नकळत एक प्रेमकथा भाग 7

Ek Prem Kahani

"शिखा यार..कधीचा फोन करतो आहे मी. उचल ना फोन." नीरज गेले दोन दिवस शिखाला फोन करत होता. पण ती उचलत नव्हती.


"अरे, शिखाला कधी भेटवणार आहेस? आम्ही वाट पाहतो आहोत तिची." सुमेधा ताई नीरजला म्हणाल्या.


"आई, ती इथे यायला माझा फोन तर उचलायला हवी ना? गेले दोन दिवस ती मॉर्निंग वॉकला देखील आली नाही. काय समजायचे मी? बरं काही कारण असेल तर स्पष्ट सांगायचे किंवा कळवायचे तरी. असं अचानक गायब होण्याचा अर्थ तरी काय? तिच्यापेक्षा आपली अर्पिता बरी. सतत माझ्या मागे -पुढे करते. माझी काळजी करते." नीरज तावातावाने म्हणाला.


"अरे, असेल काहीतरी प्रॉब्लेम. पण शिखा तशी गोड मुलगी आहे मामी. मी भेटले आहे ना तिला. पण थोडीशी शांत, धीरगंभीर वाटते इतकंच." अर्पिताने आत येत नीरजकडे एक नजर टाकली. तो अस्वस्थ वाटत होता. त्याचा चेहरा पाहून अर्पिताला कसतरीच झालं. 

'हे मी का करते आहे? नीरज खुश असावा म्हणून की तो फक्त माझा असावा म्हणून? पण शिखाचा गैरसमज झाला आहे. तो मी दूर करायला नको होता? तो वाढावा म्हणून मी त्याला खतपाणी का घातलं? इतकी स्वार्थी कशी वागू शकते मी? पण

माझंही प्रेम आहेच नीरजवर. ते नाकारता येत नाही. त्यासाठी थोडं स्वार्थी झालं तर काय हरकत आहे?

असो, म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं!' अर्पिताने आपल्या मनातला गोंधळ झटकून टाकला.

---------------------------


पुढच्या चार दिवसांत नीरजला कामातून उसंत मिळाली नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो शिखाला फोन करत होता. पण अजूनही ती फोन उचलत नव्हती. तिची आठवण त्याला खूप अस्वस्थ करत होती.

'तिचे लग्न तर ठरले नसेल? आणि हे तिला सांगायला अवघड वाटत असेल? की तिच्या घरी काही प्रोब्लेम झाला असेल?' काहीही झालं तरी आज शिखाच्या घरी जायचं असं नीरजने ठरवून टाकलं. 


रात्री उशीरा नीरज शिखाच्या घरी आला. पण घरी कोणीच नव्हतं. दिवसभर कामाचा शीण, शिवाय डोक्यात येणाऱ्या भरमसाठ विचारांनी त्याचं डोकं दुखू लागलं. त्याचे पाय आपोआप नेहमीच्या कॅफेकडे वळले. कॅफेत कोणीच नव्हते. त्याला उगीचच वाटलं, आपल्या सोबत अर्पिता हवी होती म्हणून.

"एक हॉट कॉफी.." त्याने बसल्या जागेवरून ऑर्डर दिली. काही वेळात कॉफी पिऊन तो काउंटरवर आला. पैसे पेड करून तो जायला निघणार इतक्यात शिखा गडबडीने आत आली. 

"दादा, निघायचे का? वहिनी गाडीत वाट पाहते आहे आणि आई -बाबांचा फोन आला होता. पोहोचले ते मावशीकडे."


"तू इथे काय करती आहेस?" अचानक शिखाला समोर पाहून नीरज गोंधळला. 

काही न बोलता शिखाने कॅफेच्या नावची पाटी दाखवली. 


"मार्तंड्स कॅफे.." नीरज आश्चर्याने म्हणाला. 

"तुमचा कॅफे?" 


"हा. दादाचा कॅफे आहे.

पण आज इथे तू एकटा कसा काय? अर्पिता नाही आली? नाही म्हणजे तिला कोल्ड कॉफी आवडते आणि तुला हॉट? हो ना? ते जाऊ दे. पुढच्या वेळी येताना तिला नक्की घेऊन ये." शिखा जाण्याची तयारी करू लागली.


"थांब शिखा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. गेले कित्येक दिवस मी रोज फोन करतो आहे तुला. पण तू फोन उचलत नाहीस की पुन्हा करत नाहीस. तू मला टाळते आहेस हे मात्र नक्की. पण याचं कारण मला कळायला हवं शिखा. खूप मिस केलं मी यार तुला..खूप. का टाळते आहेस मला? बोल प्लीज..' नीरज.


"ते तू तुझ्या होणाऱ्या बायकोला विचार." शिखा.


"म्हणजे? मी समजलो नाही." नीरजला तिच्या बोलण्याचा अर्थ कळेना.


"अरे, असा काय पाहतो आहेस? अर्पिता, तुझी होणारी बायको आहे ना? मी चुकून आले रे तुमच्या दोघांमध्ये. पहिल्याच भेटीत तू मला आवडलास नीरज. मग हळूहळू आपल्यात छान मैत्री झाली आणि त्या मैत्रीचा रूपांतर प्रेमात कधी झालं हे मला कळलंच नाही. नकळत माझा तुझ्यावर जीव जडला. मला वाटायचं कदाचित तुझंही माझ्यावर तितकच प्रेम असावं. 

त्यादिवशी मी तुमच्या कंपनीत आले होते, तेव्हा माझी अर्पिताशी भेट झाली आणि तिनेच मला तुमच्या लग्नाबद्दल सांगितले. मग त्या दिवसापासून ठरवले, आता तुझ्या फोनला उत्तर द्यायचे नाही की पुन्हा तुला भेटायचे नाही. पण योगायोग बघ ना, आज आपली भेट झाली." शिखा मनापासून बोलत होती.


तिचं हे बोलणं ऐकून नीरजला आनंद झाला आणि रागही आला. "शिखा, नकळत आज तू मला खूप काही सांगून गेलीस." नीरज शिखाच्या जवळ येत म्हणाला ." पण तू कंपनीत केव्हा आली होतीस?"


"मी येऊन गेल्याचे अर्पिताने सांगितलं नाही का तुला? माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर तुमच्या मॅनेजरना विचार किंवा तुमच्या गेटवरच्या वॉचमनने माझं नाव आणि नंबर लिहून घेतले होते त्यालाही तू विचारू शकतोस." शिखा.


"मुळीच नाही. याबाबतीत अर्पिताचे आणि माझे काहीच बोलणे झाले नाही. आणखी एक म्हणजे आमचं लग्न कधी ठरले नव्हते आणि ठरणारही नाही. कारण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे शिखा..खूप मनापासून." नीरज शिखाचा हात हातात घेऊन म्हणाला.


"हे तू काय बोलतो आहेस तुला तरी कळते आहे का?" शिखा आपला हात सोडवून घेत म्हणाली.


"हो. सगळं कळतंय मला. तुझा गैरसमज झाला आहे शिखा.. किंवा तो करून दिला गेला आहे. या बाबतीत मी अर्पिताला जाब विचारेनच. पण त्या आधी मला तुझं उत्तर हवं आहे. तू..माझ्याशी लग्न करशील?" नीरज.


इतक्यात शिखाचा दादा आला. "निघायचे ना?"


क्रमशः











🎭 Series Post

View all