नणंद भावजय (भाग ३)

नणंद भावजयीचे प्रेमाचे नाते


दोघी नणंद भावजयीने मिळून मग छानसा बेत केला रात्रीच्या स्वयंपाकाचा. कारण आज आई नव्हती काही बोलायला, एवढेच तेल घातले तेवढेच पीठ वाया गेले म्हणायला.

आज किचनही जणू खूपच खुशीत होते. नुसत्या घमघमाटानेच त्याचेही पोट भरले असावे.

आज खूप दिवसांनी बाबांच्या आवडीच्या अगदी त्यांना हव्या असतात तशा अळुवड्या बनवल्या होत्या सुनेने.

"रोज सुनेच्या हाताला चवच नाही असे म्हणणारी तुझी आई  असायला हवी होती आज अळुवडी खायला काय अनु." बापाने हळूच लेकीच्या कानात सुनेची तारीफ केली. सर्वांनी मिळून आज जेवणावर मनसोक्त ताव मारला.

गेल्यापासून अलका ताईचे चार वेळा फोन येवून गेले. त्या गेल्या होत्या तीर्थयात्रेला पण सर्व लक्ष जणू घरीच विसरून गेल्या होत्या. चार वेळा फोन आला पण फक्त सूनेसाठी आणि नातवासाठी. सूनेला कामांच्या सूचना देण्यासाठी. ते काही का असेना पण दोघींचे ही एकमेकींशिवाय पान हलत नव्हते हे मात्र तितकेच खरे. सून कशी का असेना पण लेकिपेक्षा शेवटी तीच जवळची होत जाते हळूहळू.

रात्री सर्वांची जेवणं आटोपली. अनुजाने शेवटी दादाजवळ विषय घेतलाच.
"अरे दादा खूप छान मूव्ही आलिये थिएटरला. आजच ॲड पाहिली टिव्हीवर."

"मग मी काय करु?" दादानेही असे बोलून तितक्याच उत्साहात बहिणीचा मुड ऑफ केला.

"अरे छान आहे असं म्हणाले मी. आपल्या शेजारची दीपिका गेली होती ती सांगत होती खूप छान मूव्ही आहे म्हणून."

"मग तुमचा काय विचार आहे. डोक्यात काही शिजत असेल दोघींच्या तर आताच तर काढून टाका." मोबाईलची स्क्रीन वर ढकलत दादा बोलला.

"काय रे दादा. आम्हाला पाहायची आहे ती मूव्ही. प्लीज ने ना आम्हाला दोघींना.

"बाबा यांना सांगा बरं. मी नाही एवढी मोठी रिस्क घेवू शकत. एकतर आई नजर म्हणजे सीआयडीची नजर आहे. तिथे बसून सुद्धा इथल्या सगळ्या बातम्या तिला माहिती होतील. नाही नाही नाही ते तुम्ही तुमचं बघा. मी नाही या सगळ्यात पडणार.

"तुम्हा पुरुषांचे बरे आहे रे. मस्तपैकी बाहेर फिरुन येता. पाहिजे तेव्हा मित्रांसोबत हॉटेलिंग करता. आम्ही बायका आहोत घरात तुमच्यासाठी भाकऱ्या थापायला. कधी नव्हे तो काहीतरी मागितले पण नाही. एवढीशी इच्छा देखील पूर्ण होत नाही घरात.
ते काही नाही बाबा, आताच्या आता माझे लग्न लावून द्या. मी जाईल माझ्या नवऱ्यासोबत मूव्हीला."

"आणि तुझी सासू पण सेम आपल्या आईसारखी असली मग?"

"माझी सासू कशीही असली तरी मी बरोबर हॅण्डल करेल. खात्री आहे मला. तुमच्या सगळ्यांसारखी भित्री नाही मी."

"मग जा आईला फोन करून विचार आधी आम्ही मूव्हीला जाऊ का म्हणावं."

"मी विचारील रे पण नंतर बोलणी तुझ्या बायकोला खावी लागतील ते बघ आधी."

"बरं चल ना रे दादा. कर ना तिकीट बूक. बाबा सांगा ना याला. किती मस्का मारायला लावतोय हा. जर तू नेले नाही ना आम्हाला तर आम्ही दोघी आमच्या पद्धतीने जावू."

"जाऊनच दाखवा आता. तुमचीही हिंमत पाहायचीच आहे आता मला."

"ताई जाऊ द्या ओ. मी म्हटलं होतं तुम्हाला की हे ऐकणार नाहीत म्हणून. कशाला उगीच एनर्जी वाया घालवताय." शीतलनेही मग रागानेच पाहिले नवऱ्याकडे. स्वतः हुन तर कधीच कुठे नेता येत नाही आणि आता नणंदेमुळे जायला भेटतंय तर तिथेही इतका भाव खात आहेत.
नजरेच्या भाषेतूनच तिने नवऱ्याला जणू खूप काही सुनावले.

"काय रे अजित, एवढ्या बोलत आहेत त्या तर जा ना घेवून."बाबांनी देखील लेकीची आणि सूनेचीच बाजू घेतली.

"आता बाबा तुम्ही म्हणता म्हणून नेतो. पण नंतर जर आईला समजले ना तर मला यात घ्यायचे नाही सांगून ठेवा ह्यांना."

"नाही समजणार आईला, तुम्ही जा आणि जेव्हा समजेल तेव्हा समजेल." बाबांनी शेवटी तयार केलेच दादाला.

दुसऱ्या दिवशी दुपारी बारा ते तीनच्या शो ला मग दोघी नणंद भावजय गेल्याच मूव्हीला.

क्रमशः

आता काय होईल? अलका ताईंना ही गोष्ट समजणार का? पाहुयात पुढच्या भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all