नकळत एक प्रेमकथा भाग2

Ek Prem Kahani

"नीरज, खाऊन जा बेटा." सुमेधा ताई डायनिंग टेबलवर नाश्ता मांडत होत्या.


"नको आई, आधीच उशीर झाला आहे. आणखी लेट झाला तर तुमचा नवरा माझा जीव घेईल तिकडे." नीरज फाईल्स घेऊन घाईघाईने पळाला देखील. 


"या मुलाला काही सांगायची सोय नाही." असे म्हणत सुमेधा ताई नाश्ता करायला बसल्या.


"मामी, गुड मॉर्निंग." इतक्यात अर्पिता येऊन सुमेधा ताईंच्या गळ्यात पडली.


"तुम्ही आत्ता उठलात वाटतं? चला, नाश्ता करून घ्या आणि ऑफिसला जाणार असशील तर हा नाश्ता डब्यात भरून देते, तो तुझ्या भावाला आठवणीने दे." सुमेधा ताई अर्पिताला म्हणाल्या.

तशी अर्पिता आवरायला पळाली.

-----------------------------------


थोड्याच वेळात अर्पिता काचेचे दार उघडून आत आली. ए.सी.ची थंड हवा लागताच तिच्या अंगावर शिरशिरी आली. 

"मोनिका हा ए. सी.."


"एस मॅम." तिथल्या रिसेप्शनिस्टने ए. सी. बंद केला.


"नीरज कुठे आहे? मीटिंग?" अर्पिताच्या प्रश्नावर मोनिकाने नुसतीच मान हलवली. 


"ओके. मीटिंग संपली की मला कळव." अर्पिता आपल्या केबिनमध्ये गेली. सगळ्या कामाच्या फाईल्स तिने चाळून पाहिल्या आणि आपल्या कामात ती डोके खुपसून बसली.


साधारण तासाभराने मीटिंग संपली. पण आजच्या मीटिंगमध्ये नीरजचे लक्षच नव्हते. डोळे मिटून स्वस्थ बसून राहिलेली शिखा त्याच्या डोळ्यासमोर वारंवार येत होती. तिचा नाजूक स्पर्श त्याच्या हाताला अजूनही जाणवत होता.


"नीरज,आज तुझं लक्ष नव्हतं मीटिंगमध्ये? काही प्रोब्लेम? तब्येत बरी आहे ना!" विवेक आपल्या मुलाला म्हणाले.


"अं..हा. आहे. मला काय झालंय? मी एकदम ओके आहे." नीरज खुर्चीत नीट बसत म्हणाला.



इतक्यात दारावर टकटक झाली.


"कम इन."


"मामीने हे तुझ्यासाठी पाठवलं आहे. खाऊन घे." आत येत अर्पिता म्हणाली.


"किती वेळा सांगितलं तुला, ऑफिसमध्ये मला 'सर' म्हणत जा. वाईट दिसतं गं ते चारचौघात." नीरज तिच्यावर नाराज होत म्हणाला. 

"तू असशील तुझ्या मामाची भाची! पण या प्रोफेशनल जगात एकमेकांचा मान ठेऊनच वागावं लागतं. नातं वगैरे सारं घरी."


"नीरज, तिला आपल्या आजच्या मिटींगचे डिटेल्स दे म्हणजे ती पुढचे काम सुरू करू शकेल." इतके बोलून विवेक आपल्या केबिनमध्ये निघून गेले.


अर्पिता खुर्ची ओढून नीरज जवळ बसली. नीरज तिला माहिती सांगू लागला. मात्र त्याकडे तिचे लक्षच नव्हते. नीरजचे राजबिंडे रुप ती न्याहाळत होती.


अर्पिता नीरजच्या आत्याची मुलगी. त्याहून केवळ दोन वर्षांनी लहान होती. सध्या आपल्या मामाकडे राहत होती. तिने नीरज पाठोपाठ इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि एक्सपिरीयन्ससाठी आपल्या मामाच्या कारखान्यात ती जॉईन झाली. इथे जॉईन झाल्यानंतर नकळत प्रेमाचे वारे तिच्या मनात वाहू लागले..खास नीरजसाठी!

त्याच्या मनात उतरण्यासाठी ती हरतऱ्हेचे प्रयत्न करू लागली. मात्र नीरज तिला काही केल्या भाव देत नव्हता. खरं तर त्याच्या लग्नाचं वय झालं होतं. पण आत्ता कारखाना महत्वाचा असल्याने त्याचे सगळे लक्ष तिकडे होते.


"अर्पिता, मॅडम लक्ष कुठे आहे?" नीरज हातातले पेन तिच्या डोक्यात मारत म्हणाला. 


"सांग ना.. सॉरी. सांगा तर सर. मी लिहून घेते सगळं." अर्पिता गोड हसत म्हणाली. 


नीरज डिटेल्स देता देता आपल्याच विचारात हरवून गेला. 'शिखा..नावही अगदी वेगळंच आहे. शिवाय ती दिसायला सुंदर आहे. असं वाटतं, तिच्या स्पर्शाची ओळख मला आधीपासूनच आहे.' 

"हं, तर बॉटल विसरली आणि.."


"नीरज हे काय सांगतो आहेस? नीट सांग ना. नाहीतर मामा मला ओरडेल आणि तो ओरडला तर त्याची जबाबदारी तुझी." आता अर्पिताने आपल्या हातातले पेन नीरजच्या डोक्यात मारले. "अरे हो, मामीने मला तुझी पाणी पिण्याची बॉटल दिली होती. मीच विसरले बघ..म्हणून तुला आठवण झाली का? सॉरी हा, गडबडीत मी विसरले." अर्पिता भराभरा लिहून घेऊ लागली.

---------------------------


"नीरज, तुझं काम झालं असेल तर केबिनमध्ये ये. थोडं बोलायचं आहे." विवेकनी निरोप दिला तसा नीरज त्यांच्या केबिनमध्ये गेला.


"पुढचे दोन दिवस तुला कामासाठी दुसऱ्या शहरात जावे लागेल. दोन मीटिंग्ज असतील, तर त्या तू हॅण्डल कर. बाकी इथे मी पाहून घेईन." विवेक.


हे ऐकून नीरजने मान हलवली. ' मी गेलो तर दोन दिवस शिखाचे दर्शन होणार नाही.' 

"पण डॅड, मी जाणे महत्वाचे आहे का?" 


"हो. पुढे हे सगळे तुलाच सांभाळायचे आहे. त्याची प्रॅक्टिस आत्तापासूनच व्हायला नको का? आणि दोन दिवसांचा प्रश्न आहे. सो, जाणे तर मस्ट आहे." विवेकनी त्याला दोन्ही मीटिंग्जची रूपरेषा समजवली आणि नाईलाजाने नीरज जायला तयार झाला.


क्रमशः

🎭 Series Post

View all