नको नको म्हणताना भाग ५

शेवटी प्रेम हे प्रेमच असतं


नको नको म्हणताना अखेर अदितीच्या हृदयात प्रेमाची तार ही छेडली गेलीच. पण ज्या व्यक्तीसाठी तिचे मन सैरभैर झाले होते ती व्यक्ती तिला पुन्हा भेटेल की नाही? याचा काहीच अंदाज नव्हता. पण म्हणतात ना की, प्रेम हे प्रेम असतं. ते केव्हा? कधी? कोणाला? आणि कोणावर होईल? हे काही सांगता येत नाही.

त्या दिवशी धाकटा भाऊ अमेयसोबत वाद घालून अदिती तिची स्कूटी घेवून अखेर कॉलेजला गेलीच. काही केल्या तिचे मन मात्र कशातच रमेना.

वेळेचे अचूक नियोजन, अभ्यासातील सातत्य, जिद्दीने कोणतीही गोष्ट मिळवण्याची तयारी यामुळेच अदिती क्लास टॉपर रहायची नेहमी. पण दोन दिवसापासून तिच्यातील बदल सर्वांनीच हेरला होता.

लेक्चर सुरू असताना तिच्या मनात सहज आले, "पण त्याचे आधीच लग्न आले असेल तर? मग तो मला पुन्हा भेटला काय आणि नाही भेटला काय, काहीच फरक पडणार नाही. प्लीज गॉड पण तरीही माझी आणि त्याची फक्त एकदा भेट घडवून आण."

दोन दिवस झाले अदितीचे लक्षच विचलित झाले होते. ठरल्याप्रमाणे कॉलेज सुटल्यावर ती अमेयला पिक करण्यासाठी त्याच्या कॉलेजमध्ये गेली.

तिची कॉलेजच्या गेटमधून आत शिरण्याची आणि समोरून एक चार चाकी येण्याची वेळ एकच झाली.

दोन्ही गाड्यांचे एकाच वेळी ब्रेक लागले. समोर पाहते तर काय? पुन्हा एकदा त्याच दिवशीची गाडी आणि गाडी चालवणारी व्यक्तिदेखील तीच होती.

क्षणभर अदिती गोंधळली. मनातून तिला खूपच आनंद झाला. पोटात फुलपाखरांचे थवे घिरट्या घालू लागले. ओठांवर आपसूकच हास्य उमटले. पण लगेचच ती भानावर आली.

"अरे देवा! खाल्ली पुन्हा एकदा मी माती." तिने दाताखाली जीभ चावली आणि गाडी थोडी बाजूला घेतली. समोरची गाडी थोडी पुढे जावून बाजूला थांबली. ती व्यक्ती गाडीतून खाली उतरली.

"मागच्या वेळी त्यांनी आपल्याला प्रेमाने समजावले होते पण ह्यावेळी ते सोडणार नाहीत मला."अदिती  विचारांत गुंतली. ह्यावेळी मनातून मात्र ती खूपच घाबरली होती.

"एक्सक्युज मी", तेवढ्यात समोरून आवाज आला. अदिती घाबरतच त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली.

"काय हो, तुम्ही त्या दिवशीच्याच मॅडम ना?"

"हो..म्हणजे नाही, म्हणजे हो...." हो नाही..हो नाही मान हलवत अदिती शेवटी "हो"म्हणाली.

"तुम्हाला माझीच गाडी भेटते का ओ नेहमी धडकायला?"

"त्यासाठी खरंच सॉरी, मला ना खूप उशीर झाला होता ओ, त्यामुळे थोडी गडबडीत होते मी."अदितीने सारवासारव करत उत्तर दिले.

"नेहमी नेहमी उशीर होतो तर मग वेळेत निघायला काय होतं? तुम्हाला तर उशीर होतोच पण तुमच्यामुळे मलाही उशीर होतो, त्याचे काय? पण बाय द वे तुम्ही तर त्या दिवशी इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाहेर दिसला होतात आणि आज इथे? एकाच वेळी दोन दोन डिग्री घेताय की काय?"

"नाही ओ सर, असे कसे करील मी? ॲक्च्युअली मी इंजिनिअरिंगला आहे आणि माझा लहान भाऊ ह्या कॉलेजला बीएससीला आहे. त्याला पिक करायला मी आले होते. मला वाटले मला खूप उशीर झाला की काय म्हणून घाईत होते. पण तुम्ही इथे कसे काय?"

"मी प्रॅक्टिकल सुपरविजनसाठी आलो होतो इथे."

"म्हणजे तुम्ही प्रोफेसर आहात?"

"आता सुपरविजनसाठी आलो म्हणजे स्टुडंट तर नक्कीच नाही."सरांनी थोडे गमतीशीर उत्तर दिले.

त्यांचे हे गमतीशीर उत्तर मिळताच अदितीला हसू आले. तिचे हसणे पाहून त्यांनाही हसू कंट्रोल होईना.

"बरं तुमचे नाव समजू शकेल का?" अखेर त्यांनी विचारले.

"हो हो नक्कीच. मी अदिती, अदिती रत्ना माधवराव लेले."

"वा..क्या बात है, हे आवडलं आपल्याला, म्हणजे वडीलांबरोबरच आईचाही सन्मान. खूप छान."

"आणि तुमचे नाव?"

"मी प्रो.शंतनु शामल अनंतराव सदावर्ते." त्यांनीही मग तिच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले.

दोघेही मग एकमेकांकडे पाहून एकदमच हसले.

