नकळत एक प्रेमकथा भाग 3

Ek Prem Kahani

अर्पिता तयार होऊन नीरजची वाट पाहत होती.

"अरे यार..किती वेळ लावतो हा मुलगा! मामी बोलव ना त्याला. अशाने फ्लाईट मिस होईल." अर्पिता गडबड करत म्हणाली. एकीकडे ती खूप एक्साईटेड होती, तर दुसरीकडे नर्व्हसही होती. आज पहिल्यांदाच तिला नीरज सोबत मीटिंगला जाण्याची जबाबदारी मिळाली होती आणि नीरज सोबत जायचे म्हंटल्यावर क्षणात तिने एका होकार दिला होता.


"चला, डॅड येतो मी. नीरज बाहेर येत म्हणाला."

अर्पिताही त्याच्या पाठोपाठ बाहेर आली.


"ही पण येते आहे का मीटिंगला?" नीरज.


"हो. तिलाही सवय व्हायला हवी. बाकी तू आहेसच." विवेक नीरजला समजवत म्हणाले. ड्राइव्हरने गाडी सुरू केली. गाडी काही अंतर जाते न जाते तोच एक टू व्हीलर गाडीच्या मागे येऊन थांबली. 


"हॅलो, एक मिनिट..थांबा." शिखा गडबडीने गाडीवरून खाली उतरली. तोपर्यंत नीरजची गाडी पुढे गेली होती.


"हॅलो, तुम्ही कोण?" विवेक शिखाला पाहून पुढे होत म्हणाले.


"हाय सर, मी शिखा. काल नीरज सरांचे वॉलेट आमच्या घरी विसरले होते. ते द्यायला आले." शिखाने आपल्या हातातले वॉलेट पुढे केले.


"..म्हणजे मला समजले नाही." विवेक गोंधळून म्हणाले. तसा कालचा सकाळचा सारा प्रसंग शिखाने त्यांच्या कानावर घातला. 

"नीरज आत्ताच मीटिंगसाठी बाहेर गावी गेला आहे. तो उद्या परत येईल तेव्हा हे मी देईन त्याला आणि तुम्ही येऊन गेल्याचेही सांगेन. बाय द वे, थँक्स हं." विवेक शिखाला म्हणाले. 

शिखा निघून गेली. पण जाताना विवेक आणि सुमेधा ताईंच्या मनात घर करुन गेली. 


"आपल्या निलाक्षी सारखी वाटते ना ही मुलगी?" आपल्या मुलीच्या आठवणीने सुमेधा ताईंच्या डोळ्यात पाणी आले.


"हो. मलाही क्षणभर तिचाच भास झाला. बरं मेधा, मला काही गोष्टी तुझ्याशी बोलायच्या आहेत. बागेत एक छानसा राऊंड मारू. मग मी ऑफिसला जाईन." विवेकनी आपल्या बायकोचा हात हातात घेतला.


"अहो, काय हे? आपल्या मुलाचं लग्नाचं वय झालं आणि .." सुमेधा ताई लाजून म्हणाल्या.


"तेच तर बोलायचे आहे मला. मुद्दा लक्षात येण्यास जस्ट प्रॅक्टिकल केलं. जसं ऑफिसमध्ये मीटिंगला प्रेझेंटेशन असतं, तसं!" विवेक हसत म्हणाले.

"आपल्या नीरजसाठी अर्पिता कशी वाटते?" विवेक थेट मुद्द्यावर आले. "अर्पिता नात्यातली आहे म्हणून विचार करू नको. सून म्हणून तिचा विचार करून बघ. तसं पाहायला गेलं तर अर्पिता दिसायला, वागायला छान आहे. तिचं शिक्षण, करियर उत्तम आहे. आपल्या कंपनीत चांगल्या पोस्टवर जॉब करते ती. शिवाय तिचं आणि तुझं छान जमतं." 


"विवेक, तुम्ही या सांसारिक गोष्टींकडे कधीपासून लक्ष द्यायला लागलात?" सुमेधा ताई .


