नणंद भावजय (भाग २)

नणंद भावजयीचे प्रेमाचे नाते


अलका ताई देवदर्शनाला गेल्यानंतर मात्र दोघी नणंद भावजय तासभर काही उठल्या नाहीत सोफ्यावरून. गप्पांना तर खूपच उधाण आले होते. छोट्या रुद्रलाही आज कितीतरी दिवसांनी आई आणि आत्या अशा काम सोडून बसलेल्या दिसल्या. त्यामुळे तोही खूपच खुश दिसत होता.

पोटभर गप्पा झाल्यानंतर मात्र पोटाने आरोळी दिली.

"ये वहिनी काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय ग. रोजची ती भाजी भाकरी खावून कंटाळा आलंय ग."

"काय बनवू मग तुम्ही सांगा ताई मी बनवते पटकन्."

"तुला कंटाळा येत नाही का गं वहिनी रोज रोज किचन सांभाळून."

"त्यात काय एवढं. आपल्याच माणसांसाठी करताना कसला आलाय कंटाळा?"

"तू नाही सुधरणार. बर थांब मी ना चंदुच्या हॉटेलमधून गरमागरम वडा पाव घेवून येते. खूप दिवस झाले खाल्ले पण नाहीत ग."

"अय्या ताई, वडा पावच्या नुसत्या नावानेच माझ्या तोंडाला पाणी सुटलं ओ."

"हो ना, थांब मग आलेच पटकन् घेवून."

"पण ताई, हा तुमचा आघाव भाचा तो आजीला सांगेल ना आल्यावर सगळं. बोलता येत नाही तरी तोडक्या मोडक्या शब्दात बोबड्या भाषेत सांगेलच."

"तू काळजी करू नको, मी बरोबर समजावेल त्याला. बरं थांब मी आलेच जाऊन पटकन्. कारण आता अजिबात कंट्रोल होत नाही यार."

अनुजाने पटकन् गाडी काढली आणि पंधरा ते वीस मिनिटात जावून गरमागरम वडा पाव आणले. योगायोगाने आज बाबाही घरी नव्हते. नाहीतरी त्यांनीच आणून दिले असते वडा पाव.

दोघींनीही मग मनसोक्त वडापाववर ताव मारला. टीव्ही पाहता पाहता एकीकडे वडापाव खाणेही सुरूच होते.

"वहिनी अगं किती भारी मुवी आली आहे थिएटर ला बघितलंस का ग? बोल.. जायचं का पाहायला?"

"काहीही काय ताई, इतकं सोप्पं आहे का ते? नंतर आईंना समजलं तर काय होईल याचा अंदाज आहे ना?"

"अगं पण आई कुठे आहे इथे? ती अजून आठ दिवस तरी येत नाही. तिला कसे समजणार?"

"अहो ताई पण तुमचे दादा तयार व्हायला पाहिजेत ना? आणि बाबांचे काय? ते सांगतील की आईंना."

"किती घाबरतेस गं वहिनी. जर समजलेच चुकून आईला तर काय होईल?"

"बापरे! नको बाई, कल्पना न केलेलीच बरी. आपल्यामुळे विनाकारण वाद नको बाबा. मला तर आता चुकून मोठ्याने जरी बोलल्या आई तरी अंगावर काटाच येतो. काहीही झाले तरी ते माझ्याचमुळे होईल अशी सतत भीती वाटत राहते."

"तू अशी घाबरतेस ना म्हणून मुद्दाम चुका होतात तूझ्या हातून. मनात तुझ्या ते सुरू असते त्याची निगेटिव्हीटी इतकी तीव्र असते ना की शंभर टक्के जे घडायला नको तेच घडते आणि मग खातेस आईची बोलणी."

"हो ना. खूपदा ठरवते मी बिंदास एखादी गोष्ट करायची. पण आईंना पाहिले की काय होते मला तेच कळत नाही. आई रागवायला लागल्या की आपोआपच माझे हातपाय थंड पडतात ओ."

"ती काय वाघ आहे का ग? किती घाबरतेस तिला तू? अगं ज्या चुका तुझ्या हातून होतात त्या करू नको मग सिंपल."

"माहित नाही ताई ते मला जमेल की नाही कधी."

"ये बाई ते जावू दे, तुला पण आईची बोलणी खायची इतकी सवय झालिये ना की त्याशिवाय तुलाही करमत नाही. मी जे विचारले त्याचे मनापासून उत्तर दे आधी. जायचे का मुव्हीला? बोल पटकन्. दादाला आणि बाबांना मनवण्याची तयारी माझी."

"तुमचे दादा ऐकतील असे वाटत नाही मला ताई."

"आधीच नकार घंटा वाजव तू. अगं कुठलीही गोष्ट प्रयत्न केल्यानंतर सक्सेस होणार की नाही ते बोलायचे. असे आधीच बॅकफुटवर नाही यायचे."

"तुला वाटतंय ना जावसं? फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दे."

घाबरतच मग शितलने होकारार्थी मान हलवली.

क्रमशः

आता खरंच ह्या दोघी नणंद भावजय मनवू शकतील का दादाला आणि बाबांना. फायनली त्या मुव्हिला जावू शकतील का? पाहुयात पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all