नैराश्य आणि त्यावरची मात

You get your life only once...and the one who gave it you only decides how you will live it..you just need to do is trust on him and survive...he will give you the direction and also make sure you will not fall down! Trust on God..have faith and move

ती ! सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली. अगदी लहान असतानाच घरच्या भांडणात आई तिच्या माहेरी निघुन गेलेली मग ही आणि हिची लहान बहीण दोघी वडीलांकडेच. वडिलांचा मुलींवर आणि मुलींचा त्यांच्यावर खूप जीव... काही न कळण्याचं वय होत ते म्हणूनच घरातल्या 'गृहिणी' ची जागा फार पटकन घेतली तिने ! अभ्यास सांभाळून जमेल तसं सगळं करत होती. संध्याकाळी आजूबाजूची हिची 'समवयस्क लोकं' बॅट बॉल, विटीदांडू खेळायची तेव्हा हिच्या हातात लाटणं असायचं पण कधी तक्रार नाही केली , वाटायचं सगळं पण पडलेल्या प्रश्नाची उत्तरं आणि त्यातून मार्ग मिळणार नाही हे त्या अजाणत्या वयात समजलं होत म्हणून सगळं निभावून नेत होती. पण शेवटी माणूसच ना कधी तरी परिस्थिती वर निराश व्हायची, देवाला हात जोडून डोळ्यांनीच विचारायची माझ्याच बाबतीत हे का? दोन अश्रू गाळून पुन्हा जैसे थे! तिला स्वप्नरंजन करायला खूप आवडे, आत्ता ही परिस्थिती आहे पण बदलेल एक दिवस. कुणाचंतरी आयुष्यात येणं होईल आणि जादूची कांडी फिरवल्यासारखं सगळं बदलेल. डायरी लिहिणं हा अजून एक छंद तिचा, तिची सगळी सुखं दुःख ती तिच्या या प्रिय सखीला सांगे.
शिक्षण झालं नोकरी लागली आणि त्यात एका नाजूक वळणावर अचानक त्याच येण झालं, स्वप्नातल्या राजकुमार टाइप्स...साखर पाण्यात विरघळावी तस तिनं तिचं आयुष्य विरघळवून घेतलं त्याच्या आयुष्यात. भरभरून प्रेम करायची फक्त एकाच अपेक्षेवर की हे सुख तिला कधीच सोडून जाणार नाही. पण म्हणतात ना आपण कितीही मनात सकारात्मक विचार आणले तरी एक सुप्त भीती त्यावर मात करते आणि तसच झालं! तो निघून गेला...तिला सोडून...त्याला त्याची काही वैयक्तिक कारणं असतीलही पण ही पुन्हा एकटी पडली. 
दिवस जात होते पण त्याच्या आठवणी काही धूसर होत नव्हत्या. किती लांब पळणार?जिथे जाईल तिथे त्यांच्या प्रेमाचं अस्तित्व होतं आणि मुख्य म्हणजे तिच मन, हृदय पूर्ण त्यानंच व्यापलं होत. तिचं जगणं अशक्य होत चाललं होतं आणि हे फक्त त्या दोघींनाच माहीत होतं एक ती आणि एक तिची सखी, तिची डायरी!
दुसऱ्या दिवशी अचानक दुपारीच ऑफिस मधून घरी निघाली, या विचारांत की आता बास... खूप झालं आणि नाही सहन होत... येता येता तिच्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनाला गेली, नेहमी प्रमाणे डोळ्यांतून च विचारलं 'मी असं काय पाप केलय की माझ्याच आयुष्यात दरवेळी हे असं? तू जे दिलंस जसं दिलंस ते गोड मानून घेतलं...शिक्षण वेगळं घ्यायचं होत पण पैसे नाहीत म्हणून मिळेल तिथे ऍडमिशन घेतली, नोकरी पण जी मिळेल ती पत्करली परिस्थितीमुळे, काही नाही बोलले. तुझ्यावर विश्वास ठेवून; पण जी गोष्ट माझी नाही, नाही राहणार माझ्यासोबत आजन्म त्याची ओळख तरी तू का करून देतोस? काय कमी राहिली माझ्यात?माझ्या प्रेमात? आत्ता पर्यंत खूप सहन केलं पण आता नाही.. हे दुःख शेवटचं. अस म्हणून स्वतःला संपवायच्या निर्धारान घरी आली आणि तडक स्वतःच्या खोलीत गेली आणि समोर बघते तो काय तिची जिवाभावाची सखी घेऊन तिचे वडील बसले होते, तिनं कधीही न बोललेलं दुःख त्यांच्या समोर घेऊन! शेवटच्या पानावरचा तिचा आत्महत्येचा विचार वाचून तो जन्मदाता हारून, गळून गेला होता. त्यांनी तिच्याकडे पाहिलं... भरल्या डोळ्यांनी उठून तिच्यापाशी आले आणि हात उचलला...तिनं घाबरून डोळे बंद केले पण वडिलांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले 'जखम ओली आहे आत्ता, म्हणून त्रास देतेय पण काळानुरूप भरेल हे नक्की, तुझ्यासमोर मोठं उदाहरण आहे... आणि एक लक्षात ठेव जर तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईशिवाय राहू शकता तर आयुष्यात तुम्ही कोणाशिवायही राहू शकता'.
त्यांनी डायरी खाली ठेवली आणि बाहेर गेले. तिनं डोळे उघडले, वडिलांची दोनच वाक्य ऐकून तिला जणू कुणीतरी निराशेच्या खोल गर्तेतून खेचून जोरात बाहेर काढल्याच जाणवलं. आयुष्यात यापुढेही खूप नैराश्य येईल पण बाप्पांन दिलेलं आयुष्य संपवण्याचा अधिकार आपल्याला नाही हे तिला कळालं, ती पुन्हा नव्यानं उभी राहिली आणि डायरी च नवीन कोरं पान उघडलं, नवीन सुरुवात करायला...!