नको नको म्हणताना भाग १

शेवटी प्रेम हे प्रेमच असतं.


"काहीही झाले तरी आज मी अदितीला विचारणारच आहे की, बाई लग्न वगैरे करण्याचा काही विचार आहे की नाही?"

"पण अगं तिच्या मनाची तयारी झाली की ती सांगेलच ना तुला."

"ते काही नाही, तुमचीच फूस आहे बरं तिला, म्हणूनच तर तिचं फावलंय."

"अगं रत्ना, आपली लेक खूप हुशार आहे गं. पुढे शिकायचे तर शिकू दे की तिला."

"काही नको ते जास्तीचं शिक्षण. आधी बी.ई. आता एम.ई. अजून काही दिवसांनी म्हणेल आता पीएचडीच करायची."

"अगं मग काय वाईट आहे त्यात? आणि विशेष म्हणजे दरवर्षी आऊट ऑफ मार्क्स मिळतात तिला. त्यात क्लास टॉपर. आणखी काय हवंय ग आपल्याला?"

"काय चाटायचेत ते मार्क्स? अहो, कसं कळत नाही तुम्हाला? आजकाल जास्त शिक्षण घेतलं तरी नवरा मिळत नाही हो."

"गप गं काहीही काय?" हातातील वर्तमानपत्र सावरत माधवराव बोलले.

"काहीही नाही. खरं तेच बोलतीये मी. त्या जोशांच्या मिनलचे काय झाले माहितीये ना? ह्या मुलाला नकार दे, त्या मुलाला नकार दे. शेवटी आता पश्चात्ताप करत बसलिये. आईनेही लेकीला तेव्हा साथ दिली आणि आता स्थळच येत नाहीत म्हणून नशिबाला दोष देण्यात काही अर्थ आहे का?"

"हे बघ रत्ना, आपल्या अदितीची आणि त्या मिनलची अजिबात तुलना करायची नाही आ. मिनल तिच्या ठिकाणी आपली अदिती तिच्या ठिकाणी, समजलं."

"अहो ऑलरेडी खूप उशीर झालाय ओ. तशीही वयाची पंचविशी गाठली ओ पोरीने. आता कमीत कमी स्थळं तरी पाहायला काय हरकत आहे मी म्हणते? कुठूनतरी सुरुवात नको का व्हायला? आणि तसंही लग्न काय लगेच जमणार आहे का? वेळ तर जाणारच ना? पण मला खूप काळजी वाटतीये ओ तिची. वाटतं तितकं सगळं सोप्प नाहीये. मुलं पाहून नकार देणं वेगळं आणि मुलंच न पाहणं हे खूपच वेगळं."

"बरं बाई ती आल्यावर बोल तू तिच्याशी. मग तर झालं."

माधवरावांची परवानगी मिळाली तशी रत्नाताईंची कळी खुलली. आता कधी एकदा लेक घरी येते असे झाले होते त्यांना."

तितक्यात अदिती घरात आली, "आई..आई.. आई.. आज मी खूप खुश आहे." अदितीने आल्या आल्या आईला दोन्ही हातांनी घट्ट पकडले आणि गरगर फिरवले.

तशी रत्नाताईंना चक्कर आली आणि त्या डोकं पकडून सोफ्यावर बसल्या.

"अगं ये पोरी! काय करायचं हिचं कळतच नाही मला. अगं लहान नाही राहिलीस तू आता. कधीतरी मोठं झाल्यासारखं वाग गं बाई. उद्या लग्न करून सासरी गेल्यावर अशी वागलीस तर तुझी सासू माझ्या नावाने खडे फोडील ना. माझाही उद्धार व्हायचा सारखा. जे की मला अजिबात आवडणार नाही आ."

"जावू दे मग आई, सासू कॅन्सल आणि लग्नही कॅन्सल. तसंही सासू नावाचा प्राणी खूपच विचित्र असतो बाई, असं ऐकलंय मी. मग उगीच कशाला पायावर धोंडा मारून घ्यायचा ना. आणि चुकून मी लग्न केलंच म्हणजे पुढे जाऊन जर माझा विचार बदललाच तर ज्या मुलाला आई नाही असाच मुलगा शोधीन मी. किंवा मग लग्नानंतर नवऱ्याला घेऊन सरळ वेगळा संसार थाटेल. हा म्हणजे तशी अटच ठेवील नवऱ्या मुलासमोर, बघ बाबा, मान्य असेल हे तर हो म्हण नाहीतर राहू दे."

