नको नको म्हणताना भाग ११

शेवटी प्रेम हे प्रेमच असतं.


आता अदितीचा राग वाढत आहे हे पाहून शंतनुने पटकन् स्वतःची ओळख सांगून टाकली.

"अहो चिडू नका मी गंमत करत होतो, मी प्रो. शंतनु सदावर्ते."

शंतनुचे नाव ऐकताच अदितीच्या चेहऱ्यावर लाजेची कळी खुलली. चेहरा अगदी गोरामोरा झाला तिचा.

"बुद्धू, इतकी कशी मूर्ख मी. माझ्याशी पण कोणी प्रँक करु शकते?" यावर अदितीचा विश्र्वासच बसेना. आता  पुढे काय रिप्लाय करू? याचाच ती विचार करत होती.

अचानक तिचा मूड बदलला आणि डायनिंग टेबलवरून उठून  ती तिच्या रूममध्ये गेली.

"आई हिचं खरंच काही खरं दिसत नाही. आता काही वेळापूर्वी इतकी रागात होती आणि आता हसतिये. कशी आहे ही? अननोन नंबरची ओळख पटली वाटतं." अमेयचा अंदाज अगदी बरोबर होता.

"सॉरी हा.. रागावलात?" अदितीचा रिप्लाय येत नाही हे पाहून शंतनुने मॅसेज केला.

"बरं ते जाऊद्या, सध्या ते महत्त्वाचं नाहीये. तुम्ही नंबर कुठून  मिळवलात माझा? ते अगोदर सांगा." अदितीने रागातच मॅसेज केला.

"ते पण एवढं जास्त महत्त्वाचं नाहीये. मला तर टेन्शनच आलं होतं आता चिडून माझा नंबर ब्लॉक करता की काय? म्हणून मग लवकर थांबवला प्रँक."

"हो का? ते तर करणारच होते मी. पण हुशार आहात तुम्ही. तुमचं तुम्हाला समजलं ते."

"बरं कशा आहात?"

"मस्त..आणि तुम्ही?"

"मी तर खूपच मस्त."

"एक बोलू... शंतनुने विचारले.

"दोन बोला." अदितीने हसून रिप्लाय दिला. त्यावर शंतनुला देखील हसू आले. खूप सारे हसण्याचे ईमोजी पाठवून स्वतःही दोघे हसत होते.

"आपण एकमेकांना नावाने हाक मारली तर चालेल का तुम्हाला?" शंतनुने घाबरतच विचारले.

"ह्ममम..चालेल की. तुम्हाला चालणार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक शंका आहे. तुम्ही प्रोफेसर...मी इंजिनिअरिंगची स्टुडंट. बरं नाही वाटत ना ते असं अरे तुरे केलेलं."

"मी जरी प्रोफेसर असलो तरी रिटायरमेंटला नाही आलो हा. तुमच्याच वयाच्या जवळपास असेल मी. त्यामुळे अरे तुरे केले तर मलाही छान वाटेल."

"बरं बरं रागावू नका. पण मी \"अहो शंतनु\" असे म्हटले तर चालेल का तुम्हाला?"

शंतनुच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्यालाही  \"अहो\" शब्द ऐकून खूप छान फील झाले. अगदी हक्काचा आणि जवळचा शब्द वाटला.

"हो अगदीच चालेल की. मी तर म्हणतो चालेल काय धावेल. फक्त शंतनु म्हटले तर जरा आणखीच जोरात धावले असते."

दिघांचेही चेहरे लाजेने गोरमोरे झाले होते. दोघांनीही जणू एकमेकांची मने जाणली होती. न बोलताही मने हळूहळू जुळत होती. हृदयाची भाषा हृदयाला कळली होती.

"बरं..अदिती मला एक सांग, लग्नाचा वगैरे काही विचार आहे की नाही?"

"मनासारखं कुणी भेटलं तर नक्कीच करेल विचार. पण अजून कुणी भेटलेच नाही आणि तुम्ही? तुमचेही लग्न नाही ना झाले? की झाले आहे? ते तर राहूनच गेले विचारायचे."

"माझं लग्न झालं असतं  तर आत्ता ह्यावेळी तुझ्याशी असं चॅटिंग करू शकलो असतो का मी?"

"हो का? का बरं नसता करू शकलात?" तशी अदितीला आधीपासूनच खात्री होती. शंतनुचे लग्न झाले नसणार. तिचे मन तिला सांगत होते.

"अगं तुझे लग्न झाल्यावर तुझ्या नवऱ्याने असे इतर कोणत्या  मुलीसोबत चॅटिंग केलेले आवडेल का तुला?"

