अबोली

Story Of A Emotional Girl....

अबोली... नावासारखीच अबोल होती. नुकतीच लग्न करून शहरात आली होती..घरी नवरा सुबोध आणि ती दोघेच.. सासूसासरे गावी , त्यामुळे इथे फक्त राजाराणीचाच संसार. सुबोध सकाळी लवकर कामाला गेला कि अख्खा दिवस तिच्यासमोर पडलेला असे..काय करायचे हा विचार करून ती थकली होती.. एका रविवार पुरवणीमध्ये तिने काव्यस्पर्धेबद्दल वाचले आणि जणू तिचा प्रश्नच सुटला. अबोलीने मराठी हा विषय घेऊन एम.ए. केले होते. तिला पुढे अजून शिकायचे होते..पण एका बाजूला तिला लग्नासाठी स्थळे यायला लागली तर दुसरीकडे तिची आई आजारी पडली.. त्यामुळे इच्छा असूनही तिचे शिक्षण थांबले.. आई बरी होईपर्यंत भावाची बारावी आणि बहिणीची दहावी एकाच वर्षी आले मग त्यांचा अभ्यास घ्यायचा म्हणून आणि मग नंतर लग्न झाले म्हणून तिचे शिक्षण थांबले ते थांबलेच.. पण कॉलेज मध्ये असताना ती कविता करायची, कॉलेजच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी लेखन करायची.. कॉलेजमध्ये तर काव्यस्पर्धा म्हणजे अबोलीचा प्रथम क्रमांक हे ठरलेच होते.. अनेक परिक्षकांनी तिच्या कवितेला नावाजले होते. फक्त कॉलेज सुटल्यावर तिचा हा छंद कमी झाला होता.. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण परत तेवढ्याच चांगल्या कविता करतो का हे आपल्याला बघता येईल असे ठरवून तिने सुरुवात केली..

        कविता लिहून झाल्यावर तिने सुबोधला त्या कविता दाखवल्या. त्याची पसंतीची मोहर उमटताच तिने थोडेसे घाबरतच त्या दोन, तीन कविता स्पर्धेसाठी पाठवून दिल्या ..निकालाला जरी वेळ होता, तरी तिने आता रोज नवीन विषयावर काहीतरी लिहायला सुरुवात केली.. एक दिवस अचानक तिला त्या वर्तमानपत्राच्या ऑफिसमधून एक फोन आला आणि तिला त्यांनी त्यांच्या कचेरीत बोलावले. आश्चर्यचकित झालेली अबोली त्या कचेरीत गेली. तिने तिथे स्वतःचे नाव सांगितल्यावर तिला थेट संपादकांच्या केबीनमध्ये नेण्यात आले..

  " या बसा, मॅडम.." संपादकांनी खुर्चीकडे इशारा केला.

" माझे काही चुकले का? तुम्ही इथे बोलावून घेतले म्हणून विचारते." अबोलीने विचारले..

" चुकले काहीच नाही. उलट तुमच्या कविता इतक्या सुंदर आहेत कि कोणत्या कविता निवडाव्यात हेच कळेना..म्हणून म्हटले एकदा तुमच्याशी बोलूयात.." संपादकांचा मनमोकळा स्वभाव पाहून अबोलीहि थोडी रिलॅक्स झाली..

" तुम्ही आधीपासूनच कविता करता कि हा पहिलाच प्रयत्न?"

" कॉलेजमध्ये असताना करायचे , पण आता थोडे कमी झाले आहे.."

" अच्छा , शिक्षण किती झाले आहे?"

" मी एम.ए. मराठीतून केले आहे.." अचानक अबोलीला आपली मुलाखत चालू असल्यासारखे वाटले..

" सध्या कुठे कामाला आहात का?"

" मी नुकतीच या शहरात आले आहे.. अजूनतरी तसा विचार केला नाही."

" माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रस्ताव आहे.. तुम्ही स्विकारावाच अशी जबरदस्ती नाही. नाही म्हणालात तरी स्पर्धा तुम्हीच जिंकणार याची खात्री बाळगा.."

" तुम्ही सांगा सर, विचार नक्की करेन."

" आमचे हे वृत्तपत्र नवीन आहे..त्याचा खप वाढावा म्हणून खरेतर आम्ही अशा स्पर्धा आयोजित करतो.. त्यातून अजून एक हेतू साध्य होतो कि कोणीतरी नवोदित लेखक, लेखिका या स्पर्धेतून नजरेस पडतात..मग काही चौकटी किंवा काही स्तंभलेखन ते आरामात करू शकतात.. त्यांना नाव मिळते, थोडेफार पैसे मिळतात.. आमचेही काम होते. बघा तुम्हाला आवडत असेल तर.."