चला तुमच्याकडून नवीन काहीतरी शिकलो आज. म्हणजे आता सगळीकडे सरकारने आईचे नाव जरी कंपलसरी केले असले  तरी बोलताना मात्र आपण अजूनही आईच्या नावाचा तितका उल्लेख करत नाही. पण तुम्ही मात्र तो आवर्जून केलात.

तेवढ्यात अमेय तिथे आला.

"ओ ताईसाहेब पंधरा मिनिटे झाली कॉलेजच्या पार्किंगमध्ये उभा आहे आणि तुम्ही अजून गेटमध्येच? मला कसे समजणार तू इथे आहेस ते? शेवटी वाट पाहून बाहेर आलो तर तू इथे छान गप्पा मारतीयेस. पण तू या सरांना कशी ओळखतेस ग? हेच सर तर आले होते आज आम्हाला सुपरविजनला."

"अरे काल मी ज्यांच्या गाडीसमोर आले होते ना, ते हेच."

"अरे! हो का?"

"पण अगं खूप कडक आणि खडूस वाटले मला ते. तू तर खूप कौतुक करत होतीस त्यांचे. पण तसे अजिबात नाहीत ते." हळूच अदितीच्या कानात अमेय बोलला."

"अरे काहीही काय बोलतोस, गप्प बस ना जरा."

"सर हा माझा लहान भाऊ अमेय. खूप खोडकर आहे. आज कॉपी वगैरे नाही ना केली याने?"

"मी असताना कॉपी करण्याची कोणाची हिम्मत?हो ना अमेय. तसा अंदाज आलाच असेल आज त्याला."

नजर चोरतच अमेय खाली मान घालून हसला आणि हळूच अदितीच्या कानात बोलला."मी कधी ग कॉपी करतो शहाणे?"

"नाही तसा आमचा अमेय खूप हुशार आहे पण कधी कधीच वेड्यासारखा वागतो."

"हो ते तर प्रत्येकाच्याच बाबतीत असते." सरांनीदेखील हसून रिप्लाय दिला.

"बरं चला मी निघतो आता, खूप उशीर होतोय मला."

"ओके सर."

"तुम्हीही जा सावकाश आणि हो, गाडी जरा जपून चालवा. पुन्हा धडकू नका कोणाला म्हणजे झालं. काल सांगितलेली गोष्ट तेवढी लक्षात असू द्या. शेवटी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जीव सर्वात जास्त महत्त्वाचा." हसतच सरांनी काल सांगितलेली लाखमोलाची गोष्ट पुन्हा एकदा आठवण करून दिली अदितीला.

तिनेही मग मानेनेच होकार दर्शवला. तिच्या चेहऱ्यावरील हास्य अधिकच खुलले. सरांच्या पाठमोऱ्या गाडीकडे ती एकटक पाहातच राहिली.

"खरंच यार, काय जादू केलीये ह्या व्यक्तीने? इतकं बोललो तरीही मन भरल्यासारखे वाटतच नाही."

"ओ, ताईसाहेब..केव्हाच गेले ते. चला आता आपणही निघुयात का?"

"ह्मम.. चल." तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून अमेय विचारांत पडला.

"ही अशी का करतिये वेड्यासारखी?"दोन्ही हातांचे खांदे उडवत अमेय अदितीच्या मागे गाडीवर बसला."

पण तिने गाडी सुरू करायच्या आधीच तो बोलला, "थांब ताई..मी घेऊ का गाडी? नाही म्हणजे तू नेहमी धडकत असतेस लोकांना. म्हणून मला भीती वाटतिये तुझ्या मागे बसायची. आजही धडकलीस ना त्या सरांना? म्हणून म्हणतो आहे मी, तू मागे बस निवांत."

"ओके.. घे बाबा, तसेही आज मला मागेच बसण्याची खूप इच्छा आहे." अमेयने मग ताईच्या हातातून गाडी घेतली. पण ही आज अशी का वागत आहे? हे मात्र त्याला समजेना.

" काय रे अमड्या, हे सर कोणत्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत?"

"आता ते मला काय माहीत? तूच इतका वेळ गप्पा मारत होतीस ना त्यांच्यासोबत, मग तू नाही का विचारायचे?"

"माझ्या लक्षातच नाही आले रे. आता कसे समजणार पण." थोड्या लाडीक सुरातच अदिती बोलली.

"पण मी म्हणतो, ते कुठे का लेक्चरर असेनात, तुला काय ग घेणेदेणे आहे त्यांचे? आणि त्यांच्यासमोर माझी इज्जत काढतेस काय?"

"गंमत करत होते रे मी, इतकेही समजत नाही का तुला?"

"ह्ममम..ते दिसतंय ना, कळली तुझी गंमत. तू नको सांगू."

"बरं काय रे अमेय.. मला एक प्रश्न पडलाय, त्या सरांचे लग्न झाले असेल का रे? म्हणजे तसे वाटत नाही, हो ना?"

"ये बाई, तू गप्प बस ना गं. यासाठी मागे बसवलंय का तुला? आणि तुला काय करायचंय मी म्हणतो, त्यांचे लग्न झाले का नाही याच्याशी आपल्याला काय घेणंदेणं? नसत्या चौकशा हव्यातच कशाला?"

बोलता बोलता घर कधी आले ते दोघांनाही कळलेच नाही.

पण अदितीच्या मनात मात्र प्रश्नांचे उठलेले काहूर थांबायचे काही नावच घेईना.

क्रमशः

कशी मिळतील अदितीला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे? जाणून घेवूयात पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all