Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

नको नको म्हणताना भाग १४

Read Later
नको नको म्हणताना भाग १४


"आई..मुलगी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. दिसायला माझ्यापेक्षाही सुंदर आहे. आता डिग्रीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे."

"अरे वा! छानच की मग. अरे पण तिच्याही घरच्यांना सर्व मान्य असायला हवे ना."

"तिच्या घरचे का मान्य करणार नाहीत? तुझा लेक काही कमी आहे काय?" हसतच शंतनु बोलला.

"तसे नाही रे पण मागच्या वेळी काय झाले पाहिले ना तू, म्हणून धाकधूक वाटते.बरं तिचा फोटो असेल तर दाखव की."

"आई मी काय सांगतोय ते आधी ऐक..मी आता मुलीचे जे वर्णन केले ते अगदी योग्य आहे. असे असले तरीही तू मुलीला पसंत करशील असे वाटत नाही."

"अरे पण का? न पाहता तू असे कसे काय बोलू शकतोस? कारण मी तर अजून तिला पाहिलेही नाही."

" याआधी तू मुलीला भेटली आहेस आई." नजर चोरतच शंतनु बोलला.

"काय....? पण मला तर नाही आठवत."

"पहिल्याच भेटीत तुमच्यात गैरसमजही झाले आहेत. त्यामुळे तुझा नकारच असेल असे वाटते. आई पण खरं सांगू, का कोण जाणे पण पहिल्यांदाच तिला पाहिले तेव्हाच तिच्याबद्दल मनात काहीतरी वेगळेच फील झाले; तसे याआधी कोणत्याच मुलीबद्दल वाटले नाही. तशी आमची ओळखही जास्त जुनी नाही. तरीही काही गोष्टी अशा पद्धतीने घडत गेल्या की देवाचीच इच्छा होती की काय माहित नाही पण आम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार समोर येत गेलो आणि क्षणातच मने जुळत असल्याची जाणीव झाली."

"तू कोणाबद्दल बोलत आहेस शंतनु?"

"आई तुला आठवतंय मागच्या आठवड्यात आपल्या गाडीसमोर एक कॉलेजची मुलगी आली होती, जिच्यासोबत तुझे वाद झाले होते. ती तीच मुलगी...अदिती."

"अजिबात नाही आ शंतनु, आधीच माझ्या डोक्यात गेली आहे ती मुलगी. एवढा मोठा निर्णय तू परस्पर घेऊन मोकळादेखील झालास? अरे, एकदा तरी माझा आणि माझ्या मनाचा विचार करायचा होतास रे. मान्य आहे मुलगी सुंदर आहे, शिकलेली आहे पण ती माझी सून..मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. आता सर्व काही लक्षात येतंय माझ्या. त्या दिवशी तिची बाजू घेवून तू का बोलत होतास ते आता समजतंय. अरे एकदा तरी सांगायचं होतंस की ती तुझी मैत्रीण आहे म्हणून."

"आई...आई...आई अगं थांब जरा. मी नव्हतो गं ओळखत तिला तोपर्यंत. त्याच दिवशी मीही तिला पहिल्यांदाच पाहिले. तिच्या बाजूने बोललो म्हणजे ती माझी मैत्रीण होती म्हणून नाही. त्यावेळी मला जे वाटले, जे पटले तेच बोललो मी."

"त्या एका भेटीत तू डायरेक्ट तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ते पण तिने तुझ्या आईचा एवढा अपमान केल्यानंतर तू तिलाच पसंती द्यावी लग्नासाठी? अरे, जगात ती एकटीच मुलगी आहे का? बाळा.. ऐक माझे, आपण तुला हवी तशी मुलगी शोधुयात पण ती मुलगी नको ना रे. आता मावशीने पण सुचवलंय ना एक स्थळ, ते पाहून घेऊ आधी हवं तर."

"नाही आई.. का कोण जाणे पण अदिती सोडून मी आता दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार पण करू शकत नाही."

"अरे! पण अशी काय जादू केली तिने तुझ्यावर? की, ती सोडून तुला दुसरे काहीच दिसत नाही. असे कसे हे प्रेम? आठ दिवसांत असं कोणी इतकं प्रेमात वेडं होऊन लग्नाला तयार होतं का? ते पण एकाच भेटीत."

