नको नको म्हणताना भाग १७

शेवटी प्रेम हे प्रेमच असतं


आज काहीही झाले तरी शंतनुची नजर अदितीवरून हटायलाच तयार नव्हती.

"खूप छान आहे आ तुमची बाग आणि फुलेही सुगंधी आहेत. अप्रतिमच." अदिती काहीच बोलत नाही हे पाहून कुठूनतरी सुरूवात व्हायला पाहिजे यासाठी शंतनु बोलला.

"बागेतील फुले तर छान असणारच यात मुळीच शंका नाही, पण मला एक सांगा, तुम्ही नेमके कोणाला पाहायला आले आहात? नाही म्हणजे, बागेला की मला?"लटक्या रागातच अदितीने विचारले.

"ऑफ कोर्स तुलाच." शंतनु अगदी सहज उत्तरला.

"तसे तर काही दिसत नाही पण. कारण इथे बागेचे थोडे जास्तच कौतुक सुरू आहे."

आग आता बरोबर लागली होती. हे शंतनुने अगदी सहजच ओळखले.

"हो का. कुठून तरी काहीतरी जळाल्याचा वास येत आहे का ग?" मुद्दाम तिला खिजवण्यासाठी शंतनु बोलला.

"जाऊ द्या.. मी काहीच बोलत नाही. जाते मी आत." अदिती चिडल्याचा आव आणत आत जायला वळली तोच शंतनूने तीचा हात घट्ट धरला आणि तिला मागे ओढले.

शंतनुचा तो पहिला स्पर्श अदितीच्या अंगावर रोमांच फुलवून गेला. तिच्या ह्रदयाचे ठोके आगगाडीच्या वेगाने धावू लागले.

"काय करताय? सोडा की. पाहिल ना कुणी?"लाडीकपणे अदिती बोलली. तसे पाहिले तर तिलाही हे सारे काही हवेहवेसे वाटत होते. पण नात्याला सध्या तरी मर्यादेचे बंधनही तितकेच गरजेचे होते.

"पाहू दे, मला नाही काही फरक पडत. होणाऱ्या बायकोचाच तर हात पकडलाय." म्हणत हाताला हलकेच हिसका देत शंतनुने तिला पुन्हा मागे खेचले. तशी अदिती शंतनुच्या आणखीच जवळ आली. नजरेला नजर भिडली नि लाजेची कळी हलकेच गालावर रेंगाळू लागली.

त्याच्या त्या कातीलाना नजरेत घायाळ होण्याआधीच तिने मनाला आवर घालत स्वतःला सावरले. मर्यादेचे हे अंतर इतक्या लवकर कमी करून चालणार नव्हते. हे दोघांनीही जाणले आणि क्षणात दोघेही एकमेकांपासून दूर झाले.

"सॉरी..." म्हणत शंतनुने लगेचच तिची माफीदेखील मागितली.

"त्यात सॉरी काय? पण वेळ काळाचे भान असे विसरून नाही ना चालणार."

"ह्ममम.. बरं जाऊयात का मग आत?" शंतनुने प्रश्न केला.

"लगेच...?" हळूच आणि लाजतच अदिती बोलली.

"मग कधी जायचं..? तू म्हणत असशील तर थांबतो."

"त्याची काही गरज नाही. पण तुम्ही खूपच छुपे रुस्तुम आहात हे हळूहळू समजतंय आता मला. तुम्ही इतके रोमँटिक असाल असे स्वप्नातही वाटले नव्हते हा."

"जाऊयात आत? वाट पाहत असतील सगळेच."शंतनुने काहीही न बोलता फक्त हसून प्रतिसाद दिला.

फक्त मानेनेच होकार दर्शवत अदिती मग शंतनुच्या पाठीमागून आत गेली.

"बरं मुलांनो, एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला."अनंतरावांनी विचारले.

"हो विचारा की."दोघेही एकाच सुरात बोलले.

"आता तुमची पसंती तर आधीच झाली आहे आणि आम्हालाही तुमचे हे नाते मनापासून पसंत आहे. मग असे असताना बाकीच्या गोष्टीत वेळ वाया घालवण्यात काही अर्थ आहे असे आम्हाला तरी वाटत नाही." अनंतराव म्हणाले.

"पुढच्या दोन महिन्यानंतर लग्नाचा उत्तम मुहूर्त आहे. तेव्हाची तारीख फायनल केली तर तुम्हाला चालेल का? म्हणजे जास्त घाई होत आहे असे काही वाटले तर नक्की सांगा." माधवराव बोलले तसे अदिती आणि शंतनु दोघांनीही एकमेकांकडे पाहिले.