हे ऐकून अबोली खूप खुश झाली. आवडीचे काम आणि तेही समोरून विचारणा केलेली..

" सर, मला नक्की आवडेल हे काम करायला.. पण तरिही एकदा घरी विचारून सांगू?"

" नक्की."

" कामाच्या वेळा वगैरे काही असतील?"

" नाही. तुम्ही सध्या तरी घरून काम केले तरी चालेल.तुम्ही तुमचे लिखाण इथे आणून देत जा..योग्य वाटेल ते लिखाण आम्ही प्रकाशित करू.. पण जे असेल ते तुम्हाला सांगूच .सध्या आमचे उपसंपादक सुट्टीवर आहेत तेच खरेतर हे सगळे निवडतात.. ते नाहीत तर तुम्ही थेट माझ्याकडे आणून दिलेत तरी चालेल. म्हणजे तुम्ही पाकिटावर 'पुरवणी' असे लिहित जा."

"मी दोन दिवसात नक्की सांगते सर."

"तुम्ही सकारात्मक निर्णय घ्याल अशी आशा करतो. तुमचा फोननंबर आणि पत्ता आहेच आमच्याकडे.. पुढच्या वेळेस जर आलात तर तुमचा एक बायोडेटा करून आणा.. म्हणजे बरे पडेल.."

"नक्की सर.. थँक यू वेरी मच"..

असे म्हणून अबोली तिथून निघाली. लगेच तिने सुबोधला फोन लावला..

"हाय... तुला माहित आहे का आत्ता काय झाले?"

" तू सांगितल्याशिवाय कसे कळणार? थोडं पटकन सांगशील समोर सर बसले आहेत.."

" अरे, मला त्या वर्तमानपत्रात छोटेमोठे लिहिण्याची ऑफर आली आहे.."

" मस्त बातमी.. आल्यावर साजरी करू.. पण आता फोन ठेवू? "

" हो...."

त्याच आनंदात तिने आईला आणि सासूबाईंनाहि फोन करुन हि बातमी सांगितली.. तिला तिचे आवडीचे काम करायला मिळाले याचा सगळ्यांनाच आनंद झाला..तिने तर घरी आल्या आल्या आपले सगळे लिखाण काढले आणि ठरवायला लागली काय काय आधी द्यायचे.. संध्याकाळी कामावरून येताना सुबोध तिला आवडणारी रसमलाई आणि कचोरी घेऊन आला होता..

" हवा तसा जॉब मिळाला आता खुश?"

" हो.. मी सांगू शकत नाही एवढा आनंद झाला आहे मला.. आधीपासूनच मला लिहायला आवडत होते.. तेच काम करायला मिळेल असा मी विचारही केला नव्हता.."

"आता नवीन कामात मला विसरू नकोस म्हणजे झालं.."

" काहिही हा..."

        अबोलीने या कामात स्वतःला खरेच झोकून दिले..नवीन नवीन विषय शोधायचे त्यावर अनुरूप लेख किंवा कविता लिहायच्या..तिचे बरेचसे लेख, कविता छापून यायच्या..आणि त्यावर वाचकांचा प्रतिसादही उत्तम होता. तिच्या इमेल्स सध्या प्रशंसेने भरलेल्या असायच्या.. त्यामुळे तिचा हुरूपही वाढला होता. तिचे लिखाण बहरत होते..आणि अचानक पहिल्यांदा ती देऊन आलेले पाकिट दुसर्‍याच दिवशी 'साभार परत' म्हणून आले होते..तिला आश्चर्याचा धक्का बसला. काय झाले असावे म्हणून तिने कचेरीत फोन केला ..

" हॅलो मी अबोली बोलते आहे..श्वेता आहे का?"

" बोल अबोली, मीच बोलते आहे.."

" अग बरं झाले तूच फोन उचललास ते..अग माझे लिखाण पहिल्यांदाच साभार परत म्हणून आले आहे. याच्या आधी कधी आले नव्हते. म्हणून आश्चर्य वाटते आहे."

पलीकडून काहीच उत्तर आले नाही. अबोलीला पण थोडे विचित्र वाटले. ती जेव्हा कधी ऑफिसमध्ये जायची तेव्हा श्वेता तिच्याशी छान बोलायची.. आज ती का अशी बोलते आहे , तिला कळेचना. पण विषय वाढवायला नको म्हणून तिने विचारले ,

"सर आहेत का तिथे? म्हणजे काय चुकले आहे ते विचारेन.."

" अग तुला त्यादिवशी नाही का बोलले सर काही दिवस ऑफिसमध्ये येणार नाहीत म्हणून.."

" हो विसरलेच.. ठिक आहे.. ठेवते मग.."

