नखरे तेरे ! पार्ट 5 ( अंतिम भाग )

.
" काय झाले रे ?" अंकुरने विचारले.

" अरे परीने निबंध पाठवला आहे. फोनच हँग झालाय. आज तर खूप कामे आहेत. उद्या जावे लागेल तिला भेटायला. " नकुल म्हणाला.

" दाखव. एवढं मोठे ईरावर लिहिले असते तर संजना मॅडमने पैसे तर दिले असते. असो. काय लिहिले ते बघ ना. " अंकुर म्हणाला.

" कधी वाचत बसू यार. वाचनाची एवढी सवय असती तर कलेक्टर नसतो का झालो ?" नकुल म्हणाला.

अंकुर हसला. तेवढ्यात ट्रेनर आला. ट्रेनरला जिममध्ये गप्पा मारलेले आणि मोबाईल वापरलेले चालत नसे. म्हणून नकुलने केके म्हणत रिप्लाय दिला.

***

" काय रिप्लाय दिला त्याने ? रडत असेल तो. म्हणत असेल माफ कर. पण तू लगेच माफ करू नको. थोडं ताटकळत ठेव. " शिल्पाने विचारले.

"त्याने रिप्लाय दिलाय फक्त केके. " परीने भोंगा पसरला.

मीना झाडू मारत होती. ती हे सर्व ऐकत होती. तिला राहवले नाही.

" दीदी , माझ्या डोक्यावरचा हा कोमेजून गेलेला गजरा पहा. माझ्या दारुड्या नवऱ्याने दिलाय. पहिल्यांदा माझ्यासाठी काही आणलं म्हणून तीन दिवस हाच गजरा घालत आहे. गजरा कोमेजून जरी गेला तरी आमच प्रेम नाही कोमेजणार. माझा नवरा म्हणजे चोवीस तास दारू. बेवडा का असेना कुंकू आहे माझं. मी तुम्हाला आणि नकुलरावांना टक लावून बघते. कारण मला बघायचं असते लोक प्रेमात पडल्यावर कस वागतात , कस प्रेम करतात. कारण मला कधीच प्रेम नाही भेटलं. बेवडा अधूनमधून गजरे आणतो त्यातच समाधान. तुम्हाला तर छत्तीस हजाराची अंगठी दिली. किती प्रेम करतात तुमच्यावर. आयुष्यात समाधान मानत चला. मगच सुख येईल. " मीना म्हणाली.

" आता एक कामवाली बाई आम्हाला सल्ले देणार ? काम कर स्वतःचे. " शिल्पाने रागावले.

***

रात्री नकुलने करड्या रंगाचा टीशर्ट घातला होता. त्याची आई त्याच्या केसांची तेलाने मालीश करत होती.

" नकुलबाळा , आज किटी पार्टीत सर्व बायका जळत होत्या माझ्यावर. खूप कौतुक करत होत्या तुझे. " आई म्हणाली.

" त्यात काय कौतुक ? आईचे ऋण कधीच फेडता येत नसते. " नकुल म्हणाला.

" बर मला एक सांग. तुझी कोणती गर्लफ्रेंड आहे का ?"

नकुल काही बोलला नाही.

" असेल तर इतकंच सांगेल तिला कधी धोका नको देऊ. वापर करून सोडू नको. तुझ्या परीने पूर्ण निष्ठेने नाते निभाव. " आई म्हणाली.

" हो आई. " नकुल म्हणाला.

***

आईच्या बोलण्यामुळे नकुल दुसऱ्या दिवशी परत परीला भेटायला गेला. परीला चॉकलेट खूप आवडायचे म्हणून चॉकलेट बॉक्सही सोबत घेतला. बेल वाजवली. शिल्पाने दार उघडले.

" काय काम आहे ?" शिल्पा रागात म्हणाली.

" ए शिल्पी. परी कुठेय ?" नकुल इकडेतिकडे बघत म्हणाला.

" डेटवर गेलीय. तुझ्याहून जास्त हँडसम आणि तुझ्याहून जास्त कमावणारा. " शिल्पा तोऱ्यात म्हणाली.

नकुलला धक्का बसला.

" पण आमचं ब्रेकअप केव्हा झाले ?" नकुल म्हणाला.

" काल जो मेसेज पाठवला तो वाचला नाही ?" शिल्पा म्हणाली.

