नाना-एक वस्तू पाठ (भाग एक)

नाना-एक वस्तू पाठ भाग एक

कथा मालिका

शीर्षक-नाना -एक वस्तू पाठ (भाग एक)

विषय-कौटुंबिक कथा

फेरी -इरा राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा

लेखिका-सौ. मृणाल मधुकर देशमुख

टीम-अमरावती


गोठ्यात चांदीचे हंबरणे सुरू होते. मुसळधार

पाऊस पडत होता. डोक्यावर घोंगडी घेऊन

नाना चिखलात पाय रोवून निश्चलपणे

चांदीला धीर देत उभे होते. त्यांच्या पत्नी

रमाबाईंची स्वयंपाक घरातील लगबग

सुरू होती. रात्रीचे तीन वाजलेले.


नानांच्या हातात मेळ वनाचे टोपले होते.

समताला जेव्हा जाग आली तेव्हा तिला हे

दृश्य दिसले. ती परत झोपेच्या आधीन गेली.

पहाटे तिने उठून पाहिले तर चांदीने एका

गोंडस वासरीला जन्म दिला होता.


नानाने आपल्या पत्नीला आवाज दिला.

'अग ये रमा आपल्या चांदीने बघ सुंदर

पिलाला जन्म दिला आहे.'

नाना व रमाबाईच्या चेहऱ्यावर थकलेले 

थकलेले असूनही आनंद व समाधान दिसत 

होते. सकाळी महादू मामा आले. त्यांनी

चांदीचा व वासरीचा ताबा घेतला.

पण तोपर्यंत नानांनी केलेले कष्ट, धडपड

पाहून आकाश दादा व समताला थक्क..

होत होते.


सकाळी स्नान करून रामरक्षा म्हणत

सर्वप्रथम आपल्या आईच्या फोटोला फुले

वाहून नानांचा दिवस सुरू होत असे.

दूध घेतल्यानंतर सकाळी साडेसातला

शाळेत जाणे, शाळेतून आल्यानंतर

न्यूज पेपर चे गठ्ठे बस मधून उतरविणे,

विक्रेत्या मुलांमध्ये त्यांचे वाटप करणे,

प्रत्येकाला नीट पेपर मिळाले की नाही

याची चौकशी करणे. इत्यादी अथक परिश्रम.

 शिक्षकाच्या अपुऱ्या वेतनातून संसार

चालवणे अशक्य असल्यामुळे विविध

व्यवसायातून शक्य होईल तसे उत्पन्न

मिळविण्याची नानांची धडपड होती.


नानांच्या जीवनाची पार्श्वभूमी इतरांपेक्षा

वेगळीच होती. सव्वाशे वर्षापूर्वीच्या 

काळातील शिक्षित कुटुंबात त्यांचा जन्म

झाला होता. पोलीस ठाणेदार असलेल्या

मोठ्या भावाने दहावी पास होण्याकरिता

नानांना दिल्लीला ठेवले होते. तेथेच त्यांच्या

जीवनाला दिशा मिळाली. शिक्षणाचे महत्त्व

व जिज्ञासा वाढतच गेली. मुळातच खेळाडू

वृत्ती असल्यामुळे विविध खेळांचे शास्त्रीय

ज्ञान त्यांना मिळाले. ओजस्वी वक्तृत्व,

कोणावरही प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व

असल्यामुळे ते लोकप्रिय झाले होते.


शिक्षण घेऊन आल्यानंतर नानांचा विवाह

झाला. सात मुली व त्यानंतर दोन मुले असे

त्यांचे कुटुंब. प्रतिकूल परिस्थितीतून..

संसाराची वाटचाल सुरू झाली होती.

शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतर तुटपुंजी

मिळकत असल्यामुळे खर्चाची हात 

मिळवणी करणे फार जिकरीचे होते.

शेतीतून उत्पन्न मिळत नसेच पण पेरणीच्या

वेळी दरवर्षी रमाबाईचे दागिने गहाण

ठेवल्या जात होते.

टोपल भर दागिने घेऊन आलेल्या रमाबाई..

च्या अंगावर एकही दागिना कधीच दिसला

नाही. हा एक मनस्ताप होता.


शिक्षणाचे महत्त्व जाणल्यामुळे नानांनी

मुलींना शिक्षणानंतर अध्यापिकेचे प्रशिक्षण

देऊन आत्मनिर्भर केले होते. या 

प्रशिक्षणाला नाना म्हणत'मुलींना मी

ही शिदोरी दिली आहे. त्यांच्या

जीवन प्रवासात केव्हाही उपयोगात येईल.'


दुर्गम आदिवासी प्रदेशातील दुर्लक्षित

गावात एका शाळेत शिक्षकाची नोकरी

स्वीकारली होती. त्या शाळेचा विकास

घडवून आणणे, मागासलेल्या विद्यार्थ्यांना

शिक्षण देऊन समाजाच्या प्रवाहात सामील

करून घेणे हे आव्हान तर होतेच पण

त्याचबरोबर गावातील दोन पक्षात जो

संघर्ष होता त्यात शाळेचे अस्तित्व टिकविणे

हे फार मोठे काम त्यांना करावे लागले होते.

आव्हाने स्वीकारणे त्यांच्या रक्तातच होते.

