नको नको म्हणताना भाग ९

शेवटी प्रेम हे प्रेम असतं


अदिती आणि शंतनु दोघांच्याही मनात आता एकमेकांसाठी प्रेमभावना निर्माण झाली होती. दोघांच्याही अंतर्मनाने तसा कौल दिला होता. फक्त दोनदाच ते एकमेकांच्या समोर आले होते.

परंतु असे असले तरीही, नजरेची जादू ह्रदयाला जावून भिडली नि मनात प्रेमाचे तरंग उठले. तहान-भूक सारे विसरून दोघेही एकमेकांच्या आठवणींत रममाण झाले.

अदितीला तर पाहताच क्षणी शंतनुचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व भावले होते. पण दुसऱ्या भेटीदरम्यान अदितीने देखील शंतनुच्या मनात नकळतपणे घर केले होते.

अगोदर अदितीची  मैत्रीण ईशा, हिला शंतनुचे स्थळ आले होते. परंतु, तिचे दुसऱ्या कोणावर प्रेम असल्याने तिने त्याला नकार दिला. अदितीच्याच सांगण्यावरून इशाने त्यांचे स्थळ नाकारले होते.हे सगळे घडण्याला कुठेतरी अदिती जबाबदार जरी असली तरी काही गोष्टी ठरवूनही नाही टाळता येत. अगदी तसेच काहीसे घडत होते. सारे काही स्वप्नवत भासत होते.

फोनवर ईशाच्या तोंडून जेव्हापासून अदितीचे नाव ऐकले तेव्हापासून शंतनु देखील बेचैन झाला होता. ही अदिती नेमकी कोण? हे जाणून घेण्यासाठी तो धडपडत होता.

"इशाला फोन करून विचारले तर? शंतनुच्या मनात अगदी सहज विचार आला.
दुसऱ्या दिवशी त्याने इशाला मॅसेज केला. फोनच करावा असे वाटले त्याला क्षणभर पण ते योग्य दिसणार नाही म्हणून मग त्याने फक्त मेसेज पाठवला.

"तुमची मैत्रीण म्हणजे "अदिती लेले" याच आहेत का? जर त्याच असतील तर प्लीज त्यांना माझ्याबद्दल सध्या काहीच सांगू नका." खूप विचार केला तेव्हा कुठे शंतनुला अदितीचे सरनेम आठवले होते.

उत्तर येईपर्यंत मात्र शंतनुच्या पोटात गोळा आला होता. एकीकडे कॉलेजला जायची गडबड आणि दुसरीकडे मोबाईलकडे अर्धे लक्ष, असे काहीसे सुरू होते त्याच्या मनात.

दहा मिनिटे झाली, पंधरा मिनिटे झाली पण अजूनही ईशाने मॅसेज पाहिला नव्हता. नाईलाजास्तव त्याने फोन बाजूला ठेवला. कारण आईचेही बारीक लक्ष होते त्याच्यावर.
मधेच आईच्या प्रश्नांची सरबत्ती नको म्हणून मग त्याने मनाला आवर घातला. आवरुन तो कॉलेजला निघून गेला.

"ये आई मी निघते ग." तिकडे अदितीही कॉलेजला जायला निघाली.

"सावकाश जा ग. धडकू नकोस कोणाला." जाताना आईच्या सूचना मात्र सुरू झाल्या.

"काय ग आई.. तू पण का आता. दोनदा काय घडले तसे, तर तुम्ही मला टॅगच देवून टाकलात धडकण्याचा."

"बरं जा बाई नाही म्हणत काही."

कॉलेजला पोहोचताच ईशाची आणि तिची कालच्या विषयावर चर्चा सुरू झाली.

"काय ग ईशा...तू बाकी सगळे सांगितलेस पण त्या सरांचे नाव नाही सांगितलेस मला."

ईशा काही बोलणार इतक्यात तिने मोबाईल ऑन केला आणि तिला सरांचे मेसेजेस दिसले. तिने पटकन विषय बदलला.

"अगं काय नाव होते बरं त्यांचे? मला नेमके आठवेना ग आत्ता. आठवले की सांगते तुला हं."
मेसेज पाहून ईशाने शंतनु सरांचे नाव सांगायचे टाळले. पण सरांनी असे का सांगितले असेल? ह्या विचारांत ती गुंतली.

"तू पण विचित्रच मुलगी आहे बाई. काल बोललीस त्यांच्याशी आणि साधे नाव पण आठवेना तुला. मोबाईल आण इकडे, मोबाईलमध्ये सेव्ह असेल."

"नाही ग! सेव्ह नाही केला मी त्यांचा नंबर." ईशाने घाईतच मोबाईल बाजूला ओढला.

"काय चाललंय ह्या मुलीचं?" मनातच बोलत रागाचेच अदितीने ईशाकडे पाहिले.

आता अदिती समोर ती त्यांना रिप्लाय पण करू शकत नव्हती.
बऱ्याच वेळाने तिने शंतनु सरांच्या मॅसेजला रिप्लाय केला.

"हो सर..अदिती लेले हिच माझी मैत्रीण आहे. पण तुम्ही कसे ओळखता तिला?" ईशाने आश्चर्यकारकरित्या प्रश्न केला.

शंतनुने देखील काही वेळानंतर ईशाचा मॅसेज पाहिला. आता तर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. "खरंच हा योगायोग म्हणावा की देवाची इच्छा? पण ते काही का असेना, अदितीशी मैत्री करायला नक्कीच आवडेल मला." म्हणत त्याने ईशाच्या मॅसेजला रिप्लाय केला.

"आम्ही कसे ओळखतो एकमेकांना? सध्या ते महत्त्वाचं नाहीये. मी नंतर सविस्तर सांगेल तुम्हाला." आनंदाच्या भरात आता बाकी काही बोलण्याची शंतनुची इच्छाच नव्हती. आता कधी एकदा अदिती सोबत कॉन्टॅक्ट होतोय असे झाले होते त्याला.

न राहवून त्याने मग अदितीचा मोबाईल नंबर मागितला ईशाकडे.

"प्लीज, मला अदितीचा मोबाईल नंबर मिळू शकेल का?"

"सर मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे. प्लीज गैरसमज करून घेवू नका. पण आज रात्रीपर्यंत मी नक्की देईल."

आता ईशा मात्र कोड्यात पडली.

"अदितीचा नंबर जर मी सरांना दिला आणि ते उगीच जर तिला काही बोलले तर? पण ते ओळखतात कसे हिला तेही सांगितले नाही त्यांनी. पण का?" ईशा शून्यात नजर लावून विचारांत हरवली होती.

"काय मॅडम कुठे हरवलात?" तिच्या समोर चुटकी वाचवत अदिती बोलली.

"कुठे काय? काहीच नाही." ईशा सारवासारव करतच उत्तरली.

"काय करू देवू का शंतनु सरांना अदितीचा नंबर? ती अजूनही याच विचारात अडकली होती.

क्रमशः

देईल का ईशा शंतनुला अदितीचा नंबर? कशी फुलणार अदिती आणि शंतनुची प्रेमकहाणी जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all