Aug 09, 2022
General

नानानानी

Read Later
नानानानी

#नानानानी

अगदी पहाटे उठून नानीने चुलीत आग घातली. थंडी असल्यामुळे पहाटे अगदी हुडहुडीच भरायची पण नानांना पहाटेचा चहा लागायचाच. नानीच्या हातचा दुधाचा चहा प्यायले की नाना तांबंड फुटायच्या आधी तांब्या घेऊन परसाकडला जायचे. त्याकाळात कुठची शौचालय! नाना मागल्यादारच्या पेरणीजवळ गेले. तिथल्या पाचशेएक साबणाच्या वडीने व बादलीतल्या पाण्याने हातपाय स्वच्छ धुतले,चुळ भरली नि बैलांकडे गोठ्यात गेले.

 नानांनी गोठ्यात विजेरी मारली. विजेरीच्या उजेडात ढवळ्या नि पवळ्याची जोडी त्यांना स्पष्ट दिसली. दोघेही माना वळवून धन्याकडे पहात होते. नानांना त्यांच्या ढोरांची भाषा कळायची. नानांनी बैलांची पाठीवरुन हात फिरवला. बैलांची कातडी थरथरली. सगुणा म्हैस एका बाजूला बसली होती. तिच्या पाठीवर फिरणाऱ्या मासक्या ती शेपटाने हाकवत होती. सगुणाची लेक पिंकी नाना तिला कधी सोडताहेत नि ती कधी आईकडे जातेय याचाच जणू विचार करत होती. 

गताडीत गवत टाकून नाना चुलीजवळ येऊन बसले. चुलीतल्या विस्तवाकारणाने त्या खोलीत जरा ऊब वाटत होती. नानीने टोपातला उकळता चहा कपात ओतला,त्यात जरा गरम दूध ओतून कपबशी नानांच्यापुढे सरकवली. नानांनी कपातला चहा बशीत ओतला व पिऊ लागले. घरातल्या दुधाचाच चहा आवडायचा त्यांना. दोन्ही हातानी बशी धरुन चहा पिणाऱ्या नानांकडे नानी बघत बसायची. 

अगदी चौदा वर्षाची होती तेंव्हा आलेली ती या घरात. सासूसासरे,दिर,नणंदा असा सगळा गोतावळा होता.  चार बाळंतपणं झाली नानीची. दोन मुलगे नि दोन मुली. दिरांनी हळूहळू आपापली घरं बांधली. नणंद लग्न होऊन सासरी गेली. सासूसासरे वयोपरत्वे देवाघरी गेले.

 मुली मोठ्या झाल्या तशी त्यांची लग्नकार्य करुन दिली. थोरला मुंबईतल्या नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. धाकटाही प्रायव्हेटमधे नोकरीला होता. दोघांच्या मुंबईत आपापल्या खोल्या होत्या. धाकट्याला एक मुलगा व थोरल्याला एक मुलगी होती. सुट्टी पडली की महिन्याभरासाठी नातवंड घरी यायची. दोन्ही नातवंडांचा गुरांवर भारी जीव होता. वंदन नि गौरी गुरांतच असायची. चिमुकली गौरी सगुणेला खाऊ घालायची. वंदन बैलांच्या पाठीवर जाऊन झोपायचा. बैल लेकरांना कधीच त्रास देत नव्हते. वंदन त्यांच्या अंगावर खेळत असला कि ते शांत बसून रहायचे. सुट्टी संपली की पोरं त्यांच्या आईवडिलांसोबत परतीची वाट धरायचे तेंव्हा नानानानीसोबत गुराढोरांचे डोळेही पाणवायचे. चारेक दिवस ढोरंही त्यांच्या आठवणीने चाऱ्याला तोंड लावत नसायची.

 नानांना नानी कसंबसं हसतंबोलतं करायची. वंदन,गौरी नववीदहावीत गेले तशी क्लासेसमुळे त्यांचं सुट्टीतलं येणंही कमी झालं. ढोरंही आता नानानानींसारखी उतारवयाला झुकली होती. नानांचा शेतगडी जीवा गुरांना चरायला न्हेणं,पाणी देणं आदि कामं करायचा. गोठा झाडून लख्ख करायचा. शेण भरुन डोणीत टाकायचा. शेतीची कामं नसली कि घराभोवतीचा परिसर झाडून काढायचा. तो वाळलेला पालापाचोळा शेतात न्हेऊन जाळायचा. नानानानींनी सांगितलेली सगळी कामं तो इमानेइतबारे करायचा. जळणासाठी लाकडं फोडायचा,नारळाच्या झावळ्या वळायचा. माडाचे नारळही काढून द्यायचा,वय(फांद्यांचं कुंपण) करायचा. 