'दुर्जन म् प्रथमं वंदे, सज्जनम तदनंतरम'..

हे त्यांचे ब्रीदवाक्य समोर ठेवून नानांनी

गुंड व्यक्तींना वठणीवर आणले.


सामोपचाराने शाळेचा विकास घडवून 

आणला. तरुण पिढीला योग्य दिशा

देण्याकरिता खेळांचे जे महत्व त्यांनी जाणले

होते त्यामुळे कबड्डीचे सामने भरविणे व

प्रशिक्षण देणे सुरू केले. आज त्या गावामध्ये

देशातून खेळाडू स्पर्धेत सहभागी होतात.

याचा त्यांना खूप अभिमान होता. निर्व्यसनी

असल्यामुळे मजेदार घटना घडत होत्या.

आनंदी वृत्ती, संकटाला सामोरे जाण्याची

तयारी, सुदृढ शरीर यामुळे त्यांच्या पेक्षा

वयाने लहान असलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा,

सहकाऱ्यांपेक्षा ते तरुण दिसत होते.

व्यसनांपासून दूर राहा, व्यायाम करा असे ते

सर्वांना तळमळीने सांगत होते. अथांग

पाण्या तील नानांची योगासनाची प्रात्यक्षिके

पाहायला गर्दी होत असे. स्काऊट गाईडची

शाखा शाळेत सुरू करून वेगवेगळ्या प्रकारे

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी विद्यार्थ्यांसहित

सामाजिक सेवा करीत असत.


पूरग्रस्त परिस्थितीत स्काऊट गाईडचे कार्य

मोलाचे ठरले होते. नानांच्या भाषणातून

विनोद बुद्धी, हजरजबाबीपणा नेहमी

दिसायचा. 'तुम्ही काय माझे विद्यालय बंद

पाडता, आमचा दिगंबर चपरासी ते एका

मिनिटात बंद करतो. व दुसऱ्या दिवशी

उघडतो सुद्धा 'असे विरोधकांना ठणकावले.

होळीच्या पूर्वसंध्येला एकटेच रात्री शाळेच्या

मैदानात खाट टाकून पहारा देत असत.

शाळेचे लाकडी सामान समाजकंटकांनी

होळीत जाळू नये हा त्यांचा उद्देश त्या मागे

होता. नानांच्या नानांच्या संस्थेच्या 

विद्यालयाला पूर्ण अनुदान मिळत नव्हते

त्यामुळे त्या काळात शिक्षक मिळविणे हे

कठीण काम होते. कारण एकतर वेतन

वेळेवर मिळत नसे. आणि ते सुद्धा अत्यल्प

असायचे.


जिल्ह्यापासून दूर वाहनांची सोय नसलेले

गाव तेही आदिवासी क्षेत्रातील. त्यामुळे

शिक्षक परत जाऊ लागले. आता शाळेचे

काय? विद्यार्थी ज्ञानापासून वंचित राहतील

हा प्रश्न त्यांच्यापुढे होता.


पण घाबरणे, माघार घेणे हे त्यांच्या 

स्वभावातच नव्हते. नानांनी त्या शिक्षकांना

थांबविले. त्यांना ग्वाही दिली व स्वतःच्या

घरी त्यांना मोफत जेवण देणे सुरू केले.

स्वयंपाक करायला रमाबाई व वाढायला

त्यांची मुले असा छान मेळ बसला.

अनुदान मिळेपर्यंत हे कार्य सुरू होते.

हेच संस्कार पुढील काळात त्यांच्या मुलांनी

कायम ठेवले.


शाळेचे रक्षण तर झालेच पण शाळेची पुढे

जडणघडण होत गेली. त्या प्रदेशात

शिक्षणाचा प्रसार होत गेला. श्रीमंतांची मुले

शहरात शिक्षण घेऊ शकत होती. पण...

गरीब, अडाणी विद्यार्थी कुठे जातील हा

मोठा विचार घेऊनच त्यांनी शिक्षकी पेशा

स्वीकारला होता.


स्वच्छतेचे व श्रमाचे महत्त्व त्यांनी सतत

आपल्या आचरणातून, कृतीतून दाखविले.

मोठ मोठ्या पदावर गेलेले त्यांचे विद्यार्थी

खासदार, आमदार ,अधिकारी झाले.

ते जेव्हा भेटायला यायचे तेव्हा नानांच्या

हातात खराटा, केराचे टोपले असायचे.

शाळेत कार्यक्रम विविध सांस्कृतिक...

कार्यक्रम दरवर्षी आयोजित करून नाना

नाटकांचे दिग्दर्शक झाले.


शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत हा त्यांच्या

आवडीचा विषय होता. पण त्याला वेळ

देऊ शकले नाही. राज्य शासनाने सुद्धा

त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना...

 'आदर्श शिक्षक'हा राज्यस्तरीय पुरस्कार

प्रदान केला. एक व्यक्ती समाजाला,

कुटुंबाला कशी नावारूपास नेऊ शकते

त्याचा वस्तू पाठ म्हणजे नाना.


क्रमशः

नानांचे कौटुंबिक जीवन कसे होते हे

जाणून घेण्यासाठी पुढील भाग अवश्य वाचा.

धन्यवाद

लेखिका-सौ मृणाल देशमुख.

टीम -अमरावती