नकोसे माहेरपण भाग ५

About Married Woman Who Are Facing Issue With Their Own Parents
सगळ्यानी एकसाथ सहमती दर्शविली. संध्याकाळचे घड्याळात सहाचे ठोके पडले तसे सगळ्यांना जाणवले की बराच वेळ झालाय. आता निघायला पाहिजे. पण कोणाचा पाय निघतच नव्हता. अजून पाचच मिनिटे बसू करून बसल्या जागेवरून कोणीच उठले नाही. थोडा वेळ शांतता होती. कोणीच बोलत नाही बघून सुचिका बोलू लागली.

“माझ्यासाठी माहेर जेवढ्यास तेवढे आहे आता. ती उपकाराची भाषा नको. त्याही भाऊ जास्त करत नाही. लग्नाच्या वयाला आलाय तरीही आई त्याचेच कौतुक करते. माझ्या सासरी आर्थिक अडचण नाही ह्याचा अर्थ असा नाही ना की मी सतत काहीतरी सासरहून आणून द्यावे. ही अपेक्षा चुकीची आहे ना गं.”

“जाऊदे गं. आपण असे बोलून दाखविले तर लगेच बोलून दाखवतील की लहानाचे मोठे केले वैगरे. पण मानसिक स्थिती समजून नाही घेत माहेरी. कधी कधी मुलगी म्हणून जन्माला येऊन चूक केली की काय वाटते.” सुज्ञा बोलत उठली.


टिंग् करून फोनवर नोटिफिकेशन आले. सुचिका ने फोन हाती घेतला आणि पहिले की नवर्‍याचा मेसेज आहे. त्याला रिप्लाय केला आणि सगळ्यांकडे बघत, “निघायला हवे आता. मुले सुद्धा सासुबाई कडून भरपूर खेळून आलेत. नवर्‍याने खायला थोडे बनवून दिले. आता माझीच वाट पाहात आहेत तिघेही. पुन्हा आपण कधी भेटायचे माहेर पुराण गायला?” बोलून एकदम हसत सुटली.


“काहीही हं! बरं मी निघते तुमचे चालू द्या. भेटूयात आपण पुन्हा. आज खूपच छान वाटले भेटून. मन हलके झाले. माहेर म्हणजे सुखाची झुळूक नाहीये आपल्यासाठी तरी. आपण सगळयाजणी एकच नावेत आहोत म्हणून आपण एकमेकींच दुख फिल करू शकतो. निघते मी सखींनो. पोहोचले की पत्र पाठवते कबुतरांनद्वारे.” असे बोलून हसतच पर्स उचलून सुज्ञा घरी निघाली. तिला बसल्या ठिकाणीच सगळ्यांनी बाय केले.


“हम्म्.. मी माझ्या मुलीला माहेर नेहमी हवेहवेसे वाटेल असे ठेवणार. अति नाही आणि कमी नाही. लग्नानंतर तिच्या संसारात माहेरहून विनाकारण ढवळाढवळ होणार नाही ह्याची काळजी घेईन. कारण आपण आपलीच मुलगी आहे समजून घेईल आणि ती नाहीतर अजून कोण समजून घेईल असा विचार करून सगळे सांगत बसलो तर तीही तिथे तिच्या संसारात मानसिकरीत्या सुखाने राहणार नाही. हो की नाही मैत्रीणींनो?” बोलून कॉफीचा शेवटचा घुट घेऊन सुचिका निवांत खुर्चीला रेलून बसली.

शेवटाचा फ्रेंच फ्राईज तोंडात टाकत नीला बोलली, “आपणही भविष्यात अश्या सासू बनू जिथे सुनेला माहेरपण मिळत नसेल तर इथे सासरीच तिला ते देऊ. काही दिवस हट्टाने कामातून सुट्टी घ्यायला लावून माहेरी करतो तीच धमाल मस्ती करू द्यायची. असो. हे तर भविष्याचे झाले. सध्या आपण पुन्हा कधी भेटायचे हे ठरवा.”


सगळ्याच आता निघायच्या तयारीत होत्या. बिल देऊन परत बागेतल्या कट्ट्यावर येऊन बसल्या. एक निवांत संध्याकाळ आणि समोर प्ले एरीयात खेळणारी मुले, बाजुला असलेले कारंजे आणि त्यावर मावळतीच्या सूर्याची किरणे अजूनच आकर्षक बनवत होती. हळूहळू लोकांची वर्दळ वाढत होती. वयस्कर, तरुण तरुणी, जोडपी बघत ही ‘चौकडी’ घरी जायचे नाव घेत नव्हती.

“झाले का तुझे निरीक्षण करून? किती ते डोळे पटपट फिरवत आहेस. जरा आराम दे. तुला लोकांच्या चेहर्‍यावरच्या भावना वाचायला फार आवडते माहिती आहे. उगाच तू सायकॉलॉजिस्ट नाहियेस. स्वबळावर मिळविलेले आहे म्हणूनच अभिमान आहे तुझा आम्हाला.” नीलाच्या पाठीवर थाप मारत अनिका बोलली.


“हो गं. माहेरी ह्याचे काही कौतुक नाही. म्हणूनच उदासीनता येते खूप वेळा. नवरा खूप सांभाळून घेतो मला. उदास असेन तर काहीतरी छान बनवतो खायला. मुलाचीही काळजी घेतो. कधी आईसोबत कडाक्याचे भांडण झाले तरी शांत असतो. कोणाचीही बाजू न घेता कृतीतून व्यक्त होतो. हीच काय ती माझी स्ट्रेग्थ. चला गं. निघते आता. नाहीतर आई नुसते कावकाव करेल. पोराला सोडून गेली, लक्ष नाही. कसली वाईट आई आहेस वैगरे ऐकवून दाखवेल. भेटूयात पुन्हा. बाय.” बोलून नीला घरी निघाली. गेटवर पोहोचली तशी तिने कॉल करुन पुन्हा एकदा बाय केले.

आता ह्या तिघी सुद्धा निघायचे करून अजून पाचच मिनिटे थांबून निघू करत पंधरा मिनिटे एकमेकांवर विनोद करत वेळ घालविला, तसे तिघींना जाणवले की आता निघायलाच पाहिजे.

सुचिकाने नवर्‍याला फोन करून घ्यायला या सांगितले. मनाली बसने अर्ध्या रस्ता पर्यंत पोहोचल्यावर नवर्‍याला घ्यायला या सांगणार होती. अनिका बस स्टॉपपर्यंत मनालीला सोडून पुढे घरी जाणार होती.

“हा..हॅलो..अहो ऽऽ मी इथे गेट वर आहे. मेन गेटवर या. माझ्या मैत्रिणींनी सोबत थांबलेय.” सुचिकाने तिच्या नवर्‍याला सांगितले.

सुचिकाचा नवरा आला तसे चौघेही सोबतच निघाले. एका वळणावर सुचिकाने मनाली आणि अनिकाला “बाय” केले. आपापल्या घरी सगळ्या निघून गेल्या.

माहेर सगळ्यांना हवेहवेसे. पण बरेचदा नकोसे सुद्धा असू शकते. फरक एवढाच की ह्याविषयी कोणीच बोलत नाही किंवा लिहीत नाही. वास्तविक आणि काल्पनिक सांगड घालून लिहिलेली “नकोसे माहेर”

समाप्त.

🎭 Series Post

View all