नको नको म्हणताना भाग १९

एक हलकी फुलकी प्रेमकथा


अखेर तो दिवस उजाडला. अदिती आणि शंतनुचा विवाहसोहळा सजला. म्हणतात ना लग्नाच्या गाठी या स्वर्गातच जुळतात. माणूस हा फक्त निमित्तमात्र असतो. अगदी तसेच अदिती आणि शंतनुची जोडीदेखील स्वर्गातच जुळली होती जणू. अगदी दृष्ट लागण्याजोगी दोघांचीही जोडी लग्न मंडपात उठून दिसत होती.

एक एक करत लग्नाचा विधी पार पडत होता. शंतनु आणि अदितीच्या आयुष्याचा नवा अध्याय लिहिला जात होता. प्रेमाचे नाते क्षणाक्षणाने बहरत होते.

एकीकडे मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद तर दुसरीकडे आई वडिलांचा विरह या दोन्ही गोष्टी अदितीला क्षणात हसू तर क्षणात आसू देऊन जात होत्या. परंतु शंतनूची धीराची नजरच तिचा भक्कम आधार बनून तिला सावरण्याचा प्रयत्न करत राहायची. असा जोडीदार मिळायला खूपच भाग्य लागतं ते काही खोटं नाही.

सप्तपदीच्या प्रत्येक फेरीबरोबर नात्यातील विश्वासदेखील दृढ होत होता. शंतनुच्या सोबतीने सप्तपदी चालताना वचनांची पूर्तता करण्याचे आश्वासन नात्यातील उरला सुरला दुरावाही मिटण्याची हमी देत होता.

कसे असते ना हे पवित्र बंधन? नात्याचे बंध प्रेमाच्या एका रेशमी धाग्यात गुंफले की मगच त्या नात्याला प्रामाणिक आणि सच्च्या प्रेमाचा सुगंध प्राप्त होतो. अगदी छोट्या छोट्या विधीतदेखील मोठा अर्थ दडलेला असतो. लग्न या पवित्र बंधनामुळेच खऱ्या अर्थाने प्रेमकहाणीला रंग चढतो. जो की आता शंतनु आणि अदितीच्या प्रेमकहाणीला चढणार होता.

सप्तपदीचा विधी आनंदात पार पडला आणि आता वेळ होती ती कन्यादानाची. प्रत्येक मुलीच्या आई वडिलांसाठी काही अंशी सुखद तर काही अंशी दुःखद असा हा विधी. एकीकडे सारे काही आनंदात पार पडल्याचे समाधान देऊन जाणारा तर दुसरीकडे लेकीला परक्याच्या स्वाधीन कसण्यासाठी प्रवृत्त करणारा.

सात फेरे पूर्ण झाले नि बघता बघता अदिती शंतनुच्या प्रेमाचा रंग आपोआपच गडद दिसू लागला. विधिवत दागिन्यांमध्ये अदितीचे रूप खूपच खुलले होते. अगदी कोणाचीही दृष्ट लागेल असे.

रत्ना ताई आणि माधवराव यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. लेकीच्या लग्नाची, तिच्या भविष्याची काळजी रत्ना ताईंना सतावत होती. आज मात्र अगदी योग्य वयात आणि योग्य वेळी अदितीचे लग्न झाले त्यामुळे त्या खूपच खूश होत्या.

शामलताई वरवर खुश जरी  दिसत असल्या तरी मनातून मात्र कुठेतरी अदिती बद्दलचा राग न बोलताही जाणवत होता त्यांच्या वागण्यातून.

वाजत गाजत नवीन नवरी अखेर शंतनुच्या घरी आली. दारात येताच त्याच्या बहिणींनी मात्र वाट अडवली. उखाणा घेतल्याशिवाय आता घरात एंट्री मिळणे अवघड होते.

लग्नातील एक शेवटचा विधी समजून अदितीने एक भन्नाट उखाणा घेतला.

"प्रेम, लग्न यापासून दूर पळणारी ती अखेर त्याच्या प्रेमात पडलीच..
नको नको म्हणतानाही बोहल्यावर देखील चढली..
माहीत नाही त्याने काय अशी जादू केली..
शंतनुच्या प्रेमात अदिती मात्र वेडीपिशी झाली.."

"वा वा क्या बात है वहिनी..एकच नंबर" म्हणत शंतनुच्या  बहिणींनी अदितीचे तोंडभरून कौतुक केले.

"दादा आता तू" म्हणत सर्वजण शंतनुला नाव घेण्यासाठी आग्रह करू लागले.

त्यानेही मग एक छानसा उखाणा घेतला.

"तिचे नि माझे नाते जणू जन्मजन्मांतरीचे..
एकाच भेटीत जुळले सूर हे प्रेमाचे..
अलवारपणे फुलली ही प्रीत मनी..
अदितीशिवाय अधुरी शंतनुची प्रेमकहाणी.."

"वा वा दादा..हा तर छुपा रुस्तूम निघाला." सारे जण शंतनुचे कौतुक करण्यात मग्न झाले.

तेवढयात "पुरे झालं आता. वेळ काळेचे भान ठेवा जरा." म्हणत शामल ताईंनी साऱ्यांच्या आनंदावर जणू क्षणात विरजण टाकले.

शामल ताईंचा राग बरेच काही सांगून गेला. "म्हणजे अजूनही आईंचा माझ्यावरील राग कमी झाला नाही. हे आज सिद्ध झाले."

मनातून अदिती खूपच नाराज झाली. अजून सासरचा उंबरादेखील तिने ओलांडला नव्हता पण त्याआधीच तिला काही गोष्टींची जाणीव करून दिली जणू शामल ताईंनी. तत्क्षणी सर्वांच्या नकळत शंतनुने अदितीचा हात हातात घेत हलकेच दाबला.

"मी आहे टेन्शन घेवू नकोस" म्हणत शब्दाविनाही आधार जणू त्याने तिला दिला होता. नात्याची अशी ही गोड सुरुवात विश्वासाने झाली होती. न बोलताही हृदयाची भाषा जणू हृदयाला कळली होती.

उंबऱ्यातील माप ओलांडून अदितीने शंतनुच्या साथीने सासरी पहिले पाऊल टाकले. माहेरची लाडकी लेक आता सासरची जबाबदार सून होण्यासाठी सज्ज झाली होती.

लग्नानंतरचे सारे विधी पूर्ण झाले. नवीन घरात, नवीन माणसांत अदिती थोडी बावरली होती. त्यात शामल ताईंचे हटकून वागणे तिच्या मनाला खात होते.

"आई..मागचे सगळे विसरून आपणही आपल्या नात्याची नव्याने सुरुवात करुयात का?" धीर करून अदिती शामल ताईंना म्हणाली.

"तुझ्या दृष्टीने इतक्या सहज विसरण्यासारखे असेल सर्व पण माझ्या दृष्टीने नाही." शामल ताई उत्तरल्या.

आता कुठे अदितीची खऱ्या अर्थाने परीक्षा सुरू झाली होती. सासूच्या मनातील गैरसमज दूर सारून संसाराची धुरा तिला सांभाळावी लागणार होती. असे असताना तिला शंतनुची मात्र भक्कम साथ होती, हेही तितकेच खरे. त्यामुळे तिला जास्त घाबरण्याची देखील गरज नव्हती.

संसारात नवऱ्याची भक्कम साथ असेल तर बायकोला मग अशक्य असे काहीच नसते.

सारे काही विसरून अदिती शंतनुच्या मिठीत अलगद विरघळली. पहिल्या प्रेमाची पहिली रात्र अखेर सजली. दोन महिन्यांपूर्वी अनोळखी असणारे दोन जीव आज एक झाले. मर्यादेची सारी बंधने अखेर संपली होती. हक्काच्या नात्याची विश्वासपूर्ण सुरुवात झाली होती.

इतक्या दिवसांची प्रतिक्षा अखेर संपली होती. नात्याची वीण अधिक घट्ट करणाऱ्या पहिल्या रात्रीची नि पहिल्या प्रेमाची नवलाई दोघांच्याही चेहऱ्यावर मोरपीस फिरवून गेली. मनासारखा जोडीदार लाभल्याचे समाधान दोघांनाही मिळाले.
आनंदाने सुखाचा संसार सुरू झाला.

शंतनु आणि अदितीची प्रेमकहाणी दिवसागणिक अधिकच रंगतदार होत होती. प्रेमाचे नाते रोजच नव्याने फुलत होते, बहरत होते. नात्यात एकमेकांची साथ आणि विश्वास मात्र दिवसेंदिवस अधिकच दृढ होत होता. एकंदरीतच अदिती आणि शंतनुचा सुखाचा संसार सुरू झाला होता .

क्रमशः

शामल ताईंचे मन जिंकण्यात अदितीला मिळेल का यश?की सासूला हॅण्डल करता करता अदिती आणि शंतनुच्या नात्यात पडणार फूट? जाणून घेवूयात पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all