नको नको म्हणताना भाग २

शेवटी प्रेम हे प्रेमच असतं


जोपर्यंत मनाच्या आत खोल तळाशी दडलेल्या भावनांचा कौल मिळत नाही तोपर्यंत हे प्रेम आणि लग्न माझ्याच्याने तरी शक्य नाही. असे अदितीचे म्हणणे घरात कोणालाही मान्य नव्हते.

अदिती एक बिंदास गर्ल. उंच, नाकी डोळी नीटस, दिसायला अगदीच सुंदर. कोणीही अगदी सहजच पसंत करेल अशी असली तरी पण मनातून लग्नाची खूपच भीती बाळगणारी होती ती.

आजूबाजूला सुरू असलेले सासू सून वाद म्हणजे घरातील शांती भंग करण्याचे मूळ कारण; हे ती जाणून होती. सख्ख्या बहिणीच्या, अवनीच्या बाबतीत तिने हे जवळून पाहिले होते. त्यात सोशिक सुनांचा तर तिला प्रचंड राग. तुम्ही ऐकून घेता म्हणूनच समोरचाही ऐकवतो ना. अगदी अशीच होती अवनी. अदितीलाही बहिणीचे शांत बसून निमूटपणे सगळे सहन करणे अजिबात पटायचे नाही.

त्यात अवनीचे अरेंज मॅरेज. तिचा नवरा भरपूर कमावता होता. बऱ्यापैकी घरी श्रीमंती होती. पण घरात सासू म्हणेल ती पूर्वदिशा. आता नवराच आईसमोर बोलायला घाबरत असेल तर अवनीची काय अवस्था असेल हे कोणीही सांगू शकेल.

त्यातल्या त्यात रत्ना ताई देखील लेकींना बऱ्याचदा सांगायच्या की, त्यांना त्यांच्या सासूकडून कसा त्रास सहन करावा लागला. किती वाईट दिवस होते ते, वगैरे वगैरे.

अशा काही अनुभवांवरून अदिती मात्र लग्नापासून लांबच पळत होती.

दुसऱ्या दिवशी अदिती कॉलेजला जायला निघाली.

"बरं अदिती मला एक सांग, तु काल काहीतरी सांगणार होतीस ना ग. म्हणजे आल्या आल्या म्हणालीस तसं तू आईला, की मी खूप खूष आहे. त्यामागचे नेमके कारण काय ग?" बाबांनी उत्सुकतेने विचारले.

"अहो बाबा, तुम्हाला ती माझी मैत्रीण ईशा माहितीये का?"

"हो.. तिचं काय झालं?"

"लग्न वगैरे जमलं की काय तिचं?" अदितीचे उत्तर यायच्या आधीच उत्सुकतेपोटी आईने विचारले.

"नाही ग आई. तिचे लग्न मोडले."

अदितीचे उत्तर ऐकून आईला आता चक्कर यायचीच बाकी होती. "देवा काय करावं ह्या पोरीचं? तूच सांग आता."

"आई अगं पुढे तर ऐक. म्हणजे परवा तिला पाहुणे पाहायला येणार होते. ऑलरेडी तिचे एका मुलावर प्रेम आहे. त्यामुळे तिला हे लग्न करायचेच नव्हते. पण घरच्यांना कसे नाही म्हणून सांगणार? त्यामुळे ती खूपच टेन्शनमध्ये होती. मग मीच समजावले तिला. त्यामुळे तिच्या मनाची इतकी तयारी झाली की तिने हिम्मत करून तिच्या आई बाबांना तिच्या प्रेमाची कबुली दिली. आणि विशेष म्हणजे त्यांनी देखील तिला सपोर्ट करण्याचे ठरवले. म्हणजे बघ त्यामुळे काय झाले, तीन आयुष्य वाचले ना बरबाद होण्यापासून."

आईने तर आता डोक्यालाच हात लावला. कशी आहे ही मुलगी? लोक एखाद्याचं लग्न जमलं म्हणून आनंद व्यक्त करतात आणि ही लग्न मोडलं म्हणून.

बापाला मात्र लेकीचे कौतुक वाटले. खरंच अदिती किती विचार करते बारीक सारीक गोष्टींचा. कोणतीही गोष्ट करताना आधी परिणामांची चिंता तिला सतावते. आणि त्यादृष्टीने ती पाऊल उचलते. खरंच हा खूप चांगला गुण आहे तिच्यातील.

"लवकरच तुलाही कुणीतरी भेटू दे म्हणजे झालं."आईने मात्र पुन्हा एकदा  विषय काढलाच.

"आई पुन्हा नको ग सुरू होवूस आता. बाबा मी जाते मला उशीर होतोय कॉलेजला जायला." म्हणत अदिती तिथून निसटली.

कॉलेजला जाताना बसमध्ये तिला दोन बायका दिसल्या. त्यांच्याकडे अंदाजे पाच सहा महिन्यांचे लहान बाळ होते. सुरुवातीला अदितीला प्रश्न पडला, ह्या मायलेकी असतील की सासू सूना? पण थोड्याच वेळात तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर आपोआपच मिळाले.

"अगं दे इकडे त्याला. लेकराला कसं धरावं हेही साधं कळत नाही तुम्हा आजकालच्या मुलींना. नावालाच फक्त आई होता येतं."
असे म्हणून त्यातील एका मध्यमवयीन स्रीने तिच्या मुलीच्या वयाच्या स्रीकडून ते बाळ जवळपास रागानेच ओढून घेतले.

