रागारागाने खोलीत गेली..

"अगं सोनू, तसे काही नाही.. तू बाहेर गेली होतीस म्हणून आमचं आम्ही गेलो.. पुढच्या वेळेस नक्की तुला घेऊन जातो.." राहूल

"मी म्हटल्यावर कोणीही येईल.. मी येईपर्यंत तुम्हाला वाट पाहता आली नाही काय??" सोनाली..

"अगं मग उशीर झाला होता.. समजून घे ना सोनू.." राहूल

"वहिनी आल्यापासून तुझ माझ्याकडे लक्षच नाही.. वहिनीच्या मागेमागे करतोस.. तुझी माझ्यावरची मायाच कमी झाली आहे.." सोनाली थोडी रूसून..

"अग तसं नाही ग सोनू.. कधी असं होईल का?? आत्ताचं दादा कधी बदलेल का??" राहूल

सोनाली आणि राहुल दोघे सख्खे भाऊ लहानपणीपासून सोनालीचे खूप लाड झाले होते.. एकुलती एक मुलगी म्हणून सगळेजण तिचे लाड करत.. आज तिला हव्या त्या गोष्टी तिला आणून देत होते.. आणि त्याची तिला सवय झाली होती.. जरा कोणी तिच्याकडे दुर्लक्ष केलं की त्यांचे लक्ष आपल्याकडे येण्यासाठी ती काहीही करत असे.. आता तर काय राहुलचे लग्न झाले म्हटल्यावर आपल्या घरातील किंमत थोडी कमी होईल अशी तिला भीती वाटत होती.. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीत तिच्या वहिनीचा म्हणजेच राहुलच्या बायकोचा तिरस्कार करत होती..

तिला कितीही सांगितले तरी कोणाचेही ऐकत नसे.. खूप हट्टी होती. आजही तिला शॉपिंगला घेऊन गेले नाही म्हणून ती राहुल सोबत भांडूण रागाने आत गेली होती..

राहुल ची बायको मेघना ही खूप समजूतदार होती.. तिला सुरुवातीला थोडं वाईट वाटलं.. पण नंतर तिने समजून घेतलं.. सोनालीचे आई बाबा पण सोनालीच्या स्वभावाला थोडे कंटाळले होते.. पण काय करणार लाडाची लेक तर होती..

एक दिवस राहुल त्याच्या बायकोला म्हणजेच मेघनाला एक सुंदर सोन्याचा नेकलेस घेऊन आला.. ते पाहून सोनालीचा राग आणखीनच वाढला.. त्या रागाच्या भरात ती घर सोडून निघून गेली.. रागारागात गाडी चालवत असताना समोरून भरधाव धावणाऱ्या ट्रकने धडक दिली आणि तिचा एक्सीडेंट झाला.. एक्सीडेंट झाल्यावर जेव्हा घरी समजले तेव्हा घरचे धावत-पळत हॉस्पिटलमध्ये गेले.. सोनालीला तेथील लोकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी ॲक्सिडेंट केस आहे म्हणून पोलिसांना बोलावून घेतले होते.. तिथे सगळा तपास झाल्यानंतर सोनालीला चेकिंग करण्यात आली.. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बाहेर आल्यावर सांगितले की, सोनालीला रक्ताची खूप गरज आहे.. तिच्या शरीरातील भरपूर रक्त गेले आहे आणि तिचे रक्तगट ओ निगेटिव्ह असल्यामुळे आमच्या हॉस्पिटलमध्ये तेवढा साठा नाही.. तेव्हा तुम्ही थोडं प्रयत्न करा आम्हीपण आमच्याकडून काय होतंय का ते प्रयत्न करतो??

सगळे टेन्शनमध्ये होते.. सगळीकडे पळापळ धावपळ रक्तगट शोधण्यासाठी चालू होती.. पण कोणी भेटेना, रक्तगट कोठेच मिळेना.. नातेवाईक झाले, पाहुणेमंडळी झाले, मित्रमंडळी झाले, इतर ठिकाणी हॉस्पिटलमध्ये चेक केले पण ओ निगेटिव्ह रक्त काही सापडले नाही.. शेवटी सोनालीची वहिनी मेघनाने रक्त द्यायला पुढाकार घेतला.. कारण तिचा रक्तगट ही ओ निगेटिव्ह होता.. पण तिच्या सासूबाईंनी तिला रक्त देण्यास नकार दिला.. कारण ती तीन महिन्यांची प्रेग्नेंट होती.. बाळाच्या जीवाला काही धोका झाला तर काय करावे?? हा प्रश्न तिच्या मनात.. इकडे जन्माला येणारे बाळ तर इकडे पोटची मुलगी या पेचात सापडल्यामुळे तिची अवस्था खूप बिकट झाली होती.. पण मेघनाने स्वतःचा निर्णय घेतला.. सोनालीला रक्त देण्याचा..

मेघना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, डॉक्टरांना सर्व काही सांगून सोनालीला रक्त द्यायला तयार झाली.. मेघनाचे रक्त घेतल्यानंतर डॉक्टरांनी पुढील ट्रीटमेंट चालू केली.. थोड्याच दिवसात सोनाली शुद्धीवर आली..

"मेघना तुझे उपकार कसे फेडू?? हे माझे मलाच समजेना.. सोनालीने तुझा किती तिरस्कार केला.. तुला काहीही कितीही बोलली.. तरीही तू मनात धरून न ठेवता स्वतःचा, स्वतःच्या बाळाचा जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचवलेस.. खरंच इतका समजुतदारपणा तुझ्यात कुठून आला?? मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन.. आज जे तू केलेस ते कधीच कोणीच करू शकणार नाही.. खरंच तू खूप ग्रेट आहेस.." मेघनाची सासू

"नाही आई, मी जे काही केलं ते माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी केल.. जर सोनाली ताईंना काही झालं असतं तर माझ कुटुंब कोलमडून गेलं असतं.. माझ्या कुटुंबाचा प्राण आहेत सोनाली ताई आणि त्यांना वाचवणे हे माझे कर्तव्यच आहे.." मेघना

"कुठून आणता ग इतका चांगुलपणा तुम्ही मुली.. खरंच मुली आणि सुना या घरच्या लक्ष्मीच असतात.." मेघनाची सासू

हे सगळं जेव्हा सोनालीला समजले तेव्हा तिला तिच्या चुकीबद्दल पश्चाताप झाला आणि तिने मेघनाची माफी मागितली.. तेव्हा मेघना म्हणाली, "नणंद माझी लाडाची.." हे ऐकून सगळेच हसू लागले..
आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका..