नको नको म्हणताना भाग ४

शेवटी प्रेम हे प्रेमच असतं


"ये हाय, कशी आहेस?"

अचानक आलेल्या आवाजाने अदिती कावरीबावरी झाली. तेवढयात तिचे लक्ष त्याच्या रुबाबदार शरीरयष्टीवर खिळले. त्याने बोलावे आणि तिने फक्त ऐकत राहावे; असेच तिला मनोमन वाटत होते.

"कालचा दिवस खूपच वेगळा होता ना तुझ्यासाठी? आता हे मला कसे समजले? असा प्रश्न तुला पडणेदेखील साहजिकच आहे. पण खरं सांगू, काल दिवसभर मला इतक्या उचक्या लागत होत्या की काही विचारुच नकोस. आणि मला खात्री होतीच की, तूच माझी आठवण काढत असणार. कालच तुझ्या नजरेत ते स्पष्ट दिसले होते मला. पण खरं सांगू, मलाही खूप छान वाटले तुला पहिल्यांदा भेटून."हसतच तो बोलत होता.

त्याचे हे बोलणे थांबूच नये असेच वाटत होते अदितीला. तीही एकटक त्याचे बोलणे अगदी मन लावून ऐकत होती. मधूनच लाजेची कळी दोन्ही गालांवर हलकेच खुलत होती. तिचा चेहरा मात्र लाजेने गोरामोरा झाला त्याचे ते बोलणे ऐकून.

"किती मनकवडा आहेस रे तू? सॉरी हा.. डायरेक्ट अरे तुरे केले त्याबद्दल." न राहवून तिनेही मनातील भावनांना वाट करून दिली.

"इट्स ओके गं नो प्रॉब्लेम."

"ये पण बरं झालं तू भेटलास ते. मला तर वाटले होते आता पुन्हा कधी आपली भेट होते की नाही?"

"आता तू एवढी मनापासून देवाला प्रार्थना केली होतीस म्हटल्यावर आपली भेट तर निश्चितच होती."

"ये पण खरंच मनापासून सॉरी आणि थँक्यू सुद्धा."

"अगं पण ते कशासाठी?"

"काल खरं तर माझी चूक होती ना. खरंच रस्ता क्रॉस करताना माझे अजिबात लक्ष नव्हते. तू जर वेळीच ब्रेक नसता मारला तर माहित नाही आज मी तुझ्याशी अशी बोलू शकले असते की नाही?"

"शू~~~~ असे काहीही अभद्र बोलू नकोस.  प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण हे दडलेले असतेच. जसे की आपली भेट ही विधिलिखितच होती जणू."अदितीच्या ओठांवर बोट ठेवत तो बोलला. नजरेला नजर भिडली नि स्वप्नांच्या वेगळ्याच दुनियेत दोघेही हरवले. क्षणात शब्दांनी दडी मारली नि नजरेची भाषा नजरेला कळली.

त्याच्या त्या स्पर्शाने अदितीच्या काळजाचा मात्र ठोकाच चुकला. ती एकटक त्याच्याकडे पाहतच राहिली. पुन्हा एकदा स्वप्नांच्या दुनियेत ती रममाण झाली. वाऱ्याची थंडगार झुळूक आली नि तिच्या केसांची बट गालावर रुळू लागली. अदितीचे सौंदर्य त्यामुळे इतके खुलले की तो आता थांबवू शकत नव्हता स्वतःला. हलकेच त्याने मग ती बट बाजूला करत तिच्या कानाच्या मागे सरकवली.

तिच्या गालावरून फिरलेली त्याची बोटे तिच्या हृदयाची धडधड मात्र वाढवून गेली. त्याचे मादक हसणे तिला इतके भावले की आता त्याच्या नजरेला नजर देण्याची तिची काही हिम्मतच होईना.

तितक्यात सकाळच्या कोवळया सूर्यकिरणांनी अदितीच्या बंद पापण्यांच्या आत दडलेल्या स्वप्नाला हलकेच हलवून जागे केले.

"अदिती अगं उठ गं बाई. कॉलेजला नाही जायचे का? वाजले बघ किती? एरव्ही अमेयला लेक्चर देत असतेस आणि आज मात्र सूर्य डोक्यावर आला तरी तू अजून झोपूनच आहेस."

"ओय शिट... शिट... शिट... यार, आई अगं लवकर तरी उठवायचेस ना मला. अंगावरील ब्लँकेट बाजूला सारत चारशे चाळीस व्होल्टचा करंट बसल्यासारखे अदिती जवळपास ओरडतच उठली नि धावतपळतच तिने बाथरूम गाठले.

आईला मात्र आता हसूच आवरेना. अदितीला काय झालंय? हे मात्र आईने बरोबर ओळखले.

