नैराश्यावर मात--- जीवन म्हणजे ऊन-पाउस

नैराश्यावर मात

गरूडझेप या संस्थेकडून आज "घे भरारी" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आकाश आणि अंकिता सरदेसाई या जोडीला बोलावले होते.... या कार्यक्रमाचा मुळ उद्देश होता की आयुष्यात येणार्या नैराश्यावर कशी मात करावी?? म्हणूनच कार्यक्रमाचे नाव "घे भरारी" ठेवण्यात आले होते.

खरी गंमत तर इथे होती की, काही वर्षांपूर्वी याच संस्थेकडून नैराश्य या विषयावर आयोजित केलेल्या शिबीरात सहभागी झालेली जोडी म्हणजे आकाश आणि अंकीता..... आणि तिथुन बाहेर पडल्यावर त्यांच्या मध्ये एवढा फरक झाला होता की आज तें यशस्वी उद्योजक आणि उद्योजिका होते.... आजच्या या पाहुण्याचे स्वागत करायला आसावरी माने ज्या गरुडझेप या संस्थेच्या संचालिका होत्या, त्या स्वतः जातीने लक्ष देत होत्या....

थोड्यावेळात कार्यक्रम सुरू होणाऱ होता, हॉल अगदी खच्चाखच भरून गेला होता....आयोजकांची लगबग सुरू असते, आसावरी मॅडम अगदी गेटवरच उभ्या होत्या...पाहुणे आले,मॅडमनी खूप छान स्वागत केले त्यांचे... आकाश आणि अंकिताला अगदी भरून आले...त्यांनी अगदी नम्रपणे मॅडमना अभिवादन केले...
आज ते जे काही आहेत ते आसावरी मॅडममुळे याची त्या दोघांना पूर्ण जाणीव होती...

स्टेजवर सर्व मंडळी विराजमान झाली आणि आसावरी मॅडमनी निवेदनास सुरवात केली.. सर्वप्रथम त्यांनी संस्थेबद्दल सांगितलं आणि मग प्रमुख पाहुणे म्हणून आकाश आणि अंकिता यांची ओळख करून दिली.... त्यांचा सन्मान केला... सर्व प्रथम मी सरदेसाई ग्रुप ऑफ स्पाईसेसचे सर्वेसर्वा श्री. आकाश सरदेसाई याना विनंती करतो की त्यांनी चार शब्द बोलावे....

आकाश येतो, आणि बोलण्यास सुरुवात करतो...  सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझी ओळख मॅडमनी आताच करून दिली, पण खरी ओळख ती नाही... म्हणजे मी फार काही मोठा नाही, आणि आज जो काही आहे तो या संस्थेमुळे... काही वर्षापूर्वी मी इथेच आलो होतो... आयुष्याची सुरुवात करत असतानाच खूप कठीण प्रसंगातून जावं लागलं आणि तेव्हा साथ दिली ती, माझ्या या पत्नीने.... आता तुम्ही म्हणाल मग् इथे कसे आलो.... सांगतो सर्व सांगतो खर तर आम्ही दोघे पती-पत्नी आज जे आहोत तें आसावरी मॅडममुळे..... फार काही नाही पण थोड्या शब्दात माझे मनोगत मी व्यक्त करतो...

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे प्रसंग येतात तसेच माझ्याही आयुष्यात आले,त्यातला एक प्रसंग मी आज तुम्हाला सांगणार आहे, मी जेव्हा माझ्या या बिझनेसला सुरुवात करायच्या आधीची गोष्ट...आमचे लग्न ठरले होते...मी सिव्हील इंजिनीअर म्हणून एका साइटवर काम बघत असताना स्लॅब पडला आणि एक कामगार जागीच ठार झाला...मला अटक झाली आणि आमचे लग्न १५ दिवसांवर आले होते, टीव्हीवर वैगरे सगळीकडे माझी बदनामी करण्यात आली....आता लग्न कसे होणाऱ?? सुटका कधी होईल काहीच माहीती नव्हते, याचा झटका घेऊन बाबांना अॅटॅक आला, मी खूप depression मध्ये गेलो होतो...सगळीकडे काळोख... कारण अटक झाल्यावर आता मला कोण जॉब देईल?? एकही आशेचा किरण दिसत नसताना अंकिता मला जेलमध्ये भेटायला आली, आणि म्हणाली माझा पूर्ण विश्वास आहे सर्व व्यवस्थित होईल...मी बाबांची काळजी घेईन, आपण आपले लग्न तुम्ही सुखरूप बाहेर आल्यावर करू....तुम्ही काहीच काळजी करू नका मी आहे... तिच्या या एका वाक्याने मला उमेद दिली अन तिने दिलेली साथ आणि देवावर असलेला विश्वास यातून या कठीण प्रसंगाशी मी लढू शकलो..२ महिन्याने माझी सुटका झाली आणि पुढे ढकललेले आमचे लग्न लागले....तरीही मी खूप घाबरत होतो...सगळ्यांच्या नजरा मला बोचत होत्या....तेव्हा तिने मला जे सांगितलं तें आज मी तुम्हाला सांगतोय,

