नकोच तो चांगुलपणा (भाग ३ अंतिम)

इतरांचा विचार करून वागताना स्वतःवर मात्र अन्याय होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे असते.


नेहा मग नरेशसोबत मार्केटमध्ये गेली. खूप विचार केल्यानंतर बाबांसाठी तिने एक छानसा अँड्रॉइड मोबाईल खरेदी केला.

"त्याकाळात परीस्थिती नसतानाही बाबांनी सर्व मुलांना उत्तमरीत्या शिक्षण दिले. त्यामुळेच आज सर्वजण स्वतःच्या पायावर उभे आहेत. जुन्या रुढी परंपरांना बगल देत मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याची मुभा त्यांनी दिली नसती तर आज सर्वचजण इतके सुखी आणि समाधानी जीवन जगू शकले नसते."

नेहाचा आनंद गगनात मावत नव्हता. किती बोलू नि किती नाही असेच झाले होते तिला. नेहाला असं भरभरुन बोलताना पाहून नरेशदेखील मनोमन सुखावला होता.

उत्तम संस्कार आणि शिक्षण देवून बाबांनी सर्व मुलांना घडवले. म्हणुनच बाबांनादेखील आता ह्या वयात छोट छोट्या गोष्टीतून आनंद कसा देता येईल हाच आता प्रत्येकाचा प्रयत्न होता.

नरेश आणि नेहा आनंदातच घरी परतले. पण दोघांशीही घरात कोणीच बोलेना.

"जावू दे, प्रत्येक वेळी आपण आपला स्वाभिमान बाजूला ठेवून चूक असो अगर नसो तरी सर्वांचे सर्व ऐकतो. पण थोडं जरी मनासारखं वागलं तरी त्याचे लगेच हे असे परिणाम दिसून येतात."

"म्हणूनच तुला सांगतो नेहा, आतातरी तुझा चांगुलपणा ठेव बाजूला. सर्वांचा विचार जरूर कर पण त्याआधी स्वतःचाही थोडा विचार करत जा."

"अरे, पण मी जर स्वतः कमावती असते तर मला कुणाची भीती नव्हती आणि तेव्हा मला कुणी काही बोललेही नसते. पण तुमच्या पैशातून माझ्या बाबांसाठी हे गिफ्ट घेतले, हेच पटत नाही वाटतं घरातील सर्वांना. पण याच घरासाठी मी माझं करिअर पण सोडलं, हे का दिसत नाही कोणाला? आणि तू स्वतः तयार आहेस ना हे गिफ्ट घेवून द्यायला मग कोणाला काय प्रॉब्लेम असायला हवा?"

"जावू दे नको विचार करुस आता.जे झालं ते झालं."

आज पहिल्यांदा नेहा इतकी व्यक्त होत होत होती. \"खरंच जेवढं जास्त आपण जगाचा विचार करतो तेवढेच जास्त स्वतःच स्वत:च्या दुःखाचे खरे कारण बनतो.\" हे आता नेहालाही पटले होते.

दुसऱ्या दिवशी नेहाच्या भावाने तिच्या सासऱ्यांना फोन करून बाबांच्या पासष्टीची कल्पना दिली आणि सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंतीदेखील केली. आता त्यांनाही नाही म्हणणे शक्यच नव्हते.

दोन दिवसांनी असणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्वजण मग हजर झाले. मुलाने आणि मुलींनी तसेच सुनेने मिळून वडिलांच्या पासष्टीचा सजवलेला हा सोहळा खरंच सर्वांना समाधान देवून गेला.

गोकुळासारखे भरलेले घर पाहून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

बाबांचे औक्षण करून मुलांनी त्यांच्यासाठी आणलेले खास गिफ्ट त्यांच्या पुढ्यात ठेवले. लेकरांचे प्रेम पाहून बाबांच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली. आज ह्या वयात मुलांचे प्रेमाचे दोन शब्दही महाग होतात तिथे मात्र नेहाचे बाबा खूपच नशीबवान समजत होते स्वतःला.

वस्तू किती महागड्या आहेत त्यापेक्षा मुलांचे त्यामागे दडलेले प्रेम मात्र स्पष्ट दिसत होते. प्रत्येक वस्तू ही रोजच आता बाबांच्या जवळ राहणार होती. याचेच त्यांना खूप मोठे समाधान वाटत होते.

हा सर्व नेत्रदीपक सोहळा पाहून नेहाचे सासू सासरे मात्र भारावून गेले.
"आजकाल कोण करतं आई बापासाठी एवढं सगळं? असा प्रश्न त्यांच्याही मनात अगदी सहजच आला. पण त्यासाठी त्या व्यक्तीची देखील तितकीच पात्रता असायला हवी. नाहीतर आम्ही, सतत एक एक पैसा जुळवत बसलो आणि संसाराचा गाडा ओढता ओढता मुलांवर मात्र अन्याय करत राहिलो. खरंच खूप नशीबवान आहेत नेहाचे बाबा ज्यांच्या पोटी ही अशी रत्न जन्मली आहेत.
त्यातील एक रत्न आमच्याही घरी आले, पण आम्ही मात्र त्याला म्हणावे तसे नाही जपले. नेहाच्या प्रत्येक वागण्यातून तिच्या आई बाबांचे संस्कार दिसतात. पण आम्ही कधीच त्याला किंमत दिली नाही. आम्ही कधीच तिचे बाबा नाही होऊ शकलो. आज जर तिने तिच्या करिअरवर फोकस केले असते तर तिला असे लाचारसारखे मन मारून कधीच जगावे लागले नसते."

एक एक सारा भूतकाळ नेहाच्या सासऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. हे सगळे सुरू असताना आम्हाला मात्र खऱ्या हिऱ्याची पारख झालीच नाही. याचीच खंत त्यांच्या मनाला बोचत होती.

पण त्याचक्षणी त्यांनीही ठरवले, जे झाले ते झाले..."यापुढे मात्र नेहाला त्रास होणार नाही असे अजिबात वागायचे नाही."

खरंच आजही अनेक ठिकाणी अशी परीस्थिती पाहायला मिळते, घरातील गृहिणीने नवऱ्याच्या कमाईतून माहेरच्यांसाठी काही घ्यायचे ठरवले तर तिला खूप काही सुनावले जाते. हेच जर सून कमावती असेल तर तिला तिचे निर्णय घेण्याचे थोडेफार स्वातंत्र्य मिळते. पण सुनेने माहेरच्या लोकांसाठी केलेला खर्च सासरच्यांना पटेलच असे नाही. मग ती सून कमावती असो अगर नसो.

थोडक्यात काय तर लग्न झाल्यावर सुनेने फक्त सासरच्या माणसांची मर्जी सांभाळायची. ती करतेही तसे फक्त तिच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जावू नये. तिच्याही मताचा आदर व्हायला हवा. हो ना?

समाप्त

सदरची कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तवाशी तिचा काहीही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

धन्यवाद

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all