नको नको म्हणताना भाग १०

शेवटी प्रेम हे प्रेम असतं


"काय रे काय झालं? असा का तोंड पाडून बसलास?"

"कुठे काय?काहीच तर नाही."

"दोन तीन दिवस झाले पाहतीये, तुझे काहीतरी वेगळेच सुरू आहे." शामल ताईंनी शंतनुला त्याच्यातील बदलाची जाणीव करुन दिली.

खाली मान घालून शंतनुने भुवया उडवत दाताखाली जीभ चावली.

"कॉलेजमध्ये काही झालंय का? कसलं टेन्शन आहे का?"शामल ताईंचे प्रश्न काही थांबायचे नावच घेईना.

"नाही ग आई. काहीही काय? मला कसले टेन्शन असणार?"

"मग असा गप्प गप्प का असतोस? रोज माझ्याशी बाबांशी पोटभर गप्पा मारणारा माझा लेक कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय."

"अरे बापरे! इतका बदललोय मी. अजून तर कशातच काही नाही आणि आईला तर इतक्यातच माझ्यातील बदल जाणवतोय. कसे होणार आहे माझे देवच जाणे." शंतनु मनातच बोलला.

"बरं ऐक, शोभा मावशीने एक स्थळ सुचवलंय. येत्या रविवारी मुलगी पाहून येऊ म्हणतिये. जमेल ना तुला? पण शक्यतो जमवच बाबा. एक एक दिवस खूपच उशीर होत चाललाय रे. आता लग्नासाठी जास्त उशीर करून चालणार नाही. वय पण वाढतंय ना रे."

"आई...मी इतका म्हातारा झालोय का गं? वय वाढतंय म्हणजे काय? उलट अजूनही माझे मित्र म्हणतात, कसलं मेन्टेन केलंयेस तू..अजूनही पंचवीसचाच वाटतोस. कोणी म्हणणार नाही तिशी गाठली."

"सगळं ठीक आहे रे बाबा. पण जे खरं ते खरंच ना." आईनेही थोडी मस्करी केली.

"पण आई ऐक ना.. ह्याच रविवारी जायला हवं का गं?"

"मग कधी जायचं?"

"म्हणजे अगं..आताच एका मुलीचा नकार आला, आता पुन्हा तसेच झाले तर? त्यापेक्षा नकोच. थोडे दिवस थांबुयात."

"नाही आ अजिबात नाही चालणार. दरवेळी काय रे तुझ्या मनासारखं. आधी सेटल झाल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणून लग्नाचा विषय टाळत होतास.आता नोकरी आहे, घर घेतलं नवं. बाबांच्या सपोर्टमुळे सगळं झालंय ना मनासारखं. मग काय प्रॉब्लेम आहे आता? ते काही नाही. येत्या रविवारी जायचं म्हणजे जायचं."

शंतनुच्या मनात मात्र अदितीचाच विचार सुरू होता. "काय जादू केली राव ह्या मुलीने? आता दुसऱ्या मुली पाहायला देखील मन तयार होईना झालंय. प्लीज गॉड, हेल्प मी."

तेवढ्यात मोबाइलची लाईट चमकली. पाहिले तर ईशाचा मॅसेज होता. अदितीचा नंबर पाठवला होता तिने.

अचानक त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. आता कधी एकदा अदितीशी बोलतोय असे झाले होते त्याला. मग घाईतच जेवण आटोपून तो त्याच्या रूममध्ये गेला.

अदितीला मॅसेज करायला म्हणून त्याने मोबाईल हातात घेतला. पण नेमकी सुरुवात कुठून आणि कशी करायची? असा त्याला प्रश्न पडला.

चला थोडी गंमत करूयात असे त्याच्या मनात आले.

"हाय, हा अदिती लेलेंचाच नंबर आहे ना?"

जेवणाच्या टेबलवर सगळे जेवत असतानाच अदितीच्या मोबाईलची घंटी वाजली. तसे सर्वांचेच लक्ष तिच्या मोबाईलवर खिळले.