" आपल्या मनात असंख्य विचार एखाद्या पक्षाप्रमाणे फडफड करत असतात,त्या मधील सकारात्मक विचारांना मुक्त करून आकाशात उडणार्या पक्षाप्रमाणे आनंदी जीवन जगायचं की नकारात्मक विचारांमध्ये अडकून पिंजर्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे बंदिस्त जीवन जगायचं हे आपणच ठरवायचं असते...."
त्याच्या या वाक्यावर टाळ्या वाजतात....धन्यवाद देऊन तो पुढे बोलत राहतो,

लोकं काय म्हणतील??ह्या भीतीच्या पिंजर्यात अड़कुन पडण्यापेक्षा,आपले मन सांगतय त्याप्रमाणे स्वच्छंद जगलं तर खर्या अर्थाने मुक्त आयुष्य जगता येईल... अन मी असेच वागायचे ठरवले....

अंकिता ने खूप प्रयत्न केले, बोलून बोलून तीने मला परत उभे केले, माझा आत्मविश्वास परत मिळवून दिला.... आणि माझ्या बाबांचा हा मसाल्याचा धंदा मी वाढवायचा ठरवले....सगळं काही सुरळीत होत होते....आमच्या संसार रूपी वेलीवर फुल उमलणार होते... पण म्हणतात ना नियतीच्या मनात काही वेगळेच होते, एके दिवशी आम्ही फेरी मारून घरी येत असताना अंकिता पडली आणि जे व्हायला नको तेच झाले, आमचे बाळ या जगात येण्याआधीच आम्हाला सोडून गेले आणि अंकिता परत कधीच आई होऊ शकत नाही याचे दुःख देऊन गेले...अंकिता हा धक्का सहन करू शकली नाही... आणि ती  depression  मध्ये गेली...मला माझ्या आयुष्यात उभे करणार्या अंकिताला असे पाहून मी सुद्धा खचून गेलो होतो...

"कितीही कठीण परिस्तिथी आली तरी मनाचे धैर्य ढळू न देता धीर धरून करावा आलेल्या परिस्थितीशी सामना....
म्हणजे पूर्ण होईल आपली मनोकामना."

हे अंकिता चे वाक्य आठवत मी जगत होतो, आणि तिला सावरायचा प्रयत्न करत होतो...

अंकिताची तब्बेत बघून, माझे जीवन सुद्धा नीरस झाले होते त्याचा परिणाम माझ्या धंद्यावर झाला आणि मी लॉस मध्ये गेलो... ह्या वेळेस मला सावरायला अंकिता नव्हती.... आणि मी वाईट संगती मध्ये हरवून गेलो....

अंकिता ची ट्रीटमेंट ज्या डॉक्टरांकडे सुरू होती त्यांनी या संस्थेचा नंबर दिला....आणि आसावरी मॅडम शी आमची ओळख झाली....

पुढचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी माझी पत्नी अंकिता हिला सांगतो....

अंकिता येते, सर्वांना नमस्कार करते...आणि बोलते...
"कोणतीही व्यक्ती किंवा तिचे आयुष्य हे परीपूर्ण कधीच नसते,आपल्या मानण्याने आणि आत्मिक समाधानाने आयुष्यामध्ये परीपूर्णता येते आणि त्यासाठी गरज असते ती आत्मपरिक्षणाची...." हे आम्हाला या संस्थेमुळे शिकायला मिळाले....

आमच्या पहिल्या दिवशीच आसावरी मॅडमनी एक कविता वाचली होती...तीच मी तुम्हाला सांगतें....

खूप काहीआहे मनात,कोणाच्या सांगूं कानात,
लिहायचंय पानापानात,
पण मिळत नाही वेळ....
मिळाला जरी,तरी बसत नाही कधीच मेळ....
अखंड सुरूच आहे हा संसाररूपी खेळ....

रोज सुरूच असते ही तारेवरची कसरत....
पण माझे छंद मी कधीच नाही विसरत....

सगळ्यांसाठी आपण राहतो झटत....
थकूनभागून आपण जातो सतत.....

किती करा कोणासाठी नसते,कोणालाच किंमत...
आपण मात्र म्हणून,हरायची नसते हिम्मत...

रडायचं,भांडायचं,हसायचं,रुसायच,पडायच...
हे सार करताना हरलो जरी...
आपल्या साठी आपण परत उभे रहायच....

