नकोसे माहेरपण भाग २

About Marrried Woman's Who Are Having Issue With Their Parents.
“हो गं. खरच तर आहे माझ्या माहेरी काही वेगळे नाही. म्हणजे मला माहेर खूप हवेहवेसे आहे. अलीकडे ते नकोसच जास्त वाटू लागलेय. तिथे गेल्यावर भाऊ उपकाराच्या भाषेत बोलणार. मग नकोच ना.” सुचिता बोलली.


“ते हवेहवेसे स्वप्नवत माहेर फक्त कथा- कादंबरी आणि कवितेतच असते असे मला वाटते. अगदी तसेच जसे एखादी प्रेमकथा आपण वाचतो.” नीलाने तिचे मत थोडीशी चिडचिड करत मांडली.


तिच्याच मताला दुजोरा देत मनाली म्हणाली, “कधीकधी वाटते का कोणता लेखक किंवा कवी वास्तविक बाजू मांडत नाही? सगळ्यांचेच माहेर हवेहवेसे असेल असे नाही ना! मला ना धड माहेर ना सासर. नवरा असा दारुडा. तसा कामाला जातो. पण घरात एक रुपया देत नाही. मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे म्हणून ठीक. मुलांचा फार आधार आहे मला.”


“ए ऽऽ अगं, सुज्ञा कुठे राहिली? अजून येतेच आहे? थांब तिला फोन लावते.” म्हणतच नीला तिला फोन लावणारच इतक्यात सुज्ञा मागून येऊन 'धप्पाऽऽऽ' करून कल्ला सुरू केला.

सुज्ञा म्हणजे ह्या सगळ्यांची बडबडी ऊर्जा. ती उदास असली की फक्त ह्यां चौघींना लगेच समजते.

“माझ्यासाठी ऑर्डर करा खायला. खूप भूक लागली आहे. तुम्ही सगळे माझ्याशिवाय सुरू केलात ना! जा बाबा मी कट्टी.” एकदम एवढूसं तोंड करून बसली तेवढ्यात पिझ्झा समोर आला. लगेचच तिच्या चेहर्‍यावर मोठी स्मायल आली.

“येऽऽय, पिझ्झा! अरे कोल्ड ड्रिंक सुद्धा सोबत. सोने पे सुहागा. तुम्हीच खऱ्या माझ्या मैत्रिणी गं!” म्हणतच एक स्लाइस उचलून घास घेत बोलत होती.

सगळ्यांचे चेहरे अगदी आनंदित होते. हसत-बोलत, थोडे उदास होत मस्ती चालू होती.


“मी तर काय सांगू बयाऽऽ! माहेरी गेले म्हंटल मस्त-मस्त चार दिवस आहे तर मी लाड करून घेईन, आराम करेन. पण...” उदास होत सुज्ञा म्हणाली, तशी मनालीने तिचा हात हातात पडला.

“भावाने संपत्तीची वाटणी करा करून तगादा लावला. त्याच्या नावावर असलेली त्याला हवी होती. मला माहेरी ते चार दिवस चार युगांसारखे वाटले. आता आपले माहेर परके झाल्याची जाणीव झाली.” डोळ्यातील अश्रू पुसत सुज्ञा बोलली.


“वहिनी जेवढ्यास तेवढेच राहते. मीच आईला माझ्याकडे रहायला बोलावत असते. वरचेवर जाणे होते माहेरी तेही कमी केले. कारण काम आल्यावर मागे पुढे करतात. काम संपले की बोलत सुद्धा नाहीत कोणी. आता घरीच नवरा-मुले ह्यातच दिवस घालवतेय. घरीच काही गोष्टी तयार करून ऑनलाईन विक्री करते. अजून एक-दोन आर्ट चे ऑनलाईन क्लासेस घेते मग दिवस छान जातो. कुठल्याही मनाला अश्या लागतील गोष्टी डोक्यात येत नाही.”

मनाली सगळ्यांकडे बघुन,“मला तर बाई वीट आलाय ह्या जिंदगीचा. असे वाटते पळूनच जावे हिमालयात.”

“वाऽ गं वा. चाललीस एकटी. आमचा विचार कर जरा. आम्ही पण आहोत हं एकाच प्रवाहात.” इति नीला.

तिच्याच मताला दुजोरा देत अनिका बोलली,” काही परिस्तिथी अशी असते की बाकी कोणाचा विचार येत नाही डोक्यात पण, तरीही तू आम्ही तुझ्यासोबत आहोत हे विसरू नकोस.”

तेवढ्यात सुचिकाचा फोन वाजला तसे सगळे तिच्याकडे किंचित रागाने बघू लागले.

“उचल बाई तो फोन. तरीच म्हंटल अजून कसा नाही आल फोन तुझ्या नवर्‍याचा.” मनाली गमतीदार तोंड फिरवत म्हणाली तसे सगळ्या हसू लागल्या.

“ए, थांबा गं. बोलून घेते. बघते काय म्हणतोय. त्याला चैन पडत नसेल बायको मैत्रिणींना भेटायला गेली विचार करूनच.” सुचिका हसतच बोलली.
सुचिका काही वेळ फोन वर बोलून फोन ठेवून देई पर्यंत बाकीच्या चारही मैत्रिणी तिच्या तोंडाकडे खाऊ का गिळू नजरेने बघत होत्या. फोन ठेव करून हातवारे चालू होते. ते पाहून सुचिका अक्षरशः हसू कसे बसे दाबून बोलत होती. एकदम सिरियस असल्यासारखे बोलत होती. एकदाचा फोन झाला. तेव्हा तिने बोलायला सुरुवात केली.

क्रमशः

🎭 Series Post

View all