नको नको म्हणताना भाग १८

शेवटी प्रेम हे प्रेमच असतं


नको नको म्हणताना प्रेमाचे वेड हे लागले
अदिती आणि शंतनुच्या आयुष्याचे नवे पर्व अखेर सुरू झाले..

प्रेम ही अशी गोष्ट आहे की अंतर्मनाने एकदा का कौल दिला की मग आपले मनही आपल्या ताब्यात राहत नाही. एखादी व्यक्ती हृदयाच्या कप्प्यात अगदी ठाण मांडून बसते. मग कितीही नाही म्हटले तरी त्या व्यक्तीसाठी मन मात्र वेडे होवून जाते.

अगदी तसेच काहीसे झाले होते आपल्या अदिती आणि शंतनुसोबत. एकमेकांना पाहता क्षणी दोघांच्याही मनाने कौल दिला. म्हणतात ना इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काही गोष्टी घडल्याशिवाय राहत नाहीत. अगदी तसेच काहीसे झाले या दोघांसोबत. एकमेकांच्या भेटीची अतूट इच्छाच दोघांना पुन्हा एकदा समोर घेवून आली नि केवळ आठच दिवसांत दोघांचेही आयुष्यच बदलून गेले.

आता काहीच दिवसांत दोघांचे लग्नही होणार होते. पण तोपर्यंत नात्यातील ओढ, आपलेपणा, हक्क, काळजी या साऱ्यांनी नाते दिवसागणिक अधिकच समृद्ध होत होते.

कितीही नाही म्हटले तरी होणाऱ्या गोष्टी त्या त्या वेळीच होत असतात. आपल्या इच्छेपेक्षाही परमेश्वराची इच्छा जास्त महत्त्वाची असते..हे अदिती, शंतनु आणि त्यापेक्षाही जास्त शामल ताईंना पटले होते. कारण आठ दिवसांपूर्वी जिच्याशी भांडण झाले तिच आपली सून होणार अशी कल्पनाही त्यांनी केली नसेल कधी.

एकीकडे अदिती आणि शंतनुचे कॉलेज तसेच रोजचे रुटीन सुरूच होते. घरचे मात्र लग्न तयारीत गुंतले होते. दोघेही मनाने अगदी जवळ आले होते.

बघता बघता लग्न आठ दिवसांवर येवून ठेपले. अजूनही सारे स्वप्नवतच वाटत होते दोघांनाही. एक एक करत सुखाचा क्षण दोघेही वेचत होते. प्रेमाचा प्रत्येक क्षण आनंदाने फुलवत होते. आठवणींची गोड अशी साठवण रोजच नव्याने होत होती.

एकमेकांशी बोलल्याशिवाय आता एक दिवसही सरत नव्हता. प्रेमाच्या गप्पांना आता रोजच उधाण आले होते.

पाहुण्या रावळ्यांनी दोन्ही घरे गजबजली होती. मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात भावी वर वधू हरवून गेले होते जणू. तरीही एवढ्या सगळ्यांतून एकमेकांशी बोलण्याची त्यांची धडपड मात्र स्पष्ट दिसायची. येता जाता अमेयचे अदितीला चिडवणे, तिची खेचणे सुरूच असायचे.

तिकडे शंतनुच्या घरीही लग्नाची गडबड सुरू होती. त्याची चुलत निलत भावंडेही जमली होती. सारे कसे आनंदाचे वातावरण होते. मावस बहिणी, आते बहिणी, चुलत बहिणी, त्याचे जवळचे मित्र मैत्रिणी यांच्या घोळक्यात तो हरवून गेला होता.

इतक्यात अदितीचा मॅसेज आला.

"हाय.. काय करतोस? बिझी आहेस?" न राहवून अदितीने शंतनुला मॅसेज केला अहो जाहो वरून दोन महिन्यात अदितीची गाडी अरे तुरे पर्यंत येवून पोहोचली होती.
नात्यातील मोकळेपणा आता जरा जास्तच वाढला होता. दोघांमधील प्रेमाचे आणि हक्काचे नाते छान बहरले होते आता.

"काय दादा...वहिनीचा मॅसेज वाटतं. तिला करमत नाही वाटतं तुझ्याशिवाय? इतके दिवस थांबलीस आता अजून एकच रात्र धीर धर म्हणावं." बहिणींनी शंतनुची खेचायला सुरुवात केली.

घोळक्यातून स्वतःची कशीबशी सुटका करून घेत तो बाजूला गेला. मेसेज करण्यापेक्षा त्याने तिला डायरेक्ट फोनच केला.