"ते जाऊ दे. पण आज आपली नीलाक्षी असती, तर तिचेही लग्न झाले असते. तिचे लग्न अगदी थाटामाटात करून दिले असते मी. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ज्या मुलावर तिचे प्रेम होते, त्याला आपल्याला भेटवण्याचा अट्टाहास, त्यासाठी तिचे घाईघाईत जाणे आणि त्यातच तिचा झालेला ॲक्सीडेंट.." विवेकनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले. 

"प्रत्येक बाबतीत घाई असायची तिची..मेधा, तिची कमी कोणी भरून काढली असेल तर ती केवळ अर्पिताने. आपल्या निलाक्षी सारख्याच लाघवी, मनमोकळ्या, दिलखुलास अर्पिताने या घरात आता सून म्हणून राहावं असं मला वाटतं. मेधा, तू विचार करायला हवा तेवढा वेळ घे. तुला योग्य वाटलं, तर ताईशी मी बोलेन. नाहीतर हा विषय आपल्या दोघांत राहिलेला बरा." आणखी बरेच काही बोलून विवेक ऑफिसला निघून गेले.

------------------------------


" हे बघा मॅम, आम्हाला दोन वेगवेगळ्या रूम्स हव्या आहेत." नीरज हॉटेलच्या रिसेप्शनिस्टला बराच वेळ समजावून थकला होता.


"हो. सर पण आत्ता एकच रूम अवैलेबल आहे. तुम्ही काल बुकिंग करताना एकच रूम बुक केली होती आणि आज साऱ्या रूम्स फुल्ल आहेत." रिसेप्शनिस्ट काहीशी चिडून म्हणाली.


"नीरज, रोज एकाच घरात राहतो ना आपण? मग इथे एका रूममध्ये राहायला काय हरकत आहे? तुझा माझ्यावर विश्वास नाही का?" अर्पिता.


"तू हे जे काही चालवलं आहेस, ते मला समजत नाही असे नाही. पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. आय थिंक, यू लव्ह मी? राईट? पण मी तुझ्याकडे केवळ बहिणीच्या नात्याने पाहतो. बाकी कुठलचं नातं आपल्यात तयार होऊ शकत नाही." नीरज अर्पिता जवळ येत बोलला.


"हे सगळं बोलायची ही वेळ नाही आणि हो माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे अगदी खरं आहे. पण मी ते लपवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही." अर्पिता आणखी काही बोलणार इतक्यात रिसेप्शनिस्ट धावत आली. "सर, जस्ट एक रूम रिकामी झाली आहे. क्लीन करून पाच एक मिनिटांत रेडी होईल."

हे ऐकल्यावर नीरजच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव उमटले. 

"तू आधी बुक केलेल्या रूममध्ये जा. मी आत्ता रिकाम्या झालेल्या रूममध्ये जाईन आणि ठीक चार वाजता तयार रहा. मी कॉल करतो. मीटिंग इथेच आहे." नीरज आपले सामान घेऊन निघून गेला.

अर्पिता त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत राहिली. 'नीरज, खरंच माझं प्रेम आहे रे तुझ्यावर..अगदी मनापासून.'


मीटिंग झाली. पण अर्पिता अजिबात बोलायच्या मूडमध्ये नव्हती. जेवतानाही तिचे नीट लक्ष नव्हते.


"सॉरी." जेवता जेवता नीरज अर्पिताला म्हणाला. "खरं सांगतो अप्पू, माझ्या आयुष्यातली नीलक्षीची जागा तू भरून काढलीस. माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण एक बहीण म्हणून." आपल्या बहिणीच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी आले.

त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून अर्पिता कासावीस झाली. "नीलू जशी तुझी बहीण होती तशीच माझीही होतीच." झटक्यात आपला राग विसरून तिने नीरजला पाणी दिले आणि आपल्या डोळ्यातलं पाणी तिने मोठ्या प्रयासाने अडवले.


क्रमशः



🎭 Series Post

View all