नांव... एक घेणे

Maharashtrian Tradition


श्रावण महिना आलाय.आता इथून पुढे सणवारांची अगदी रेलचेल असणार आहे.नवीन लग्न झालेल्या मुलींचे वर्षाचे सण आता सुरु होणार आहेत.

लग्नातले विधी असोत की सणवारांच्या पूजा, समारंभाला रंगत येते ती छान छान कपडे, चविष्ट जेवण,प्रेमाच्या माणसांसोबत रात्र रात्र जागून रंगवलेल्या गप्पा आणि ह्या अनुषंगाने घेतले जाणारे उखाणे म्हणजेच "नांव घेणे".

पूर्वीच्या काळी स्त्रिया आपल्या पतीला नावाने हाक मारत नसत.पण लग्न-कार्यप्रसंगी, नातलग आणि मित्रमंडळींच्या मैफिलीत, घरी पूजा-अर्चा असेल तर मात्र स्त्रिया लाजत मुरडत पतीचे नाव घेत पण उखाण्यात गुंफून...

पतीचे नांव उखाण्यात घेतल्यानं पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं असं म्हणत. समोरच्या व्यक्तीनं आग्रह केल्यावरच "नांव" घ्यायचे असाही एक अलिखित नियम आहे !

उखाणे तयार करणं हे अतिशय कौशल्याचं काम आहे.त्याच्या ओळींमध्ये यमक तर जुळलं पाहिजेच पण त्या नाजूक आणि अर्थपूर्ण ही असायला हव्यात.

जुन्या चाणाक्ष स्त्रिया नववधूच्या उखाण्याच्या निवडीवरून तिच्या संस्कारांची आणि विचारांची पारख करीत.मग चतुर वधूही उखाण्यात सासूबाईंचे किंवा नणंदबाईंचे नांव अलगद गुंफून त्यांना खूष करून टाके !

लग्नानंतर लक्ष्मीपूजनाच्यावेळी जोडीने सासूच्या हातावर साखर घालताना-

"चुकलं माकलं पदरात घ्या, घाला मायेची पाखर
*****रावांचं नांव घेऊन देते तुम्हाला साखर"

असा उखाणा नववधूने घ्यायचा अवकाश की सासूच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि कृतार्थतेची छटा पसरे !आणि सूनबाई हळूच सासूबाईंच्या हृदयात प्रवेश करीत !

तसंच लग्नानंतरच्या पहिल्या सणाला माहेरवाशिणीनं उखाणा घ्यावा-

"अरुणोदयाच्या आगमनाने उषा होते हासरी
******रावांच्या सहवासात सुखी आहे सासरी"

अन् बैठकीच्या खोलीत बसलेल्या वडिलांसहित साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी यावं !

मला उखाणे म्हटलं की अगदी नॉस्टॅल्जीक व्हायला होतं आणि डोळ्यासमोर दोन्ही खांद्यावरून पदर सावरत, खाली मान घालून, लाजत अगदी हळू आवाजात "नांव" घेणाऱ्या नववधू काकू आणि मावशी आठवतात.

ह्या लग्न ठरलेल्या मुलीला कपडे, दागिने, मेंदी ह्यासोबतच उखाण्यांचीदेखील तयारी करावी लागे. मग ती सौभाग्यकांक्षिणी एखाद्या रसिक काकू, आत्या, ताई किंवा मैत्रिणीची मदत घेई.एका कागदावर उखाणे लिहून घेतले जात अन् मग उखाण्यांचे पाठांतर सुरु होई.होमवर्क कितीही चांगलं केलं तरी ऐनवेळी उखाणा घेताना काहीतरी गडबड होई आणि बऱ्याच गमतीजमती घडत.

एका नवरीनं असा उखाणा तयार केला होता :-

"भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांनी घेतली उडी
*****रावांसोबत माझी अखंड राहो जोडी"

पण ऐनवेळी काहीतरी गडबड झाली अन् भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ****रावांनी उडी घेतली !

आता उखाणा तर अर्धवट राहिला पण उपस्थितांचे भरपूर मनोरंजन मात्र झालं !!

काही स्त्रियांचे पेटंट उखाणे ठरलेले असतात त्यामुळे त्यांचा गडबड-गोंधळ उडण्याचा प्रश्नच नसतो.

"(एखाद्या देवाच्या) फोटोला हार घालते वाकून
*****रावांचं नांव घेते तुमचा मान राखून"

पिढ्यानुपिढया ह्यातलं देवाचं आणि रावांचं नांव फक्त बदलतंय आणि उखाणा तसाच सदाबहार आहे !

त्याचप्रमाणे कुठल्याही प्रसंगाला साजेसा एक पर्मनंट उखाणा म्हणजे-

"मंगलकार्यात दाराला लावतात तोरण
****** रावांचं नांव घ्यायला ******चं कारण"

आता ह्यात वास्तूशांतीपासून सत्यनारायणापर्यंत आणि मंगळागौरीपासून दिवाळीपर्यंत कुठल्याही प्रसंगाचं किंवा सणाचं नांव घालून अगदी समयोचित उखाणा तयार होतो !

एखादी हौशी ललना ह्याच उखाण्यातली पहिली ओळ तशीच ठेऊन दुसरी ओळ जराशी बदलते-

\"***रावांचं नांव घ्यायला मला नाही लागत कारण"

आणि मैत्रिणींमध्ये भाव खाऊन जाते.

माझी आजी तर वीस बावीस ओळींचा मोठ्ठा उखाणा घेत असे.तिच्याकडून गाण्यातला उखाणासुद्धा मी ऐकलाय.

मला स्वतःला नवनवीन उखाणे जुळवायला आवडतात.आमच्या घराच्या वास्तुशांतीला-

"मनात होती इच्छा स्वतःची असावी वास्तू
आज झाली पूर्ण कारण ******राव म्हणाले तथास्तु!"

तर पुतण्याच्या मौन्जीच्या मुहुर्तावेळी-

"उंच निळ्या आभाळात उगवले शशी रवी
सर्वेशच्या मुंजीत *****रावांकडून मला पैठणी हवी"

असा उखाणा मी घेतलेला !

अलीकडे एक नवीन उखाणा ऐकायला मिळाला-

"बिगबॉसच्या घरात देतात रोज वेगवेगळे टास्क
***रावांना देते जिलेबीचा घास,काढा तोंडाचा मास्क!"

पुरुषमंडळी मात्र उखाणे प्रकरणात अजूनही मागासलेलीच आहेत असं मला वाटतं बरं का ! कारण "भाजीत भाजी मेथीची" आणि स्टुलावर स्टूल बत्तीस स्टूल" ह्यापलीकडे त्यांची प्रतिभा गेल्याचं माझ्या तरी पाहण्यात आलं नाही !

काही वेळा विनोदाच्या नावाखाली अतिशय आचरट आणि अश्लीलतेकडे झुकणारे उखाणे घेतले जातात.

आजच्या आधुनिक युगात मुली नवऱ्याला नावाने हाक मारतात पण त्याच मुली जेव्हा उखाण्यातून "नांव" घेतात तेव्हा त्यांच्या सलज्ज मुद्रेवरचं तेज वेगळंच भासतं!

अत्यंत शालीनपणे आणि नजाकतीने आपल्या जोडीदारावरचं प्रेम जाहीर करण्याची "उखाणे"\" ही  आपल्या विवाहसंस्कृतीमधील ही एक सुंदर परंपरा ह्यापुढेही पिढयानुपिढया चिरंतन टिकून राहणार ह्यात शंकाच नाही !!!

तुमचा आवडता उखाणा कोणता कंमेंटमध्ये जरूर सांगा.