नकळत एक प्रेमकथा भाग 5

Ek Prem Kahani

त्या दिवसापासून सुमेधा ताई अर्पितावर नकळत लक्ष ठेऊन होत्या. नीरज आसपास असला की ती खुश असते. त्याची सगळी कामे मन लावून करते. त्याचं उशीरा येणं तिला नाराज करतं. असे बरेचसे शोध त्यांना लागले. 

पण नीरज तिच्याकडे फारसे लक्ष देत नाही, हेही त्यांना जाणवलं होतं. आता या बाबतीत प्रत्यक्ष नीरजशी बोलणे झाले तर बरे होईल, म्हणून त्यांनी नीरजला आपल्या खोलीत बोलवून घेतले.

पण विषयाला कुठून सुरुवात करावी? हे सुमेधा ताईंना कळेना. आपल्याच विचारात त्या फेऱ्या मारू लागल्या.


"आई, कशाला बोलवलं मला?" नीरज जागेवर चुळबुळ करत म्हणाला.


"नीरज, तुझ्या मनात असलेली मुलगी अर्पिता तर नाही ना?" सुमेधा ताईंनी थेट मुद्द्याला हात घातला. ती जेव्हा तुझ्याबरोबर असते तेव्हा खूप खुश असते. तुझी प्रत्येक गोष्ट मनापासून जपते. ती तुझ्या प्रेमात आहे नीरज..हे कधी जाणवले नाही का तुला?" 

आई, असले काही बोलेल असे नीरजला अजिबात वाटले नव्हते. शिवाय आईने मुलाला तुझ्यावर कोणीतरी जीवापाड प्रेम करत, हे सांगणं म्हणजे नीरजला थोडं ऑकवर्ड फिल झालं.


"आई, ते जाणवलं आहे मला. पण अर्पिताकडे मी एक बहीण म्हणूनच पाहतो. बाकी माझ्या मनात तसले काही नाही." नीरज कसाबसा म्हणाला.


"बरं, मग तुझ्या मनात आहे तरी कोण?" सुमेधा ताई नीरज जवळ बसत म्हणाल्या.


"शिखा..आई माझं शिखावर प्रेम आहे. पण अजून ही गोष्ट मी तिला सांगितली नाही. कदाचित तिलाही मी आवडत असेन. आम्हा दोघांत खूप छान नातं तयार झालं आहे. त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही. हा..पण मी तिला प्रपोज केलं आणि ती नाही म्हणाली तर आमचं मैत्रीचं नातं तुटेल की काय अशी भीती वाटते मला म्हणून मी काहीच बोललो नाही." नीरज आपल्याच तंद्रीत बोलत होता.


"शिखा.. म्हणजे तू तुझं पाकीट जिच्या घरी विसरला होतास ती का?" सुमेधा ताई.


"हो." नीरज.


हे ऐकून सुमेधा ताईंना आपल्याला राग आला, वाईट वाटलं की आनंद झाला हेच कळेना. 

त्यांच्याही मनात नीरजसाठी अर्पिताच होती. पण असं जबरदस्तीने एखाद्यावर प्रेम करायला लावणं म्हणजे आयुष्यभर त्याला तडजोड करावी लागेल, हेही त्यांना माहीत होते.


"आई, अर्पिता स्वभावाने छान आहे, दिसायला सुंदर आहे. माझी खूप काळजी घेते ती. माझ्या शिवाय तिचे पान हालत नाही, हेही माहीत आहे मला. पण म्हणून मी ठरवून तिच्यावर प्रेम करू शकत नाही ना? मनातून यायला हवं ते.

पण शिखा पहिल्याच भेटीत मला आवडली. का ते माहीत नाही. पण तिच्याबद्दल जे वाटतं ते अर्पिताबद्दल वाटत नाही मला. माझे तिच्यावर प्रेम आहे, पण एक बहिण म्हणूनच." नीरजचे बोलणे ऐकून सुमेधा ताई गप्प बसल्या. इथून पुढे बोलणे त्यांना योग्य वाटले नाही. 

पण आज पहिल्यांदाच ताई आणि नीरजमध्ये मुलात मनमोकळा संवाद झाला होता. नकळत आई आणि मुलाचं जुनं पण नवीन नातं खुलू पाहत होतं.

