शाळा सुरू होऊन आता बरेच दिवस झाले होते आणि सगळ्यांना सहलीचे वेध लागले होते. दरवर्षी आमच्या शाळेतून वेगवेगळ्या ठिकाणी सहल नेली जाते. आता यंदाच्या वर्षी सहल कुठे जाणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता होती आणि शेवटी तो दिवस आला. आमच्या शाळेची सहल यावर्षी गंगा नदीकिनारी जाणार असं ठरलं आणि आम्ही ठरलेल्या दिवशी सहलीसाठी गेलो. तिथलं दृश्य खूप सुंदर होतं. समोर वाहणारी पवित्र गंगा नदी, त्यात स्नान करणारे भाविक आणि आपल्या दिव्यंगत नातेवाईकांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी आलेले कुटुंबीय असे बरेच लोक होते. सगळे दृश्य न्याहाळत आम्ही नदीकिनारी बसलो. नदीचे ते रूप खूपच मोहक होते. शिक्षकांनी नदीच्या फार जवळ जाऊ नका म्हणून सूचना दिल्या आणि आपापले डबे काढायला सांगितले. मी डबा घेऊन थोडी लांबच जाऊन बसले होते. आसपास जास्त वर्दळ नव्हती. वरचेवर नदीत असणारा प्लॅस्टिकचा कचरा तरंगत तरंगत किनारी येत होता पण त्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि स्वतःच्याच विश्वात रमुन नदीच्या पाण्याचा संथ खळखळाट ऐकत होते. तो आवाज कानात साठवत मी एकटक नदीकडे बघत होते. नदीचे रूप बघता बघताच मी डबा खाल्ला आणि पुन्हा सगळे जिथे होते तिथे जायला वळले. एवढ्यात मला कोणीतरी "मुली! ए मुली!" अशी हाक मारली. अचानक आलेल्या त्या आवाजाने मी दचकून इकडे तिकडे पाहिलं पण कोणी दिसलेच नाही. पुन्हा आवाज आला; "घाबरु नकोस. मी गंगा. गंगा नदी बोलतेय. मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे."
स्वतःला सावरत मी नदीकडे बघितलं आणि म्हणाले; "गंगा माई साक्षात तू बोलतेय? मी खूप नशीबवान आहे. बोल ना." माझ्या या वक्तव्यावर नदी हसली आणि बोलू लागली.
"मी गंगा. तुला माहीतच आहे हिंदू धर्मात माझे किती महत्त्वाचे स्थान आहे. इथे अनेक भाविक अगदी श्रध्देने येतात. माझ्या डोहात अंघोळ करतात, माझी पूजा करतात. मला त्यांचा हा विश्वास खूप आवडतो. साक्षात भगवान शंकरांच्या मस्तकी मला स्थान आहे. अनेक भक्तांची अशी श्रद्धा आहे की, माझ्या पाण्याने आंघोळ केली की पापे धुतली जातात. पवित्र पूजा विधी असो वा अंत्यविधी माझे जल पवित्र मानले जाते आणि त्यात सगळेच त्याचा वापर करतात. अनेकांना इथे रोजगार मिळतो, माझे कित्येक शेतकरी पुत्र माझ्यावर अवलंबून आहेत. आपण कोणाच्यातरी कामी येतोय हे बघून मनाला फार समाधान मिळतं. सगळी माझीच मुलं त्यामुळे मी त्यांच्या चुका आणि पापं माझ्या पोटात घेते पण आजकाल आता त्यांच्या चुका आणि पापांसोबत मला प्लास्टिक आणि कचरा पण माझ्या पोटात घ्यावा लागतोय. जसे माणसं माझी बाळं आहेत तशीच माझ्या उदरात राहणारी सगळी जलचर देखील माझीच आहेत. या सगळ्या कचऱ्यामुळे आणि प्लास्टिकमुळे त्यांना खूप त्रास होतो. कित्येक मासे तडफडून माझ्या डोळ्या देखत गेलेत.
आधी अगदी मनसोक्त सरळ सरळ माझे पाणी घेऊन पिणारे लोक आता नक्कीच विचार करतात. तुम्ही सगळ्यांनी विज्ञानात प्रगती केली त्याचा वापर करून माझ्यातले पाणी किती दूषित आहे याच्या चाचण्या देखील केल्या. माझ्या पाण्यात बहुतांश ठिकाणी बरेच प्रदूषण आढळले आहे. त्या ओळी आहेत ना; "राम तेरी गंगा मैली हो गयी पापीयो के पाप धोते धोते" त्या सत्य होताना दिसत आहेत. इथे पाप म्हणजे माणसांनी माझ्या पात्रात टाकलेली सगळी घाण, सांडपाणी, रसायने आणि सगळ्यात मोठं पाप म्हणजे प्लास्टिक आहे.
जेव्हा मी वाहत वाहत पुढे माझ्या बहिणींना भेटते तेव्हा माझ्यामुळे त्यांनाही त्रास होतो. माझ्या पाण्याला येणारा कुबट दर्प जलचारांचे श्वास कोंडतो. पुढे आम्ही सगळ्या मिळून समुद्राला मिळतो त्याच्यात पण प्रदूषण शिरकाव करते. मला माहित आहे जग प्रगती करणार त्याबरोबर कचरा वाढणार, रसायने वाढणार पण यावरही उपाय आहेत ना?
कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करणे, सांडपाणी प्रक्रिया करून मगच सोडणे आणि निर्माल्य नेहमी निर्माल्य कलशात टाकणे. हे एवढं जरी सगळ्यांनी मनापासून केलं ना तरी मी आपोआप स्वच्छ होईन. सध्या सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमा खूप उपयोगात येतायत पण अश्या मोहिमा ज्या दिवशी राबवाव्या लागणार नाहीत त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझ्या बाळांनी प्रगती केलेली असेल.
सध्याच्या या धावत्या काळातच मी जास्त घाण होतेय. माणसाच्या प्रगतीच्या आणि राहणीमानाच्या व्याख्या जश्या बदलायला लागल्यात तसे माझ्यावर बंधारे बांधण्यात येऊ लागले. शेतीसाठी आणि पाणी साठवणुकीसाठी जेवढे आवश्यक होते तेवढे ठीकच आहेत पण कचरारुपी जे बंधारे आहेत त्यांचं काय? एकाचवेळी कितीतरी टन कचरा माझ्या पात्रात टाकण्यात येतोय आणि म्हणूनच मला पुढे जायला अडथळा निर्माण होऊन पाणी स्वच्छ होतच नाहीये.
समुद्र, डोंगर, झाडे, मी आणि माझ्या इतर मैत्रिणी आम्ही सगळे निसर्गाचा एक भाग आहोत. आम्हालाही मनापासून वाटतंय माणसाने प्रगती करावी खूप खूप प्रगती करावी पण आमचा आणि मुक्या प्राण्यांचा पण विचार करावा. माणूस फक्त स्वतःचा स्वार्थ बघतोय पण आम्हालाही इच्छा आहे या प्रगतीच्या वाटेवर जग जात असताना त्यात खारीचा वाटा आमचाही असावा. आम्हालाही काही कोणाला त्रास द्यायचा नाहीये.
प्रगती पथावर असताना माणूस नेमकं हेच विसरतो. आजचे ऋतुमान नीट राहिले नाही, उष्णता वाढतेय, बर्फ वितळत आहे, नद्यांना अचानक पूर येतायत आणि मग माणसाने जे भौतिक जग उभे केले आहे त्याचे फार मोठे नुकसान होते पण हे सगळं माणसामुळेच ना? ज्या दिवशी हे असं घडतं आणि लोकांच्या तोंडून कुठे किती आर्थिक नुकसान झालं, किती जीवित हानी झाली याचे आकडे ऐकले की काळजात धस्स होतं. मलाही याचं फार वाईट वाटतं पण म्हणतात ना अती तिथे माती तसंच घडतं आणि मग फक्त बघत राहण्याशिवाय पर्याय नसतो. निसर्ग नियमानुसार कालांतराने सगळे सगळं विसरून पुन्हा त्यांच्या त्यांच्या जीवनात व्यस्त होतात पण माझ्या मनातून ही सल काही जात नाही. या सगळ्याला माणूस कारणीभूत असला तरी निमित्त मात्र मी ठरते.
पूर्वी नदीचा काठ म्हणलं की लहान मुलं, बायका, नदीत पोहायला येणारी मुलं अशी वर्दळ असायची पण आता तसं काहीच नाही. गाई गुरं जरी आता माझ्या पात्रातून पाणी प्यायला आली तरी तोंड फिरवून तसेच तहानेने व्याकुळ असताना मागे फिरतात. त्या मुक्या प्राण्यांना देखील कळतंय माझे पवित्र पाणी आता विषाचा घोट झालाय. मला तर भविष्याची फार काळजी लागून राहिली आहे. आजच्या पिढीने निदान मला बघितलं आहे. मी नदी आहे हे आजतरी ओळखू येतंय पण उद्या जेव्हा माझं वाहणं बंद होईल, प्रदूषणाने माझे पवित्र, स्वच्छ पाणी काळे होईल आणि त्यात डास, किडे यांचे निवास असतील तेव्हा ती पिढी मला ओळखेल का? की त्यांच्यासाठी गंगा नदी फक्त पुस्तकात राहील? असो! आज बऱ्याच वर्षांनी मन मोकळं करून बरं वाटलं. एका आईची इच्छा म्हणून तरी माझ्यात कचरा टाकू नका. आई म्हणून मी तुम्हाला कितीही माफ केलं तरी निसर्ग त्याचं काम करणारच."
एवढं बोलून नदी अचानक बोलायची थांबली. मी त्या खळखळत्या नदीकडे एकटक बघत होते. जणू नदी ढसाढसा रडत आहे असं वाटत होतं. नदीच्या पात्रात तरंगणारी खाऊची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, कागदाचे तुकडे, हार आणि फुले पाहून मला नदीचे शब्द आठवू लागले. मी माझा डबा तसाच ठेवून नदी किनारी असलेला कचरा उचलू लागले. नदीच्या अस्तित्वासाठी किंबहुना आपल्याच चांगल्या भविष्यासाठी आणि आपल्याच अस्तित्वासाठी मला या स्वच्छता मोहिमेत खारीचा वाटा उचलायचा होता. मला बघून माझ्या इतर मित्र मैत्रिणींनी आणि शिक्षकांनी देखील यात सहभाग घेतला. या सहलीत खूप काही शिकायला मिळाले आणि नदीने स्वतः माझ्याशी बोलून डोळ्यात अंजन घातले त्यामुळे तिथून निघताना मनोमन मी नदीचे आभार मानले आणि जमेल तशी निसर्गाची काळजी घेईन, नदीत कधीही कचरा, निर्माल्य टाकणार नाही अशी शपथ घेऊन सगळ्यांसोबत निघाले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा