"नाही" म्हणता आलेच पाहिजे

Learn To Say No
तनुजा कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती. वयाची तिशी ओलांडलेली... अविवाहित...तुषार तिचा वरिष्ठ सहकारी ... त्याच्याबद्दल तिच्या मनात तरल भावना उमलू लागलेल्या...

तनुजाला तुषारबद्दल फार आकर्षण.. इतका देखणा आणि उच्चपदस्थ व्यक्ती आपल्यासोबत बोलतो ह्याचं अप्रूपही खूप...तुषारने तिच्या मनातलं आकर्षण जाणलं होतं. आता एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर झाले. व्हाट्सऍपवर चॅटिंग सुरु झाली.. रात्रीचे कॉल्स, व्हिडीओ कॉल्स... कॉफीशॉप मधल्या भेटी... संपर्क सतत वाढू लागला आणि तनुजाची तुषारबद्दलची ओढही...

एक दिवस तुषारनं तिला दुपारी मित्राच्या फ्लॅटवर बोलावलं... तनुजाला जरा काळजी वाटली आणि भीतीही...तिनं त्याला टाळण्याचा क्षीण प्रयत्न केला.

पण त्यावरची प्रतिक्रिया म्हणून तुषारने पांघरलेला निर्विकारपणा तिला खोलवर चिरत गेला. आपल्या नकारामुळे आपण तुषारला गमावून बसू की काय ह्या भीतीने तिची विचारशक्ती काम करेनाशी झाली अन् मनात "तश्या" भावना नसतानाही ती सतत स्वतःला लुटत राहिली... फसवत राहिली...

कॉलेजमध्ये ह्याचा बोभाटा झाला तेव्हा ती भानावर आली... एव्हाना तुषारला स्वतःचा संसार आहे आणि आपल्या ह्या नात्याला काहीच भवितव्य नाही शिवाय त्यानं आपल्या प्रेमभावनेचा गैरफायदा घेतलाय हे तिला कळून चुकलं. ही टोचणी तिला आयुष्यभरासाठी लागून राहिली.

स्वतःचं सर्वस्व लुटून देताना मित्राच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन मैत्रीची सीमारेषा ओलांडताना जरा विचार करता आला असता तर? मैत्री, आकर्षण आणि प्रेम ह्यातला फरक लक्षात घेऊन तनुजानं वेळीच "नाही" म्हटलं असतं तर ?

*************************************

विनया एका राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीला आहे. तिच्या बहिणीच्या नवऱ्यानं चेन मार्केटिंगचं एक प्रपोजल आणलं त्यात तिनं एक लाख गुंतवायचे होते आणि ह्या चेनमध्ये आणखी चार सदस्य जोडायचे होते. त्याबदल्यात तिला एक ठराविक रक्कम मिळणार होती आणि ही चेन जसजशी पुढे जाईल तसतशी ही रक्कम वाढणार होती.

वास्तविक विनया बँकेत नोकरीला असल्याने तिला अश्या फसव्या योजनांची माहिती होती पण हा समोरचा व्यक्ती म्हणजे सख्ख्या बहिणीचा नवरा ! त्यावेळी त्याची नोकरी गेलेली म्हणून तो "हे" काम करत होता. त्याला  "नाही" म्हटलं तर आपल्या बहिणीला काय वाटेल? तिला सासरी त्रास होईल म्हणून तिनं त्यांना एक लाख रुपये दिले पण पुढे सदस्य जोडता न आल्याने तिला त्याचा परतावा तर मिळाला नाहीच शिवाय आहे ते पैसेही गमावून बसली.

विनयानं कठीण काळात बहिणीला मदत करायला काहीच हरकत नाही आणि तिला ती अन्य मार्गाने करता आलीच असती. पण बुडीत खाती जाणार हे माहित असताना ही गुंतवणूक करण्यासाठी तिला "नाही" म्हणता आलं असतं तर??

*************************************

अनघा माहेरी आणि सासरी सगळ्यांना प्रिय! सोसायटीतल्या मैत्रिणींची अगदी लाडकी मैत्रीण!! कोणाला काही मदत लागली तर करायला अगदी तत्पर!!! "नाही" म्हणायचा स्वभावच नाही तिचा!!!

अगदी शेजारी लग्न-मुंज-बारसं-डोहाळजेवण-भिशी काहीही असो, अनघा तिथे जाणार आणि हक्कानं राबणार...

घरीही तेच...कोणीही यावं आणि हक्कानं काहीही मागावं, अनघा देणार म्हणजे देणार!!!

"कुणी मला वाईट म्हणू नये, सगळ्यांनी मला चांगलं म्हणावं" ह्यासाठी ती सतत प्रयत्नशील.

पण हल्ली पन्नाशी जवळ आली तशी तब्येत बरी नसते तिची... मेनोपॉज जवळ आलाय.. सतत डोकं दुखतं, जेवण जात नाही , अशक्तपणा आलाय, सतत झोपून राहावंसं वाटतं...

सकाळीच शेजारच्या सोसायटीतल्या पांडे वहिनींचा फोन आला.. त्यांच्याकडे भिशीची पार्टी आहे आज अन् डोसे-भाजीचा बेत आहे... अर्थातच वेळेवर गरमागरम डोसे घालायला अनघा आहेच! पार्टी दुपारी चार वाजता असली तरी अनघाला दोन वाजताच बोलावलंय..

खरंतर आजही तिला बरं वाटत नाहीये... अंगावर खूप जातंय...अगदी उठवत नाहीये...

वास्तविक त्यांनी डोश्याचा मेनू ठरवताना अनघाला विचारलंसुद्धा नाहीये. ती मदतीला येणारच हे गृहीत धरून सगळं परस्पर ठरवलंय.

पण "डोश्यांचा घाट घातलाय पांडे वहिनींनी, त्यांना एकटीला कसं झेपेल एव्हढं सगळं" असा विचार करत अनघा उठलीच अन् त्यांच्याकडे भिशी पार्टीच्या तयारीला गेली.

जवळपास सतरा-अठरा जणांसाठी डोसे करून घालण्यात संध्याकाळचे सात वाजले. अनघाच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. तशीच काही न  खाता -पिता ती घरी आली. रात्री भोवळ येऊन पडली तसं तिला दवाखान्यात भरती करायला लागलं.

आधीच तब्येत बरी नाही तर पांडे वहिनींना "नाही" म्हणणं अनघाला जमलं असतं तर? स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करून दुसऱ्यांना मदत करायला जाणं किती महागात पडलं!

*************************************

मैत्रिणींनो, मला एव्हढंच सांगायचंय की आपण बरेचदा समोरच्या व्यक्तीचा, त्यांच्या आनंदाचा, सोयीचा विचार करून आपल्याच मनाविरुद्ध काम करत असतो, निर्णय घेत असतो.

एरव्ही असं वागणं योग्य असेलही पण जेव्हा त्याचा परिणाम आपल्या आनंदावर, स्वास्थ्यावर होत असेल किंवा त्यामध्ये आपलं काही नुकसान होत असेल तर "नाही" म्हणता आलंच पाहिजे...

नाही का?