एकदाच मिळत आयुष्य,परत मिळत नाही..
म्हणूनच तें बनवायच एकदम सही....

आपणच आपल्याला मानायचे स्पेशल
मग् कॊणी काहि बोलो,मनात रहात नाही त्याची सल...

आपल्यालाच द्यायचा आहे आयुष्याला आकार आणि उकार.....
कारण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.....


त्याचं हे शेवटचं वाक्य मला खूप काही सांगून गेले...खरच आपले आयुष्य, आपले जीवन....कोणाच्या बोलण्यावरून का बदलायचे?? हळू हळू आम्ही परिस्थिती कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला, मी आई होऊ शकत नाही असा विचार सोडून मग् मी वेगळ्या बाजूने विचार केला आणि एक अनाथ आश्रम सुरू केले आणि आज मी ३० मुलांची आई झाले, आई होण्याचा वेगळा अर्थ मी समजले... माझ्या आश्रमाची नुकतीच सुरुवात आहे... पण ह्या मुलांनी मला एक वेगळा दृष्टीकोन दिला आयुष्याकडे बघण्याचा म्हणूनच मी म्हणेन,

समृद्ध आणि सुखी आयुष्याचे काय आहे गुपित....???
कोणत्याही परिस्थितीवर/ आयुष्यात आलेल्या नैराश्यावर  मात करण्याची कसब ठेवावी लागतें संसाररूपी कुपीत....

आयुष्यात खूप कठीण प्रसंग येतात, पण मानसिकदॄष्ट्या समाधानी असलेला माणूस कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये न डगमगता खंबीरपणे उभा राहतो. म्हणुन नेहमीच आपला आत मध्ये जो आवाज आहे तो ऐका....प्रत्येक रात्रीनंतर एक नवीन दिवस सुरू होत असतो, तसेच आपल्या आयुष्यात देखील किती दुःखाचे काळे ढग आले तरी त्यानंतर येणारे इंद्रधनु नक्कीच सुखाची उधळण करते...

कोणत्याही कठीण प्रसंगात एक आशेचा किरण नेहमीच दिसतो,तो म्हणजे आपला आतला प्रकाश....त्याच्यावर विश्वास ठेवून जो पुढे जातो तो नेहमीच यशस्वी होतो....

जेव्हा तुमच्या मनाचे खच्चीकरण होऊन जीवन नीरस होईल....तेव्हा देवाला स्मरण करून केलेली प्रार्थना आपले जीवन प्रफुल्लित करेल....आणि मनाला शांती आणि समाधान मिळेल....

जोरात टाळ्या वाजतात....

अजून एक मी जाता जाता सांगतें.... कोणत्याही परिस्थिती मध्ये नेहमीच महत्वाच असते तें 'आत्मपरिक्षण'....
कोणत्याही व्यक्तीचा दर्जा हा त्याच्याकडे असणारा पैसा किंवा त्या व्यक्तीने शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेले गुण यावरून कधीच ठरवू नये,त्याच्या वर्तणुकीतून आणि त्याच्यावर झालेल्या संस्कारावरून त्या व्यक्तीचा दर्जा म्हणजेच त्याची गुणवत्ता दिसून येते आणि त्यासाठी महत्वाचं असते ते म्हणजे "आत्मपरिक्षण..." कारण त्यामुळेच आपले व्यक्तीमत्व विकसित होते अन आपला दर्जा वाढतो...


आत्मपरीक्षण करून स्वतःला बनवा सशक्त...
सोडा त्यांची साथ जे आहेत विचाराने अशक्त....
स्वतःला करा छंदामध्ये आसक्त....
त्यामुळे तुमचे आयुष्य कधीच राहणार नाही रिक्त....
येणार्या दूःखावर मात कराल तुम्ही सशक्त....
आणि जीवन जगाल आनंदी आणि मुक्त.....

आसावरी मॅडमचे खूप आभार मानते की आज त्यांच्यामुळे आम्ही आमच्या  आयुष्यात आलेले नैराश्याचे जाळे दुर करू शकलो....आणि आज तुम्हा सर्वांसमोर एवढ्या बिनधास्त व्यक्त होऊ शकलो....

शेवटी आपले आयुष्य म्हणजे आशा-निराशा यांचा खेळ आहे.....कितीही कठीण प्रसंग आला तरी हार मानू नये. हेच मला या कथेतून दाखवायचे आहे....कथा पूर्ण काल्पनिक आहे....तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा....लाइक आणि कंमेंट करत रहा..

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.... लेख आवडला असेल तर नावासहीत शेअर करायला माझी हरकत नाही...

© अनुजा धारिया शेठ

१४/०७/२०२०