" तू चेष्टा करत आहेस ना ?" नकुलने विचारले.

मग शिल्पाचा फोन वाजला. परीने एक सेल्फी पाठवली होती.

" ही सेल्फी बघ. आणि आता परीला त्रास द्यायचा नाही. गेट लॉस्ट. " शिल्पा म्हणाली.

नकुलने ती सेल्फी बघितली. त्याचे डोळे पाणावले. चॉकलेटचा डब्बा खाली पडला. तो तसाच बाहेर आला. नकुल जाताच स्वाभिमानी शिल्पा ते चॉकलेट खाऊ लागली. नकुल परत घरी आला. घरी येऊन स्वतःला खोलीत कोंडवून नकुल रडू लागला. इतक्या लवकर तिने नाते तोडले ? इतकं काय चुकले होते आपले ? अश्या असंख्य प्रश्नांनी मनात काहूर माजवले. नकुलने परीला कॉल केला , मेसेज केला पण परीने सगळीकडे ब्लॉक केले होते.

***

दुसऱ्या दिवशी जिममध्ये आल्यावर नकुलला तो सेल्फीमधला मुलगा दिसला. नकुलने मुद्दाम त्याच्यासोबत ओळख वाढवली. त्या मुलाने स्नॅपचॅटवर परिसोबतची फोटो टाकली होती. बोलता बोलता नकुलने आपण परीला ओळखतो असे खोटेच सांगितले. मग तो मुलगा परीबद्दल सांगू लागला.

" भाई , तो परीचा एक्स खूप हरामी होता. सेक्स ऍडीक्ट. टॉक्सिक रिलेशनशिप होते त्यांचे. तिला मारायचा पण. त्याचेही नाव नकुलच होते. युज केला त्याने तिचा हवस भागवण्यासाठी. " तो मुलगा म्हणाला.

परीने त्या मुलाला नकुलबद्दल खूप काही वाईटसाईट सांगितले आणि विकटीम कार्ड मिळवले होते.

***

त्या प्रकरणानंतर नकुल खूप डिप्रेशनमध्ये गेला. आपण ज्या मुलीवर इतके पैसे उधळले , इतकं प्रेम केलं , इतके रुसवेफुगवे दूर केले त्या मुलीने मागेमागे असले घाणेरडे आरोप लावावे ? युज आपण केला की तिने ? नकुल कुणाशीच जास्त बोलत नसे. अश्यावेळी त्याच्या आईनेच त्याच्या बॉसशी बोलून काही दिवस सुट्ट्या घेतल्या आणि नकुलला मनालीच्या ट्रिपवर पाठवले. आपली बुलेट घेऊन नकुल मस्तपैकी फिरून आला. त्याचे डिप्रेशन दूर झाले. जेव्हा गर्लफ्रेंड सोडून गेली तेव्हा आईनेच त्याला सावरले.

***

नकुलला अंकुरचा फोन आला.

" भाई , एका फ्रेंडला तुझ्यासोबत डेटवर जायचं आहे. खूप हॉट आहे. " अंकुर उत्साहात म्हणाला.

" भाई , सध्या फक्त करियरवर फोकस करायचा आहे. आईची खूप इच्छा आहे चारधाम यात्रा करायची. त्यासाठीही पैसे गोळा करतोय. एकदा तो कटू अनुभव आला म्हणून आता मुलींवर विश्वास नाही राहिला. " नकुलने इतके बोलून फोन कट केला.

आपण सर्वजण स्त्रियांचे गुणगान गातो. पण समाजात आजही कितीतरी मुली असतात ज्या मुलांच्या भावनांशी खेळतात , त्यांचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात. ब्रेकअप झाल्यावर मुलींना खांदा द्यायला खूपजण येतात पण मुलांना कुणी विचारतही नाही. जिममध्ये डंबल उचलून किंवा ऑफिसमध्ये ओव्हरवर्क करून ते आपले दुःख विसरतात. मुली रडतात म्हणजे त्यांची काहीच चूक नसते ? किंवा मुले रडत नाहीत म्हणून त्यांना दुःख होत नाही ? व्हिकटीम कार्ड खेळणाऱ्या सर्व मुलींचा मी धिक्कार करतो. टॉक्सिक रिलेशनशिपचा अनुभव घेतलेल्या सर्व पुरुषांना ही कथा समर्पित.

समाप्त

🎭 Series Post

View all