"आई अगं दुसऱ्याच दिवशी आमची पुन्हा एकदा भेट झाली होती योगायोगाने. ते पण दोघांच्याही मनीध्यानी नसताना. तेव्हाच वाटले हा एवढा मोठा योगायोग कसा काय असू शकतो? त्यात पुढे जाऊन अशा काही गोष्टी समोर आल्या की आपोआपच सर्व चित्र स्पष्ट दिसायला लागले. नक्की देवाचीच काहीतरी योजना असावी यापाठीमागे हे अगदी सहजच कोणालाही वाटू शकते. कारण, अशा गोष्टी फक्त चित्रपटातच पाहायला मिळतात. खऱ्या आयुष्यात हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल."

"असे घडले तरी काय नेमके की, तू डायरेक्ट तिच्याशी लग्नच करायला तयार झालास?"

"आई आपण जी मुलगी पाहायला गेलो होतो ना...ईशा, तिची अदिती ही मैत्रीण आहे. योगायोग कसा झाला बघ, ईशाचा मला फोन आला होता परवा. तिने सांगितले की तिचे दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे पण हे सगळे तिच्या आई बाबांना सांगण्याची तिच्यात हिम्मत नव्हती. अदितीने तिला समजावले त्यामुळे हिंमत करून तिने तिच्या आई बाबांना सांगितले आणि म्हणूनच तिने या लग्नाला नकार दिला. तिने मला सॉरी म्हणायला फोन केला होता तेव्हा मला हे सगळे समजले. तेव्हाच अदितीबद्दल देखील समजले. जर अदिती नसती तर कदाचित ईशाने नाईलाजास्तव मला होकार दिला असता आणि पुढे आमचे लग्नही झाले असते  पण त्यामुळे तीन आयुष्य बरबाद नसती का गं झाली? त्या दिवशी अदितीबद्दल मनात खूपच आदर निर्माण झाला."

"त्यात काय एवढं? त्यामुळे तुमचे लग्न मोडले त्याचे काय?"

"आई तुला मुद्दाच कळला नाही बघ. अगं ईशाने जर लग्न झाल्यानंतर तिच्या प्रेमाबद्दल मला सांगितले असते तर तसेही आमचे नाते सुरू होण्याआधीच संपले नसते का? त्यापेक्षा मग आधीच समजले ते बरे झाले ना आणि हे फक्त अदितीमुळे शक्य झाले. तोपर्यंत तर अदितीला हेसुद्धा माहित नव्हते की ईशाला पाहायला आलेली व्यक्ती मी..म्हणजे शंतनु सदावर्ते आहे म्हणून.  मीच ईशा कडून तिचा नंबर घेतला आणि त्यावेळी तिच्याशी बोलणं झालं."

"एकदाच बोलणं झालं आणि लगेच लग्नाला मागणी घातली की काय तू?" आईने आश्चर्यकाकरीत्या प्रश्न केला.

"मग त्यात काय एवढे? मुलगी पाहायला गेल्यावर एकदाच पाहून तिला होकार देतात ना? मग मी तर त्याआधी दोनदा भेटलो होतो अदितीला. योगायोगाने दोन्ही वेळेला तीच माझ्या गाडीसमोर आली होती. कदाचित तो एक संकेत असावा पुढे जाऊन आम्ही एकत्र येणार याचा."

"असे काही नसते. तू ऐक माझे. सोड त्या मुलीचा नाद. मी बोलते मावशी सोबत, आपण रविवारी तसेही जात आहोत ना मुलगी पाहायला आणि मावशी म्हणाली सुद्धा ह्यावेळी शंतनुला मुलगी आवडणार याची खात्री आहे तिला."

"म्हणजे मी एवढा वेळ बडबड केली ती सर्व व्यर्थ होती का आई?"

"शंतनु..अरे तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत आम्ही. उगीच नको त्या गोष्टीसाठी हट्ट करू नकोस. मला ती मुलगी पसंत नाही आणि तिच्याशी तुझे लग्नही होणार नाही." एवढे बोलून शामल ताई आत निघून गेल्या.

शंतनु मात्र उदास होवून तिथेच उभा राहिला.

क्रमशः

आता कसे एकत्र येतील अदिती आणि शंतनु की येणारच नाहीत? चार दिवसांचे प्रेम वेडे इथेच तर संपणार नाही ना? जाणून घेऊयात पुढील भागात.

©® कविता वायकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//