Feb 25, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

नको नको म्हणताना भाग ३

Read Later
नको नको म्हणताना भाग ३


"कोण असेल ती व्यक्ती? आणि त्यांच्या एका बोलण्यावर तावातावाने बोलणारी त्यांची आई एकदम शांत कशी काय झाली? विशेष म्हणजे त्यांच्या आईला त्यांचे म्हणणे इतक्या लवकर आणि इतक्या सहज कसे काय पटले? याचेच नवल वाटते आहे."

पुढे लेक्चर सुरू असताना अदिती मात्र विचारांत गुंतली होती.

आज काही केल्या घडलेला प्रकार अदितीच्या डोळ्यासमोरून हटायलाच तयार नव्हता. त्या तरुणाचा चेहराही राहून राहून तिला आठवत होता.

त्याचे ते दिसणे, असणे, बोलणे, जाताना ते हलकेच हसणे.. सारेच आठवत होते अदितीला. मनाच्या खोल तळाशी अचानक भावनांचे तरंग उठले नि अदिती वेगळ्याच दुनियेत प्रवेश करत असल्याचा भास क्षणभर तिला स्वतःलाच झाला.

आज पाहिल्यांदा अदिती कोणाचा तरी इतका विचार करत होती. ठरवूनही ती मनापासून लेक्चर ऐकत नव्हती. असे का होत आहे? ते मात्र तिला काहीच कळत नव्हते. त्या व्यक्तीचे बोलणे इतके नम्र आणि संयमी होते की समोरच्यालाही ते पटणार नाही असे होवूच शकत नव्हते.

\"समाजात अशाही व्यक्ती आहेत\", त्याबद्दल अदितीला खूपच छान वाटले. त्या गर्विष्ठ वाटणाऱ्या स्रीने किती पटकन् आपल्या मुलाचे म्हणणे ऐकले. पुढे अवाक्षरही न काढता ती महिला लगेचच गाडीत जाऊन बसली.

राहून राहून अदितीच्या मनात एकच विचार येत होता,"त्या व्यक्तीची बायको मात्र खूपच नशीबवान म्हणावी लागेल. खरंच किती शांतपणे त्यांनी त्यांचे म्हणणे त्यांच्या आईला पटवून दिले. अशी व्यक्ती आई आणि बायकोच्या भांडणात खरंच एक महत्त्वाचा दुवा बनून उत्तमरीत्या परिस्थती हाताळू शकते. व्यक्ती जितकी  प्रभावी तितकेच तिचे बोलणेदेखील."

त्या व्यक्तीचा चेहरा आठवून आपसूकच हसू फुलत होते अदितीच्या चेहऱ्यावर. मैत्रिणीही खोचकपणे विचारत होत्या."आज स्वारी कुठे हरवली? अखेर स्वप्नातील राजकुमार मिळाला वाटतं." असे म्हणून अदितीला आज मैत्रिणींनी खूपच पिडले होते.

आज त्या अनोळखी व्यक्तीच्या विचारांत दिवस कसा सरला, ते कळलेच नाही अदितीला.
"अरे, आताच तर आपण कॉलेजला आलो आणि इतक्यात सुट्टीही झाली?"
मनाशीच बोलत अदिती कॉलेजच्या गेटमधून बाहेर आली.

सकाळी जिथे ही घटना घडली तिथे आल्यावर पुन्हा एकदा तिला सर्व काही आठवले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाणाऱ्या गाड्यांवर तिने एकदा नजर फिरवली. पुन्हा एकदा त्या व्यक्तीची गाडी दृष्टीस पडेल या आशेने तिची नजर सैरभैर धावू लागली. पण त्याच वेगाने तिने सैरभैर धावणाऱ्या तिच्या मनातील भावनांना आवरदेखील घातला.

घरी पोचताच तिने सर्व हकीकत आई बाबांना सांगितली. अदिती त्या अनोळखी व्यक्तीबद्दल इतके भरभरून बोलत होती की काही विचारूच नका.

आईला मात्र अदितीच्या वागण्यातील हा बदल खूपच सुखावून गेला.
"चला...ती व्यक्ती खूपच नशीबवान म्हणावी लागेल बाबा, जिच्याबद्दल माझी लेक इतके भरभरून बोलत आहे आणि तेही चांगले. नाहीतर एरव्ही तिला लोकांमध्ये असणारे असे गुण इतक्या सहजासहजी दिसतात कुठे?" आईने भुवया उंचावत खोचकपणे टोमणा मारला लेकीला.

"पण काय ग अदिती, ती व्यक्ती कोण? तिचे नाव काय? गाव काय? एकदा विचारुन तर घेतेस ना?" गालातल्या गालात हसत आईने प्रश्न केला.

"कशाला? आणि ती काय वेळ होती का विचारायची? काय आई तू पण ना. त्यात ती बाई आधीच माझ्या डोक्यात गेली होती. पण आई एक सांगू, मला त्यांच्या आईचे विशेष वाटले बरं का, इतकी गर्विष्ठ बाई होती ना ती की बस काही विचारुच नको. म्हणजे एक क्षण मला वाटले की हा नेमकी त्यांचाच मुलगा आहे का? किती तफावत होती दोघांच्या विचारांत."

