नकोसे माहेरपण भाग १

About Married Womans Facing Issues With Their Parents.
माहेरपणाला जाणे हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सुखद दिवस. पण काही असेही लग्न झालेल्या मुली आहेत ज्यांना माहेरी जाणे नकोच वाटते. ह्या पाच मैत्रिणी मनाली, सुचिता, अनिका, सुज्ञा आणि नीला आज खूप दिवसांनी बागेत भेटतात. सुख दुःखाची देवाणघेवाण करण्यासाठी. एकमेकांना उभारी देण्यासाठी.

“काय गं, अनि आज तू माहेरी जाणार होतीस ना? काय झाले? गेली नाहीस?” सुचिता बागेतल्या बाकावर अनिका च्या शेजारी बसत विचारत होती.

अनिकाने डोळे मिटून एक मोठा श्वास घेतला. डोळे मिटल्यानंतर तिला माहेरचा वाडा, अंगण, झाडे, रस्ते डोळ्यांसमोर आली. तिला तिचे बालपण दिसू लागले.

सुचिताने तिच्या खांद्यावर हलकेच थोपटले तशी ती बोलू लागली.

“सुचे, माहेरी जायला नेहमी छानच वाटते. गावी कोकणात मोठा वाडा सगळच सुंदर कसे हवेहवेसे. मुलांना कोकणात जायची भारी हौस. प्रत्येक सुट्टीत कोकणात जायचे चालू असते. मी नको म्हणते तेव्हा मुले नाराज होतात.” अनिका काहीसे विचारात हरवत बोलत होती.

सुचिताने तिला आज विचारून टाकू करून, “का नको जावेसे वाटते? एक आम्ही किंवा आमच्यासारखे लोक अश्या निसर्गरम्य ठिकाणी जायला जीव काढतो.” हलकेच हसत विचारले.

“मला नाही जावसे वाटत गं. माहेरी जाणं म्हणजे दोन दिवसाचा का होईना थोडासा आराम. सुरुवातीला माहेर म्हणजे बॅग भरा आणि गाडी पकडा. लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षीपर्यंत मला माहेरी जायची ओढ प्रचंड होती. पण...”

“पण काय? सांग ना.”

“तिथल्या त्या ठराविक नियमानुसार वागणे थोडेसे कष्टदायक आहे. वाढत्या वयानुसार ते पाळणे अवघड आहे. लग्नाच्या आधी होते हेच नियम. पण आता नाही होत गं. त्यापेक्षा इथे शहरात मुले, सासुबाई आणि नवरा यांच्यासोबत वेळ छान व्यतीत करते.” अनिका एक समाधानाची स्मायल देत म्हणाली.

तितक्यात धापा टाकत मनाली आणि नीला गाडी पार्क करून आल्या. उशीर जो झाला होता.

“हेऽय, गर्ल्स क्या हालचाल?” मनालीने सचिता आणि अनिकाकडे पाहत विचारले.

“तेच माहेर पुराण.” इति अनिका.

“एक मी आहे जी माहेरी राहते आणि नको वाटते. एक तुम्ही आहात तुम्हाला माहेर नको वाटते.” नीला आळीपाळीने सगळ्यांकडे बघत म्हणाली.

सुचिता थोडं वैतागत,”नाहीतर काय यार! आईकडे जावेसे वाटते तिच्या काळजी पोटी. भाऊ वयाने छोटा असून बोलतो की घरी आली आहेस तर कामाला हातभार लाव. इथे आल्यावर काही काम करायला नको.”

“अरे ऽ ही काय बात झाली?” बाकीच्या तिघी एकसाथ बोलल्या.

“घरी नवरा आणि दोन्ही लहान मुलांचे करा. त्याव्यतिरिक्त नवर्‍याला त्याच्या कामात मदत करते. घरातला पसारा आवरता आवरता जीव नकोसा होतो. असे वाटते जावे निघून हिमालयात.” मिश्किल हसत सुचिता बोलली.

“काही खाणार काय? मला भूक लागली आहे.” मनालीने सगळ्यांना विचारले तसे जाणवले की ह्या सगळ्या गप्पांच्या नादात खाणे काही झाले नाही.

बागेच्या बाहेरच असलेल्या कॅफेमध्ये एक छानसा कोपर्‍यातला टेबल बघून तिथे बसल्या.

“काय घेणार तुम्ही? मी तर किवी मिंट मोहितो घेणार.” नीला बाकीच्यांना मेनू कार्ड कडे बघत विचारत होती.

“मला कोल्ड कॉफी विथ क्रीम ऑन टॉप आणि अनिकाला कापुचिनो. तू काय घेणार मनू?” सुचिताने विचारले.

हनुवटीवर हात ठेवून एक बोट गालावर ठेवून मनाली म्हणाली, “मी ऽऽ अम्म् कॅड बी घेईन. चल नीला ऑर्डर दे.”

ऑर्डर देऊन सगळ्या जणी पुन्हा गप्पांमध्ये रंगून गेल्या.

“माझे काय म्हणणे आहे, माहेरी गेलो की आराम पाहिजे थोडासा तरी. माहेरी सुद्धा सकाळी पाच वाजता उठा आणि कामे करा. रोजच तेच रूटीन. त्यापेक्षा मला सासरीच छान वाटते. आरामात कामे उरकून निवांत एक झोप घेता येते.” अनिकाने तिचे म्हणणे मांडले.

क्रमशः

🎭 Series Post

View all