नक्की करावं तरी काय... भाग 2

तुला काय वाटतं स्नेहा.. नोकरी करणाऱ्या बायकांच आयुष्य खूप छान आहे का? , असंच सुरू आहे आमचं,


नक्की करावं तरी काय... भाग 2

©️®️शिल्पा सुतार
........

हाय श्रेया ... स्नेहा येवून जवळ बसली

हाय.. काय चाललय स्नेहा? ,

"काही नाही रोजच रुटीन, आज दिवसभर वेळ मिळाला नाही म्हणून आता आर्याला घेवून जरा खाली आले" ,.. स्नेहा

"काय ग बिझी होतीस का ?",.. श्रेया

"हो पाहुणे आले होते, जेवून गेले",.. स्नेहा

"बापरे खूप काम पुरत कोणी आल की",.. श्रेया

"हो ना.. मी हाऊस वाईफ आहे म्हणून सगळ्यांना माहिती असत मी घरी असेल तर इकडे येतात, सगळ्यांची उठ बस अगदी थकून जायला होत ग मला " ,.. स्नेहा

"कस काय करते ग तू एवढं काम?, जरा स्वतःला वेळ देत जा ",.. श्रेया

"काय करणार मग काही ऑप्शन आहे का? , आणि एवढं करून कोणाला कौतुक नाही माझ, सारख तुला काय काम असत अस ऐकवतो सौरभ मला ",.. स्नेहा

" हो बरोबर अस असत, घरचे खूप बोलतात, काय करणार पण आता ",.. श्रेया

राहुल हाक मारत होता,.." आली मी एका मिनिटात",.. श्रेया गार्डन मधे गेली

आज सकाळपासून स्नेहा बिझी होती, आर्याचा डब्बा झाला, सकाळी सौरभला तिच्या नवर्‍याला वेगळी भाजी हवी होती ती केली, सासुबाई सासरे यांचा पथ्य वेगळं, एवढ सगळ काम झाल, दुपारचं आवरलं, तेवढ्यात पाहुणे येणार होते ते समजलं, त्यांचा फोन आला होता , मग सगळंच घर आवराव लागलं, त्यात ते संध्याकाळी जेवून जाणार होते, त्यांचा स्वयंपाक करायचा होता, स्नेहा मार्केटमध्ये जाऊन सामान घेऊन आली,

एवढ्या गडबडीत भेंडीची भाजी जरा खारट झाली, म्हणजे सौरभला खारट लागली, बाकीचे काही म्हटले नाही, मसाले भात कमी पडला, किचनमध्ये येऊन खूप बोलला सौरभ तिला

"करते काय तू दिवसभर घरी? स्वयंपाक हे एकमेव काम असतं तुला, तेही नीट जमत नाही, साधी भेंडीची भाजी येत नाही, किती खारट आहे जरा खाऊन बघ, मसाले भात संपला काही अंदाज? ",.. सौरभ

"गडबडत झाली आहो स्वयंपाकाची, मी उसळ केली आहे, आणते लगेच तुम्ही बाहेर जावुन बसा",.. स्नेहा

"आटोप लवकर आता ",.. सौरभ बाहेर जावुन बसला, जेवण झाल, पाहुणे गेले, त्यानंतर सगळं आवरून स्नेहा जेवली,

सौरभ पुढच आवरत होता, सासुबाई बाहेर आल्या..." तू का करतोस काम सौरभ? , दिवस भर ऑफिस घरी घरकाम, किती करेन माझा मुलगा, स्नेहा आटोप पुढच आवर जरा",

स्नेहा घर झाडत होती,... एक झाल की एक काम आहे, घर आहे की काय हे? , अजिबात विश्रांती नाही.