---------------------------


आता लवकरात लवकर शिखाला प्रपोज करायचे हे मनाशी पक्के करत नीरज जागेवरून उठला. "आई, नाराज झाली नाहीस ना? एकच बोलतो, प्रेम ठरवून होत नाही. मनापासून ती व्यक्ती खास वाटायला हवी." बोलता बोलता नीरजने दार उघडले. समोर अर्पिता उभी होती. 

"तू कधी आलीस?" नीरज तिची नजर चोरत म्हणाला.

अर्पिता काही न बोलता आत आली. 

"मामी, मी माझ्या घरी जायचे पक्के केले आहे. आज मामाशी बोलेन आणि माझे ऑफिसचे राहिलेले काम पूर्ण करून जाईन. आईशी माझे बोलणे झाले आहे." अर्पिताने मागे वळून पाहिले. पण नीरज केव्हाच निघून गेला होता. 


"अप्पू, परत एकदा विचार कर. एखाद्या गोष्टीपासून पळ काढणे बरे नव्हे. खास करून न मिळणाऱ्या गोष्टीपासून..तेव्हा शांतपणे विचार कर. काही मार्ग निघतो का पाहू आपण आणि सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात. हे मात्र लक्षात ठेव." सुमेधा ताई तिला समजावत म्हणाल्या. 

हे ऐकून अर्पिताने सुमेधा ताईंना आपल्या मनातले सारे काही सांगितले. त्यांना याची कल्पना होतीच. पण अर्पिताचे बोलणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. "एक लक्षात घे अर्पिता, नीरजचे तुझ्यावर प्रेम नाही आणि त्यातून जरी तुमचे लग्न झाले, तरी तुम्ही दोघेही सुखी राहू शकणार नाही. एकमेकांबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा बोलून प्रश्न सुटतो का पाहा." 

हेही तितकेच खरे होते. जबरदस्तीने नाते जोडण्यात काहीच अर्थ नव्हता. अर्पिताला सुमेधा ताईंचे म्हणणे पटत होते.


दुसऱ्या दिवशी केबिनमध्ये कोणी नाही हे पाहून अर्पिता आत आली.

"नीरज, थोडं बोलायचं होतं."

"मला वाटतं ऑफिसची वेळ संपली आहे. सो, जाता जाता बोलूया किंवा आपण तुझ्या फेवरेट

कॅफेमध्ये मस्त कॉफी प्यायला जाऊ शकतो." आज नीरजचा मुड एकदम मस्त होता.


काही वेळातच दोघेही कॅफेत आले. नीरजने वेटरला एक कोल्ड आणि एक हॉट कॉफीची ऑर्डर दिली.


"बघ, इतका फरक आहे आपल्या दोघांत आणि मी वेड्यासारखी तुझ्यावर प्रेम करते. आय एम सॉरी, नीरज. मी मामीचं आणि तुझं कालच सगळं बोलणं ऐकलं. तुला शिखा आवडते ना? तू एक काम कर..तिला प्रपोज कर. मी मदत करेन तुला. 

माझं तुझ्यावर प्रेम आहे हे खरं आहे. पण आपलं नातं जबरदस्तीने बंधनात बांधण्यात काहीच अर्थ नाही. ती एक तडजोड होईल आयुष्यभरासाठी आणि ना तू खुश राहशील, ना मी खुश राहीन." अर्पिता बराच वेळ बोलत राहिली. तिचं बोलणं ऐकून नीरजच्या मनावरचं दडपण उतरल होतं. थोड्या वेळात दोघेही जायला निघाले.


"तू कुठेही जायचं नाहीस. मला तू इथेच, आमच्या घरी राहायला हवी आहेस. तुला माझ्यापेक्षा हँडसम , स्मार्ट मुलगा शोधून देण्याची जबाबदारी माझी." नीरजने अर्पिताला हलकीशी मिठी मारली. तशी अर्पिता सगळं विसरून त्याच्या मिठीत विसावली. 


हे सारं लांबूनच पाहणारी शिखा मात्र कमालीची अस्वस्थ झाली होती.


क्रमशः






🎭 Series Post

View all