"हो असू दे, जशी की तुझ्या आणि माझ्या विचारांत आहे."

"बरं असू दे. फिरून फिरून त्याच मुद्द्यावर नको येवूस आ.. प्लीज. बाबा कशी आहे ओ तुमची बायको? मला घरातून हाकलून देण्याचा जणू चंगच बांधला आहे तिने. कधी एकदा माझे लग्न होते आणि मी सासरी निघून जाते असे झाले आहे तिला."

"हो झालेच आहे. एकदा का तुझे लग्न झाले की मग मी मोकळी."

"तू होशील ग मोकळी, पण मी अडकेल ना सासूच्या कचाट्यात त्याचे काय? आणि त्यात जर सकाळी भेटली तशी बाई माझी सासू असेल तर मग काही विचारुच नका. बाई बाई! त्यापेक्षा नकोच ते लग्न."

का कोण जाणे पण अदितीच्या मनात सासुविषयीची भिती दिवसेंदिवस वाढत जरी असली तरी,"सकाळी भेटला तसा तरुण जर माझा नवरा असेल तर मग सासू कशीही असू दे त्याने काही फरक पडणार नाही." असे नकळतपणे तिच्या मनात येवून गेले आणि चेहऱ्यावर आपसूकच हास्य फुलले. नुसत्या विचारानेच अदितीचा चेहरा खुलला.

आई बाबांच्या नजरेतून मात्र ही गोष्ट काही सुटली नाही. आई बाबाही एकमेकांकडे पाहून हसले मग.

आई बाबा, बहीण भाऊ, कॉलेज, मैत्रिणी, अभ्यास हेच जणू अदितीचे विश्व बनले होते. अजूनतरी तिच्या मनात लग्न हा विषय दूरदूरपर्यंत नव्हता.

असे असले तरी आज पहिल्यांदा ती शांतपणे झोपू शकत नव्हती. राहून राहून त्या तरुणाने वाक्य तिच्या कानात घुमत होते.
"रस्ता क्रॉस करताना डोक्यातील सर्व विचार नेहमी बाजूला काढून ठेवायचे, मग ते कितीही महत्त्वाचे असले तरीही. कारण स्वतःच्या जीवापेक्षा ते जास्त महत्त्वाचे असूच शकत नाहीत. माझे हे वाक्य चुकुनही विसरू नका."

खरचंच त्या व्यक्तीचे हे वाक्य काही केल्या अदितीच्या डोक्यातून जातच नव्हते.

"ओळख नसतानाही बोलण्यात किती तो नम्रपणा आणि काळजी होती. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तर आईसोबत स्वतःदेखील माझीच कशी चूक आहे हे मला दाखवून दिले असते. पण तसे काहीही झाले नाही." अदिती मनाशीच बोलत होती.

डोळे बंद केले तरी त्या व्यक्तीचा चेहरा तिच्यासमोर येत होता. दोन मिनिटांच्या त्या संभाषणाचा परिणाम इतका खोलवर झाला होता अदितीच्या मनावर की, ती पहिल्यांदा स्वतःला विसरली होती.

"कोण असेल ती व्यक्ती? पुन्हा कधी भेटेल का मला? थँक्यू आणि सॉरी दोन्ही म्हणायचे राहूनच गेले आहे त्यांना. देवा प्लीज एकदा फक्त ती व्यक्ती माझ्यासमोर यावी अशी मनापासून इच्छा आहे. बाजूला असलेली पिलो छातीशी कवटाळत अदिती स्वप्नांच्या दुनियेत रममाण झाली. चेहऱ्यावरील स्मित काही केल्या हटायलाच तयार नव्हते.

विचार करता करता कधी तिला झोप लागली ते कळलेच नाही.

"काय हो, आज अदिती वेगळीच वागत होती नाही?" रत्ना ताईंनी देखील लेकीच्या वागण्यातील बदल अचूक हेरला होता.

"हो ग मलाही जाणवले ते." हसतच माधवराव उत्तरले.

"चला म्हणजे अशी एक तरी व्यक्ती सापडली की जी आपल्या अदितीला बदलवू शकेल."

"सापडली आणि हरवली सुद्धा बरं का. उगीच हवेत इमले बांधू नका सौभाग्यवती. तुमच्या मनात काय सुरु आहे ना ते बरोबर समजतंय आम्हाला."

"असे काही नाही ओ. अगदी सहज मनात आले बाकी काही नाही. पण ते काही का असेना, अदिती बदलतिये आणि सध्या तरी एवढेच पुरेसे आहे माझ्यासाठी."

क्रमशः

भेटेल का ती व्यक्ती पुन्हा एकदा अदितीला? अदितीच्या मनात सुरू असलेले विचार पुढे कोणते वळण घेणार? जाणून घेवूयात पुढील भागात.

©®कविता वायकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//