नकळत एक प्रेमकथा भाग 6

Ek Prem Kahani

"नीरज, आत ये ना."

शिखा आपल्या स्टुडिओचे दार उघडत म्हणाली. 

नीरज आत आला आणि पाठोपाठ अर्पिताही आली. 
"वा.. ब्युटीफूल!" अर्पिताची नजर शिखाने शिवलेल्या ड्रेसवर गेली. तिने आजुबाजूला पाहिले, स्टुडिओचा लूक एकदम टिपिकल होता. शिखाने तयार ड्रॉ केलेली डिझाईन्स एका टेबलावर विखुरली होती. तीन- चार स्टॅच्यू वेगवेगळ्या आणि रंगबिरंगी कॉस्चयुम्सने नटले होते. कलरफुल पेन्सिल्स, पेन असे साहित्य सारीकडे पसरले होते. 

हे सारे पाहून अर्पिता भारावून गेली. 
"हाय, शिखा.. बऱ्याचदा नीरज बोलत असतो तुझ्याबद्दल, त्यामुळे मी तुला तशी ओळखते. पण प्रत्यक्षात कधी भेट झाली नव्हती आपली आणि तुझ्या कामाबद्दल मला फारशी माहिती नव्हती गं. पण हे सारं पाहून खूप भारी वाटतंय मला. बाय द वे, मी अर्पिता. नीरजची आतेबहीण. त्यांच्याच कंपनीत काम करते." अर्पिता उत्साहाने म्हणाली. 

"हाय.." शिखा अर्पिताला न्याहाळत म्हणाली.
\"परवा हीच होती का? नीरज सोबत त्या कॅफेत? वाटते तरी तशीच.\" शिखा मनातल्या मनात म्हणाली. 
नीरज आणि अर्पिता स्टुडिओ पाहू लागले. तोपर्यंत शिखा डिझाईन्स सिलेक्ट करू लागली. पण तिचे सगळे लक्ष या दोघांवर होते. \"किती सुंदर दिसते ही! आणि यांची जोडीही छान दिसते. ही दोघे अशी वागत अन् बोलत आहेत जणू यांचे लग्न ठरले आहे!\" शिखाच्या मनात विचार तरळून गेला. \"खरंच यांचे लग्न ठरले असेल तर मी आस लावून बसण्यात काय अर्थ आहे? नाहीतर ती त्या दिवशी नीरजच्या मिठीत किती प्रेमाने विसावली होती! शिखा एकदम भानावर आली. "मग त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम दिसते ते खरे की खोटे?" तिला काहीच कळेनासे झाले. 

"एकदम मस्त आहे स्टुडिओ. मला खूप आवडला. आता माझे ड्रेस शिवण्यासाठी मी इथेच देत जाईन." अर्पिता शिखाच्या शेजारी बसत म्हणाली.
"हो. आणि आपल्या कंपनीत कापडांची खूप व्हरायटी आहे. तू कधीही येऊन बघू शकतेस तिथे. तुला त्याचा उपयोग होईल. शिवाय आपण अनेक, वेगवेगळ्या शोरूम्ससाठी पुरवठा करत असतो. आमच्या ओळखीचा तुला उपयोग नक्की होईल. अगदी उद्याच ये. मी वाट बघते." आणखी काही वेळ थांबून अर्पिता आणि नीरज तिथून बाहेर पडले. 

-------------------------------

दुसऱ्या दिवशी शिखा कंपनीत पोहोचली. पण आत जायचे तिचे धाडस होत नव्हते. आत जावे की न जावे? या विचारात शिखाने कंपनीच्या बाहेर दोन-तीन फेऱ्या मारल्या. 

"मॅडम, आत जायचे आहे की अशाच फेऱ्या मारणार आहात?" तिथला वॉचमन गेटवर हातातली काठी आपटत म्हणाला.

