नको नको म्हणताना भाग ६

शेवटी प्रेम हे प्रेमच असतं


दोन्ही भाऊ बहिण वाद घालतच घरी आलेले पाहून रत्ना ताईंनी काळजीपोटी एकामागून एक प्रश्न विचारायला सुरूवात केली.

"काय रे अमेय, ताई वेळेत नाही पोहोचली का तुझ्या कॉलेजला?"

"पोहोचली ना, पण आई आजकाल ही नुसती धडकत फिरते लोकांना."

"म्हणजे आजही काही झाले का?" रत्ना ताईंनी आश्चर्यकाकरीत्या विचारले.

"काय नाही झाले ते विचार?" अमेयच्या बोलण्याने तर आईच्या काळजीत आणखीच भर पडली.

"काय ग, आजही भांडलीस की काय कोणासोबत? आणि आज कोणाला धडकलीस? की लागलं कुठे तुला?"

अदितीच्या जवळ जात काळजीपोटी आईने एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

"आई..आई..आई..किती प्रश्न? थांब ग जरा. यातील काहीच नाही झाले ग. ह्या अमड्याचे काही ऐकू नकोस."

"कोणी सांगेल का मला की, नेमकं झालंय काय ते?"

"अगं आई ही पुन्हा कालच्या त्या सरांना धडकली." अमेयने मग सगळी हकीकत आईला सांगितली.

आईलाही आता हसू आवरेना.

"हे एक बरे झाले." आई तोंडातच पुटपुटली.

"काही बोललीस का तू?" आश्चर्यकारकरित्या अमेयने विचारले.

हसत आणि मान हलवतच रत्ना ताईंनी नकार दर्शवला.

"बरं.. जाऊ दे आता. जे झालं ते झालं. तिला काही झालं नाही ना..मग नको टेन्शन घेऊ."

"टेन्शन कोण घेतंय गं, उलट...." पुढे काही बोलायच्या आतच आईने अमेयच्या पाठीत हलकेच एक धपाटा टाकला.

"म्हणजे अगं आई तसे नव्हते गं म्हणायचे मला, पण आपण ना हिचे लग्न लाऊन द्यायला पाहिजे आता. वेळेत लग्न न झाल्याचे परिणाम आहेत हे. अगं त्या सरांना धडकल्यापासून तिचा मेंदू थोडा खाली सरकलाय, असं मला तरी वाटतंय. काहीही बडबडत असते. बघ आई आताच लक्ष दे तुझ्या पोरीकडे नाहीतर एखादा चांगल्या डॉक्टरला दाखवून आण."

"अमेय, तुझी मोठी बहीण आहे बाळा ती. असं बोलतं का कोणी?"

"सॉरी बाबा...पण ती पण काही कमी नाही आ आणि तुम्ही नेहमी तिचीच बाजू घेता. ती मात्र शांत बसून हळूच चिमटा काढून मोकळी होते.

"ये आई ह्या अमड्यालाच गरज आहे डॉक्टरची. आधी त्यालाच घेऊन जा." म्हणत दोन्ही भावंडांच्या मस्तीत पुन्हा एकदा घर हरवून गेले.

"पण खरंच, काहीही म्हणा... यांच्याशिवाय घराला घरपण नाहीच मुळी." रत्ना ताई भाऊक स्वरात माधवरावांना म्हणाल्या. 

ते दोघेही मग दुरुनच मुलांचे बालपण आठवत भूतकाळात काही क्षण रममाण झाले.

रात्री पुन्हा एकदा अदितीच्या झोपेला शंतनु सरांच्या आठवणींची सोबत झाली.
"शंतनु...किती गोड नाव आहे हे. नावाप्रमाणे व्यक्तीदेखील तितकीच गोड. पण काहीही म्हणा, काहीतरी आहे त्या व्यक्तीत. नाहीतर मला सहजासहजी कोणी वेड लावेल असे होऊच शकत नाही."

शंतनु सरांचा चेहरा काही केल्या अदितीच्या डोळ्यांसमोरून हटायलाच तयार नव्हता. डोळे बंद केले तरी सर आपल्याकडेच पाहून हसत आहेत असे वाटत होते तिला.

नुसत्या कल्पनेनेच तिच्या चेहऱ्यावर प्रेमाची लाली खुलली होती. गोड गुलाबी स्वप्नांची पहाट आता कुठे अदितीच्या जीवनात होत होती. तीही त्याचा मनसोक्त आनंद घेत होती. पण हे जे काही सुरू होते त्यात खरंच कितपत तथ्य आहे हे देवालाच ठाऊक होते. कारण हे सर्व सद्ध्या तरी एकतर्फीच होते.

अदितीच्या मनाचा ताबा आता हळूहळू शंतनु सर घेत होते. अगदी त्यांची सहजच झालेली ती पहिली भेट, पण अदितीला मात्र वेड लावून गेली. त्या दिवशीपासून असा एकही क्षण नाही की अदितीला त्यांची आठवण झाली नाही.

काही व्यक्ती अगदी सहज आपल्या मनाचा ताबा घेतात. हळूच येवून मनात छोटेसे घर करतात. आणि कधी एकदा ते आपल्या आयुष्याचा एक भाग होतात ते कळतदेखील नाही. सध्या अदितीच्या बाबतीत पण तसेच काहीसे घडत होते.

अगदी ध्यानी मनी नसताना शंतनु सदावर्ते अदितीच्या आयुष्यात आले. पहिल्याच भेटीत त्यांनी अदितीच्या मनात घर केले. माहित नाही का पण त्या व्यक्तीत नक्कीच काहीतरी वेगळे जाणवले अदितीला. उगीच नाही दोन दिवसापासून त्यांनी तिची झोप उडवली.

आता हे काय कमी होते म्हणून पुन्हा एकदा ती त्यांच्याच गाडीसमोर यावी. अगदी "मनी वसे ते स्वप्नी दिसे" तसेच काहीसे घडत होते. नक्कीच देवाची ही काहीतरी योजना असावी. काही गोष्टी चुकून घडत असतात तर काही दैवयोगाने घडवून आणल्या जातात; हे काही खोटे नाही बरं का.

तिकडे शंतनुदेखील आज नकळतपणे अदितीला आठवून
गालातल्या गालात हसत होता. तिची अमेयसोबत सुरू असलेली नोकझोक आठवून त्यालाही मनात कुठेतरी वाटले की, "आपल्यालाही एखादी बहीण असायला हवी होती. मोठी किंवा लहान आणि तीही सेम तिच्यासारखीच...पण नाव काय बरं तिचे? हां आठवले...अदिती."

नकळतपणे शंतनु थोडा मोठ्याने बोलला. अगदी सहजच अदितीचे नाव त्याच्या तोंडून बाहेर पडले.

"अदिती.... ही अदिती कोण रे शंतनु?" न राहवून आईने विचारलेच.

आता काय उत्तर द्यावे हे त्यालाही सुचेना. आता आला का शंतनु गोत्यात?

क्रमशः

आता काय उत्तर देईल शंतनु? जाणून घेवूयात पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all