जीवाची बायको सखू बांबूपासून टोपल्या,रोवळ्या,तटे,सुपं असं बरच काही बनवायची. नानीच्या मागणीनुसार तिला या वस्तू आणून द्यायची. नानीचा तिच्या मुलांइतकाच जीवावरही जीव होता. कोणताही सण केला तर ती जीवाला घरी न्हेण्यासाठी शिदोरी बांधून द्यायची. जीवाला पोटभर जेवू घालायची. एवढ्या मोठ्या घरात अडीअडचणीला तोच तर.होता त्यांच्यासोबत.

 असा हा जीवा एकदा आजारी पडला. पोटदुखी म्हणून सुरु झाली. कितीएक गावठी उपचार केले. पोट दुखायचं थांबेना तशी सखू नानीकडे आली. नानी म्हणाली,"हास्पिटलात घेऊन जा त्याला. पैशाची चिंता करु नको. नानीने दुधाच्या रतीबाचे डब्यात साठवलेले चार हजार रुपये तिच्या हातावर ठेवले. अजून लागले तर हक्काने माग म्हणूनही सांगितलं. 

जीवाला मोठ्या हॉस्पिटलात न्हेला खरा पण जीवाने आठवडाभरात आपला खेळ संपवला. नानानानीला ही बातमी कळली तसं खूप वाईट वाटलं. शे्वटी नात्यागोत्याचा नसला तरी मायेचे ऋणानुबंध जोडले गेले होते जीवाशी. 

काही दिवस नानांनी गुरांच केलं कसंबसं पण त्यांना त्या शेणात वावरायला जमेना. हातपाय लटलटू लागले. अंगातला वात वाढला. कुणी दुसरा गडीमाणूस भेटेना. आजुबाजूची तरणीताठी पोरं गॉगल लावून बाइकवर फिरत स्टाइल मारणारी. त्यांच्या हातापाया पडण्यात अर्थ नव्हता. नाना काही काम सांगतील,नानी भाजी आणायला,दळण न्यायला सांगेल म्हणून शेजारची पोरं त्या वाटेने जायचंही टाळायची. नाना मग चिडायचे. नानी समजवायची,म्हणायची, "चालायचंच हो. त्यांचे दिवस आहेत. आपल्या मुलांना शहरगावी नोकरी लागली. ती तिकडे स्थायिक झाली. मग यांना वाटणारच ना म्हाताराम्हातारीची पोरंबाळं तिकडे ऐटीत खातायत नि आम्ही का सेवा करु यांची." नाना म्हणायचे,"माझी मुलं गेली ती नोकरीसाठी,चरितार्थासाठी गेली. उद्या सेवानिवृत्त झाली की आपल्या मातीतच येणार ती आणि दरवर्षी येतातच ना सुट्टीक. यांच्याकडून अपेक्षा एवढीच की शेजाराला रहातात म्हणून कधी साद घालावी. दोन घटका कधी आमच्यासोबत बसून गप्पा माराव्या. त्याही महाग झाल्या आता."

 नानांनी थोरल्या लेकाला फोन लावला. थोरल्याने सांगितले,"नाना,नाहीतरी शेती करुन काही विशेष उत्पन्न मिळत नाहीए आपल्याला. गुरांचं खाणं,डॉक्टर यातच जास्त पैसा जातो आपला. शिवाय तुम्हाला दगदग सहन व्हायची नाही आणि वाड्यात(गोठ्यात) पडलात बिडलात तर तुम्हाला बघणार कोण तिथे! आम्हाला जमणार आहे का नोकरी सोडून तिथे येऊन रहायला! भावनांच्या आहारी जाऊ नका नाना."
नानांना यावर काय बोलायचं ते सुचेना. धाकट्या मुलानेही वाडा रिकामा करा असंच उत्तर दिलं. नानांनी फोन ठेवला नि पडवीत जाऊन वाड्याकडे पाहिलं.

 सगुणा जणू त्यांच्याकडेच पहात होती आणि नानांना पुढे काय करणार आहात आमचं असं विचारत होती. नानांनी थरथरत्या हाताने बादल्या टाकीच्या नळाला लावल्या नि सगळ्या गुरांना पाणी दाखवलं. जीवा असताना जरा पाणी,खाणं द्यायला उशीर झाला तर हंबरणारी ही मुकी जनावरं जीवा गेल्यापासनं समजदार झाली होती. नानानानींना सतावत नव्हती. मुकाट्याने पुढ्यात ठेवलेलं खात होती. नानांना काय करायचं समजत नव्हतं. पोटच्या पोरासारखं जपलेलं त्यांनी ढवळ्यापवळ्याला. सगुणा तर तिसरी लेकच होती त्यांची. 