"हॅलो...बोल आता."

"कामात होतास?"

"अगं उद्या माझे लग्न आहे. माहित नाही तुला?"

" नाही ना. आताच समजले." लाडीकपणे अदिती उत्तरली.

"बरं...मग आता तूच सांग उद्या लग्न म्हटल्यावर कोण काम करू देईल मला. अगं सगळ्या बहिणींनी मिळून मला अडवून धरले होते. कसाबसा सुटलोय त्यांच्या तावडीतून."

"कसं वाटतंय रे? विश्वास बसत नाही ना आपले उद्या लग्न आहे यावर."

"हो ना, किती पटकन् दिवस गेले ना. स्वप्नातही वाटले नव्हते, इतक्या भरभर सगळे काही घडेल. पण काहीही म्हण आपल्या घरच्यांच्या सपोर्टमुळे आपण आज एकत्र येत आहोत."

"हे मात्र अगदी खरं. आमच्या घरी तर आजकाल सारखे तुझेच गुणगान सुरू असते बघ. आई बाबा तर खूप खूश आहेत. तुझ्यामुळे मी लग्नाला तयार झाले नाहीतर लग्न हा विषय निघाला की दूर दूर पळायचे. हे आई बाबांना चांगलेच ठावूक होते. तू माझ्या आयुष्यात नसता आला तर माहित नाही मी इतक्यात तरी लग्न केले असते की नाही."

"माझे थोडे उलट आहे. मी आई बाबंच्या आग्रहाखातर लग्न केलेही असते पण माहित नाही जो आनंद आज मिळत आहे तो कधी मिळाला असता की नाही. लग्नाबद्दल आज जी एक्साईटमेंट वाटत आहे ती कधी निर्माण झाली असती की नाही देवच जाणे पण फक्त तू माझ्या गाडीसमोर आलीस आणि आज बघ आपण आयुष्यभरासाठी एक होणार आहोत. सगळे स्वप्नातच घडत आहे असेच वाटते आहे. हो ना?"

"ह्ममम...खरंच आहे रे पण, उद्या माहेर सोडून मी सासरी येणार याचेही वाईट वाटत आहे रे खूप. अमेयची बडबड सुध्दा आता रोज ऐकायला नाही भेटणार." नुसत्या कल्पनेनेच नकळतपणे अदितीचे डोळे पाणावले.

"ये वेडाबाई, रडू नकोस गं. थोडीच ना शहर सोडून कुठे जाणार आहेस तू. जेव्हा  आई बाबांची, अमेयची आठवण येईल तेव्हा तू भेटायला जाऊ शकतेस ना त्यांना. अगदी केव्हाही आणि फोन आहेच की. हवं तेव्हा त्यांना कॉल, व्हिडिओ कॉल करुच शकतेस. त्यामुळे अजिबात रडायचं नाही. डोळे पुस बरं आधी. उद्या लग्न आहे अगं आपले. उद्यासाठी थोडे अश्रू शिल्लक ठेव गं राणी." अदितीचा मुड चेंज करण्यासाठी शंतनु मस्करीच्या स्वरात बोलला.

"गप रे." शंतनुच्या बोलण्यावर अदितीला हसू आले.

अदितीचे बोलणे रत्ना ताईंच्या कानी पडले आणि त्याही खूपच भावूक झाल्या.

लेकीने लग्न करावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती आणि आज तो क्षण आलादेखील पण आता लेक सासरी जाणार या कल्पनेनेच रत्ना ताईंना रडू आवरेना.

अमेयची आणि अदितीची सुरू असणारी नोकझोक आता मिस करणार होते रत्ना ताई आणि माधवराव. लेक कितीही लाडाची असली तरी एक ना एक दिवस तिला सासरी जावेच लागते. ही पिढ्यान् पिढ्या चालत आलेली परंपरा थोडीच ना आता बदलणार होती.

खूप वेळ गप्पा मारल्यानंतर अदिती आणि शंतनुने फोन ठेवला. दोघांमधील मर्यादेचे अंतर आता कायमचे संपणार होते.

अदितीच्या हातावर शंतनुच्या नावाची मेहंदी रंगली होती. काही वेळातच आता तिच्या चेहऱ्यावर हळदीचा रंगदेखील चढणार होता. प्रेमाच्या गुलाबी रंगात दोघेही न्हाऊन निघणार होते.

क्रमशः

प्रेमाचा हा रंग कसा खुलणार जाणून घेवूयात पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all