  अबोलीने काहिशा नाराजीनेच फोन ठेवला. तिचा मोबाईल वाजला म्हणून तिने पाहिला तर श्वेताचा मॅसेज होता. 'आपल्या उपसंपादकांनी ते परत पाठवायला सांगितले..आम्ही त्यांना खूप समजावले.. पण सर नाही आहेत याचा ते फायदा घेत आहेत.ते आता समोर बसले आहेत. म्हणून बोलता आले नाही..ते तुला ओळखतात का? कारण तुझा बायोडेटा सकाळी वाचल्यापासून चिडले आहेत.. तुला कल्पना दिली. सविस्तर नंतर बोलू.'

      अबोली विचारात पडली अशी कोणती व्यक्ती आहे कि जी तिचा एवढा रागराग करते आहे.. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर श्वेताने तिला फोन केला..

" हाय.."

" हाय, हॅलो नंतर बोलू.. आधी सांग ऑफिसमध्ये नक्की काय झाले?"

" अग आपले उपसंपादक आहेत, सुरेश म्हणून.. तू जेव्हा आलीस तेव्हा ते सुट्टीवर होते.. आणि नंतर जेव्हा जेव्हा तू यायचीस तो नेमका तुझा सुट्टीचा दिवस असायचा. त्यामुळे तुझी आणि त्यांची भेट झाली नाही.."

" त्याचा इथे काय संबंध?" उतावळेपणाने अबोलीने विचारले..

" मॅडम ऐकून तर घ्या.. गेले काही दिवस तुमचे नाव गाजते आहे.. म्हणून त्यांनी तुझी फाईल मागवली.. त्यातला तुझा फोटो आणि नाव बघून ते जे चिडले.. बाप रे बाप.. त्यात आपले सर पण इथे नव्हते.. मला तर वाटते आहे. एकतर तो तुझा जुना आशिक असावा किंवा शत्रू".. श्वेता थोडे मस्करीत थोडे गंभीरपणे म्हणाली..

" काहीच कल्पना नाही ग.. सर कधी येणार आहेत, सांगशील.. मी त्यांनाच येऊन भेटेन. " अबोली विचार करत म्हणाली.

" नक्की.. पण थोडे जपून बरे का.. कारण सुरेशसर आपल्या सरांचे मेव्हणे आहेत.."

" अच्छा.. म्हणजे सगळेच अवघड आहे.. मग मी उद्या येऊन त्या सुरेश सरांनाच भेटते.. वाघ म्हटल तरी खातो , वाघ्या म्हटले तरी खातो.."

" शोभतेस बाई साहित्यिक .. चल ठेवते फोन.. उद्या बोलू".

  सुबोध ऑफिस मधून आल्यानंतर तिने त्याच्या कानावर हे घातले..तो ही चिडला.." काय फालतुगिरी आहे..हे असे पेपर चालतात का? चांगले लेख आणि कविता नाकारून काय मिळते आहे या माणसाला? मी येऊ का उद्या तुझ्यासोबत?"

" नको मी जाईन एकटी.. गरज पडली तर तुला नक्कीच सांगेन..तसेही श्वेता असेलच तिथे.. बघते तर काय आहे गोंधळ.."

   दुसर्‍या दिवशी अबोली ऑफिसच्या वेळेत तिथे पोचली.. उपसंपादक अजून आले नव्हते म्हणून त्यांची वाट पहात बसली..थोड्या वेळाने ते आल्यावर श्वेताने तिला डोळ्यांनी खूण केली..

" Excuse me sir , मी आत येऊ का?" तिने विचारले..

" हो या ना.." त्यांच्या चेहर्‍यावर थोडे छद्मी हास्य होते.. हा चेहरा कुठे पाहिल्यासारखा वाटतो आहे का? अबोली स्वतःशीच विचार करू लागली..

" बोला काय काम आहे माझ्याकडे?"

" सर,मी गेले महिनाभर या वृत्तपत्रात लिहित आहे. आजपर्यंत मी लिहिलेले कधीच 'साभार परत' आले नव्हते. माझे यावेळेस एवढे काय चुकले आहे हे कळावे म्हणून आले आहे."

" आता चुकले काहीच नाही.. पण तुम्हाला नकाराचे दुःख कळावे म्हणून मी हे केले.."

" नकार?? तो ही विनाकारण? मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही.."

" कशी ओळखशील.. कॉलेजमधली मोठी कवयित्री होतीस ना तू..आमच्या सारखे कसे लक्षात राहणार तुझ्या?"

" तुम्ही वाटेल तसे बोलताय?"

" हो का? आणि रोज डे ला तू केलेला माझा अपमान? तेव्हा तू नव्हतीस वाटेल तसे बोललेलीस? सगळे कॉलेज हसले होते मला.."