नाना बाजारात दाढी करायला गेले असता त्यांना एक गडी भेटला. नानांनी त्याला घरी आणला. नानीच्या पसंतीस काही तो गडी उतरला नाही पण नाना म्हणाले,तातपुरता ठेवुया गो. शेवटी हो ना करत नानी तयार झाली. नवीन गडी सांग काम्या हो नाम्या होता. कामात हुशारी नव्हती. प्राण्यांची विशेष आवडही नव्हती त्याला. सगुणा तर तो जवळ जरी आला तरी लाथेने हाकलायची त्याला,दूध काढणं तर दूरच. 

एके रात्री पडवीत फिरताना त्यांना गोठ्यात काहीतरी पेटल्यासारखं दिसलं. नाना तसंच पुढे गेले. नवीन गड्याने कुठे जळतं थोटूक टाकल्याने गताडीतलं गवत पेटलेलं. नानी गो धाव बेगिन म्हणत नाना अक्षरश: धावत सुटले. नानीही त्यांच्यामागून धावली. दुखऱ्या पायाचा विचारही तिच्या मनात आला नाही. नानांनी त्या आगीतच जमतील तसे पटापट गुरांचे दावे सोडले. गुरांना म्हणाले,"जावा बाबांनो,कुठे वाट मिळेल तिकडे जावा."

आजुबाजूची लोकं एव्हाना जमा झाली. टाकीच्या नळाला पाइप लावून आग विझवण्यात आली. नाना ह्या धक्क्याने  खालीच बसले. त्यांना हॉस्पिटला न्हेण्यात आलं. सलाइन लावलं गेलं. नानी बिचारी घरी एकटीच. सकाळी नवीन गडी आला. त्याला आपली चूक समजली. गुरं मोकळी होती,दावं सोडलेली तरीही वाड्याच्या बाहेर बसून होती. आपल्या धन्यावर संकट आलंय हे त्यांना जणू कळलं होतं. नवीन गड्याने गुरं दावणीला बांधली नि भीतीने जो पळून गेला तो परतलाच नाही.

 दोन दिवसांनी नानांना सोडण्यात आलं. थोरल्या लेकाचा फोन आला,"नाना ,मी सांगत होतो ना गोठा रिकामी करा म्हणून. एकतर मधुमेह आहे तुम्हाला. भात खाता कुठे तुम्ही दोघं,शेती नि बैल हवेत कशाला!  नि दुध काय डेअरीवर मिळतं की,त्यासाठी सगुणा कशाला हवी?मी पुढच्या आठवड्यात येतो. गोठा रिकामी करुया नि तुम्ही चला थोडे दिवस मुंबईला.

नाना अगतिक दिसत होते. त्यांना काय सांगावं मुलाला हेच कळत नव्हतं. गुराढोरांत जीव गुंतलेला त्यांचा. इतक्यात सखू आली, नानांच्या तब्येतीची विचारपूस करायला. नानांनी फोन स्पीकरवर ठेवल्याने सखूनेही नानांच्या लेकाचं बोलणं ऐकलं,नानांच्या चेहऱ्यावरची अगतिकता,व्याकुळता दिसली तिला. 

सखू म्हणाली,"नानांनू तुम्ही काय्येक काळजी करु नका. मी नि माझा मुलगा,आम्ही दोघं गोठ्याकडे लक्ष देवू."

नाना म्हणाले,"तुका आणि कशाक त्रास बाय. तुका काय कमी कामा आसत!" सखु म्हणाली,"काय सांगू नानांनू,राती हे सपनात इले नि म्हणाक लागले,गो निजलहस काय उठ बेगिन. माजी ढोरा भायर आसत. वाडो पेटलो..वाडो पेटलो..उठ गो उठ.म्हनान अंगार पानी घितलय नी इलय तुमच्याहारी. हेंचोव ढोरांवर लय जीव होतो ओ नानांनू." असं म्हणत सखू वाड्यात गेली. सखूने सगुणेच्या चरवीला हात लावला पण सगुणेने तिला अजिबात लाथ हाणली नाही. सखुने बैलांच्या पाठीवरुन हात फिरवला. बैलांना कुठेतरी आत जीवा जवळ असल्याचा भास झाला. 

नानांनी लेकांना फोन लावून ते त्यांच्या गुरांना कोणत्याही परिस्थितीत जगवणार असं सांगितलं. एरवी मुलांची कड घेणारी नानीसुद्धा नानांच्या गटात सामील झाली.

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now