"स्नेहा इकडे ये आधी, आर्याची वहि बघितली का किती खराब अक्षर तीच, रोज शुद्धलेखन हो घेत जा बर , आणि गणित रोज घ्यायला सांगितल होत ना तीच, काय झालं त्याच, संध्याकाळी इकडे तिकडे फिरण्यास पेक्षा अभ्यास घेत जा तिचा, आणि आईचे औषध आणले का",.. सौरभ

"हो सांगितल आहे दुकानात तेव्हा नव्हते तो उद्या देणार आहे ",.. स्नेहा

" औषध संपायच्या आधी दोन दिवस सांगत जा तिकडे",.. सौरभ

" हो तेच करते मी ",.. स्नेहा.... यांची काही जबाबदारी आहे की नाही घरात? सगळे काम मला देणार आहेत हे, आणि ते काय करतील मग, जावू दे कोण बोलेल, ऑफिसला जातात ते, मी काय घरी असते, सगळे नुसते चारी बाजूने ऑर्डर सोडत रहातात, ओरडतात मला,

खूपच कंटाळा आला होता तिला घरात, म्हणून ती आर्याला घेऊन खाली आली,

सगळ काम घरी, कोणाची मदत नाही, करणार तरी काय दिवसभर थकायला होतं, त्यात आर्या कडे बघावं लागतं, तिचा अभ्यास आता वाढत चालला आहे, त्यात हा असा स्ट्रेस, घरचे समजूनच घ्यायला तयार नाहीत,

घरी राहणारी स्त्री म्हणजे एक मोलकरीण आहे आणि तिला सगळ्या गोष्टी परफेक्ट यायला पाहिजे एवढेच माहिती आहे त्यांना, मी पण माणूस आहे , माझी सुद्धा होते कधी कधी चूक,

श्रेया आली,.. "काय ग काय झालं स्नेहा कसला विचार करते आहेस?",

"श्रेया मला तुला काहीतरी सांगायचं आहे, आता हल्ली मी जे काही करते ना ते माझ्या घरच्यांना पसंत नाही, मी जॉब करत नाही ना त्यामुळे मला काही किंमत नाही, तू कस ग जॉब करते पैसे कमवते, तुझ छान आहे, मला तुझ्या सारख हव आहे आयुष्य",.. स्नेहा

श्रेया ऐकत होती,.. "बापरे तुला कोणी सांगितल की माझ खूप छान आहे स्नेहा, तारेवरची कसरत सुरू आहे माझी ",

"मला काहीतरी करायचं आहे श्रेया घरातच आहे मी तर कुणाला माझी किंमत नाही, इझी अवेलेबल झाली आहे मी, काहीही करा कोणाला पसंत पडत नाही",.. स्नेहा

" तुला काय वाटतं स्नेहा.. नोकरी करणाऱ्या बायकांच आयुष्य खूप छान आहे का? , असंच सुरू आहे आमचं, आम्हाला ही काहीही किंमत नाही, आम्हीही काहीही करा कोणालाही पसंत पडत नाही, तुला नोकरी करायची तर कर, घरच व्यवस्थित झालं पाहिजे, अगदी एकाही कामातून आमची सुटका होत नाही, नोकरीमुळे उगीच दमछाक होते आहे माझी, नेहमी सासूबाई नवरा चिडलेले असतात, आता ही मी संदीपशी भांडूनच खाली आली आहे, या लोकांच्या अपेक्षा संपतच नाही, करावं तरी काय? काहीही केलं तरी आपल्यालाच बोलतात ",.. श्रेया

" काय कराव ग मग म्हणजे हे सगळे आनंदी होतील, जॉब केला तरी त्रास नाही केला तरी त्रास ",.. स्नेहा

" मला असं वाटतं की हे लोक कधीच आनंदी होऊ शकत नाही, काहीही करा त्यात थोडी कमी राहतेच, आपणही माणूस आहोत, आपल्याला समजून घेणार.. चांगलं वागणार कोणी भेटणारच नाही का? ",.. श्रेया

" बहुतेक नाही भेटणार, काय करावं मग? बिनधास्त व्हायला पाहिजे आपण ",.. स्नेहा

पण जमेल का आपल्याला ?

🎭 Series Post

View all