नक्की मोठं कोण?

Story of a girl who found her way of life because of her hard work and self respect

मुलाचा दुसरा वाढदिवस म्हणून अबोली आणि शंतनू आज खूप दिवसानंतर निवांत खरेदीसाठी बाहेर पडले होते. बाळासाठी कपडे आणि सजावटीच्या वस्तू खरेदी झाली, केकची ऑर्डर देऊन बाहेर पडले तितक्यात एक साधारण सात आठ वर्षाची मुलगी हातात दहा बारा पुस्तकांचा गठ्ठा घेऊन समोर आली.

अगदीच काळवंडलेला चेहरा पण दिसायला खूप देखणी, अस्ताव्यस्त झालेले केस ,अंगात बरीच छिद्र असलेला जुना फ्रॉक, दोन्ही पायात दोन वेगळ्या चप्पल अशी ती मुलगी अगदीच केविलवाणे चेहरा करून म्हणाली "दादा,बाळाला पुस्तक घ्या ना. खूप छान आहे, चित्रकलेची पुस्तक त्यात फळं, फुलं, कार्टून्स सगळं आहे. बाळाला आवडेल तुमच्या.. घ्या ना ताई. खूप भूक लागलीये. लहान बहीण आहे तिला तिथे सावलीला बसवून आलीये.फक्त वीस रुपयात आहे,घ्या ना ताई." ती अगदीच गयावया करू लागली.

शंतनू आणि अबोलीने एकमेकांकडे बघितलं आणि स्मित हास्य केलं. त्याने खिशातून पाकीट काढलं तसा तिचा कोमेजलेला चेहरा अगदीच प्रफुल्लित झाला. ती लगबगीने एक एक पुस्तक अबोलीला दाखवू लागली. शंतनूने शंभर रुपयांची नोट काढून तिला दिली. तसं ती म्हणाली ,"दादा सुट्टे नाहीत हो, किती पुस्तक घ्यायची आहेत तुम्हाला? पूर्ण शंभर रुपयांची देऊ का?"
(हळूच ती  तोंडातल्या तोंडात बोलत हिशोब करु लागली,वीसचं एक तर ...हा शंभरचे पाच..)
हा दादा पाच..कोणती देऊ सांगा".

अबोली म्हणाली, "अगं हो, किती बोलशील..नाव काय तुझं?कुठे राहतेस?आई वडील कुठे आहेत तुमचे? पुस्तक नको देऊ आम्हाला, आमचं बाळ  आता दोन वर्षाचं होईल त्याला कुठे चित्रात रंग वगैरे भरता येणार आहे. तू दुसरं कुणालातरी विक ती पुस्तकं आणि चल तुम्हाला काहीतरी खायला घेऊन देते."

त्यावर ती म्हणाली ,"माझं नाव राणी, बहीणीचं नाव सोनी,आई नाही..मरून गेली.. बाप दारू पिऊन पडलेला असतो..आम्हाला भीक मागायला लावतो. त्याला आम्ही कुठे आहे तेही माहीत नसते. थोडे पैसे होते मग एक एक करून ही पुस्तक घेतली आणि विकते, पण त्यातही कधीकधीच पुस्तकं विकली जातात आणि दुसरं काही घ्यायला पैसे नाहीत आता."

अबोली आणि शंतनू निशब्द होते. शंतनूने बेकरीतून त्या दोघीसाठी कपकेकचं एक पाकीट, फरसाण, दोन पफ घेऊन तिला दिले. राणीचे डोळे भरून आले. ते बघताच बाजूलाच बसलेली आणखी एक बाई भीक मागत आली. तिला त्या दोघांनी काहीही दिले नाही तर ती रागाने बघत त्यांना शिव्या देत तिथून निघून गेली.

ती एवढुशी चिमुरडी तिच्यात इतका स्वाभिमान की भीक मागायचं नाही म्हणून स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि ती धडधाकट बाई भीक मागत होती आणि दिलं नाही तर शिव्या देत होती.खरंच किती फरक होता दोघींच्या वयात पण नक्की मोठं कोण असा प्रश्न त्यांना पडला.

अबोलीने राणीला त्यांच्या घरचा पत्ता दिला आणि संध्याकाळी घरी बोलवले. त्या दोघी संध्याकाळी घरी पोहचल्या, अबोलीने त्यांना आधी अंघोळ करायला लावली मग त्यांच्यासाठी आणलेले नवीन कपडे त्यांना घालायला दिले. त्या कपड्यांमध्ये बघून कुणीच त्यांना ओळखलं नसते इतक्या त्या सुंदर दिसत होत्या.

राणीला वाटलेलं खूप गर्दी असणार वाढदिवसासाठी पण घरात अबोली, शंतनू आणि बाळाशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. त्यांनी केक कापून, औक्षण करून वाढदिवस साजरा केला आणि मग राणी सोनीला जेवू घातले. गोडा धोडाचं इतकं चविष्ट जेवण त्या पहिल्यांदाच खात होत्या.त्यांना इतकं आस्वाद घेऊन जेवताना बघून अबोली आणि शंतनूचे डोळे भरून आले. अबोली नको नको म्हणत असताना राणीने फटाफट सगळं आवरलं, तिला भांडी घासू लागली.
जाताना बाळाला तिने तिच्याकडचं एक पुस्तक भेट म्हणून दिलं. ते बघून अबोली आणि शंतनूला गलबलून आलं. स्वतःकडे जे काही आहे त्यातूनही थोडं दुसऱ्याला देण्याचं धाडस त्या लहान मुलीमधे होतं. वयाने लहान पण किती शिकण्यासारखं होतं तिच्याकडून.

त्या गेल्यावर हे दोघेही अस्वस्थ होते. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. फक्त एक दिवसाचं जेवण आणि काही कपडे देऊन आपण सुटलो का जबाबदारीतून असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी दोघांनी चर्चा केली आणि त्या दोघींसाठी काहीतरी करू असं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी शंतनूने त्याच्या ओळखीच्या NGO मधे संपर्क करून त्या दोघींची तिथे राहण्याची सोय केली. त्यांना सरकारी शाळेत प्रवेश करून दिला. गरजेच्या वस्तू घेऊन दिल्या. राणी आणि सोनीने अगदी मिठी मारून रडत दोघांचेही खुप आभार मानले. खूप आनंदाने ते दोघे घरी परतले. परतीच्या वाटेवर त्यांच्या मनात एक वेगळं समाधान होतं, एक जगावेगळाच आनंद होता. दरवर्षी वाढदिवस, हॉटेलिंग किंवा ऍनिव्हर्सरीला जो अधिक खर्च केला जातो तो न करता अशा एका तरी मुलीला मदत करण्याचा निर्धार त्यांनी केला. आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं दुसऱ्याला देणं हे राणीकडूनच तर शिकले होते ते दोघे.

कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेयर जरूर करा. माझे इतरही ब्लॉग वाचण्यासाठी मला नक्की फॉलो करा.


©®सुवर्णा राहुल बागुल