"देवा खरंच तुझी खूप आभारी आहे मी. याच अदितीला भेटण्यासाठी किती दिवसापासून आतुर झाले होते मी. आता हळूहळू लग्नासाठी तिच्या मनाची तयारीदेखील करायला मदत कर म्हणजे माझी भक्ती फळाला आली असे मी समजेन.
एरव्ही फक्त आणि फक्त त्या उंचच उंच बिल्डिंग नि त्यांचे आराखडे यात रमलेली माझी लेक आता कुठे योग्य ट्रॅकवर येतेय." हे पाहून रत्ना ताईंमधील आईदेखील मनोमन सुखावली होती.

एकदा का मनात प्रेमभावना निर्माण झाली की मग हळूहळू आपोआपच अदिती लग्नाला तयार होणार, याची रत्ना ताईंना खात्रीच होती जणू. 

घाईघाईत आवरून अदिती मग डायनिंग टेबलवर येवून बसली. घाईघाईतच तिने मग नाश्ता केला.

"काय ग अदिती रात्री खूप वेळ अभ्यास करत बसली होतीस की काय?" बाबांनी प्रश्न केला.

"नाही म्हणजे आपलं ते हो.. हो.."

लेकीचे त त प प झालेले पाहून रत्ना ताईंना हसू आले.

"आई... अगं हसतेस काय? इथे मला बघ किती उशीर झालाय आणि तू हसतेस?"

"अगं मी तुला नाही हसले. तू कर नाश्ता सावकाश."

"ये अमेय आज माझी मला गाडी देवून टाक बरं. त्या बसने प्रवास करताना किती त्रास होतो माहितीये का तुला. तुझे प्रॅक्टिकल संपले असतील तर मी घेवून जाते आज गाडी. तसंही मला खूपच उशीर झालाय आज."

"नाही आ. आजच्या दिवस जा बसने. आज लास्ट प्रॅक्टिकल आहे माझे."

"बाबा सोडतील ना मग तुला. आज मी जाते गाडी घेवून."
पोह्यांचा चमचा जवळपास तोंडात कोंबता कोंबता अदिती बोलली.

"अमेय, मी सोडेल तुला. जावू दे तिला गाडी घेवून."

"बाबा, तुम्ही पण ना. तिचीच बाजू घेणार माहितीये मला. त्यात नेमकी आजच सुपरविजनसाठी बाहेरच्या कॉलेजचे प्रोफेसर येणार आहेत आणि नेमकी आजच हिने असा घोळ घालून ठेवलाय. सकाळी लवकर उठायला काय झाले होते ग तुला? चूक तुझी आहे आणि शिक्षा मात्र मला."

"अरे पण आठ दिवस दिली ना मी तुला गाडी. माझे किती हाल झाले तेव्हा आणि काल काय झाले ते तर माहीतच आहे तुला. आता फक्त एकच दिवस राहिलाय, कर मॅनेज तू तुझे."

"मग तूच का करत नाहीस एक दिवसासाठी मॅनेज."

"ये बाबा मला तुझ्याशी वाद घालायला अजिबात वेळ नाही. माझेही खूप इंपॉर्टन्ट लेक्चर आहे आहे. उशिरा पोहोचले तर मिस होईल."

"आई म्हणते तसं तुझे एकदा लग्न झाले की आम्ही सुटलो."अमेय आता अदितीच्या वर्मावरच बोट ठेवले होते जणू.

"गप रे, येवून जावून तुमच्या दोघांची गाडी माझ्या लग्नावरच येवून घसरते. तू काळजीच करू नकोस मी नाही इतक्या सहजासहजी जाणार इकडून. आणि मी गेल्यावर तुम्ही सुटणार काय? संध्याकाळी बघते आल्यावर. आता मला अजिबात वेळ नाही."
आईने भरून ठेवलेला डबा आणि पाण्याची बॉटल सॅकमध्ये ठेवत अदिती बोलली. आणि घाईतच मग ती घराबाहेर पडणार इतक्यात बाबा बोलले.

"सावकाश जा गं. कालच्यासारखा गोंधळ नको व्हायला पुन्हा.

"हो बाबा तुम्ही काळजी करू नका मी जाईल व्यवस्थित...बरं अमेय तुझे प्रॅक्टिकल संपले की मला फोन कर. मी येताना पिक करेल तुला. उगीच सारखा सारखा बाबांना त्रास नको देवूस.

"बरं बरं ताईसाहेब. खूप उपकार होतील."

"असेच उपकार मानत जा नेहमी माझे म्हणजे तुझे कल्याण होईल." दाताखाली जीभ दाबत अदिती बोलली.

"आई..आता हिला सांग हा. खूप बोलतिये ही."

"अगं जा ग बाई तू. कशाला उगीच चिडवतेस त्याला. वेळेत पोहोच त्याला घ्यायला म्हणजे झालं."

"हो हो बाय. बाय अमड्या."

भावा बहिणीची सुरू असलेली ही नोकझोक आई बाबा मात्र फुल्ल एन्जॉय करत होते. लेकरांमुळे घराचे गोकुळ झाले यातच आई बाबांचे समाधान दडले होते.

क्रमशः

अदितीच्या स्वप्नातील तिचा राजकुमार अखेर केव्हा भेटणार तिला? जाणून घेवूयात पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all