बाजूलाच बसलेल्या अमेयचे लक्ष मात्र पटकन् मोबाइलच्या स्क्रीनकडे गेले.

"बापरे! आता तर अननोन नंबरवरून पण मॅसेज यायला लागले मॅडमला."
नेहमीप्रमाणेच अमेयने ताईची खेचायला सुरूवात केली.

"तू गप रे. तू तुझ्या जेवणाकडे लक्ष दे."

अदितीने मॅसेज ओपन केला.

"हाय...हा अदिती लेलेंचाच नंबर आहे का?"

"माहित नाही तर मग कशाला मेसेज केलात?"अदितीने तिरसटासारखेच उत्तर दिले.

"काय विचित्र लोक असतात. म्हणे हा अदिती लेलेंचा नंबर आहे का?"

"तुला सगळेच लोक तिरसटच वाटतात आधी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल तू आधी." आता अदितीच्या बोलण्यावर शांत बसेल तो अमेय कुठला.

"अरे पण ही कोणती पद्धत. खात्री नसेल हा कोणाचा नंबर आहे तर मग कशाला मॅसेज करायचा ना?" अदिती तिचा हेका सोडायला तयारच नव्हती.

"अगं पण नसेल पटत तर रिप्लाय नको करुस ना." रत्ना ताईंनी लेकीला सुचवले.

"ह्ममम..आता माझ्या डोक्यात कोणी गेल्यावर त्याला मी सोडते का?"

"जा मग भांड जाऊन, नाहीतरी तुला तेच जमतं. आणि त्याबदल्यात तुला सासू पण तशीच भेटेल मग. जैसी करनी वैसी भरनी.." अमेयची गाडी पुन्हा लग्नावर येऊन घसरली.

"भेटू दे हं, पण माझा नवरा मला समजून घेणारा असेल तर सासू कशी का असेना. चालेल मला."

"बापरे! आई.. ही बघ आज चक्क लग्न या विषयावर काहीतरी बोलली. हिला ताप आलाय का चेक कर एकदा."

लेकाच्या या बोलण्यावर रत्ना ताईंना खुदकन हसू आले.

पुढे पुन्हा मॅसेज आला...

"बरं सॉरी मला वाटले तुम्ही अदिती लेले आहात की काय? कदाचित चुकीचा नंबर मिळाला असेल मला. पुन्हा एकदा सॉरी हा. पण नक्की तुम्ही अदिती लेले नाहीत ना?"

"अहो नाही. किती वेळा सांगू आता तेच तेच? आणि असेल जरी मी अदिती लेले तर तुम्ही काय करणार आहात? आपण ओळखतो का एकमेकांना?"

"अरे वा! तुम्ही तर मान्य केले की राव तुम्ही अदिती लेले आहात म्हणून. इतकं कुणी खोटं बोलतं का हो? मला आधी वाटलं की तुम्ही फक्त धडकता लोकांना पण आज खात्री पटली तुम्ही तर खोटेही बोलता."

"ओ मिस्टर...कोण आहात तुम्ही? का त्रास देत आहात मला? आणि मी लोकांना धडकते म्हणजे काय? पण तुम्हाला माहीतच कशा झाल्या माझ्या पर्सनल गोष्टी?"

"ते आमचं सिक्रेट आहे बाबा." एकीकडे अदितीच्या रागाचा पारा चढत चालला होता पण शंतनुचे मात्र हसून हसून हाल झाले होते. तो खूपच मजा घेत होता या साऱ्याची.

अदिती देखील आता विचारात पडली. कोण असेल ही व्यक्ती? आणि मला कसे काय ओळखते?

क्रमशः

सांगेल का शंतनु अदितीला त्याची ओळख? त्यावर अदितीची काय प्रतिक्रिया असेल? जाणून घेवूयात पुढील भागात.

©®कविता वायकर

🎭 Series Post

View all