"तसे पाहिले तर कामाच्या बाबतीत काही असेल तर बोलायला काही हरकत नाही पण विनाकारण टाइमपास सुरू असेल तर ते मात्र अजिबात नाही आवडणार. कारण त्याचा वेगळा अर्थ निघू शकतो ना."

"म्हणजे आता आपण टाईमपास करत आहोत आणि त्याचाही काहीतरी वेगळा अर्थ निघतो, असं म्हणायचंय तुला?"

अरे देवा...खाल्ली पुन्हा माती. स्वतःच्याच कपाळावर मारून घेत अदिती मनातच बोलली.

"आता काय अर्थ निघतो? ते नका विचारू हा प्लीज." अदितीलाही आपण काहीतरी चुकीचे बोललो आहोत याची जाणीव झाली.

"अदिती एक स्पष्टच विचारू तुला?"

"अहो विचारा हो..अशी दरवेळी परमिशन नका घेत जावू."

"तुला काय वाटतं ते मला माहित नाही पण तुला जेव्हापासून मी पाहिलंय ना तेव्हापासून वेगळंच फील होत आहे. माहित नाही का? पण, राहून राहून तुझा चेहरा डोळ्यासमोर येणं, तुझ्याशी बोलावंसं वाटणं असंच होतंय. त्यात योगायोगाने ध्यानीमनी नसताना तुझं दोनदा अचानक माझ्यासमोर येणं. यात देवाची काहीतरी योजना आहे असं नाही का वाटत तुला?"

"अहो तुम्ही जे बोललात त्या सर्व गोष्टी सेम माझ्यासोबत पण घडत आहेत. मला तर वाटले होते की आता आपली पुन्हा कधी भेट पण होते की नाही? पण दुसऱ्याच दिवशी लगेच तुम्ही भेटलात. खूप म्हणजे खूपच भारी वाटलं तेव्हा. मी तर देवाला प्रार्थना पण केली हाती, एकदा तरी आमची भेट घडवून आण म्हणून."

"याचा अर्थ समजतोय तुला? आपण एकमेकांना मनापासून आवडायला लागलोय." शंतनुने या वाक्याच्या पुढे एक हार्ट ईमोजी टाकले.

"बापरे! किती फास्ट निघालात ओ तुम्ही. पहिल्याच बॉलवर डायरेक्ट सिक्सर."

शंतनुला आता खूपच हसू येत होते." खरचंच मी खूप घाई तर करत नाही ना?" असे क्षणभर त्याला वाटले. पण आता जर उशीर केला तर आई दुसऱ्याच कोणाशी माझे लग्न लावून देईल.  मग तेव्हा मात्र खरचंच खूप उशीर होईल.

"हो, आहे मी फास्ट पण आता अजून उशीर केला ना तर कदाचित येत्या संडेला माझा साखरपुडा फिक्स आहे अगं. मग मात्र आयुष्यभर मनात एकच गिल्ट राहील की कुणीतरी आपल्याला आवडले होते पण तेव्हा का नाही विचारले?" शंतनु थोडे स्पष्टच बोलला.

"खरं सांगू तुम्हाला, तसे पाहिले तर आपण अजून एकमेकांना नीटसे ओळखत पण नाहीत. तुम्ही प्रोफेसर आणि मी इंजिनिअरिंग स्टुडंट..यापलीकडे आपण एकमेकांना ओळखत पण नाही."

"माझ्यासाठी तुझी तेवढी ओळख पुरेशी आहे. माझ्याबद्दल काय सांगू बोल?"

"अहो माझ्या आई बाबांना तर कधी एकदा मी लग्नाला होकार देते असे झाले आहे पण का कोण लग्नाची भीतीच वाटते मला."

"ते आणि का?"

"लग्न ही जबाबदारी माझ्याच्याने झेपेल का? असे वाटत राहते. त्यात पुढे जाऊन सासू नावाचा प्राणी माझ्याच्याने हॅण्डल होईल का? उगीच भांडणं, रोजचे वाद यात नव्हते अडकायचे मला. कारण लग्न म्हटलं की आधी सासूचा विचार डोक्यात असतो माझ्या आणि त्या दिवशी नेमकी हाच विचार सुरू असताना तुमच्या गाडीसमोर आले अचानक. त्यात तुमच्या आई ज्या पद्धतीने बोलल्या माझ्याशी त्यानंतर तर खात्रीच पटली."

क्रमशः

शंतनुने तर पहिल्याच बॉलवर जरी सिक्सर मारला तरी अदितीने मात्र अप्रत्यक्षपणे नकार दिला. आता काय होईल पुढे शंतनु आणि अदितीच्या प्रेमकहाणीचे? सुरू होण्याआधीच संपणार तर नाही ना? जाणून घेवूयात पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all