"हो चालेल आम्हाला."क्षणाचाही विलंब न लावता दोघांच्याही तोंडून अगदी एकाच वेळी बाहेर पडले.

सगळ्यांच्याच चेहऱ्यावर तेव्हा हसू उमटले.

"नक्की ना ताई? पुन्हा म्हणू नकोस मला या घरातून घालवायची तुम्हाला घाई झाली आहे."

"हो.. अमेय बरोबर बोलतोय. नाहीतर सहा महिन्यांनी देखील एक छान मुहूर्त आहे. तेव्हाही चालेल आमची काहीच हरकत नाही." डोळे मोठे करत अमेयला शांत बसण्याचा अदितीने इशारा करताच माधवरावांनी देखील अमेयच्या री मध्ये री ओढली.

"नाही..नाही..चालेल दोन महिन्यानंतरचा मुहूर्त चालेल आम्हाला. सहा महिन्यांनंतर कॉलेजच्या एक्झाम असतील आणि अदितीचीही फायनल एक्झाम असेल तेव्हा."

"माझी एक्झाम होईपर्यंत थांबायचे का मग? काही कळेना काय करू?" अदितीने शंतनुकडे पाहत प्रश्न केला.

"नाही नको..डोळ्यांनीच इशारा करत शंतनुने तिला जास्त उशीर करायला नको म्हणून सांगितले.

"तुझी एक्झाम सुरू होऊन संपेपर्यंत आणखी दोन महिने जातील त्यात. त्यापेक्षा दोन महिन्यानंतरचा मुहूर्त योग्य वाटतो मला."

"हो..हो..आम्ही अगदीच समजू शकतो." अमेयने आतापासूनच  त्याच्या भावोजींची खेचायला सुरुवात केली होती बरं का.

"मग करायचा दोन महिन्यानंतरचा मुहूर्त फायनल?" अनंतरावांनी पुन्हा एकदा विचारले.

"हो..हो..आमची काहीच हरकत नाही." म्हणत माधवरावांनी आणि रत्ना ताईंनी देखील आनंदाने होकार दर्शवला.

शामल ताई जरी शांत होत्या तरी आता नकार देण्याचे काही कारणच नव्हते. तरीही मनातून त्या थोड्या नाराजच दिसत होत्या.

अखेर नको नको म्हणताना एकाच बैठकीत अदिती आणि शंतनुचे लग्न फायनल झाले. पुढच्या दोन दिवसांत पुढची बोलणी करण्याचे ठरले. दोन्ही घरी आनंदी आनंद झाला.

"चला माधवराव लागा आता लग्नाच्या तयारीला." म्हणत अनंतरावांनी सर्वांचा निरोप घेतला आणि सर्वजण निघाले. अदितीने मग मोठ्यांचा आशीर्वाद घेतला.

अदिती आणि शंतनुच्या चेहर्यावरील आनंद अगदी ओसंडून वाहत होता. प्रेमाचा विरह आता दोघांनाही असह्य झाला होता. कधी एकदा हे दोन महिने संपतात असे झाले होते दोघांनाही.

निघताना नजरेतूनच एकमेकांवर प्रेमवर्षाव सुरू होता. "भेटू पुन्हा लवकरच." नजरेतूनच दोघेही जणू एकमेकांना सांगत होते.

पुढच्या दोन दिवसांत लग्नाची बोलणी करून सर्व नियोजन फायनल करण्यात आले.

अदिती आणि शंतनुची प्रेमकहाणी आता हळूहळू फुलत होती. नात्यातील प्रेम दिवसागणिक वाढत होते. एकमेकांची ओढ मनाला हुरहुर लावून जात होती.

अदितीची मैत्रीण ईशा आणि इतर मैत्रिणींना देखील अदितीच्या लग्नाची बातमी आणि तिची लव्ह स्टोरी समजली. सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता अदितीने. सर्वच मैत्रिणी अदितीसाठी खूपच खुश होत्या आणि त्यातल्या त्यात ईशा तर जास्तच. कारण "मी लग्नच करणार नाही" असे म्हणणारी अदिती आज फक्त ईशामुळेच बोहल्यावर चढणार होती.

क्रमशः

आता कसे होणार अदितीचे? लग्न तर ठरले पण पुढे जावून सासूचा सासुरवास तिच्याही नशिबी येणार का? जाणून घेवूयात पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all