नाजूक रेशीमगाठी.. भाग ३

कथा त्याच्या अव्यक्त प्रेमाची


नाजूक रेशीमगाठी.. भाग ३



" आकाश, थोडे खाऊन घेतोस? मगाशी पण तसाच निघून आलास. काही बिनसले आहे का?"
" नाही आई.. असेच.. जरा दगदग झाली ना.."
" तेच सांगत होते मी मुग्धाला.. पण ऐकेल तर ना?"
" तिला काय झाले?" कितीही नाही म्हटले तरी कुतूहलाने आकाशने विचारले.
" तिला वाटले, तुला ती आवडली नाही. बोलला नाहीस ना तिच्याशी तू, म्हणून रडत होती.. क्षितिज समजावत होता तिला असे काही नाही. तू थोडा अबोलच आहेस म्हणून. पण तरिही रडणे काही थांबत नाही तिचे. थोडी अवखळ आहे अजून तशी ती..आणि आता तर तिला जास्तच जपायला पाहिजे." आकाश मन लावून आईचे बोलणे ऐकत होता.
" का?"
" अरे वेड्या.. काका होणार तू आता."
" अग पण आत्ताच लग्न झाले ना त्यांचे?" आकाशला आश्चर्य वाटले.
" हो रे. पण चुकतात कधी कधी गोष्टी. मीच म्हटले होऊन जाऊ दे एक नातवंड. परत हे तिथे गेल्यावर तिचे बाळंतपण कोण करणार?"
" तिथे गेल्यावर म्हणजे?"
" तुला सांगितलेच नाही ना? अरे क्षितिजला त्या परदेशी कंपनीत नोकरी मिळाली. त्यांची काय काय प्रोसेस सुरू आहे. एकदा गेले की दोनतीन वर्ष काही येता येणार नाही. मग मीच समजूत काढली, जे होते ते चांगल्यासाठीच."
" तिचे आईबाबा?"
" अरे नाहीत तिला. मामाने सांभाळले. म्हणून तर घाई केली ना लग्नाची त्यांनी. नाहीतर थांबलो नसतो का तू परत येईपर्यंत? ती चांगली नोकरी पण करते. तरिही बहिणीची पोर म्हणजे त्यांना असे वाटत होते लग्न करून दिली की जबाबदारीतून सुटका. माझ्या तर मनात भरली होती रे ही.."
" मी सहा महिने काय बाहेर गेलो, सगळे जगच उलटेपालटे झाले आहे." आकाश स्वतःशीच बोलला.
" चल बाहेर. नाहीतर परत रडूबाई भोकाड पसरेल." आईला तिचे खूप कौतुक वाटत होते. आकाश बाहेर आला. जेवणाची सगळी तयारी झाली होती. त्याच्या आवडीचा मेनू होता. त्या सुवासानेच त्याची भूक चाळवली गेली. त्याने जेवायला सुरुवात केली. पहिल्या घासातच त्याने डोळे मिटून घेतले.
" आई, हे सर्व जेवण मी गेले कितीतरी महिने मिस केले ग. खूप छान झाले आहे."
" हे सगळे मुग्धाने केले आहे. आजकाल मला स्वयंपाकघरात जायची परवानगी नसते. मी सध्या फक्त मजा करते आहे."
" आई, तुम्ही पण ना.." मुग्धा लाजली. आकाश बघतच राहिला. हे चुकीचे आहे त्याला समजत होते, पण तो स्वतःला सावरू शकत नव्हता. तिची आणि क्षितिजची जुळत असलेली केमिस्ट्री तो बघत होता. परत परत त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत होता. कसेबसे जेवून तो निघाला. जायच्या आधी न विसरता त्याने आणलेल्या भेटवस्तू सगळ्यांना दिल्या. मुग्धा ते सगळे बघून खुश झाली होती.
" थॅंक यू भाऊजी. मला हे खूप आवडले."
" मलाही तुला हे द्यायला खूप आवडले." जाणीवपूर्वक हसत आकाश तिच्याशी बोलला. भारतात परत आल्यावर आता आकाशने जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवायला सुरुवात केली. मुग्धा आता क्षितिजची बायको आहे हे तो मनाला समजावत होता, हळुहळू त्या धक्क्यातून बाहेर यायचा प्रयत्न करत होता.. पण तरिही.. मुग्धा त्याला आवडलेली पहिली मुलगी होती हे तो विसरू शकत नव्हता. दिवस नुसते पळत होते. क्षितिजची जॉइनिंग डेट आली. मुग्धा सुद्धा सुट्टी घेऊन त्याच्यासोबत मिळेल तेवढा वेळ घालवत होती.. गर्भारपणाचे तेज आता तिच्या चेहर्‍यावर दिसू लागले होते. या सगळ्या गडबडीत आकाशच्या लग्नाचा विषय परत मागे राहिला होता ज्याबद्दल त्याला हायसे वाटत होते. क्षितिजचा जायचा दिवस उगवला. रोज अखंड बडबडणारी मुग्धा आज शांत होती. डोळ्यातल्या आसवांना तिने कसेबसे रोखून धरले होते. तो घरातून निघाला मात्र ती स्वतःला थांबवू शकली नाही..


क्षितिज परदेशी गेल्यावर आकाश कशी घेईल घरातल्यांची काळजी.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all