नणंद भावजय (भाग ४ अंतिम)

नणंद भावजयीचे प्रेमाचे नाते


शितल आणि अनुजा या दोघी नणंद भावजयने शेवटी आपला हट्ट पुरवून घेतलाच. बाबांनी देखील दोघींनाही साथ दिल्यामुळे अखेर अजितने देखील त्यांना मूव्ही पाहायला नेलेच. छोटा रुद्रही खूपच खुश झाला थिएटरमधील एवढी मोठी स्क्रीन पाहून.

घरी आल्यावर बाबांना कौतुकाने सांगत होता, "बाबा आम्ही ना एवली मोथी तीव्ही पाहायला गेलो होतो."

त्याचे हे बोलणे ऐकून आता शितल आणि अनुजाला तर धडकीच भरली. हा नक्की त्याच्या आजीला सांगणार. म्हणून दोघीही त्याला समजावू लागल्या.

"बाळा आजीला सांग हा आल्यावर आपण कुठे गेलो होतो ते." ह्या दोघींकडे पाहून अजित खोचकपणे बोलला.

"पण बाळा आपल्याला पप्पाने नेले होते हे पण सांगायचे बरं का." अनुजाने देखील दादाच्या बोलण्याला बरोबर टोला लगावला.

"मी आधीच सांगितले आहे मला यात ओढायचे नाही. तुम्ही तुमचे पाहा काय ते." अजितने मात्र अंग काढून घेतले या साऱ्यातून. पण बायकोची आणि बहिणीची खेचायची संधी थोडीच ना सोडणार होता तो.

"पण विनाकारण आग लावायची काही गरज आहे का मी म्हणते."शितलने देखील नवऱ्याला चांगलीच तंबी दिली.

अनुजाने मग छोट्या रुद्रला जवळ घेवून खूप समजावले. "आपण कुठे गेलो होतो हे आजीला बिलकुल सांगायचे नाही. नाहीतरी काम सोडून आपण फिरायला गेलो म्हणून आजी रागावेल की नाही आपल्याला. तू जर आजीला नाही सांगितले तर तुला एवढं मोठ्ठं चॉकलेट देणार आत्तू."

"मी आजीला नाही सांगणार" म्हणत लेकरु उड्याच मारायला लागले मग.

खरंच अलका ताईंचा घरात खूपच धाक होता. अगदी छोट्यातली छोटी चूकदेखील त्यांच्या नजरेतून सुटत नसायची. उगीच वाद नकोत म्हणून घरातील सर्वचजण त्यांना घाबरून राहायचे. पण आठ दिवसांसाठी त्या देवदर्शनाला गेल्या आणि थोडीफार का होईना पण प्रत्येकालाच मोकळीक मिळाली.

घरात प्रमाणापेक्षा जास्त कोणाचा धाक असला की मग इच्छा नसतानाही हे असे वागण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही.

अधूनमधून अलका ताईंचा फोन सुरूच होता. आज काय काय काम केले विचारायला. हे केले का? ते केले का? कोणी काही मागायला आले होते का? मला विचारल्याशिवाय कोणालाही कोणती वस्तू द्यायची नाही. हे असे खूपदा अलका ताई फोनवरून देखील समजावून सांगत राहायच्या सुनेला. त्या घरात जरी नव्हत्या तरी त्यांचा धाक वाटायचा प्रत्येकाला.

त्या घरी आल्यावर पुन्हा सगळे नियमितपणे सुरू झाले. पुन्हा घरात शांतता पसरली. जो तो आपापल्या कामात गुंतला.

परंतु,अनुजासारखी नणंद होती शितलच्या पाठी भक्कम उभी. त्यामुळेच तर तिलाही तिचा खूपच आधार वाटायचा. लग्न करून शीतल सासरी आली त्या दिवसापासून अनुजाचा तिला पाठिंबा मिळाला होता. सासरी जुळवून घेताना अनुजामुळेच तिला खूप सोप्पे झाले होते.

अनुजा जितकी बडबडी तितकीच शितल शांत स्वभावाची. आपली चूक नसताना अनुजा ऐकून घेणार्यातील नव्हती. याउलट शितलचा स्वभाव होता. स्वतःच्या हक्कासाठी तिला कधी बोलताच यायचे नाही. कोणाकडून कोणतीच अपेक्षा न करता सर्वांचे मनापासून ती करायची.

अनुजा मात्र भावजयीला तिच्या चुका तर दाखवून द्यायचीच पण त्याबरोबरच शितलच्या या सोशिक स्वभावाची तिला खूपच दयादेखील यायची. कदाचित वहिनीच्या या अशा स्वभावामुळेच आईची खूप चिडचिड होत असावी. पण आईनेही तिला समजून घ्यायला हवे. आजकाल नाही करत कोणी एवढं. ऐकून तर त्याहून कोणी घेत नाही. पण वहिनी मात्र एका शब्दाने उलट उत्तर देत नाही कोणालाच.

वहिनीतील वाईट गुण बाजूला सारून चांगले गुण जर लक्षात घेतले तर नक्कीच वादाचे अनेक प्रसंग टाळता येवू शकतील. अलका ताईंचा मुड पाहून अनुजा शीतलच्या बाबतीत खूपदा सकारात्मक गोष्टी आईला सांगायचा प्रयत्न करायची. पण अलका ताई मात्र "तुला नाही काही कळत, तू अजून लहान आहेस" म्हणत तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायच्या.

पुढे काही दिवसातच अनुजाचे लग्न ठरले.

"ताई आता तुम्ही सासरी गेल्यावर माझे कसे होणार ओ?" म्हणत शितलच्या डोळ्यात मात्र आसवांची दाटी झाली. नवऱ्यापेक्षाही जास्त नणंदेचा सपोर्ट होता शितलला त्या घरात. त्यामुळेच अनुजा सासरी जाणार म्हटल्यावर शितललाच आता रडू आवरत नव्हते.

नणंद भावजयीचे हे असे घट्ट नाते क्वचितच पाहायला मिळते. जवळपास आठ वर्षे दोघींनी एकत्र घालवली होती. दोघीही स्वभावाने अगदी विरुद्ध पण तरीही एकमेकींच्या अगदी घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या.

खरंच नाते कोणते का असेना पण त्यात आपलेपणा आणि मायेचा ओलावा असेल तर ते नाते दिवसागणिक फुलत जाते. एकमेकांना समजून घेण्याची मनाची तयारी असेल तर मग चुकाही दुर्लक्षित होतात.

पण अलका ताईंसारखी सासू असेल तर मग अनुजासारखी खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी नणंद देखील तितकीच गरजेची असते. हो ना?

धन्यवाद

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all