नकळत एक प्रेमकथा भाग 4

Ek Prem Kahani
दोन दिवसाच्या दौऱ्यानंतर अर्पिता आणि नीरज घरी आले. शिखा येऊन गेल्याचे कळताच का कोण जाणे, पण नीरज अस्वस्थ झाला. 
दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला जरा तो लवकरच बाहेर पडला. पण शिखा आणि त्याची भेट झाली नाही. 'भेट एकदाच झाली! पण तिचा चेहरा डोळ्यासमोर आला की अस्वस्थ का वाटते?' हे नीरजला काही केल्या कळत नव्हतं. 

दोन दिवसांनी मात्र दोघांची भेट झाली. 
"तू..तुम्ही घरी येऊन गेलात ना?" शिखाला अचानक समोर पाहून नीरज गोंधळला.

"हो. तुमचे वॉलेट विसरले म्हणून द्यायला आले होते. तसे घर सापडण्यासाठी फार कष्ट नाही पडले. वॉलेट मधल्या लायसन्सवरचा पत्ता पाहून आले. पण त्यातल्या एकाही वस्तूला हात लावला नाही हं मी." शिखा काहीशी हसून म्हणाली. 

"मी संशय घेतला नाही तुमच्यावर. असो, परत कधी याल घरी?" तिच्या गालावरच्या खळ्या निरखत नीरज म्हणाला.

"येईन केव्हातरी. पण ते वॉलेट विसरल्याबद्दल एक ट्रीट तो बनती है. परवा आपलं बोलणं नीट झालं नाही. आता मी ऑफिशियली माझी ओळख करून देते. हाय..मी शिखा, स्वतःच्या एका छोट्याश्या फर्ममध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम करते. मी काम जरी नुकतंच सुरु केलं असलं, तरी स्वप्न मात्र मोठं आहे बरं!" शिखा गोड हसून म्हणाली आणि नीरजची विकेट पडायला फारसा वेळ लागला नाही. 

आता शिखा आणि नीरज रोज भेटू लागले. 
हळूहळू त्यांच्यात छान मैत्री झाली. नीरजच्या वागण्यात जाणवण्या इतका फरक पडला होता.
तशीच शिखाही नीरजला भेटायला अधीर असायची. मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने भेटणारे दोघे रोज न चुकता संध्याकाळी आपापली कामे आटोपून भेटू लागले. झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला फारसा वेळ लागला नाही.
नीरज पुरता शिखाच्या प्रेमात पडला होता. पण तिच्या मनात तसे 'काही 'नसेल तर तिला हे सांगून मैत्रीचं नातं त्याला गमावायच नव्हतं, म्हणून तो शांत होता.
-------------------------

"नीरज लग्नाचे कधी मनावर घेणार? आम्ही मुली पहायच्या की तुझ्या मनात आहे कोणी?" अचानक एक दिवस सुमेधा ताईंनी विषय काढला.

"आई, माझे लग्नाचे वय झाले आहे. आता आणखी काय मनावर घ्यायचे? आणि तसं म्हणशील तर.. आहे एक मुलगी मनात. पण आत्ताच सांगत नाही. त्यासाठी थोडे थांबावे लागेल. आधी कन्फर्मेशन येऊ दे. मग पुढे पाहू." नीरज आज चांगल्या मूडमध्ये होता. 
शिखाबद्दल आईला सांगावे की नको? हा विचार करत असताना अर्पिता अचानक खोलीत आली. "मामी, थोडं बोलायचं होतं." 
"बोल." अर्पिताचा पडलेला चेहरा पाहून सुमेधा ताई तिच्या पाठोपाठ बाहेर आल्या.

"मी आईकडे जाईन म्हणते, कायमचं. हल्ली इथे मला करमत नाही. आईची खूप आठवण येते." बोलताना अर्पिताचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते 

"अगं, अचानक असं काय झालं? गेले अनेक दिवस इथे राहते आहेस आणि करमत नाही म्हणजे काय? कोणी काही बोललं का तुला? की कामाचा कंटाळा आला?" सुमेधा ताई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या.
त्या स्पर्शाने अर्पिता त्यांच्या कुशीत शिरली. 
खरं तर तिला खूप काही बोलायचं होतं. नीरजचं बदलेलं वागणं तिला खटकत होतं. तो कोणाच्या तरी प्रेमात आहे, हे न सांगताही तिला जाणवलं होतं.

"त्याचं माझ्यावर प्रेम नाही, हे मला माहित आहे आणि त्याने माझ्यावर प्रेम करावं अशी जबरदस्ती नाही ना करू शकत मी. पण हेही तितकंच खरं की, मी त्याला आणखी दुसऱ्या मुलीबरोबर नाही पाहू शकत म्हणून मी हा निर्णय.."
अर्पिता अचानक भानावर आली. 'आपण हे काय बोलून गेलो?' ती सुमेधा ताईंच्या कुशीतून पटकन् बाजूला होत आपल्या खोलीत निघून गेली.

हे काय चाललं आहे? सुमेधा ताईंना काहीच कळेना. 'ही मुलगी नक्की कोणाच्या प्रेमात आहे? नीरजच्या तर नाही ना? आजकाल त्याचं वागणं जरा बदललं आहेच आणि अर्पिताही हल्ली गप्प गप्प असते. दोघेही आपल्या मनातलं काही सांगत नाहीत. काय चाललं आहे या पोरांच्या मनात देवच जाणे!' 

ताईंनी झाला प्रकार विवेकच्या कानावर घातला. 
तसे ते म्हणाले, "असेल मुलांचं काहीतरी. आपण त्यात नको लक्ष घालायला. मात्र अर्पिताच्या बाबतीत आता नीरजशी बोलायला हवे. हे मात्र खरं." 

तरीही ताईंना मनातून अर्पिताची काळजी वाटत होती. 'आज माझी नीलू असती तर, हक्काने विचारलं असतं मी तिला. मग अर्पिता कोणी परकी आहे का? माझ्या मुलीसारखीच आहे ती. किती जीव लावला आहे पोरीने सर्वांना!' तिच्या मनात नक्की काय आहे, हे जाणून घेतल्याविना ताईंना चैन पडणार नव्हतं.
त्या अर्पिताच्या खोलीत आल्या. " अप्पू , येऊ का गं?"
"मामी, ये ना. 
सॉरी गं. ते मगाशी जरा.."

"तुझ्या मनात काय असेल ते सांगून टाक. मन मोकळं झालं की माणसाला कसं बरं वाटतं आणि मला सांगावं असं तुला वाटतं नसेल, तर नीरजला सांग. तो तुझ्याच वयाचा आहे म्हणजे तुला मोकळेपणाने बोलता येईल त्याच्याशी. नाही का?" सुमेधा ताई अर्पिताचं बोलणं मध्येच तोडत म्हणाल्या.

"नको. नीरज ऐकून घ्यायचा नाही माझे बोलणे. त्यापेक्षा मी तुझ्याशीच बोलते. पण आत्ता नाही. मला थोडा वेळ दे. सारं काही सांगेन तुला, प्रॉमिस." बोलता बोलता अर्पिताने तेलाची बाटली आणली. 
"मामी, डोक्याला छान मॉलिश करून दे. जरा बरं वाटेल मला." 

क्रमशः
 

🎭 Series Post

View all