नको नको किती म्हणू

सासु होणार या वाक्याने , रोहनचे लग्न होणार चा आनंद जाऊन भीतीने जागा घेतली .सासू म्हणजे जबाबदारीने वागावे लागेल, हे बरे दिसणार नाही, ते यायला हवे, आदर्श सासू म्हणजे नेमके काय? आता समोर ची साय साखर खावी की नकोच, पण ,पण मग ही वाया जाणार, आज तर खाते उद्यापासून बंद ,असे मनाला समजवत आवडती साय मधुराने कशीबशी गिटकली..-------------------------------------------
नकोनको किती म्हणू?
साय पुराण
डायनिंग टेबल वरच्या नाश्त्याच्या डिश सिंक मधे ठेवून मधुराने उरलेले दूध छोट्या पातेल्यात काढले व दुधाचे पातेले व चमचा घेऊन साय खरडायला सुरुवात केली, सगळी साय वाटीत घेऊन खायला सुरुवात केली ,तोच सीमाताई चा व्हिडिओ कॉल? आला.
"हाय मधु कशी आहेस?
मी मस्त,
"अगं मधु तुझ्या रोहन साठी एक छान छान मुलगी पाहिली आहे. त्यांना तुझा फोन नंबर व रोहनचा बायोडेटा दिला आहे त्यांचा फोन येईल ". महत्वाच्या गोष्टी झाल्या नंतर ,बाकी काय म्हणते?
"रोहन मनीष दोघेही ही कामावर गेले, मी आता निवांत पणे नाश्ता करते आहे" मधूने हसत सांगितले.

हं, ते दिसतच आहे, समोर वाटीत साय साखर. मधु ,अग मधु आता सासु होणारं न? मग हे असे साय चाटण बंद कर. बरं दिसत का? उद्या काय म्हणेल तुझी सून?
ताईने जुना राग नव्या शब्दात काढला....

सासु होणार या वाक्याने , रोहनचे लग्न होणार चा आनंद जाऊन भीतीने जागा घेतली .
सासू म्हणजे जबाबदारीने वागावे लागेल, हे बरे दिसणार नाही, ते यायला हवे, आदर्श सासू म्हणजे नेमके काय?
आता समोर ची साय साखर खावी की नकोच, पण ,पण मग ही वाया जाणार, आज तर खाते उद्यापासून बंद ,असे मनाला समजवत आवडती साय मधुराने कशीबशी गिटकली....
ताई चा तिच्या साय खाण्यावर लहान पणा पासून च राग ,दोघींमध्ये मधुरा धाकटी,झाली ती कमी वजनाची, नाजूक , आज्जी सारखी गोरी सुंदर म्हणून आज्जी ची लाडकी,दुधा वरची साय, दोन वर्षाची झाली तरी हाडांची काड.
आई सांगायची, एक दिवस आज्जी ने कौतुकाने साय खाऊ घातली, मधुरा ला खूप आवडली,मग काय आज्जी शी गट्टी जमली,आई ने एक दोन वेळा नको म्हंटले ,पण" अग जरा बाळसं धरतीए पोरं खाऊ दे ग"
,पण जरा जरा म्हणतां मधुरा ने जास्त च बाळसं धरलं तरी आज्जी च कौतुक संपत नव्हते परिणाम मधुरा चा घेरवाढत गेला.ताई ने बरेचदा टोकले
"मधु कॉलेजमध्ये मुले चिडवतील", पण परिणाम शून्य ,साय खाण कमी केलं पण बंद काही होईना.
पाहता पाहता ताईचे लग्न होऊन मधुरा पण लग्नाची झाली. इथेही मधुरा चे नशीब जोरदार एका समारंभात मनीष व त्याच्या आईने तिला पसंत करून मागणीच घातली.
लग्न ठरले तशी ताई, आई, व आता आजी च्या सूचना, हे शिकून घे ,अशी वागू नको हे, ते करता करता लग्नही झाले.
इकडे सासरी एकुलती एक सून, कौतुकाचं धिरडे कसे खाऊ कोरडे? त्यातून मनीष ची नौकरी परगावी ,राजा राणीचा संसार आणि मनीष तर काय तेरे चेहरे से नजर नही हटती, वरच अडकलेला. तिला साय खाताना पाहून तो तिला माझी मनी माऊ असे लाडाने बोलायचा...

पुढे मधुराला दिवस गेले सासूबाईंना तिची ही आवड कळली. मग काय खा बरे जे आवडते ते नाहीतर बाळाची लाळ गळेल म्हणत त्याही प्रेमाने तिला साय देत.
माहेरी मात्र आई ताई ने अगं आता आई होणार ना म्हणून पाहिलं. मधुराने संकल्प केला आता झालेल्या मुलांनाच खाऊ घालेन पण ते ,दोघेही बापाच्या वळणावर गेली .दूध ही गाळून पीत .मग काय करणार मधुराला पातेले स्वच्छ करणे भाग होते....

पण आता सासु होणार या ताईच्या वाक्याने ती भानावर आली. उद्यापासून साय खाणे बंद असे रोज रोज ठरवता ठरवता मुलाचे लग्न होऊन सून घरात आली..
. नव्या नवलाईचे चार दिवस संपले , एक दिवस चहा करताना सुनेने विचारले, आई - आई या साईचे काय करू?
मधुराने कौतुकाने म्हटले तूच खा न तशी" शी बाई मला अजिबात आवडत नाही." मधुराने भोळेपणाचा आव आणत विचारले तुझ्या घरी काय करता?
माहित नाही ते सगळं आईच पाहते.
आपल्याकडे तुम्ही काय करता? तेवढ्यात मनीष मध्येच पचकला अगं तुझ्या सासूला खूप आवडते साय, दे ते पातेलं तिला. मधुराने रागाने मनीष कडे पाहिलं तशी म्यांऊ ?म्हणून तो सटकला.
अय्या हो कां मग घ्या ना आई बरे झाले. इतके दिवस केलेला सय्यम मनीष च्या बोलण्याने मोडला. आता काय करता खाणे भाग होते.
आता नात किंवा नातू झाला कि त्यालाच खाऊ घालीन म्हणजे माझा वारसा कोणी तरी चालवेल. असा संकल्प मधूराने केला पण---- त्यांना आवडत नसले तर, विचार करत करत मधू ने पातेले खरवडायला घेतलं.
########**########
लेखन---सौ प्रतिभा परांजपे
-------------------------------------------