नागपूर स्पेशल तर्री पोहा Recipe in marathi

सकाळी सकाळी मस्त गरमागरम पोटभर नाश्ता करा


नागपुरी स्पेशल


"तर्री पोहा"

     नागपुर म्हटलं कि त्या शहराची सर्वात फेमस रेसिपी म्हणजे तर्री "पोहा" हा खुप स्पेशल आहे . आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत . हेल्दी आणि पोट टम्म भरणारी . आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे ह्या दिवसांत कडधान्ये खाल्लेले चांगले असते त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्या जेवणात ते असले पाहिजे . 


चला तर मग आधी आपण तर्री कशी बनवायची ते बघूया . त्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे ... 


साहित्य : एक वाटी काळे चने म्हणजे आख्खे हरभरे , दोन मोठे कांदे , आल एक इंच , आठ ते दहा लसून पाकळ्या , दोन हिरव्या मिरच्या , दोन टोमॅटो , हळद , हिंग , दोन चमचे लाल मिरची पावडर , एक चमचा रंगासाठी काश्मिरी लाल मिरची पावडर , धने पावडर , एक चमचा कसूरी मेथी , एक चमचा बेसन पीठ , एक चमचा गरम मसाला किंवा वऱ्हाडी मसाला किंवा काळा मसाला किंवा तुमच्याकडे जो घरात बनवलेला असेल तो , बारीक चिरलेली कोथिंबीर , मीठ चवीनुसार आणि तेल पाच पळ्या .

कृती : सर्वप्रथम हरभरे रात्रभर पाण्यात भिजवून त्याला कुकरमध्ये छान मऊसर मीठ घालून शिजवून घेणे . कांदा हिरवी मिरची आलं लसूण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणे घोटभर पाणी घालून .

आता पॅनमध्ये तेल घालणे . तेल जरा जास्त घालणे कारण तर्री म्हटल्यावर तेलाचा तवंग वरती दिसायला हवा . तेलात मोहरी जीरे तडतडल्यानंतर हिंग आणि हा वाटलेला कांद्याचा मसाला घालून छान परतवून घेणे . त्यात लाल मिरची पावडर हळद धने पावडर वऱ्हाडी मसाला कसूरी मेथी हे सर्व मसाले घालून झाले कि छान तेल सुटेपर्यंत परतून घेणे . आता तुम्हांला मी इथे एक टीप देते ... कुठलीही पातळ मसाला भाजी बनवतांना त्यात एक चमचाभर बेसन पीठ घातल्यावर रस्सा छान असा दाटसर होतो त्यामुळे ह्या भाजीत पण एक चमचा बेसन पीठ घालून छान एकत्र करून घ्यायच मसाल्यात . आपला मसाला परतवून झाला की मग त्यात शिजवलेले काळे चणे म्हणजेच हरभरे घालून घेणे तसेच एक ग्लासभर पाणी घालणे आणि मंद आचेवर उकळायला ठेवणे . चवीनुसार मीठ पण लागलीच घालणे . 

आता त्यात दोन टोमॅटो मोठे काप करुन म्हणजे दोन किंवा चारच फोडी करून त्यात घालणे आणि पुन्हा उकळायला ठेवणे . पंधरा ते वीस मिनिटे बारीक गॅसवर छान उकळल्या नंतर आता यात वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणे . आपली तर्री तयार आहे .


आता आपण पोह्याची रेसिपी बघूया


साहित्य : एक मोठा कप जाड पोहे , दोन कांदे बारीक चिरलेले , चार हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या , मुठभर शेंगदाणे , जीरे मोहरी , हळद , हिंग , कढीपत्ता , मीठ चवीनुसार , बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तेल .

कृती : सर्वप्रथम जाड पोहे पाणी घालून धुवून घेणे आणि नंतर ते एका चाळणीमध्ये काढणे म्हणजे जास्तीच पाणी निघून जाते आणि पोहे छान भिजतात .

एका कढईमध्ये तेलात मोहरी तडतडल्यानंतर जीरे आणि शेंगदाणे घालून खरपूस तळून  घेणे . आता त्यात हिरवी मिरची कढीपत्ता आणि कांदा परतवणे . कांदा छान गुलाबीसर झाल्यावर त्यात हळद घालणे . आता यात भिजवलेले पोहे घालून त्यात चवीनुसार मीठ घालून छान सर्व एकजीव मिक्स करून घेणे . तुम्हांला आवडत असेल तर साखर एक चमचा घालणे . त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ देणे आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून घेणे .

आपले पोहे तयार आहेत . तुम्हांला बटाटे किंवा हिरवे ताजे वाटाणे आवडत असेल तर यात कांद्यासोबत ते देखील परतवून घ्यायचे म्हणजे कांद्यात घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायचे . 


आता एका मोठ्ठ्या प्लेट मध्ये पोहे घेणे आणि त्यावर थोडे चणे घालून बाजूने जास्त तर्री घालणे . यावर बारीक चिरलेला कांदा , बारीक शेव किंवा फरसाण आणि लिंबू पिळून मस्त सजवणे . आणि हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोटो काढायला विसरायच नाही ... चला तर मग आपले झणझणीत तर्री पोहे तयार आहे खाण्यासाठी .


सकाळी सकाळी इतका स्वादिष्ट आणि पोषक आहार घेतला की लवकर भूक लागणार नाही . 


चला तर मग वाट कसली बघताय , लागा कामाला .

किचन तुमचे आणि रेसिपी माझी .

करून पहा आणि सगळ्यांना खाऊ घाला , ह्यापेक्षा जास्त आनंद कशातच नाही . 


मला वाचत रहा आणि असेच नवनवीन रेसिपी बनवून खात रहा . 


धन्यवाद 


सौं तृप्ती कोष्टी 


🎭 Series Post

View all