"अं.. जायचे तर आहे. मला अर्पिता मॅमना भेटायचे आहे." शिखा पट्कन म्हणाली. 
वॉचमनने एका वहीत तिचे नाव, नंबर आणि येण्याची वेळ लिहून घेऊन तिला आत पाठवले.
रिसेप्शनिस्टने केबिन दाखवल्याप्रमाणे शिखा अर्पिताच्या केबिनमध्ये आली. 

"ओ.. हाय. आलीस तू? ये ना आत. माझ्याकडे फारसा वेळ नाही. पण मी तुला काही ओळखी करून देईन. इथून पुढे तू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर. तुझे काम होऊन जाईल." अर्पिताने मॅनेजरला आत बोलावले आणि शिखाची ओळख करून दिली. 
"मीटिंगला अजून थोडा वेळ आहे. तोपर्यंत एक कॉफी?" अर्पिता शिखाला कॅन्टीनमध्ये घेऊन आली.

"एक विचारू?" आपल्या पुढ्यात आलेला कॉफीचा मग हातात घेत शिखा म्हणाली.

"हो. पण जरा लवकर." अर्पिता.

"तुझं आणि नीरजचं लग्न ठरलं आहे की..? म्हणजे मी फक्त एक क्युरिऑसिटी म्हणून विचारलं. मागे एकदा तुम्हा दोघांना मी कॅफेत पाहिलं होतं. पण काही कारणाने मी तुमच्या समोर नाही आले." शिखा जरा घाबरतच म्हणाली.

"हो का? म्हणजे लग्न ठरलं नाही अजून. पण...ठरण्याची शक्यता आहे. का गं? शिखा, मी म्हंटल्याप्रमाणे माझ्या लग्नाच्या ड्रेसचे कॉन्ट्रॅक्ट तुलाच देणार आहे. डोन्ट वरी." अर्पिता शिखाचा अंदाज घेत म्हणाली.

"अच्छा, असं आहे तर. पण मी निघते आता. तुलाही मीटिंगला जायला उशीर होईल आणि मलाही घरी जायचं आहे. चल, भेटू पुन्हा कधीतरी." शिखा गडबडीने आपली बॅग उचलून बाहेर आली. आपल्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसू नये म्हणून तिने डोळ्यावर गॉगल चढवला.

"अगं, कॉफी राहिली तशीच." अर्पिताने शिखाला हाक मारली. पण अगदी हळू आवाजात. कारण नीरजने तिला पाहिलं तर उगीच घोळ नको आणि शिखाचा झालेला गैरसमज तसाच रहावा म्हणून. अर्पिता ती येऊन गेल्याचे नीरजला सांगणारही नव्हती. मीटिंगला जाण्याआधी अर्पिताने 
मॅनेजरना बोलावले. "आत्ता जी मुलगी येऊन गेली ना, ती इकडे आली होती हे कोणाला कळता कामा नये. अगदी नीरजला सुद्धा."

इकडे नीरज शिखाची वाट पाहत होता. "आज येणार होती ती. आता कंपनी बंद व्हायची वेळ झाली. एव्हाना यायला हवी होती.." 

"नीरज चालायचे का?" अर्पिता केबिनमध्ये येत म्हणाली.

"तू हो पुढे. मी येतोच." नीरजने शिखाला फोन लावला. रिंग वाजत होती. पण ती फोन उचलत नव्हती. "कामात असेल," म्हणून त्याने फोन ठेऊन टाकला.

"येतो आहेस ना? मी थांबली आहे." अर्पिता नीरजच्या हालचाली न्याहाळत होती. "कोणाला फोन करतो आहेस? शिखाला?"

"हो."

"ती नाही उचलणार फोन आता." अर्पिताच्या तोंडून निघून गेलं.

"म्हणजे?" 

"अरे, असंच म्हणाले मी." अर्पिता सावरून घेत म्हणाली.
"नीरज, आता तू शिखाला विसरण्याची तयारी कर. माझा इगो कुठे ना कुठे तू आणि तिनेही दुखावला आहे.

क्रमशः

🎭 Series Post

View all