 आता अबोलीला आठवले कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना कोणीतरी तिला गुलाब दिले होते. तिने घ्यायला नकार दिला तर ते गुलाब त्या व्यक्तीने अख्खया वर्गात लावून ठेवले होते आणि फळ्यावर तिचे नाव लिहून ठेवले होते.. त्यानंतर मात्र त्याला तिने सोडले नव्हते.. वर्गात आलेले प्रोफेसर सुद्धा त्याला ओरडले होते.. पण नंतर तो मुलगा परत कधीच दिसला नाही आणि ती ही विसरून गेली होती..


" अच्छा तूच आहेस का तो? मला वाटले आता तरी सुधारला असशील, पण दुसऱ्यांना त्रास देण्याची तुझी सवय अजून गेली नाही का? एखादी मुलगी नाही म्हटली म्हणून त्याचा राग असा व्यावसायिक पातळीवर काढायचा? व्वा... आणि मला काही पसंत , नापसंत असू शकते हे तरी तुला समजले पाहिजे."

" पण माझे प्रेम होते तुझ्यावर.." आवाजातली मगरूरी कमी झाली नव्हती..

" हो पण माझे नव्हते ना.. आणि आता तुझे वागणे पाहून तर त्या निर्णयाचा अभिमान वाटतो.. भिडेपोटी किंवा भितीपोटी जरी मी ती फुले स्विकारली असती तर माफ करू शकले नसते स्वतःला.."

" हा माज? बघतोच तुझे लेख, कविता कसे छापून येतात इथे?"

" ह्याला माज नाही स्वाभिमान म्हणतात. जो तुला माहित आहे कि नाही शंकाच आहे.. आणि अजून एक गोष्ट ज्याच्याकडे कर्तृत्व असते ना त्याला कोणत्या कुबड्यांची गरज लागत नाही.. इथे नाहीतर कुठेतरी मी यशस्वी होईनच.. तु तुझा विचार कर."

  असे बोलून रागानेच अबोली बाहेर पडली.. जाउ येणाऱ्या श्वेताला नंतर बोलू असे म्हणून बाहेर पडली..बाहेर पडताच तिने आधी सुबोधला फोन करून झालेली घटना सांगितली..

" मी येऊ का तिथे?"

" नको, मी निघाले इथून..माझा ना विश्वासच बसत नाहिये कि जगात अशी माणसे असू शकतात.."

" तू शांत हो.. आणि आरामात ठरव काय करायचे. तू एकदा सरांशी बोलून घेतेस का?"

" हो बोलले तर पाहिजेच.. आपण घरी आल्यावर बोलून.मी ठेवते फोन..."

       घरी येऊन अबोली थोडी शांत झाली.. मनाशी थोडा विचार करून तिने सरांना मोबाईलवर कॉल केला..

" सर अबोली बोलतेय.. आपण बोलू शकतो का?"

" काही महत्वाचे आहे का? कारण तुम्ही कधी फोन केला नाही.. आणि गेले काही दिवस तुम्ही काही लिखाण देत नाही का? आपल्या पेपरमध्ये येत नाही आजकाल?"

" सर, मी मागच्याच आठवड्यात नेऊन दिले होते.. पण ते मला साभार परत आले..बहुतेक उपसंपादकांची इच्छा नसावी ते छापण्याची.." अबोलीने धीर करुन सांगितले..

" सुरेश? पण तो असे का करेल?" संपादकांना आश्चर्य वाटले. नाईलाजाने अबोलीने कॉलेजचा प्रसंग सांगितला..

" असे होय, सुरेशना थोडा बालिशच आहे.. तुम्ही एक करू शकाल का? थोडे दिवस टोपण नावाने लिखाण द्या मी बघतो काय करायचे ते.."

" सर, मला वाटले होते कि तुम्ही निष्पक्षपातीपणे वागाल.. असो ते तुमचे नातेवाईक आहेत. त्यांच्या समाधानासाठी मी माझे नाव बदलून काम करणार नाही.. तुम्ही आलात कि मला सांगा.. माझे अप्रकाशित लेखन परत घ्यायला आवडेल.."

   अबोलीने फोन ठेवला..आणि तिने प्रवेश केला आपल्या लिखाणाच्या जगात.. या निश्चयाने कि जर माझे लिखाण चांगले होत असेल तर अशी कोणीही व्यक्ती मला पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही...



"डॉक्टर, अबोली होईल ना बरी?"

" मि. सुबोध त्यांना तीव्र नैराश्याचा घटका आला आहे. भरपूर कौतुक आणि त्यानंतर विनाकारण आलेला नकार,  त्यामुळे झालेली  कुचंबणा त्यांच्या हळव्या मनाला झेपली नाही.. काळजी करू नका.. आपण करू प्रयत्न त्यांना यातून बाहेर काढण्याचा.."



 कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..

 सारिका कंदलगांवकर दादर मुंबई