आता कोणी कशाला सांगायला हवे ना की त्या मायलेकी आहेत की सासू सूना?

पुन्हा एकदा अदितीला समाजातील आणखी एका सासूचे दर्शन झाले. डोक्यात असंख्य प्रश्नांची गर्दी झाली होती. का वागत असेल एक स्रीच दुसऱ्या स्रीसोबत असे? का तिला समजून घेत नसेल? एक स्रीच दुसऱ्या स्रीची दुश्मन कशी काय असू शकते? 

विचार करता करता केव्हा कॉलेज आले हे अदितीला समजलेच नाही. ती बसमधून उतरली. रस्ता क्रॉस करत असताना अचानक एक गाडी तिच्या समोर येवून थांबली. अदिती अचानक भानावर आली. क्षणभर ती खूपच घाबरली. काय करावे तिला काहीच सुचेना.

त्याच क्षणी गाडीतून एक महिला तावातावाने खाली उतरली. भरजरी साडी नेसलेली, हातभार बांगड्या, कपाळावर लाल चुटूक टिकली. गळ्यात दागिने. अगदी श्रीमंत घरची वाटत होती ती महिला.

"काय ग ए, नीट पाहून चालता येत नाही का? आम्हाला तर जेलमध्ये पाठवायची पूर्ण तयारीच केली होतीस की तू. काही झालं असतं म्हणजे तुला?"

"सॉरी, पण काकू, काही झालं तर नाही ना."

"अगं पण झालंच असतं तर चूक आमचीच दिसली असती ना. तू मात्र चूक करून आम्हाला बदनाम करून अगदी सहज निसटली असतीस."

"काकू प्लीज मला कॉलेजला पोहोचायला आधीच उशीर झालाय खूप. मी निघू का?"

"आधी स्वतःची चूक कबूल कर, सॉरी म्हण आणि मग जा कुठे जायचे ते?"

"काकू अहो मी मगाशीच बोलले आहे तुम्हाला सॉरी."

"ह्या आजकालच्या मुलींना शिस्त म्हणून नसते. मोठ्यांच्या तोंडी लागायची एक संधी सोडत नाहीत त्या."

"काकू आता हे अती होतंय आ. मी शांत आहे याचा उगीच चुकीचा अर्थ घेवू नका."

"हेच संस्कार केले का तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर?"

"आणि हेच वाक्य जर मी बोलले तर? तुम्ही मोठ्या आहात म्हणून आम्ही लहानांनी तुमचा आदर करायचा, तुमचा मान ठेवायचा. पण तुम्ही मात्र तुमच्या मोठे असण्याचा हे असा गैरफायदा घ्यायचा? मी मान्य करते ना की आहे माझी चूक मग आता एवढं ताणायची काय गरज आहे?" आतापर्यंत शांत असलेल्या अदितीने मात्र न राहवून चार दोन शब्द सुनावले त्या स्रीला.

त्याचवेळी गाडीतून अंदाजे तिशीतील एक तरुण खाली उतरला.

"आई अगं जाऊ दे ना उशीर होतोय. कशाला वाढवतेस आता. मान्य आहे त्यांची चूक झाली आणि त्यांनी ती कबूल पण केली आहेच ना. मग कशाला उगीच रस्त्यावर तमाशा आणि तसेही त्यांच्याबाबतीत नाण्याची एकच बाजू तुला दिसली. पण दुसऱ्या बाजुचाही विचार केला तर त्यांची पुर्णतः चूक असेलच असे नाही. कदाचित कसले तरी टेन्शन असेल त्यांना, म्हणून घाईत रस्ता क्रॉस करत असतील. किंवा मग घरी काहीतरी घडले असेल. कॉलेजला प्रोजेक्ट सबमिट करायचे असतील. कारण काहीही असू शकते ना. मग फक्त जे डोळ्याने दिसते त्यावर आपले स्पष्ट मत मांडणे चुकीचे नाही का?"

त्या तरुणाच्या बोलण्यावर अदिती अवाक् होवून बघतच राहिली त्याच्याकडे.

त्यांच्या आईलाही त्याचे म्हणणे पटले आणि काहीही न बोलता मग ती स्री गाडीत जावून बसली.

"रस्ता क्रॉस करताना डोक्यातील सर्व विचार नेहमी बाजूला काढून ठेवायचे, मग ते कितीही महत्त्वाचे असले तरीही. कारण स्वतःच्या जिवापेक्षा ते जास्त महत्त्वाचे असूच शकत नाहीत. माझे हे वाक्य चुकुनही विसरू नका."

एवढे बोलून त्या तरुणाने अदितीला हलकीशी स्माइल दिली आणि तो निघून गेला.

काहीही म्हणा त्याच्या बोलण्याबरोबरच त्याचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व भावले होते अदितीला.

वाऱ्याची हलकीशी झुळूक तनुला स्पर्शून जावी आणि शरीरात निर्माण झालेली उष्णतेची काहीली अचानक शमावी, क्षणभर असेच काहीसे वाटले अदितीला.

ती मात्र त्या अनोळखी व्यक्तीच्या पाठमोऱ्या कारकडे एकटक पाहातच राहिली.

क्रमशः

कोण असेल तो तरुण?  जाणून घेवू पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all