"अगं ये कार्टे! तुझ्या जिभेला काही हाड? अहो, काय बोलतिये ही. जरा समजवा की हिला." माधवरावांकडे पाहत रत्ना ताई जवळपास किंचाळल्याच.

"अगं रत्ना, ती गंमत करतिये इतकंही समजत नाही का गं तुला?"

"नाही आ बाबा, ही गंमत नाहीये, खरंच बोलतिये मी." बाबांकडे पाहून डोळा मिचकावत अदिती बोलली आणि हळूच हसली. अधूनमधून आईची अशी खेचायची तिला हुक्की यायचीची म्हणा.

"माझा ना आता विश्वासच नाही राहिला तुमच्या दोघांवर. तुम्ही दोघे मिळून काय बोलाल आणि काय कराल याचा काही नेम नाही.

"बरं आई...मला एक सांग, हे माझ्या लग्नाचं खूळ कोण घालतं गं तुझ्या डोक्यात? मी आधीच सांगितलंय ना तुला मला मनातून जेव्हा लग्न करावसं वाटेल तेव्हा मी स्वतः सांगेल तुम्हाला म्हणून." घरात पाऊल टाकण्याआधीच अदितीच्या कानावर आईचे बोलणे पडले होते.

"कोणी कशाला घालायला हवं? प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळीच झालेली बरी असते. आणि हे बघ तुला हवा तसा मुलगा आपण शोधूयात ना. पण आधी लग्नाला तर हो म्हण गं बाई." आई काळजीपोटी पोटतिडकीने बोलत होती.

"आई अगं आधी मुलगा पाहायला येणार, मग पसंती होणार, त्यात मुलाच्या घरच्यांच्या अपेक्षा ऐकाव्या लागणार, इच्छा असो अगर नसो पण त्या अनोळखी लोकांसमोर अदबीने वागावं लागणार. आणि अर्ध्या एक तासाच्या त्या एका भेटीमध्ये एखाद्याबद्दल सगळेच कसे समजणार गं? आणि पुढे जाऊन होकार आलाच तर लगेच लग्नाची बोलणी सुरू होणार. अगं आई लग्न म्हणजे त्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न असतो ना? मग असं कसं एखाद्याला डायरेक्ट होकार देऊन लग्न करून त्याच्या सोबत निघून जायचं. मला नाही पटत हे."

"तुला नाहीच पटणार हे आम्हाला आधीच माहित होतं."

"पण मला खरंच हे असे लग्न मान्य नाही आई."

"बरं बाई, मग तुला कोणी आवडत असेल तर तसे सांग." बाबा मधेच बोलले.

"बाबा, तसे असते तर तुम्हाला सांगणार नाही का ओ मी?" पण खरंच तसे नाही ओ काही. मला हवा तसा मुलगा भेटतच नाही मग मी तरी काय करू? पण भेटला की नक्की सांगेल हा." चला आलेच फ्रेश होवून मी, तुम्ही करा कंटीन्यू, म्हणत अदिती आत निघून गेली.

"हे असे असेल तर हीचे लग्न अवघड आहे ओ. लग्नाचा विषय काढला की असा पळ काढते.  त्यात तिला कोणी आवडत पण नाही हे विशेष. आणि अरेंजमध्ये अनोळखी माणसाला होकार द्यायचा कसा असे हिचे मत. आता असे असताना या गोष्टीची सुरुवात होणारच कशी? हे असेच जर सुरू राहिले तर हिचे लग्न अवघड आहे."

"होईल ग नको काळजी करू. नक्कीच तिच्यासाठी तिच्या मनासारखा मुलगा असणार कुठेतरी. योग्य वेळ आली की भेटलेच."

रत्ना ताईंना मात्र कसे होणार अदितीचे? म्हणून काळजी लागली होती. त्यांच्या मनाला वेगळीच चिंता सतावत होती. त्या मिनल सारखे आपल्या लेकीचे नको व्हायला. असे राहून राहून त्यांचे मन त्यांना सांगत होते.

तर ही अशी आहे आपल्या कथेतील नायिका आणि तिची फॅमिली. अगदी बिंदास गर्ल अशी ही अदिती. सध्या इंजिनिअरिंगच्या मास्टर डिग्रीला होती ती. आई बाबांची लाडकी लेक. मोठी बहीण अवनी लग्न करून तिच्या सासरी संसारात अडकली होती. मधली अदिती आणि सर्वात लहान होता अमेय.

क्रमशः

होईल का अदिती लग्नासाठी तयार? लग्न हा विषय का टाळत असावी ती? पाहुयात पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all